Saubhagyavati - 9 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 9

९) सौभाग्य व ती !
बाळूच्या लग्नाला निघालेल्या नयनची बस तिचे सासर सोडून माहेराकडे धावत असताना गावाशेजारी असलेली नदी नयनच्या दृष्टीस पडली. नदीचे पाणी कसे उत्साहाने, वेगाने खळाळ करीत वेगळ्याच ओढीने सागराकडे धावत होते. नयनच्या मनातील विचारही त्याच वेगाने धावत होते...
'निघताना विठाबाईला सांगायला पाहिजे होतं. तिला तस न सांगता मी निघून आले हे बरोबर झालं नाही. विठा किती जीव लावते आम्हा दोघींवर! खरेच लक्षातच आले नाही पण ती वेळ तशीच होती. खरे तर सदाला प्रभाच्या मिठीत पाहिल्यावर मी जिवंतच कशी राहिले? त्यांचा खून करण्यासाठी शिवशिवणाऱ्या हातांनी माझीच मान का तोडली नाही? जिथे मी स्वतःलाच विसरले तिथे विठा कोण? खरेच कोण लागते विठा? पाठच्या बहिणीप्रमाणे ती माझ्यावर माया का करते? जिथे कुंकवाच्या धन्याने परकं केले तिथं विठा कोण? अचानक तिला चार-पाच दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला...
जेवण झाल्यानंतर संजीवनीशेजारी पलंगावर पडलेली नयन स्वतःच्याच विचारात दंग असताना कुणीतरी खाकरले. आवाजाच्या दिशेने पाहत नयन म्हणाली,
"ये, विठा ये..."
"म्या तर आलेच. या म्हटलं तरी बी आले, न्हाई म्हन्ल तरी बी येणार."
"मी तुला नको म्हणते का? या घरात मला तुझ्याशिवाय जीवाभावाचं दुसरं कुणी आहे का?"
"हां. हां. अस्सा मस्का नग. येक सांगा, आस्स टकामका बघत कोठचा इच्चार करत होत्या?"
"काही नाही ग. आईची आठवण आली."
"ती कामून हो?"
"विशेष नाही. पण उगीच वाटलं, की आईला भेटावं. तिच्या गळ्यात पडून यांचं वागणं सांगावं..." "ताईसाहेब, येक सांगत्ये, ह्ये आयमाय काय नसते. हा तिचं पिरेम नसते आस न्हाय पर.. आस्स बगा, ती चिमणी आन् त्ये घरटं बगा..." खोलीच्या खिडकीतून दिसणाऱ्या झाडावरील चिमणीच्या घरट्याकडे बोट करत विठा म्हणाली. तिच्या बोटाच्या दिशेने पाहत नयनने विचारले,
"त्याच काय ?'
"आस्सं बगा, घरट्यात पिल्लू हाय तव्हर ती चिमणी बाहेरून दाणा, गवत आणते. वक्ताला सोत्ता खाणार न्हाई पर लेकराला भरविते. पर जव्हा ते पाखरू बाहीर पडते, उडाया शिकते तव्हा ती चिमणी सोत्ताच्याकडेच फाते. तसंच आपल्या बायकांचं असत्ये. पोरीचं लगीन होईस्तोर माय सम्द करत्ये पर जव्हा पोरीचे हात पिवळे व्हतात तव्हा त्याच मायीला वाटत्ये, पोरीचं लगीन झाल म्हंजी ती या घराची सोयरीन झाली. तिनं तिचा सौंसार फावा..."
"पण..."
"थांबा. आणिक येक सांगत्ये. मह्या बाजूच्या झोपडीत येक जोडपे राहते. लगीन लागून दोन वरीस झाले. त्यो गडी रोज राती पेवून येयाचा. बायकुला मारझोड करायचा. माराय सुरू झाला की उजडेस्तोर या पेलेली उतरेस्तोर मारायचा. पैले पैले बायकुने पेण्याला ईरोध केला केला की याच्या आंगाची आग-आग व्हायची. पिसाळल्या कुत्र्यावाणी तुटून पडायचा. हातात यील त्यानं मारायचा. शेजारची येक बाई तिला म्हणाली, 'तू जा माहेरी. मंग बग यील पाया पडत.' या बाईलाबी त्ये पटलं. तोऱ्यात गेली निघून माहेरी. तिला फाताच तिच्या मायीला बी बरं वाटलं पर त्याच मायला जव्हा मूळ घावलं तव्हा ती माय कडाडली. म्हणाली, 'तू नवऱ्याला टाकून आलीस? काय अवदसा आठवली? आग नवऱ्याच्या घरातून कायमचं बाहीर पडायचं तर त्येच्या खांद्यावरच. अग लगीन लावून डोलीत जायचं आन् आखरीला तिरडीवर निघायचं. बाळे, आता आली तशी ऱ्हाय चार दिस सोयऱ्यावाणी! तुह घर, तुही मान्स आता तीच हाईत बरं..."
