एक प्रवास असाही shabd_premi म श्री द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक प्रवास असाही

हसेल माझ्यावर जर मी माझा प्रवास कुणाला सांगितला तर, काही नाही झाडापासून ते जमीनीपर्यंतचा प्रवास माझा.. किती असावं ते अंतर तरी...

कधी वय झालं म्हणून, हळुवारपणे हवेच्या तालावर नाचत जमिनीवर येऊन पडायचं, कुणाचा पाय पडत नाही तोवर माझ्यावर अंत्यसंस्कारच होणार नाही, अस समजायचं. तेव्हापासून निपचित पडून कुणाचा पाय पडेल म्हणून वाट बघत बसायचं...

मला वाटलं माझा एवढाच असतो प्रवास, पण एकेदिवशी एक नवीन प्रकार घडला माझ्यासोबत, एव्हाना वर्षानुवर्षे माझा चुराडा व्हायचा, माझ्या शरीराचे अगणित तुकडे वाऱ्यासंगे वाहायचे इकडून तिकडे. चोहीकडे सुबन्ध दरवळत फिरायचे ते.

पण त्यादिवशी मला कुणीतरी पायाखाली न घालता, हाताने अलगद उचलून एका ताटात ठेवलं, तसं त्या दिवशी माझं वय झालं म्हणून मी पडले नव्हते जमिनीवर, वाऱ्याच्या एका झुळकाने मला जमिनीवर आणून ठेवलं होतं. मला ताटात ठेऊन माझ्या इतर सवंगड्यांनाही माझ्यासोबत ताटात ठेवलं होतं.

मला वाईट वाटलं त्यांच्या वय सुद्धा झालं नव्हतं की त्यांना वेगळं करण्यात आलं, त्यांच्याच जन्मदात्यापासून. पुढे आमच्या सोबत काय होईल याची कल्पना तर कुणालाच नव्हती आणि येणारही कशी.. कारण सर्वजण पहिल्यांदाच ह्या प्रवासाचा आनंद घेत होते..

काही वेळात, आम्ही थेट एका मूर्तीच्या पायाशी विसावलो. तिथून आम्हाला त्या मूर्तीचा चेहराही दिसत नव्हता, त्या मूर्तीचं नाव, गाव आम्हाला कधीच कळलं नाही... आम्ही कितीतरी वेळ तिथे निपचित पडून होतो..हळू हळू आमची अंग सुकायला लागली होती, मग एक जण आम्हाला एका कचरापेटी नावाच्या डब्यात गोळा करत होता. त्यात गेल्या गेल्या इतर प्रकारच्या मृतदेहांशी ओळख झाली. मग त्याने आम्हाला बाहेर फेकून दिलं. आणि मी परत माझ्या जन्मदात्यापाशी येऊन थांबले.

दुसऱ्या दिवशी परत नवीन काहीतरी घडलं.. कुणीतरी मला उचललं, पण फक्त मलाच.. वरच्या खिशात ठेवलं. आणि तो चालू लागला, मी दूर जाताना पाहून माझ्या सवंगड्यांनी मला शेवटचा निरोप दिला, थोड्यावेळात तो एका सुंदर दिसणाऱ्या अश्या व्यक्तीसमोर एक गुडघा टेकवून उभा राहिला. आणि मला समोर धरलं. मी बुचकळ्यात पडले. सगळीकडे आता शांतताच शांतता पसरली होती.. आणि काही मिनिटांत त्या समोरच्या व्यक्तीने मला हाती घेतलं.. अश्या प्रकारे जणू माझी देवाणघेवाणच झाली...
पुढे त्या व्यक्तीने मला एका वहीत डांबूनच ठेवलं असं म्हणता येईल.. तिथे मी कायमचीच अडकले.. माझा रंग पार उतरला होता.. जीव तर गेलाच होता.. मग काही दिवस गेले आणि अचानक मला वहीतून काढून परत त्याच व्यक्तीच्या चेहऱ्यावर फेकण्यात आलं. मला समजण्यापलीकडेच होतं.. मी खाली पडल्यावर मला परत कुणी उचलले नाही... कदाचित माझे काम झाले होते तेव्हा.. मी हवेच्या झोक्याने परत माझ्या जन्मदात्यापाशी येऊन थबकले.
मला माझा नवीन वापर समजला होता. माणूस माझा असाही वापर करू शकतो हे कळलं होतं.. नवीन दिवस उजळला. सूर्यप्रकाशाची कोवळी कोवळी किरण अंगावर झेलून झाली होती. थोडयावेळाने कुणी आलं आणि मला, सोबत माझ्या काही सवंगड्यांनाही घेतलं. पुढे ती व्यक्ती एका ठिकाणी गेली. तिने आम्हाला तिच्या ओंजळीत ठेवलं होत, डोळ्यांतून पडणार पाणी आमच्यावर पडत होतं. हळू हळू ती पुढे जात होती, एका ठिकाणी थांबून तिने आम्हाला समोर फेकून दिलं.

तिच्या जवळच्या कुणाचा तरी तो मृतदेह होता. तो पुरवल्या गेला होता, कदाचित तिचं कुणी तिला सोडून गेलं होतं. तिथे आणखी लोक होते सगळेच शांत, काहींच रडणं अजून थांबलेलं नव्हतं. मला ती जागा आधीच्या ठिकानांपेक्षा बरी वाटली होती... हळू हळू गर्दी विरळ होत गेली. रात्री उशिरा तिथून जाणारी तीच होती. सगळं शांत झालं. मी ही तिथून कधीच परतली नाही. माझा प्रवास तिथेच संपला.. मंदिरा पेक्षा ही जागा मला जास्त आवडली.... का ते ठाऊक नाही...



सर्व हक्क राखीव असून. कथेचा कुठलाही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करण्याबाबत आधी परवानगी घेणे अनिवार्य.


मयुर श्री. बेलोकार
insta@shabd_premi म श्री
९५०३६६४६६४