भरकटलोय आपण
सध्याच्या घडीला वाटोळं होतंय ते इतक्या बाजूंनी की सुरुवातीला कुठली बाजू घेऊन सुरुवात करायला हवी हेच कळत नाही. हल्ली एखाद्या सामान्य नागरिकाने देशात घडणाऱ्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी बद्दल लिहिलं की त्याला विरोधक किंवा समर्थक या दोन पैकी एका शब्दाने त्याला ओळख देऊन लोक मोकळे होतात. तो काय बोललाय ह्या कडे कुणी लक्षही देत नाही. मग घसरणारी अर्थव्यवस्था असेल, वाढणारी रुग्णसंख्या असेल वा राज्याच्या कोपऱ्यात आलेला पुर असेल.
अर्थव्यवस्थेचं घ्यायचं म्हंटल तर या सहा महिन्यात किती व्यवसाय सुरू होते आणि ती का घसरली हे लक्षात येईल. त्यावर ताशेरे ओढणारे असंख्य मिळतील. पण अर्थव्यवस्था बळकट करायला आपण भरतो तो कर सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. मग कर भरणाऱ्यांनीच बोलावे असा फतवा काढला तर किती बोलतील. पहायला गेलं तर देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त २.५% लोकांनी कर भरला पण अर्थव्यवस्था बुडाली ह्याला फक्त नी फक्त सरकार जबाबदार आहे असं त्यांना दिसून येत. पण सरकार सुद्धा काहीच करत नसेल असं तर नाही ना. घसरणाऱ्या अर्थव्यवस्था कारण म्हणून द्यायला काही सापडत नाही म्हणून ह्या करणीला सुद्धा देवाची करणी म्हणून उद्देशून टाकतात काही जण. त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते. वाढणारी बेरोजगारी हा त्यातलाच एक ज्वलंत प्रश्न. गेल्या सहा महिन्यात हातातली नोकरी गमावून स्वतःला त्या नैराश्या सोबत जिवंत ठेवण हाच एक मोठा पेच होता. काहींना जमलं तर काहींनी वाट सोडली.
दुसरीकडे वर आणि खाली सरकार सारख्या पक्षाचं नसेल तर त्यांची भांडणं वेगळीच. निम्म्या प्रश्नांची उत्तरं तो हे देत नाही, हा ते देत नाही अश्याच स्वरूपाची असतात. हल्ली एखाद्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला त्यांच्यात धमकच उरली नाही असं दिसून येतं, हो पण आम्हाला खुर्ची हवीच आणि बसल्यावर आम्ही जबाबदाऱ्यांपासून पळवाट कशी काढायची हे नक्की सांगू. बाकी तिकडे जनता मेली काय नि जगली काय, ह्याचा आम्हाला फक्त निवडणुकीच्या वेळी फरक पडेल, इतर वेळी फक्त आम्हाला आमच्या खुर्चीशी मतलब.
हल्ली लक्ष भटकवण्यासाठी नवीन नवीन विषयांचा आधार घेतला जातो. मग आसाम मधल्या कोळसा खाणीच्या विषयावरून लोकांचं लक्ष विचलित करायला केरळ मधल्या हत्तीचा विषय मोठ्याने वर उचण्यात आला. आजवर केरळातच काय अख्ख्या देशात प्राण्यांचा अमानुष जीव घेतल्या जातो. मग तेव्हा कसा कुणाला जाग येत नाही. सामाजिक माध्यमांवर एखादी गोष्ट Viral करायला आता पूर्वी सारखा जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे लोकांचं लक्ष हे सहजरित्या इकडून तिकडे नेल्या जाऊ शकतं.
आता सु.री.कं. ह्या तीन विषयांवरून राज्य आणि केंद्र सरकारचं भलंच झालं असं म्हणता येईल. जनतेला चुकून घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेवर किंवा वाढणाऱ्या कोविड-१९ च्या रुग्णासंख्येवर प्रश्न करायला वेळच मिळू नये तेव्हा स्वतःला पैशांकरिता विकलेल्या नाममात्र न्युज चॅनेल वाल्यांनी ह्या विषयांना चांगलंच धारेवर धरून ठेवलं. म्हणायला त्या केस संबंधी तपास करायला शासनाने लोक नेमली आहेत त्यामुळे त्यांच्या तपास होईल, ज्याला व्हायची त्याला शिक्षाही होईल. पण काही इतर विषय सुद्धा आहेतच की ज्यांवर लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
सु.री.कं. वरून दुसऱ्या राज्यातील निवडणूकी साठी तिथल्या सरकारला विषय आणि स्टार प्रचारक मिळाला. तर कुणाला रुग्णसंख्ये वरून लक्ष हटविण्यास मदत झाली आणि नाममात्र अश्या न्यूज चॅनेल वाल्यांची पोटं भरली.
राज्याच्या कोपऱ्यात असलेल्या काही जिल्ह्यांत पूर येतो तेव्हा पाहणी करून झाल्यावर सरकारने मदत करावी असं म्हणून विरोधी पक्ष आपलं काम संपवतो, तर सत्ताधीश पुराचं खापर दुसऱ्या राज्याच्या सरकारवर फोडून
स्वतः जबाबदारीतून मुक्त होतो. म्हणजे पूरग्रस्त जनतेचा वाली कुणीच नाही. मग अश्यांना निवडून देऊन लाभलं तरी काय.
असो असे अनेक विषय आपल्याला मिळतील. पण त्यावर भाष्य करण्याशिवाय आपण अजून करू तरी काय शकतो. तोंड उघडणाऱ्या व्यक्तींचा तोंड बंद कसं करायचं हे राजकारणी लोक चांगलंच जाणून आहेत, आणि त्याच करिता तर आपण त्यांना निवडून दिलंय
धन्यवाद
ना मी त्यांचा न तुमचा
एक सामान्य नागरिकच