सौभाग्य व ती! - 4 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 4

४) सौभाग्य व ती !
बाळू आणि छोट्या संजीवनीसोबत नयन बसस्थानकावर उतरली. रिक्षा आणण्यासाठी बाळू गेला. नयन बाजूलाच झाडाखाली उभी राहिली. तिच्यापासून काही अंतरावर अचानक कुत्र्यांची कौंडळ लागलेली पाहून बरीच माणसे त्याची मजा लुटत होते. तो प्रकार नयनला अशुभ वाटला. 'हा प्रकार माझ्यासमोरच का? घरी काय वाढून ठेवले असेल?' अशा विचारात असताना बाळूने आणलेल्या रिक्षात बसून ती निघाली मात्र कौंडळीचा आवाज कानावर येतच होता. रिक्षा घरी पोहचली तशी नयन संजूसोबत खाली उतरली, तिचे लक्ष प्रभाच्या वाड्याकडे गेलं. दाराला भले मोठ्ठे कुलूप पाहून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिच्या वाड्याला कुलूप होते. सासू देवळात गेली असेल म्हणून तिने देवळात जावून सासूकडून चावी आणली. तोपर्यंत प्रभाचा वाडा उघडला होता. प्रभाच्या नवऱ्याने बाळूला घरात बसवून घेतले होते. तिला पाहताच नयनचे 'ते' सासरे म्हणाले, "सूनबाई, तू लवकर आलीस?"
"हो. यावे लागले." असे म्हणत नयन बाळू व संजीवनीसह घरात आली. संजूला झोपवून तिने चहा केला. चहा घेवून बाळू निघाला. नयननेही त्याला राहण्याचा आग्रह केला नाही. तिची मनःस्थिती वेगळीच होती. प्रभा घरी नाही म्हणजे काहीतरी काळेबेरे आहे. प्रभासह सदा बाहेरगावी तर गेले नसतील ना? या विचाराने तिच्या कपाळाची शीर तडातडा उडत होती. बाळूच्या पाठोपाठ ती पुन्हा प्रभाकडे आली. तिला पाहताच सासऱ्यांनी विचारले,
"काही हवे आहे का सूनबाई?" शक्य तितका संयम ठेवत नयना म्हणाली,
"मांमजी, प्रभाताई..."
"ती....ती बाहेरगावी गेलेय..." असे म्हणणारे सासरे आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत हे ओळखून तिने विचारले,
"कोणासोबत?"
"त--त--स--"
"सरळ सांगा ना, सदाशिवसोबत गेलेय म्हणून. ही थेर तुम्ही का खपवून घेता? माझ्या वडिलांच्या जागी मी तुम्हाला पाहतेय. एक नाही दोन संसार उधळताहेत आणि..."
"नाही, पोरी मी काहीही करू शकत नाही."
"पण का? प्रभा आणि सदाशिव मध्ये मामी भाच्याचे..."
"नाते आहे पण मी तिचा नावालाच नवरा आहे."
"मामंजी, एक सांगा. तुम्ही असे डोळ्यावर का कातडं घेतलं आहे? डोळे उघडे ठेवून तुम्ही हे प्रकार का सहन करता?"
"तुला कसे सांगू सुनबाई? आपल्यात असलेले नाते आडवे येतेय..."
"त्यांना नंगानाच करायला नाते आडवे येत नाही आणि..."
"सांगतो. सूनबाई सांगतो. माझ्या पहिल्या लग्नाला बारा वर्षे झाली आणि वंशाला दिवा न देता तुझी सासू हे जग सोडून गेली. वंश, नाव तर पुढे चालायला हवे ना? म्हणून मी दुसरे लग्न केले. प्रभा घरामध्ये आली. त्यावेळी मला काय ठावूक की माझ्या निर्णयाचे परिणाम मला असे भोगायला लागतील ते? वंशाला दिवा मिळावा म्हणून मी दुसरे लग्न केले आणि प्रभाने वेगळेच दिवे लावले. लग्नाच्या पहिल्या रात्री कळून चुकले की-की- मी तिचे समाधान करू शकत नाही, तिची तृष्णा शमवू शकत नाही..."
"पण...पण..."
"नाही. सूनबाई नाही. मी तिला थांबवू शकत नाही. खळखळून वाहणाऱ्या, पुरामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला बांध घालणे कुणाला जमलंय का? सध्या प्रभाची स्थिती तशीच आहे. तिला आवरणे मला शक्य नाही. माझ्या असहाय्य स्थितीचा फायदा घेवून..."
"पण मी काय करू? मी एक तरुण स्त्री आहे, गळ्यात पोरगी..."
"तुला कसं सांगू, परंतु ऐक. गैरसमज करून घेवू नको. तू प्रभापेक्षा काकणभर सरसच आहेस. तू...तू जर सदाला तुझ्या सौंदर्याच्या जाळ्यामध्ये अडकवलेस तर...तर तो नक्कीच प्रभापासून दूर जाईल आणि कदाचित तुझ्यामुळे माझा वाहवलेला संसाराचा गाडाही रूळावर येईल..." असे म्हणत त्यांनी दोन्ही हातांनी स्वतःचा चेहरा झाकून घेतला. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून शिकार करण्याच्या त्या प्रवृत्तीवर रागवावे, हसावे की त्यांची कीव करावी? या संभ्रमावस्थेत नयन वाड्याबाहेर पडली. त्याचवेळी एक घार तिला खेटून गेली. दूरवर कुठेतरी घुबडाचा आवाज येत होता. सूर्य मावळतीकडे झुकत होता...
नयन घरी परतली. पाठोपाठ तिची सासूही देवळातून आली. संजीवनीला घेत तिने विचारले, "सूनबाई, का ग लवकर आलीस?"
"का? मी लवकर आल्यामुळे तुमच्या मुलाच्या..."
"हे तू काय बोलतेस?"
"आजवर बोलले नाही, पण आज बोलते. तुम्ही यांना का बोलत नाहीत? का आवरत नाहीत?"
"काय झाल? आल्या आल्या अशी का बोलतेस?"
"सासुबाई, खूप उशिरा बोलते."
"असे कोड्यामध्ये बोलू नको. तुझ्या मनात काय खदखदतेय?"
"माझ्या मनात खदखदणारे तुम्हाला का दिसू नये? ह्यांचे रोज पिवून येणे, मला त्रास देणे, सिगारेटने जाळणे. शिवाय... शिवाय ह्यांचे आणि प्रभाचे संबंध..."
"सूनबाई, भलतेच आरोप करू नको. हे खरंय की सदा पितो, तुला त्रास देतो पण नवरा-बायकोच्या भांडणात..."
"काय? तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही? आज सिगारेटने जाळतात. उद्या रॉकेल टाकून पेटवून दिले म्हणजे? माझ्या जागी तुमची मुलगी असती तर?"
"सूनबाई, माझे चुकलेच ग. लहानपणीच त्याचा बाप गेला. सदा पोरका झाला. बापाच्या मागे त्याला सांभाळताना जरा जास्तच लाड झाले. त्याची प्रत्येक गोष्ट पुरवताना कधी त्याला शब्दाने दुखवले नाही. कदाचित त्यामुळेच तो बिघडला. पण प्रत्यक्ष मामीशी संबंध? नाही सूनबाई नाही. सासू बोलत असतानाच प्रभाच्या वाड्यातून जोरजोराने बोलण्याचे आवाज आले. आवाज स्पष्ट नसले तरी ते कोण बोलत आहेत हे दोघींनाही समजले. शिवाय प्रभा आणि तिच्या नवऱ्याच्या भांडणाचा मतितार्थ नयनने ओळखला. नयनची सासू लगबगीने तिकडे धावली. सर्वस्व गमावल्यागत् नयन पलंगावर पडून राहिली. तिच्या डोळ्यामध्ये विचारांच्या चौकार-षटकारांची आतषबाजी चालूच होती. त्यात किती वेळ गेला ते समजलेच नाही. कुणीतरी लाईट लावताच भानावर येत ती उठली. शेजारी संजीवनी झोपलेली होती. लाईटच्या प्रकाशात तिच्यासमोर उभा असलेल्या सदाशिवने विचारले,
"हे काय? तू लवकर आलीस?"
"का? माझ्या येण्यामुळे तुम्हाला अडचण झाली का?"
"नको. नयन नको. असं बोलू नको. मला क्षमा कर. पुन्हा मी कधीच दारूला स्पर्श करणार नाही. अगदी खरे बोलतो..."सदाशिव बोलत असताना नयनला जाणवले, की त्यावेळी तो प्यालेला नाही. लवकर रागात येणारी असली तरी शेवटी नयन स्त्री होती, नवमाता होती. तिने दुसऱ्याच क्षणी मनास विचारले, की ती स्वप्नात तर नव्हती ना?
"अग, मी खरेच सांगतो. आजपासून सारे बंद. फक्त तू, मी आणि आपली ही छकुली." असे म्हणत सदाशिवने झोपलेल्या संजीवनीच्या कपाळावर हलकेच ओठ टेकले. त्याच्या तशा कृतीने नयन अंतर्बाह्य रोमांचित झाली, पूर्णपणे विरघळली. मागचे सारे-सारे क्षणात विसरली. एका वेगळ्याच उत्साहात खोलीबाहेर आली. सायंकाळ होत होती. हातपाय धुवून नयनने देवाजवळ, तुळशीजवळ दिवा लावला. दररोज दिवा लावल्याबरोबर गोड आवाजात बोलणारा पोपट शांत होता. तिनं पिंजऱ्याकडे पाहिलं. पोपट निपचित पडला होता. उत्साहाने भरलेल्या नयनने स्वयंपाक केला. लग्नानंतर प्रथमच सदाशिव सायंकाळी घरी जेवला. सदामध्ये झालेला बदल नयनला प्रचंड सुखावत होता, अंतर्बाह्य फुलवत होता. कडक उन्हाळ्यांतर मृगाच्या पहिल्या सरीने पुलकित होणाऱ्या लतावेलीप्रमाणे! त्याच उत्साहाच्या भरात तिने कसे तरी दोन-चार घास पोटात ढकलले. एका वेगळ्याच उन्मादाने, अनामिक हुरहूरीने ती खोलीत शिरली. खोलीत तिच्या स्वप्नातील राजकुमार पूर्ण शुद्धीत तिची वाट पाहत होता. तिच्या वैवाहिक जीवनातील तो पहिलाच प्रसंग होता. नयनचे लक्ष पाळण्यातल्या संजीवनीकडे गेल. तिला पाहताच नयनला आनंदाचे भरते आले कारण त्या चिमुकलीचे त्या घरातील पहिले पाऊल नयनसाठी भाग्याचे ठरले होते. तिचे हरवलेले भाग्य, तिचे रूसलेले सर्वस्व संजीवनीच्या साक्षीने घरी परतले होते. दुसऱ्या अर्थाने तिचे आगमन नयनच्या वाळवंटमयी जीवनात संजीवनीच ठरले होते. पलंगावर जाण्यापूर्वी नयनने त्या गोंडस बाळाची हलकी पापी घेतली त्यात अनेक भाव होते, बरेच अर्थ दडलेले होते. नयन नव्या नवरीगत पलंगाच्या काठावर बसली. थोडा वेळ वाट पाहून सदाशिव हलकेच तिच्याकडे सरकला. अलगद तिच्या मानेवर ओठ टेकवून गदगदल्या स्वरामध्ये म्हणाला,
"का? क्षमा नाही केली?" त्याच्या स्पर्शाने मोहरलेली, कावरीबावरी झालेली आणि लग्नानंतरच्या पहिल्या प्रवासातला तो स्पर्श पुन्हा गवसल्याप्रमाणे नयन म्हणाली,
"तसे नाही..." परंतु तिचे शब्द सदाशिवच्या ओठाने आतच दाबले. त्याच्या स्पर्शाने, त्या ओढीने त्याला बिलगलेली नयन अचानक बाजूला होत म्हणाली,
"नको. नको ना.."
"अग, पण का?" तिला पुन्हा मिठीत घेत सदाने विचारले.
"अहो, तुम्हाला समजत कसे नाही, बाळ लहान आहे. मी ओली बाळंतीण आहे."सदाच्या स्पर्शाने विरघळत ती म्हणाली.
"अग, आम्ही तो ओलेपणा आमच्या ओठांनी..."
"नको ना... चांगले नसते म्हणे."
"ठीक आहे. नयन, मी तुला भरपूर त्रास दिला तरीही तू मला हे गोडुलं, सोनुलं बाळ दिलं. मी तुला एक बक्षीस देणार आहे. अर्थात त्याला बक्षीस म्हणता येणार नाही. वास्तविक ते तुझ्याकडूनच मला मिळणार आहे..."
"सांगून तर पहा. माझं स्वप्नं, माझं सर्वस्व, माझा प्राणप्रिय पती जर मला परत मिळणार असेल ना तर मी काहीही करायला तयार आहे."
"तेच तर सांगतोय ना. तुला मी हवा असेल, माझे प्रेम हवे असेल आणि यापूर्वीचा मी..."
"नको. नको. त्याचे नावही घेवू नका. फक्त आणि फक्त तुमचे प्रेम मला मिळणार असेल ना तर मी कोणतेही अग्निदिव्य करायला तयार आहे."
"बघ हं. नीट विचार कर. आता भावनेच्या भरात बोलतेस..."
"नाही हो. बदलणार नाही. मी शपथ घेवून..."
"नको, शपथ नको. हे बघ, लहानपणीच बाबा गेले आणि मला कुणाचाच धाक राहिला नाही. पैशाची कमी नव्हती. त्यामुळे मी वाहवत गेलो. नको ती व्यसनं लागली. आता सोडू म्हटलं तरी..." "राहू द्या. तुमच प्रेम मिळत असेल तर..."
"पुन्हा विचार कर. माझी सिगारेट, दारू..."
"नका सोडू. पाहता येईल पुन्हा..."
