सौभाग्य व ती! - 7 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 7

७) सौभाग्य व ती !
कशाचा तरी आवाज झाला आणि नयनला जाग आली. तिने घाबरलेल्या अवस्थेत आजूबाजूला बघितले. काही दिसत नव्हते पण अंगाचा ठणका होत होता ही जाणीव प्रकर्षाने झाली. कारण त्या रात्रीही सदाने त्याचा प्रताप दाखवलाच होता. अनेक विषारी दंश करून तो तिकडे प्रभाकडे गेला होता. सकाळ झाली म्हणजे... त्या रात्रीही विषारी प्याला तिने पचविला होता. बाहेर चांगलेच फटफटले होते. उठून कामाला लागणं भाग होते कारण मामेसासरे गेल्यापासून सासूने अंथरूण धरले होते. तिचेही सारे नयनला करावे लागे. कदाचित मामांच्या मृत्यूनंतर प्रभा-सदामधील सलगी तिला पाहवली नसेल. कदाचित लग्नानंतर सदाशिव सुधारेल ही सासूची आशा फोल ठरली असेल म्हणून ती नैराश्यावस्थेत पडूनच असायची...
नयन खोलीबाहेर आली. सरावाप्रमाणे तिचं लक्ष पिंजऱ्याकडे गेलं, नित्यक्रमच जणू! सकाळी उठून बाहेर येताच ती पोपटाला बघायची, कदाचित त्या दोघांची बंदिस्त स्थिती आणि समान दुःख त्यामागे असेल. त्यावेळीही तिचं लक्ष पिंजऱ्याकडे गेलं आणि दचकली.
'हे...हे काय? पिंजरा रिकामा? म्हणजे राघू... उडून गेला तर! सुटला बिचारा...' असं बडबडत ती न्हाणीमध्ये गेली. स्नान करून येताच नयनने चहा केला. अंथरूणावर पडलेल्या सासूपुढे कपबशी ठेवून ती चहा घेत तिथेच टेकली. 'फुर्र. . फुर्र...' चहाचे घोट वाड्यातली शांतता भंग करीत होते. चहा संपवून बशी खाली ठेवत सासू म्हणाली,
"सूनबाई, तुला माझा राग येत नाही का ग?" सासूने अचानक विचारलेल्या प्रश्नाने गोंधळलेली नयन म्हणाली,
"राग आणि तुमचा? सासूबाई, कशाचा आणि कुणाचा राग करावा हेच मला समजत नाही. राग, द्वेष या भावनांपलिकडे मी गेलेय. आता राग स्वतःवर, नशिबावर."
"नाही, सूनबाई, नाही. मी खरेच चुकले ग. एकुलता एक मुलगा म्हणून मी त्याचे लाड पुरवत गेले आणि तो माझ्या डोक्यावर केंव्हा बसला ते कळलेच नाही. कळाले तेंव्हा खूप उशीर झाला होता. परंतु त्या उशिरामुळेच सदाच्या मामांचा जीव गेला. तूही तुझ्या हक्काच्या संसारसुखाला मुकलीस. परंतु सूनबाई, तुझी चूक नसताना तू का सहन करतेस? तू का भोगतेस? थांब, मला बोलू दे. मरताना मला..."
"सासुबाई, हे काय विचित्र बोलताय? अशी भाषा बरी नाही..."
"थांब. माझे मरण मला दिसतेय. मला बोलू दे. अडवू नको. तुला काय वाटते, मला काहीच माहिती नाही? नाही, सूनबाई, नाही. तुमच्या लग्नाच्या आधीपासूनच सदशिवची प्रभासोबत चाललेली थेरं मनावर धोंडा ठेऊन मी पाहत होते. वाटले होते, एक आशा होती की, लग्न झाल्यावर तरी सद्या सुधारेल परंतु त्या चांडाळणीने काय जादू केली माहिती नाही. तुझ्यासारखी सुंदर, सोज्ज्वळ सोन्यासारखी बायको असूनही तो तिच्या पदराआड गडप होतो. रात्र रात्र तुझा छळ करतो. तुला काय वाटले, तुझ्यावर होत असलेली जबरदस्ती मला माहिती नाही? नाही, पोरी तसे नाही. मला एक न एक गोष्ट माहिती आहे. तुझ्यावर झालेले अत्याचार या कानांनी ऐकलेत. त्याच्या जखमा माझ्या हृदयावरही झाल्या आहेत. परंतु त्या नराधमासमोर का कोण जाणे माझी जीभ लुळी पडते गं. अनेकवेळा वाटलं, त्याला बोलावं, त्याची चांगली कानउघाडणी करावी. परंतु कदाचित सदावर असलेलं प्रेम प्रत्येकवेळी आडवं आलं. हो. मनात असूनही मी त्याला खडसावू शकले नाही, कारण कसाही असला तरी तो माझा मुलगा आहे. नऊ महिने पोटात वाढवलय, रक्ताचे पाणी, दूध करून त्याला जोपासलय... त्याच्या खोड्यांवर, चुकांवर नेहमीच पांघरूण घातलंय. कदाचित येथेच मी चुकले. त्या चुकीमुळे मी पराभूत अवस्थेत जगतेय. तो बिघडतोय...तुला छळतोय हे समजूनही मी त्याला बोलू शकले नाही, तिथेच माझा पराभव झाला. पण सूनबाई, तू नको सहन करू. तुला सांगते पोरी, तू अशीच गप्प राहिलीस तर तुझ्यावरही पश्चात्तापाची पाळी येईल. वेळ गेली नाही. सूनबाई, उठ. तुझे, मुलीचे आणि सदाचेही हित पहा. होय! त्या चांडाळणीच्या जाळ्यातून बाहेर पडणे यातच सदाचेही हित आहे पण ते त्याला समजत नाही. कदाचित त्याला समजतही असेल पण बाहेर पडणे जमत नसेल. पोरी, त्याला त्या मोहपाशातून सोडवून तुझा वाहवलेला, भरकटलेला संसार परत मिळव. सूनबाई, मी...मी...सासू...मीच तुझे वाट्टोळे केले. देवा,आता नाही रे पाहवत. सोन्यासारख्या पोरीची हेळसांड केली..." बोलता बोलता तिला धाप लागली. ती जोरजोराने खोकलू लागली आणि काही क्षणात शांत झाली. डोळे छताकडे वळले, स्थिरावले. एका वेगळ्याच शंकेने नयनने सासूला हलवले. तिचे शरीर थंडगार पडले होते. मोठ्याने रडावेसे वाटत असूनही नयनला रडणे येत नव्हते. मूक आसवांनी डोळ्यात गर्दी केली होती. पोपट उडाल्यामुळे रिकाम्या पिंजऱ्यावर बसून कावळा कावकाव करीत होता. वाड्याबाहेर दोन कुत्री जोरजोराने ओरडत होती. वाड्याचा दरवाजा कुणीतरी ठोठावत होतं. नयन धावतच दाराजवळ आली. दार उघडताच समोर विठा उभी होती. ती म्हणत होती,
"हाऽड, आरं हाड, फाटेफाटे दारा म्होरं कामून गवरता रे?"
"विठा, त्यांना ते तरी करता येतं ग..."
"तायसाब, फाटेच झालं का तुमचं सुरू..."
"विठाबाई, सासूबाई गेल्या गं. जा त्यांना बोलव..." शेजारच्या प्रभाच्या वाड्याकडे पाहत ती म्हणाली.
"तायसाब, काय म्हणता तुम्ही?"
"अग, सासूबाई खरेच गेल्या ग. जा पटकन बोलवून आण..." नयन पुन्हा म्हणाली. विठा त्या वाड्याकडे निघाल्याचं पाहून नयन आत शिरली...
काही वेळात रडत रडत विठा आली. पाठोपाठ सदाशिव आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत प्रभाही आली. गल्लीत समजायला वेळ लागला नाही. बाहेर गावाहून कुणी येणार नव्हतं. प्रसंगाची जाण ठेवून भावकीचं कुणीतरी पुढे झाले. नंतरचे सारे यांत्रिकपणे, सराईतपणे पार पडले. म्हातारी मेल्याचं दुःख ना सदाला होतं ना प्रभाला होतं तिथे इतरांना कसे असेल? पण नयन मात्र दुःखात बुडाली. सासू तिच्या छळाबद्दल सदाशिवला काही बोलत नसली, नयनची विचारपूस करीत नसली तरीही नयनला एक आधार होता. एक आशा होती की, सासू कधी ना कधी तिची बाजू घेऊन सदाशिवला बोलेल, त्याचे मनपरिवर्तन करेल पण ती आशाही प्रचंड निराशेत वाहून गेली...
परंपरेप्रमाणे सदाशिववर दहा दिवस घराबाहेर न पडण्याचं बंधन आलं. तोही त्यास जागला. प्रभा मात्र त्याच वाड्यामध्ये राहिली. नयन दिवसभर तिच्याच खोलीत असे. कामापुरती तिची पावले खोलीबाहेर पडत. सुरुवातीचे दोन - तीन दिवस सोडले तर नंतर सदा -प्रभा यांच्या चेष्टांना उधाण आले. म्हातारीचा अडसर दूर झाला होता. नयनचे अस्तित्व नगण्य होते. रात्री मात्र प्रभा तिच्या वाड्यात जात असे. पाचव्या रात्रीपासून पुन्हा सदाशिवचे अत्याचार सुरू झाले. आईच्या मृत्युच्या दुःखापेक्षा त्याच्या वाटेतला अडथळा दूर झाल्याचा आनंद त्या सदासह प्रभाला अधिक झाला होता. सासू गेली परंतु मरण समोर दिसल्याप्रमाणे ती स्वतःची बाजू नयनजवळ स्पष्ट करून गेली. स्वतः माता झाल्यामुळे तिला सासूची बाजू पूर्णपणे नाही परंतु काही अंशी पटली होती. त्यामुळेच तिची कीव करावी की राग करावा या द्विधा मनःस्थितीत असताना सासू वारल्याचे दुःख अधिक झाले.
सहाव्या दिवशी अण्णा भेटायला आले. भाऊंना लेकीचे सांत्वन करायलाही वेळ नव्हता. ओसरीवर बसलेल्या सदाशिवजवळ दोन क्षण थांबून, त्याला काही न बोलता ते नयनजवळ आले. त्यांना पाहताच तिला भडभडून आले. तिचा पहिला आवेग ओसरेपर्यंत अण्णा काहीच बोलले नाहीत. परंतु नंतर हळूच म्हणाले,
"झालं ते झालं. विसरून जा. स्वतःला जप, मुलीची काळजी घे. अरे, हो बाळूचे लग्न ठरलंय."
"काऽय? बाळूचे लग्न?" स्वतःचे दुःख क्षणभर विसरून ती आनंदून म्हणाली,
"केव्हा आहे?"
"आहेत अजून दोन महिने. कुणी तरी तुला न्यायला येईल." असं म्हणत अण्णा निघाले. ओसरीवर बसलेल्या जावयाची दृष्टभेट घेवून, त्याचे चकार शब्दानेही सांत्वन न करता अण्णा वाड्याबाहेर पडले...
००००