shankarachi bhakti books and stories free download online pdf in Marathi

शंकराची भक्ती

एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. तो शंकराचा खूप मोठा भक्त होता म्हणून त्याला सारेजण शिवभक्त महादेव याच नावाने हाक मारत असत. त्याला नंदा नावाची एक बायको होती. ती रोज या शिवभक्ताला शिव्या देत असे. कारण ही तसेच होते, शंकराच्या भक्तीशिवाय तो अन्य कोणतेच काम करायचं नाही. त्याची बायको रागात येऊन रोज ओरडत बसायची " मी एकटीच काम करू का ? संसार करायचं असेल तर काही काम बीम करावं लागेल की नुसतं ओम नम: शिवाय म्हटलं की पोट भरते का ?" तिच्या बोलण्याकडे महादेव मात्र दुर्लक्ष करायचा. त्याचे नित्य एकच काम असायचे, रोज सकाळी लवकर उठायचं आणि शिवमंदीर समोरील जागा झाडून स्वच्छ करायचे. त्यानंतर पाणी शिंपडायचे. मग घरी येऊन स्नान करायचे आणि कळशीत पाणी घेऊन मंदीराकडे निघायचं. महादेवाच्या पिंडाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा, तोंडाने ओम नम: शिवाय जप चालू ठेवायचा, तेल वाती टाकून दिवा लावायचा, घमघमाट असलेली अगरबत्ती लावायचा. चालुक्य घराण्यात बांधलेली हेमाडपंथी मंदीर होती, खूपच आकर्षक आणि सुंदर होती. महादेव देखील त्या मंदिराची अगदी उत्तमरीत्या देखभाल करत होता. म्हणून तर मंदीर आणि त्याचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत होते.
श्रावण महिन्यात तर महादेवाचे काम अजून वाढायचे. श्रावण सोमवारी महिलांची मंदिरात खूप गर्दी होत असे म्हणून तो स्वतः जातीने तेथे उपस्थित राहायचा आणि पूजा विधी करायचा. सारे महिला त्याला किती चांगला व्यक्ती आहे असे म्हणत असे शिवाय त्याच्या बायकोचे. तिला काय माहीत या पूजेचे महत्व म्हणून तो तिचे बोलणे कधीच मनावर घेत नसे. नंदासोबत लग्न होऊन पाच वर्षांचा काळ उलटला पण अजूनही त्याच्या घरात पाळणा हलला नाही म्हणून नंदा त्रागा करीत होती. प्रत्येक स्त्रीला जीवनात आई होण्याचे एक स्वप्न असते, ते पूर्ण झाले तर जीवन सफल झाल्यासारखे वाटते. आईचे ममत्व त्या पुरुषाला काय माहीत म्हणून ती रोज त्याच्यावर ओरडत असे. तिच्या या रोजच्या बोलण्याला तो देखील खूप कंटाळला होता.
एके दिवशी त्याच्या मनात आले की मी शंकराची एवढी भक्ती करतो तरी देव मला प्रसन्न का होत नाहीत. म्हणून त्याने शिवजीची आराधना करायला सुरुवात केली. भगवान शंकर खूप भोळे देव, त्यांनी शिवभक्त महादेवला प्रसन्न झाले. महादेवाने आपली करूण कहाणी सांगितली आणि एक अपत्य देण्याचे वचन मागितले. भगवान शंकर त्याची भक्ती पाहून अति प्रसन्न झाले होते म्हणून लगेच त्यांनी तथास्तु असे म्हटले पण एक अडचण देखील सांगितली की, तुला जे अपत्य मी देत आहे, ते तुझे नाव बदनाम करून टाकेल, चालेल का तुला. महादेवाने थोडा वेळ विचार केला, " पुढचं पुढं बघू, नसता ही नंदा मला जगू देणार नाही, ठीक आहे काही हरकत नाही, चालेल मला." भगवान शंकर वरदान देऊन अंतर्धान पावले.
काही दिवसांनी नंदाला एक गुटगुटीत गोंडस मुलगा जन्मला. त्याचे नाव ठेवले गोपाळ पण सारेजण त्याला गोपू किंवा गोपी या नावाने हाक मारत असत. भगवान शंकराने सांगितलेली अडचण महादेवच्या लक्षात होती, हे अपत्य त्याचे नाव बदनाम करेल. म्हणून महादेवचे गोपीवर पूर्ण लक्ष असायचे. त्याला कोठे ही बाहेर जाऊ देत नसे. मंदीरात जातांना त्याला सोबत घेऊन जात असे. त्याच्यावर भक्तीचे संस्कार व्हावे म्हणून तो गोपीला आपल्या सोबतच ठेवत होता. गोपी हळूहळू मोठा होऊ लागला. दोन चार महिने तेवढं नंदाचे तोंड बंद होते. पुन्हा पहिल्यासारखेच तिचे बोलणे सुरू झाले. गोपी हे रोज ऐकायचा, त्याच्या कानावर महादेवाचे ओम नम: शिवाय मंत्रासोबत आईचे बोलणे देखील पडायचे. माणूस खराब गोष्टी लवकर शिकतो तर चांगल्या गोष्टी शिकायला वेळ लागते. त्यानुसार आईचे बोलणे गोपी लवकरच शिकून घेतला आणि तोही तसाच बोलू लागला. आईचे वर्तन त्याच्या वर्तनात दिसू लागले. घराशेजारील मुलांसोबत त्यांचा भांडण तंटा हा रोजचा विषय झाला होता तर कुणाच्याही शेतात जायचे आणि त्या शेतात असेल ते धान्य ओरबाडून आणायचे. दुसऱ्यांच्या झाडाचे चिंचा पाडायच्या, आंबे पाडायचे हा त्याचा नित्याचा धंदा झाला होता. काम करण्यात बापावर गेला तर बोलण्यात आईवर गेला अशी गावातली मंडळी गोपीविषयी बोलायची. त्याच्या अशा वागण्याने महादेव खूपच परेशान होऊ लागला. तसे देवाने तथास्तु म्हणताना अडचण सांगितली पण त्यावर काही उपाय मात्र सांगितला नाही. विचार करून विचार करून मुलाच्या काळजीपायी महादेव दिवसेंदिवस बारीक होत चालला होता.