"प्रभासोबत माझे उठणे-बसणे..."
"अं...अ..."
"बघ पडलीस ना विचारात."
"नाही हो. मला माझे प्रेम मिळत असेल ना...ठीक आहे. मला तुमचे तेही मान्य आहे..."
"आणि.... आणि समज... अग तसे होणारच नाही. पण तुझे प्रेम, तुझे हक्क-अधिकार अबाधीत ठेवून मी-मी प्रभाशी केलेले लग्न..."
"माझ्यावरील प्रेमास अडथळा येणार नसेल तर तुम्ही त्या प्रभाशी खुश्शाल लग्न करा..." सदाशिवच्या प्रेमाने स्वतःस हरवून बसलेली नयन वेगळ्याच त्वेषाने म्हणाली.
"नयन, विचार कर. नंतर बदलशील, आकांडतांडव.."
"नाही. काहीही करणार नाही. करा तुम्ही दुसरे लग्न..." नयन म्हणत असताना सदाशिव गडबडीने उठून दूरदर्शन संच जवळ गेला. तिथे असलेला टेप बंद करीत म्हणाला,
"मी...मी जिंकलो..."
त्याच्या त्या वागण्याने संभ्रमात पडलेली नयनने विचारले, "म्हणजे?"
"अग, माझी आणि प्रभाची शर्यत लागली होती. तुझ्या माझ्यावरील प्रेमाची. मी म्हणालो, बाकी तर सोड पण माझी नयन मला दुसरे लग्न आणि तेही तुझ्यासोबत करायला परवानगी देईल. तिला ही कॅसेट ऐकवून शर्यतीत जिंकलेले दहा हजार रुपये घेऊन आत्ता आलोच..." सदाशिव बोलत असताना संजीवनी रडायला लागली. नयन तिला घेत असताना सदाशिव खोलीबाहेर पडला. संजीवनीला झोपवताना नयनलाही झोप लागली...
रात्री केंव्हातरी संजू रडू लागल्यामुळे नयनला जाग आली. तिने शेजारी पाहिलं. तिथे सदाशिव नसल्याचे पाहून ती मनाशीच म्हणाली, 'हे- हे कुठे आहेत? प्रभाकडे? छे छे भलताच संशय नको.' तिने संजूला पदराखाली घेतलं. त्या चिमुकल्या ओठांच्या स्पर्शाने तिच्या अंगात एक सुखानुभूती पसरली. काही क्षणानंतर तिने संजीवनीला पाळण्यात टाकलं आणि ती पुन्हा विचारांच्या स्वाधीन झाली. काही वेळाने खोलीचे दार वाजले. सदाशिव गडबडीने आत आला. नयनला जागृतावस्थेत पाहून त्याने विचारले, "तू...तू.. जागीच आहेस?"
"खूप दिवसांनी शांत झोप लागली होती. पण हे काय? तुम्ही असे वाघ मागे लागल्याप्रमाणे... साप...बिप..."
"हो ना. सापच होता. बाहेर गेलो आणि लघुशंकेला बसणार, की मोठ्ठा साप सळसळत गेला. झोप तू..." तो बोलत असताना नयन शंकित मनाने त्याच्या मिठीत शिरली. त्या स्पर्शाने मनात आलेली शंका झटकत तिने त्याच्या भरदार छातीवर डोकं ठेवलं आणि क्षणार्धात ती झोपेच्या स्वाधीन झाली...
सकाळी खोलीचे दार कुणीतरी वाजवलं. तशी नयन जागी झाली. बाहेर चक्क उजाडलं होतं. अनेक दिवसांनी ती उशिरापर्यंत झोपली होती. शेजारी सदाशिव शांत झोपला होता. त्याचा तो नवा अवतार तिला भावला. तिने अलगद त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तोवर दारावर पुन्हा थाप पडली आणि पाठोपाठ सासुचा घाबराघुबरा आवाज आला.
"ए सद्या, ऊठ लवकर उठ रे."
काहीतरी वेगळे घडले या जाणिवेने नयनने पळत जावून दरवाजा काढला तोपर्यंत सदाशिवही ऊठला. दार उघडताच सासू म्हणाली,
"सदा, जा बरे. प्रभा जोरजोराने रडत आहे..." ते ऐकून सदाशिव तीराच्या वेगाने खोलीबाहेर गेला, पाठोपाठ नयनही! दूर कुठे तरी घुबड ओरडत होते... ओसरीतल्या पिंजऱ्याकडे सवयीप्रमाणे नयनने नाहिले आणि ती दचकली... पिंजऱ्यातल्या पोपटाने चोच वासली होती. पाय नि पंख स्थिरावले होते. जणू त्या पोपटाची समाधी लागली होती....
००००