"मग?" नयनने मध्येच विचारले.
"काय व्हयाचं? कान कापल्या कुत्र्यावाणी माघारी आली. पर पार बदलून..."
"म्हणजे?"
"नवरा म्हन्ला तस्सच करू लागली. त्येला सोत्ताच दारू..."
"काऽय?"
"व्हय. सोत्ताच दारू पाजू लागली. बायसाब, चार पाय पुढे जायाचं म्हल, की दोन पाय माघारी येवावं. माहेराहून आल्यावर लईच बदलली, नौरा म्हणल तस्सच करू लागली. तायसाब, त्यो बी गडीच. आठ-पंद्रा दिस जाताच...मोमबत्ती पाघळावी तसा ईरघळला. तो बी बदलला..."
"म्हणजे?"
"दोग सुकानं ऱ्हात्यात. त्येची दारू सुटलीया. येक पोरगबी झालं..."
"म्हणजे आई-बाप, पाहुणे..."
"तायसाब, पोटची पोरं म्हणून आई मदत बी करील पर किती न दी? येक मातर पक्क... फायजे तर लिवून ठिवा पाव्हणं कुणी बी डोकावणार न्हाईत."
"अग, कितीही झालं तरी मी त्यांच्या जवळच्या..."
"जवळची आणिक दूरची कुछ न्हाय. तायसाब, आमच्या झोपडपट्टीत तुमाल येक बी उंदीर घावणार न्हाई आणिक भिकारी तर कव्हाच येत न्हाई. आस्स कामून वो? सांगशाल?"
"सोप आहे, झोपडीतल्या लोकांना स्वतःच्याच पोटाचा प्रश्न मिटविताना नाकी नऊ येतात..."
"हांग आस्स! कस शाण्यावाणी बोल्ल्या. झोपडपट्टीत भाकर मिळणार न्हाई डब्बे ठणठण म्हन्ल्यावर उंद्र आन् भिकारीबी येत न्हाईत. तस्सच तायसाब, जव्हा तुमच्या सोयऱ्यास्नी समजलं की, तुमच्याजवळ आल्यावर दुकाशिवाय काय बी मिळणार न्हाई? तव्हा पाव्हणे घराम्होरून जातेल पर वाड्याकडं ढुंकूनबी फाणार न्हाईत."
"खरं आहे तुझं, विठा. पटलं. अग किती बरोबर बोललीस तू. माझं नसतं झेंगट लावून घ्यायला कोण येईल?"
"पटलं ना, तायसाब. तर आता आस्सच शान्यासारखं ऱ्हावा. तुमाला मी बार-बार सांगत्ये, तुमी जरासं झुका, पडत घ्या, आन मंग बगा. ह्या गोजिरीच उपेग घ्या. लहान्यांचं रडणं, फुगणं, हासणं भल्याभल्यांना पाझर फोडते. धनी तं लईच कोवळे हाईत. आस्स करता का, दोन-च्यार दिस त्येंना घिवून दूर कोठ तरी जा. तेथं त्येंना गुंतवा हिच्या खोड्यात आन् तुमच्या रूपात. आता काय सांगाव, तुमचं रूपडं ना भल्याभल्यांना रूंजी घालाय लावणार हाय. या रूपांचा जरासा निवध त्यांना दाखवा, मंग फा रोज आरती करतील तुमची. मंग..."
"विठा, तुला असं वाटत्ये का ग मी चूप बसते? अग, साधा प्रेमाचा कटाक्ष टाकत नाहीत ग. गावातल्या गावात सिनेमाला जावू म्हटल तर दोन-तीन वेळा असा मार मिळाला..." म्हणता-म्हणता नयन हमसू हमसूरडू लागली. विठाला काय झालं ते समजलं नाही. ती शांतपणे नयनच्या डोक्यावरून हात फिरवत ऊभी राहिली. नकळतच तिचेही डोळे भरून आले...
बस नयनच्या गावी थांबली. बसमधून उतरून ती घरी निघाली. तिच्या पायाखालचा रस्ता. काही वेळातच नयन घराजवळ पोहोचली. घरासमोर लांबच लांब हिरवागार मांडव पडला होता. तिला पाहताच कुणीतरी ओरडलं, "नयनताई आली..."
दुसऱ्याच क्षणी मांडवामध्ये शांतता पसरली. आबालवृद्ध स्थिरावले. सर्वांच्या नजरेत सहानुभूती, कीव, दया स्पष्ट जाणवत होती. कमात्याने तिच्या पायावर पाणी घातलं. ते वातावरण, झालेले थंड स्वागत नयनला खटकत होत. कुणी तिला शब्दांनी बोलले नाही. बहिणी आणि आत्यांच्या मुलांनी नयनला घेरले. काही घडलेच नाही अशा थाटात मांडवातली वर्दळ सुरू झाली.
"ताई, तू उशीर का केलास? भाऊजी आले नाहीत?" भावंडांच्या प्रश्नांनी, झालेल्या थंड स्वागताने, कुणीही आपुलकीने, पुढे होऊन संजीवनीस घेतले नाही म्हणून का इतर कारणाने तिच्या डोळ्यातून गंगा-जमुना वाहू लागल्याचं पाहून नयनभोवती जमलेली चिमुकली फौज घाबरली. कुणीतरी जाऊन मांडवात सांगितलं. तशी नयनची आई लगबगीने येऊन म्हणाली,
"सगळं ठीक आहे ना? असं..."
"म...म...मला न्यायला कुणी का..."
"अग, उद्या पाठवणारच होते..."
"सर्वांना आणलत आणि मलाच..." नयन रडत म्हणाली. झालं. पराचा कावळा उडत मांडवात गेला आणि सांगत सुटला...
"नयन रडते, गोंधळ घालते." ताबडतोब खोलीसमोर बघे जमले. आपली माणसं पाहून तिला जास्तच भडभडून आलं. तिच्या आपल्या माणसामध्ये मात्र चर्चा सुरू झाली...
"खूप त्रास आहे म्हणे हो."
"नवरा सिगारेटने जाळतो म्हणे..."
"अहो, ही पण तशीच गरम डोक्याची आहे..."
"त्यांचे म्हणे बाईशी संबंध..."
"बाई नाही हो मामी..."
"मामी की मावशी?"
"दूरची जशी मामी ना तशीच दूरच्या नात्यातली मावशी आहे म्हणे."
"घराशजारीच तिचा वाडा आहे. नवरा म्हातारा होता म्हणून पडली ह्याच्या गळ्यात..."
नैनीनेही थोडं सांभाळून घ्यायचं. माणूसच तो. घसरला असेल पाय. प्रेमाने, गोडीने घ्यावं लागतं." "अहो, पण त्याचेही चूकलेच ना..."
"ही का कमी आहे? फाड फाड बोलत असेल नवऱ्याला?"
"बस म्हणावं आता. आपल्याच हाताने कुंकू..." त्या तशा जिव्हारी लागणाऱ्या बोलांनी तिला प्रकर्षाने आठवण झाली ती... विठाबाईची!
बाळूच्या लग्नाचा थाट काय वर्णावा? लहानपणी नयन भाऊंसोबत कीर्तनाला जात असे. एका किर्तनकाराने सांगितलेली गोष्ट नयनला आठवली...
एका काळात वतनदार असलेल्या आणि नंतर उतरणीस लागलेल्या माणसाच्या घरी काही पाहुणे आलेले असतात. यजमान मोठ्या आवाजात नोकरास सांगतात,
"अरे, दोन तांबे घेऊन जा. पाहुण्यांसाठी चांगलं तूप आण..."
ते ऐकून पाहुण्यांना वाटलं, दोन तांबे तूप? व्वा! काय पाहुणा मोकळा आहे. परंतु नोकरास माहिती होते. त्याने एक तांब्या गिरवी ठेवून त्या बदल्यामध्ये दुसऱ्या तांब्यामध्ये तूप घेऊन मागच्या दाराने वाड्यात आला. अण्णा काय, भाऊ काय किंवा इतर वतनदार काय... शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःची शान, रूबाब टिकविण्यासाठी झटतात, वतनदारी थाट कायम राहावा म्हणून अण्णांनी बाळूच्या लग्नात तो भाचा असूनही भरपूर खर्च केला. कामवाल्या बायकासह सर्वांना साडीचोळी घेतली. परंतु तो वतनदारी थाट जपण्यासाठीही त्यांना स्वतःची वतनदारी गहाण टाकावी लागली होती. बाळूच्या लग्नासाठी त्यांच्या वतनदारीतील बाळूच्याच नावे असलेला तीन एकराचा तुकडा विकला गेला होता. वतनदारीची कक्षा आखडली होती...शिल्लक होता फक्त डामडौल.. कर्जात बुडालेली जमीन, बुरूज ढासळलेला वाडा चढतानाही तारेवरची कसरत करावी लागे...
००००

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED