सौभाग्य व ती! - 5 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 5

५) सौभाग्य व ती !
पोपटाने वाड्याची साथ सोडली हे नयनच्या लक्षात आले. प्रभाकडे काय झाले ते पाहण्यासाठी ती तिकडे निघाली. वाड्यात प्रभा जोरजोराने रडत म्हणाली,
"बघ रे सदा तुझे मामा बोलतच नाहीत. थोडावेळापूर्वी जोरजोराने छाती चोळत छातीत दुखतंय म्हणाले आणि लगेच हे असे शांत झाले. असं कसं झाले रे?"
नयनकडे लक्ष जाताच ती पुढे म्हणाली, "कुणाची नजर लागली रे माझ्या सोन्यासारख्या संसाराला?" असे म्हणत ती जोरजोराने रडू लागली. नयनने सारे विसरून प्रभाला सांभाळले. भावकीचे लोक जमले. सदाशिवने सारी सूत्रं स्वतःकडे घेतली. तीन तासात अंत्यविधी उरकून सारे परतले. प्रभाही हळूहळू शांत झाली. त्याच सायंकाळी नयन संजीवनीला पाजत असताना सदाशिव धावतच खोलीत आला. घाईघाईने त्याने कपाट उघडले. आतमध्ये असलेल्या नोटांचे पुडके घेऊन पुन्हा त्याच घाईघाईने तो बाहेर गेला. शंकित मनाने नयनही लगबगीने बाहेर आली. ओसरीवर खुर्चीवर बसलेल्या फौजदाराच्या हातात नोटा देत सदा म्हणाला,
"घ्या साहेब. विसरून जा. मामांची कुणाशी दुश्मनी नव्हती. पन्नासपेक्षा जास्त वय होते. हार्ट अॅटॅकने गेले."
"तुम्ही म्हणताय ते ठीक आहे. अॅटॅकच तो. शिवाय कुणी तक्रारही केली नाही. जाऊ द्या. मी तरी मेलेले मुडदे कशाला जिवंत करू?" असे म्हणत फौजदार निघून गेले. सदाशिव खोलीकडे वळला. दारामध्ये नयनला पाहताच म्हणाला,
"त.. त.. तू?"
"पोलिसाला पैसे कशाला दिले?"
"चूप! तुला काही कळत नाही. मामांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल त्यांना संशय होता. पोलीसच ते संशय घेणार."
"त्यांना पैसे कशाला द्यायला हवे होते?"
"अग द्यावेच लागतात. नाही तर मामांच्या मृत्यूचा संशय घेवून ते प्रभाला अटक करणार होते. आधीच तिला केवढा धक्का बसलाय. त्यात आणखी हे एक संकट. पोलिसांना संशय फार येतात. अजून कुणावरही संशय घेतील. पराचा कावळा करतील. डोंगर पोखरतील पण उंदीर तर सापडला यातच समाधान मानतील. जाऊ दे. चल." सदाचे ते स्पष्टीकरण नयनला पटले नाही. दोलायमान स्थितीत ती खोलीत परतली आणि सदाशिव बाहेर गेला परंतु नयनची स्थिती प्रचंड वादळात सापडून समुद्राच्या मध्यभागी असलेल्या होडीप्रमाणे झाली. आदल्या दिवसापासूनचे सारे प्रसंग चलचित्रपटाप्रमाणे सरकू लागले. ती माहेरहून आल्यानंतर प्रभा-सदाशिव घरी नसणं, घरी परतल्यावर बदललेला सदा. लग्नांनतर प्रथमच उफाळून आलेले त्याचे प्रेम. नयनला लागलेली गाढ झोप. मध्यंतरीच जाग येताच शेजारी सदाशिव नसणे. काही क्षणात घाबरलेल्या सदाचे आगमन.
त्याच सायंकाळी नयनची आणि प्रभाच्या पतीची झालेली चर्चा. अपराधीपणाची जाण झालेले त्यांचे रूप. दुसऱ्याच सकाळी त्यांचा मृत्यू? घाईघाईत पार पडलेले अंत्यसंस्कार. फौजदारांस सदाशिवने लाच का द्यावी? अशा अनेक घटनांमुळे नयनच्या मनात शंकांचा डोंगर उभा राहिला. प्रभाला सदाशिवने पोलिसांपासून का वाचवले? पोलिसांना अजून कुणाचा संशय येईल अशी भीती सदाशिवास का वाटावी? आणखी कोण असेल? माय गॉड! ती दुसरी व्यक्ती सदाशिव तर नसेल? निश्चितच तोच असेल. म्हणून तो तेवढ्या घाईघाईने पैसे घेऊन गेला असणार. म्हणजे.. म्हणजे... मामंजीचा तो नैसर्गिक मृत्यू नव्हता? तो खून होता? बाप रे! त्यांचा खून झाला आणि तो-तो महाभयंकर प्रकार प्रभा आणि सदाने तर केला नाही ना? नक्कीच तसं झालंय. त्यामुळे अचानक सदाशिव बाहेर गेला. परत आल्याबरोबर दचकला त्याच कारणामुळे. एवढं प्रेम काल रात्रीच का उफाळून आले? पोलिसांना पैसे देताना तो का कापत होता? तिथे मी अचानक जाताच तो का दचकला? आणि...आणि हे सारे एका रात्रीतून घडलं नाही. ती बाळंतपणासाठी माहेरी गेली त्यावेळी प्रभा-सदा निश्चितच जवळ आले असणार. कदाचित त्या दोघांना नयनच्या सासऱ्यांनी रंगेहाथ पकडले असेल. मात्र नेहमीप्रमाणे ते व्यथित मनाने 'मूग गिळून' बसले असतील. परंतु काल दोघे बाहेर गेले असताना नयन परतली आणि नयनचे सासरे आणि नयनमध्ये चर्चा झाली. कदाचित ते त्यांच्या जिव्हारी लागलं असणार. त्यांचा स्वतःचा संसार तर उद्ध्वस्त झालाच होता. पण नयनच्या संसाराची नौका बुडू नये म्हणून त्या सायंकाळी प्रभाचा नवरा-सदा आणि प्रभा यांच्यामध्ये वाद झाला आणि मग नंतर नयनशी गोड बोलून, तिला अंधारात ठेवून, फसवून ती शांत झोपलीय हे पाहून सदा आणि प्रभाने संगनमत करून त्यांची ईहलोकीची यात्रा संपवून तो घाबरलेल्या अवस्थेत खोलीत परतला मात्र त्याचवेळी नयनला जागी पाहून त्याचं धाबं दणाणलं. पण..पण.. मग त्या रात्री नयन-सदामध्ये झालेल्या संभाषणाची टेप? काय डाव होता दोघांचा? तशा शंकित, व्यधित मनाने तिचे लक्ष आलमारीकडे गेले. कधी नव्हे त्या चाव्या आलमारीला लावलेल्या होत्या. नयनने धावत जावून आलमारी उघडली. सारे कप्पे बारकाईने शोधले परंतु रात्री त्या दोघांमध्ये झालेल्या संभाषणाची टेप कुठेही सापडली नाही. हताश झालेली नयन पलंगावर बसली. तिचं डोकं सुन्न झालं, कुणीतरी डोक्यावर घण मारतेय अशी स्थिती झाली. कुठे असेल ती टेप? प्रभासोबतच्या शर्यतीचे नाटक तर नसावे ना? काय असेल सदाशिवचे पाऊल? त्या दोघांनी संगनमताने प्रभाच्या नवऱ्याच्या रूपाने असलेला एक अडथळा दूर केला. त्यानंतर त्या दोघांच्या सुखामध्ये आडवी येणारी एकमेव व्यक्ती म्हणजे नयन. म्हणजे त्यांची त्यानंतरची योजना नयनला संपविण्याची तर नसेल ना? नाही.. नाही... तसं नसावं. सदाशिव नक्कीच बदललाय. रात्री तो किती प्रेमाने वागला....
प्रेम? नाही.. नाही ते प्रेम नव्हतंच ते नाटक होतं. 'प्रभासोबत लग्नाची परवानगी मिळविण्यासाठी केलेले अफलातून नाट्य होतं ते?' अशी नाटकं करून सदाशिव नयनचा बळी घेणार नाही कशावरून? नाही आता तिला गाफील राहून चालणार नव्हतं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवावं लागणार होतं. ती आता एकटी नव्हती तर एका चिमुकलीची आई होती. बाप रे! ते दुष्ट या-- या गोंडस जीवावर तर उठणार नाहीत ना? तसा विचार येताच नयन धावतच पाळण्याजवळ गेली. झोपलेल्या संजीवनीला पटकन उचलून तिच्या सर्वांगाचे पापे घेत तिला कवटाळत म्हणाली,
'नाही. सदाशिव नाही. तू मला वाटेल ते छळ परंतु या चिमुकलीकडे तू वाकड डोळा केलास तर...' तिच्या कवटाळण्याने गुदमरलेल्या अवस्थेत संजीवनीने भोंगा पसरला. तिच्या रडण्याने भानावर येत नयनने तिला पदराआड केले...
