मी एक साधा वेब डेव्हलपर आहे. मागील काही वर्षांपासून. त्याआधी अकौंटंट होतो. आजपर्यंत मला कधीही भूत / हडळ / खवीस / ब्रह्मराक्षस / वेताळ किंवा तत्सम व्यक्ती भेटलेल्या नाहीत. अगदी स्वप्नातही त्यांनी मला कधी दर्शन दिलेले नाही. काही वर्षांपासून मी फक्त माझ्या मनोरंजनासाठी कथा लिहितो. त्याही पूर्ण काल्पनिक असतात. त्यामुळे जर कुणाला असे वाटत असेल की मी या विषयातील जाणकार व्यक्ती आहे तर तो पूर्णपणे त्यांचा गैरसमज आहे.
आता तुम्ही म्हणाल, मी हे का सांगतो आहे? अहो आजकाल सांगावेच लागते. कोण कोणत्या गोष्टीचा कोणता अर्थ काढेल हे त्या ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही. म्हणून हे आधीच सांगावे लागते. खरं नाही वाटत? थांबा... माझा अनुभवच सांगतो.
दोन दिवसांपूर्वी मला एक फोन आला. नंबर अनोळखी होता. अनोळखी नंबर दिसले की माझा फोनवर बोलण्याचा टोन आपोआपच खूप मृदू होत असतो. कारण एकतर समोरच्या व्यक्तीवर आपण किती सभ्य आणि सुसंस्कृत आहोत याची छाप पडावी, आणि समजा एखादा घेणेकरी असेल तर तोही काहीसा शांत होऊन आपल्याशी सभ्यपणे बोलतो.
“मिलिंद जोशी बोलताय का?” पलीकडून विचारणा झाली.
“होय... बोलतोय...” मी अगदी सौम्यपणे उत्तर दिले.
“नमस्कार साहेब... मी संजय पाटील बोलतोय.” पलीकडून आवाज आला आणि मी विचारात पडलो. एकतर संजय पाटील या नावाचे किमान तीन जण तरी माझ्या मित्र यादीत आहेत. त्यापैकी हे कोण? अर्थात त्या तिघांपैकी एकाच्याही बोलण्याची पद्धत यांच्याशी जुळत नव्हती. बरे यापैकी एकही जण मला साहेब म्हणणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.
“अगदी मोठ्या कष्टाने तुमचा नंबर मिळवला मी...” मी विचारच करत होतो तेवढ्यात पलीकडून आवाज आला. म्हणजे हे माझ्या मित्र यादीतील नव्हते तर.
“ओके सर... बोला... मी आपली काय मदत करू शकतो?” त्यांनी फोन कशासाठी केला आहे हे न समजल्यामुळे मी प्रश्न केला.
“ते तर मी नंतर सांगेनच पण मला आधी सांगा... कापालिक, मुक्ती, कर्मभोग या कथा तुम्ही लिहिल्या आहेत का?” त्यांनी माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्याआधी त्यांचा प्रश्न फेकला.
“हो... मीच लिहिल्या आहेत. तुम्ही वाचल्या का? कशा वाटल्या?” मी आनंदाने विचारले. ज्या अर्थी त्यांनी माझ्या कथांची नावे उच्चारली म्हणजे नक्कीच ते माझे वाचक होते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे... कोणत्याही लेखकासाठी वाचक हाच देव असतो. तसे फेसबुकवर मला भरपूर अभिप्राय आले होते. पण त्यासाठी फोन येण्याची ती पहिलीच वेळ होती.
“वा... म्हणजे मी अगदी योग्य व्यक्तीला फोन केला तर...” त्यांच्या स्वरातून त्यांना हायसे वाटल्याचे दिसत होते.
“खूपच सुंदर लिहितात तुम्ही. अगदी अफलातून... आणि खूपच माहिती आणि अभ्यासपूर्ण...” त्यांनी अभिप्राय दिला आणि मी काहीसा चक्रावलो. चांगले लिहितो हे ठीक आहे पण अभ्यासपूर्ण? काल्पनिक कथेत कसली आलीये माहिती आणि अभ्यास? ते फक्त काही वेळापुरते मनोरंजन असते. मी हा विचारच करतच होतो तो पुढील शब्द कानावर पडले.
“अगदी जबरदस्त अभ्यास आहे तुमचा. आणि तो तुमच्या लिखाणातून लगेचच समजतो. तुम्ही अगदी पोहोचलेले असणार अशा गोष्टीत...” त्याने वाक्य पूर्ण केले आणि मी बुचकळ्यात पडलो. साला कल्पनेचे घोडे दामटायला अभ्यासाची गरजच काय? आणि त्या कथेत त्यांना अशी कोणती गोष्ट दिसली ज्यात माझा अभ्यासूपणा त्यांच्या लक्षात आला?
“सॉरी सर... पण मी नाही समजलो. ‘अशा गोष्टीत’ म्हणजे कशा गोष्टीत?” मी विचारले.
“अहो हेच की.., ते आपलं... अघोरी विद्या, काळी जादू, टोणा टोटका... अशा...” आयला..!!! मी गारच पडलो. तोंडातून एक शब्द फुटेना... १५/२० सेकंद असे शांततेत गेल्यावर परत पलीकडून आवाज आला.
“साहेब... ऐकताय ना?” पलीकडून विचारणा झाली आणि मी भानावर आलो. उगाच त्याचा जास्त गैरसमज नको म्हणून म्हटलं...
“ओ... तुम्हाला कुणी सांगितलं असं?” यावेळेस मात्र माझ्या आवाजातील मार्दव कुठल्या कुठं पळालं होतं आणि त्याची जागा घेतली होती वैतागाने.
“अहो... सांगायला कशाला पाहिजे कुणी? तुमचं लिखाणचं बोंब मारतंय ना... ओह... सॉरी... तुमच्या लिखाणातून ते अगदी स्पष्ट दिसतं असं म्हणायचं होतं मला...” पलिकडील आवाजात ठामपणा दिसत होता.
“अहो... नाही हो... एकतर अशा गोष्टींवर माझा स्वतःचा बिलकुल विश्वास नाही. मी आपलं फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी लिहिलं... त्यावेळेस जे मनात आलं ते... बसं... बाकी काही नाही.” आता माझा स्वर वैतागाचा नाही तर काकुळतीचा होता.
“खोटं नका बोलू साहेब... एकेक पूजा तुम्ही अगदी पूर्णपणे डोळ्यासमोर उभी केली. हे कुणी असंच लिहितं होय? या गोष्टी, त्याचा सखोल अभ्यास असल्या शिवाय शक्यच नाहीत.” त्याच्या या युक्तिवादावर काय बोलावं हेच मला सुचेना.
“हे पहा साहेब... मी अगदी शपथेवर सांगतो... खरंच मला यातली काहीच माहिती नाही.” मी आवाजात शक्य तितका शांतपणा आणून एकेका शब्दावर जोर देत सांगितले.
“बरं..! ऱ्हायलं..!! तुम्हाला नसंल कबूल करायचं तर मला त्यात काही प्रॉब्लेम नाहीये... ते जाऊ द्या... एक काम होतं तुमच्याकडं...” त्याने माघार घेत म्हटले. आता हा काय काम सांगतो याचा मी विचार करू लागलो...
“काम? आणि माझ्याकडं?”
“हो... तुमच्याचंकडं... आणि हे फक्त तुम्हीच करू शकता... कराल का?” त्याने काकुळतीला येऊन विचारलं.
“जर शक्य असेल तर नक्कीच करेन. आधी सांगा तर खरं...” मी अगदी मोघम उत्तर दिलं.
“आपल्याला ना.., पैशाचा पाऊस पाडायचा आहे... त्यासाठी कोंबडं... बकरु... कशाचाही बळी द्यायला तयार आहोत आपण...” त्याने हे म्हटले मात्र आणि माझे डोळे पांढरे पडायचीच वेळ आली. तुम्हाला सांगतो... मला ‘मी’ पेक्षा ‘आपण’ हा शब्द खूप आवडतो... सगळ्यांना सोबत घेणारा हा शब्द खरंच सगळ्यांनी वापरावा असं नेहमी मला वाटतं. पण आज मला त्याच्या या ‘आपण’ शब्दाची एक प्रकारची भीतीच वाटली हो...
“अहो काय बोलताय तुम्ही? हे असं कधी असतं का?” आता माझं डोकंच फिरलं. आवाजातला सौम्य पणा, शांत पणा कुठल्या कुठे गायब झाला.
“हो... मला माहिती आहे... मी बरोबर तेच बोलतोय...” त्याने तितक्याच शांतपणे उत्तर दिले.
“हे पहा... मी असलं काहीही करत नाही...”
“नाही नका म्हणू साहेब... खूप नड आहे हो मला पैशाची... असं करा... ६०% तुमचे... मला फक्त ४०% द्या... जास्त नाही पाहिजे आपल्याला...” त्याने स्वतःचे म्हणने पुढे रेटले.
“बास... खूप झाले आता... शेवटचे सांगतो... मी असले धंदे करत नाही... ठेवा फोन...” मी चिडून उत्तर दिले.
“विचार करा साहेब... काही घाई नाही... १ दीड तासाने परत फोन करतो...” त्याचा पलीकडून आवाज आला आणि मी त्यावर काही बोलण्याच्या आतच फोन कट झाला. मी पूर्ण वैतागलो होतो. तेवढ्यात माझे वडील तिथे आले.
“काय रे... कुणाचा होता फोन?”
“काही नाही हो... असाच...”
“हं... पण काय रे... तो काय लाच मागत होता का कामाबद्दल?” त्यांचा पुढचा प्रश्न... मी काय उत्तर देणार? कप्पाळ? त्यांना कोणत्या तोंडाने सांगणार होतो की तो लाच मागत नव्हता तर ६०% शेअर म्हणून मलाच लाच देण्याचा प्रयत्न करत होता म्हणून. शेवटी महत्प्रयासाने मी माझ्या रागावर नियंत्रण मिळवले.
“नाही हो... असाच होता फोन... बिगर कामाचा...” बहुतेक त्यांना वाटले असावे की मी मुद्दाम सांगत नाहीये त्यामुळे मग तेही शांत बसले.
एक तासानंतर परत त्याचाच फोन... आणि नंतर नंतर दर एक तासाने फोन येऊ लागला... तो ही वेगवेगळ्या नंबर वरून. मी पुरता भंडावलो.
तुम्हाला म्हणून सांगतो... आत्ता... अर्ध्या तासापूर्वी परत फोन वाजला. परत अनोळखी नंबर... एखाद्या वेळेस क्लाईंटचा असू शकतो म्हणून भीत भीत उचलला.
“हेल्लो...” आवाज वेगळा होता... मनात म्हंटले... चला... “तो” नाहीये... परत आवाजात मृदुता आणली.
“हेल्लो... कोण बोलतंय?”
“एं... आपण भाई बोलतोय...” आवाजही राकटच होता.
“अं... कोण भाई?” आता हा भाई कोण असावा असा विचार करून गोडीत विचारलं.
“तो... ठोकणारा भाई... आख्ख्या शहराचा भाई...” मनात म्हटले च्यायला... आपल्या लिखाणाबद्दल अजून पैसे मिळायलाही सुरुवात झाली नाही आणि भाई लोकं खंडणीसाठी फोनही करू लागले?
“चल... ते सोड... आता त्या आपल्या माणसाच्या कामाचं काय झालं ते सांग...” त्याने डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला.
“अं... कसलं काम? कोण तुमचा माणूस?” मी परत वैतागलो.
“आपला संज्या... दोन दिवसांपासून फोन करतोय त्यो आपला माणूस हाय... अन काम म्हणजे त्ये... पैशाचा पाऊस..!!!” त्याने सांगितले आणि मला घेरी येण्याचीच बाकी राहिली...
“अहो... खरंच हो... मला त्यातलं काहीच समजत नाही... शप्पथ..!!!” मी आता अगदी रडवेल्या स्वरात सांगितले...
“ते मला काय म्हाईत नाई... तुला काही जमत नसल तर ज्याला जमतं त्याला शोध आणि आपलं काम करून दे... काय? आपल्याला नाई ऐकायला आवडत नाई... समजलं? चल ठेव फोन... उद्या मी परत फोन करतो...” आणि फोन कट झाला.
आता मला प्रश्न पडला आहे... असा मांत्रिक कुठे शोधायचा? तुम्हाला कुणाला माहिती आहे का हो अशा मांत्रिकाचा पत्ता??? आता मलाच खूप गरज आहे त्याची??? प्लीज...
- घाबरलेला मिलिंद
९६५७४६२६१३