श्रावण महिन्याला सुरुवात झाली होती. पहिल्याच सोमवारी महादेवाच्या मंदिरात बेलफुल वाहण्यासाठी बायकांची खूप गर्दी झाली होती. त्यात जानकी नावाची एक मुलगी देखील आली होती. गेल्या कित्येक सोमवारी महादेवाने तिला मंदिरात पाहिला होता. गोपी देखील त्या जानकीला पाहून खूप खुश होत असे. तो तिला पाहण्यासाठीच मंदिरात येत असे. महादेवाने मोठ्या धाडसाने तिला म्हणाला, " जानकी, तू माझ्या गोपी बरोबर लग्न करशील का ? " यावर ती म्हणाली, " तुमच्या या सुसंस्कारी गोपी बरोबर लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर अविवाहित राहीन, पण गोपीसंगे लग्न करणार नाही" तिचे बोलणे गोपीला देखील ऐकू गेले. महादेव नाराज झाला तसा गोपी देखील नाराज झाला.
त्यादिवशी रात्री जानकीच्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि ते म्हणाले, " जानकी, तुझ्या नशिबात गोपी हाच नवरा लिहिलेला आहे, त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याची शक्ती फक्त तुझ्याजवळ आहे, काही तरी शक्कल लढव आणि गोपीला अक्कल दे " जानकी सकाळी उठली आणि मंदीराकडे पळाली. आज सोमवार नव्हता तरी जानकी मंदीरात का आली असेल म्हणून गोपी देखील मंदिराकडे पळाला. तिने मंदिरात महादेवाला गाठले आणि गोपीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचे कळविले. गोपी हे दुरून ऐकत होता. जानकीने गोपीला आपल्या जवळ बोलवून घेतलं आणि म्हणाली, " मी तुझ्यासोबत लग्न करण्यास तयार आहे, पण एका अटीवर" गोपी आतुर झाला होता, तो म्हणाला, " कोणती अट, तुझे सारी अटी मला मान्य आहेत, बोल लवकर" हे ऐकून जानकीने त्याला अट सांगितली, " तुला एक वचन द्यावे लागेल, एक वर्षभर तू कोणाला त्रास देणार नाहीस, रोज देवळात येऊन तुझ्या बाबासारखी शंकराची सेवा करावी लागेल तसेच या काळात तुझी एकही तक्रार येता कामा नये." गोपीने जानकीचे आव्हान स्वीकारले. पुढच्या श्रावण महिन्यापर्यंतचा करार ठरला.
गोपीला ते सगळं खूप कठीण चालले होते मात्र जानकीचा चेहरा डोळ्यासमोर आला की तो सारं विसरायचा. त्याच्या वागण्याने सारा गाव अचंबित होऊ लागला. महादेवला त्याच्या वर्तनात झालेला बदल म्हणजे भगवान शंकराची कृपा होय असे मनोमन वाटू लागले. तो सुद्धा मनोभावे भगवान शंकराची सेवा करू लागला. पाहता पाहता आठ-दहा महिन्यांचा काळ उलटला. गोपीच्या वर्तनात आमूलाग्र बदल झाला होता. रोज सकाळी उठून तो देवळात जात असे, तेथील साफ सफाई करून स्नान केल्यावर पूजा अर्चा करत असे. आता तर त्याने शेतात जाऊन काम करायला ही सुरुवात केली होती. त्याचे सगळे दुर्गुण हळूहळू दूर होऊ लागले. आषाढ महिन्यात तर त्याने पायी पंढरीची वारी देखील केली आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन आपल्या गावी परत आला. ठरलेल्या करारानुसार श्रावण महिन्याची सुरुवात होत असताना गोपी आणि जानकी यांचा साखरपुडा झाला. गोपीमध्ये बदल झाला म्हणून जानकी देखील विना अट त्याच्याशी लग्न करण्यास तयार झाली. भगवान शंकराची मनोभावे केलेली सोमवार व्रत कामाला आली म्हणून ती खूप आनंदात होती. येत्या दिवाळीत दोघांचे लग्न करण्याचे ठरले. महादेव आणि नंदा हे दोघेही भगवान शंकराचे मनोमनी आभार मानले.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED