सौभाग्य व ती! - 8 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 8

८) सौभाग्य व ती !
स्वतःचा बडेजाव, श्रीमंती, वतनदारी थाट दाखविण्यासाठी आईच्या गोडजेवणासाठी सदाशिवने गावजेवण दिले. हजारो लोक जेवले परंतु नयनच्या माहेरचे कुणी आले नाही ही गोष्ट कुणाला नाही परंतु स्वतः नयनला खटकली. अण्णा, भाऊंना त्यांच्या व्यापातून वेळ नसला तरी कुणाला तरी पाठवायला हवे होते. अण्णा कसेही का होईना तोंडदेखलं येऊन गेले पण भाऊंनी ती तसदीही घेतली नाही. सख्ख्या मुलीची सासू वारल्यानंतर लेक-जावयाची भेट घेणे हे भाऊंचे कर्तव्य होतं पण भाऊ त्या साध्या परंतु आवश्यक कर्तव्यालाही जागले नाहीत.
दोन घास घशाखाली ढकलून ती झोपली. केंव्हा झोप लागली ते तिला समजले नाही. रात्री ती जागी झाली तीच उफाळलेल्या सदाच्या प्रेमामुळे! आईच्या तेरवीच्या दिवशीही त्याने स्वतःचा हक्क बजावलाच. वासनांकिताना ना माणसे असतात, ना धर्म असतो, ना आचार विचार असतो ना कोणत्या विशेष दिनाचे औचित्य असते. स्वतःचा हक्क बजावताना दुसरी बाजू कर्तव्य असते हेही तो पार विसरला होता, नाहीतरी त्याची ती कर्तव्याची बाजू एखाद्या नाण्याप्रमाणे गुळगुळीत होती. लग्नानंतर पती-पत्नीने मिळून एकमेकांची सुख-दुःखे वाटून घ्यायची असतात. त्याला फक्त स्वतःच्याच भुकेची, स्वतःच्याच सुखाची गरज होती. तो सुखी होताना कुणीतरी म्हणण्यापेक्षा त्याची स्वतःची पत्नी दुखावते आहे, हे तो विसरत होता. शरीरसुख दोघांनाही आवश्यक असते, ते सुख एकमेकांना फुलवत, हळूवार घ्यायचे असते. मात्र या प्रकारचे शरीरसुख नयनच्या वाट्याला कधीच आले नव्हते. सदा मात्र ते सुख ओरबाडून घेत असे. त्याला हवं असलेलं शरीरसुख तिच्यासाठी मरणप्राय ठरत होतं. रोज रात्री तिला जणू रात्रीपुरता मृत्यू येत होता. दररोज सकाळी ती सधवा सतीच्या चालीने स्वतःच्या संसारामध्ये रमण्याचा प्रयत्न करीत होती. सदाशिवला जवळचे असे पाहुणे नव्हतेच. जे कुणी होते ते तसे दूरचेच. त्यांच्याशीही ना नयनच्या सासूने, ना सदाशिवने संबंध ठेवले होते. कर्तव्य म्हणून काही पाहुणे तेरवीला आले आणि त्याच सायंकाळी निघून गेले. गोड जेवणाचा बेत फार मोठ्या प्रमाणात पार पाडला म्हणजे एक प्रकारे आपण मातृ ऋणातून मुक्त झालो या जाणिवेतून एक-दोन दिवसांनतर त्याचे प्रभाकडे जाणे-येणे सुरू झाले. शेतीची कामे पूर्वीपासूनच गड्याच्या विश्वासावर चालत असत. रोज सकाळी गडी अगोदर प्रभाच्या वाड्यामध्ये जात असे. तिथे त्या दिवसाच्या कामाचे नियोजन होत असे. दोन-तीन दिवसांत एखादा गडी वाड्यामध्ये येवून नयनला काय हवं, काय नको ते विचारत असे. तिला आवश्यक वस्तू तो आणून देत असे. प्रत्येकवेळी येणाऱ्या गड्याची नजर इतकी सहानुभूतीची असे, की त्या नजरेचा सामना करणेही नयनला नकोसे होत असे. संबंध दिवस आणि रात्रीसुध्दा सदाशिव प्रभाच्या वाड्यात असे. रात्री उशिरा केंव्हा तरी वाड्याच्या मोठ्या दारावर थापा पडल्यानंतर नयन दार उघडत असे. दारात उभा असलेला यमरुपी सदाशिव तिला फरफटत आणून तिला नरकयातना, मरणवेदना देऊन पुन्हा काही क्षणात प्रभाच्या वाड्यामध्ये गडप होत असे. चोवीस तासातली त्या दोघांची ती तशी एकमेव भेट! तीही प्रचंड वेदनामयी! पाण्यात राहून माशांशी वैर नको आणि आलीया भोगासी असावे सादर या भावेनतून नयन संजीवनीकडे पाहत आपल्या मोडक्या संसाराचा गाडा कसा तरी ओढत होती. तशा वेदनामय परिस्थितीत सासूला जाऊन दीड महिना झाला आणि तिला अचानक आठवलं की, अण्णा म्हणाले होते, की दोन महिन्यात बाळूचे लग्न आहे. म्हणजे लग्न तर जवळच आलेय. तोपर्यंत पत्र, पत्रिका किंवा कुणीतरी यायला पाहिजे होते. नयनला माहेरी न्यायला माहेरचा माणूस यावयास हवा होता. आत्या, मामी, मावश्या साऱ्या आल्याच असतील परंतु तिला वाटलं का टाळलं असेल? तिला बोलवायचं नाही का? तोपर्यंत कुणी का आले नाही? बाळूचे लग्न आणि नयनला आमंत्रण नाही? छे! तसे होणारच नाही. कुणीतरी येईल. लग्नास अवधी असणार. ती नेहमीच वेगळा विचार करीत असे. आई, भाऊ तिला कसे विसरतील? केवढं मोठ्ठ त्यांचं कुटुंब. प्रत्येकाला आणायला कुणाला ना कुणाला पाठवलेच असेल. त्यामुळे तिच्याकडेही कुणी तर येणारच. तिच्या मनातल्या विचाराच्या वादळाने रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच बाहेरून 'पोस्टमन' असा आवाज आला. नयन लगबगीने बाहेर आली. पोस्टमनने टाकलेले टपाल तिने उचलले. ती लग्नपत्रिका होती. ते पाहून तिला आनंदाचे भरते आले. बाळुच्या लग्नाची पत्रिका होती. लग्न चारच दिवसांवर आले होते. ते वाचून ती मनाशीच म्हणाली,
'मला न्यायला कुणी का आले नाही? माझ्या लग्नानंतर माहेरी होत असलेले हे पहिलेच लग्न. तेंव्हा कुणी तरी मला मानाने न्यायला यायला हवे होते. अण्णा भाऊंचे हे पहिलेच जावई असताना माझ्या माहेरच्यांनी केवळ पत्रिका तीही पोस्टाने का पाठवली? इथे माझ्या घरी येऊन सदाशिवला... त्यांच्या जावयाला मानाने निमंत्रण द्यायला हवे होते. का वागले असतील हे असे?...' लगेच दुसरे मन म्हणाले,
'नसेल आले कुणी? एवढ्या साध्या गोष्टीवर आकाश-पाताळ का एक करावे? ते का परके आहेत? सारी कामे करणारे अण्णा आणि भाऊ दोघेच त्यामुळे झाले नसेल येणे. त्यात काय एवढे? चला. निघायला हवे. सदाशिवांना विचारायला हवं. त्यांनाही यायला लागेल. पण कुठे आहेत हे? असतील तिथेच....सवतीकडे. होय. ती सवतच! विठाबाई, आई आणि समाज तिला रखेली, अंगवस्त्र म्हणत असेल परंतु ती माझी सवतच आहे. खरे तर मीच रखेलीचे, अंगवस्त्राचे जीणे जगतेय...' अशा विचारात नयन प्रभाच्या वाड्याकडे निघाली. दाराजवळ जाते न जाते तोच भल मोठ्ठ मांजर आडवं गेलं. थोडे पुढे जावून ते थांबलं आणि एकाएकी जोराने रडायला लागलं. शंकित मनाने तिने वाड्यात प्रवेश केला. धुणे वाळू घालण्यासाठी बांधलेल्या ताराचे एक टोक अचानक तिच्या मंगळसुत्राला लागले. मंगळसूत्र त्यास अडकले आणि एका झटक्यात ते ओघळले, तुटले. तसे अपशकून का व्हावेत? का? का? दुःखी अंतःकरणाने पसरलेले मणी तिने जमा केले. कुठे एखादा मणी शिल्लक आहे का हे शोधत असणाऱ्या नयनला शेजारच्या बंद खोलीतून वेगळीच धुसफूस ऐकू आली. त्याचा अर्थ नयनच्या लगेच लक्षात आला. वेगळ्याच शंकेने तिला घेरले. तशी ती मनाशीच म्हणाली,
'दार बंद आहे. दारावर थाप मारावी की खिडकीतून पहावे. वेगळेच काही दिसले तर सहन होईल का?' विचारा- विचारातच शेवटी खिडकीतून डोकावले. दुर्दैवाने तिची शंका खरी ठरली. सकाळचे दहा वाजत असताना तिचा पती एका परस्त्रीच्या... स्वतःच्या मामीच्या मिठीत होता. मनाचा निर्धार करून तिने पाहिले असले आणि अपेक्षित दृश्य जरी समोर दिसत असले तरी तिच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले. तिच्या हातापायातले त्राण गेले. संतापाने ती थरथरू लागली. सीतेस स्वतःच्या कवेत घेणारी ती धरती नयनलाही प्रसन्न व्हावी. क्षणार्धात त्या धरित्रीने तिला मिठीत घ्यावे असे तिला प्रकर्षान वाटू लागले. परंतु सत्ययुगात घडणाऱ्या घटना कलियुगात थोड्याच घडणार आहेत? संतापाने धरधरत तिने आजूबाजूला पाहिलं. अंगणात एका कोपऱ्यात एक कुऱ्हाड पडलेली तिला दिसली. दार ठोकरून आत जावे आणि दोघांनाही सावरण्याची संधी न देता दोघांचेही शीर धडापासून वेगळे करावेत असा क्रांतिकारी विचार तिच्या मनात आला. संभ्रमावस्थेत ती कुऱ्हाडीच्या दिशेने धावली परंतु अचानक शक्तिपात झाल्यागत, सर्वस्व हरवल्याप्रमाणे ती खांबाला टेकून उभी राहिली. बसलेला धक्का इतका जबरदस्त होता, की तिच्या डोळ्यातील अश्रूही बाहेर आले नाहीत, जणू तेही थिजले होते. वाड्यात येताना मांजर का रडलं? मंगळसूत्र का ओघळलं? तिच्या मंगळसूत्रावर, तिच्या कुंकवावर घाला घातला जात होता. तिचे सर्वस्व, सुख कुणी तरी हिरावतेय या बाबीच्या तर त्या दोन्ही घटना प्रतीक नव्हत्या? खोलीतले वादळ शमले होते, कपड्यांची सळसळ ऐकू येत होती... दुःखी अंतःकरणाने, सर्वस्व गमावले असल्याची जाणीव, सौभाग्य लुटले गेले या भावनेने नयन बाहेर पडली...
००००