सायंकाळी उशिरा परतलेला सदाशिव पुन्हा पूर्वीच्याच रूपात परतला. कालचं आणि आजचं रूप? कालपासून त्या रूपावर भाळलेली नयन त्याचं ते नेहमीचे रूप पाहून पंख कापलेल्या पक्षाप्रमाणे घायाळ झाली, मनोमन विव्हळत राहिली. तिची तशी आत्मिक फडफड चालू असताना त्या सव्वा महिन्याच्या कोवळ्या बाळंतीणीवर सदाशिवने पाशवी बलात्कार केला. सताड उघड्या डोळ्यांनी तिने तो प्रसंग झेलला. रात्रभर तिचा डोळ्याला डोळा लागला नाही. उघड्या डोळ्यापुढे तिला भविष्यातला अंधार आणि त्या अंधारातला तिचा संसार दिसत होता. त्या दोघांमधल्या संबंधाला प्रेम म्हणावं? प्रेमाची वसुली तशी जबरदस्तीने करतात? प्रेमामध्ये वसुली तरी कशाची? तिथे तर दोघांनी एकमेकांना जेवढे देता येईल तेवढे प्रेम दिले पाहिजे. त्या प्रेमासाठी दोघांनीही तळमळलं पाहिजे, आसुसलं पाहिजे, कासावीस झालं पाहिजे. परंतु त्या संबंधाची आठवण येताच नयनच्या अंगावर काटा का यावा? प्रेमाने शरीर, मन शहारलं पाहिजे परंतु नयनचे मन, शरीर भीतीने का शहारते? कारण सदाशिवचे ते प्रेम नसायचे तर तो असायचा बलात्कार... रोज रात्री! होय तो बलात्कारच असायचा! शेवटी त्या रात्री धाडस करून नयन सदाला म्हणाली,
"तुम्ही आजकाल पुन्हा..."
"होऽय! मी दारू पितो. कुणाच्या बापाची नाही पीत. वर तोंड करून विचारतेस त्याच तोंडाने तू त्या रात्री 'तुम्ही दारू पिली तरी चालेल' असं म्हणाली होतीस ना? विसरली का? टेप वाजवून ऐकवू? स्साला मी ठरवतो एक आणि घडते निराळेच. आत्ताच कुठे प्रभा सावरत होती तोच त्या म्हाताऱ्यास मरण..."
"कुणाला सांगताय? मामंजी हार्टफेल होवून मेले नाहीत..."
"काय म्हणतेस? मामा, हार्टफेलने गेले नाहीत?"
"खरं तेच सांगतेय ना, ते... त्यांना मारलय, त्यांचा..."
"चूऽप हरामखोर ...त.. तुला काय म्हणायचंय?"
"मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजलंय..."
"नैने, चूऽप!..."
"तुम्हाला माझ्याच तोंडून ऐकायचं ना? मग ऐका तुम्ही आणि त्या सटवीने मिळून मामंजींना संपवलं... मारलंय... खून केलाय त्यांचा..."
"गऽप! साऽली...मला खुनी म्हणतेस? थांब. तुझा हा माज उतरवतोच..." असे म्हणत सदाने हातात येईल त्याने नयनला बडवण्यास सुरुवात केली. कशाने मारतोय, कुठे लागतेय असा विचार त्याच्या मनाला शिवलाच नाही. कदाचित नयनचा शाब्दिक वार सदाच्या वर्मी लागला असावा त्यामुळे बेभान झालेल्या सदाशिवच्या मनात एकच विचार आला की नयनला मुठीत ठेवणे भाग आहे. त्यावर उपाय म्हणजे धाकात, दाबात ठेवण्यासाठी मार आणि चोप! त्याने लगेच त्या अघोरी विचाराची अंमलबजावणी सुरू केली. त्याचा तो रौद्रावतार एवढा राक्षसी होता, की त्याच्या अत्याचारामुळे नयनच्या डोक्यातले रक्त, डोळ्यातले पाणी, नाकातील पाणी आणि बांगड्या फुटल्यामुळे मनगटातले रक्त यांचा जणू काला झाला...
००००