लेडीज ओन्ली - 13 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेडीज ओन्ली - 13

|| लेडीज ओन्ली - १३ ||

( वाचकांसाठी विनम्र आवाहन -

शिरीष पद्माकर देशमुख लिखित कथासंग्रह 'बारीक सारीक गोष्टी' आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. मिळविण्यासाठी 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा किंवा वाट्सप करा. हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून देशभरात कोठेही आॅनलाईन देखील मागवू शकता.)


|| लेडीज ओन्ली ||

भाग - १३

मध्यरात्र उलटून गेली असेल. रोजच्या दगदगीने थकून भागून गेलेल्या विजयाताई शांत झोपल्या होत्या. त्यांना अगदी गाढ झोप लागली होती. अचानकच काहीतरी खडखडण्याचा आवाज झाला. त्या दचकून उठल्या. आजूबाजूला बघितलं. काहीच नव्हतं. 'मांजरी बिंजरीने उडीबिडी मारली असेल' असं त्यांना वाटलं. वरच्या बाजूला डाव्या हाताशी पाण्याचा तांब्या ठेवलेला होता. त्यांनी तो हातात घेतला. पाणी पिलं अन् पुन्हा झोपण्यासाठी आडवं होऊ लागल्या. तोच त्यांचं लक्ष बाजूच्या अंथरूणाकडे गेलं. अश्रवी आणि जेनीच्या झोपण्याची जागा. पण आता त्या दोघीही तिथे नव्हत्या. त्यांना वाटलं बाथरूमला वगैरे गेल्या असतील. इतक्यात पुन्हा तो मघाच्या सारखाच आवाज आला. न राहवून विजयाताई उठल्या. कुठे काय खुडखुडतंय याचा शोध घेऊ लागल्या. पलंगाखाली बघितलं. माळ्याकडे बघितलं. कोपऱ्यात शोधलं पण कुठेच काहीच सापडत नव्हतं. नंतर त्यांच्या लक्षात आलं की आवाज स्वयंपाक घरातून येत होता. 'उंदरं बिंदरं असतील' असा विचार करून त्यांनी त्या खुडखुडीकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आणि त्या आपल्या झोपायच्या जागी, कॉटवर जाऊन बसल्या. झोपण्यासाठी आडवं व्हायचं की त्यांच्या लक्षात आलं. पोरींना बराच वेळ लागला. काही दुखायलंय की काय? त्या विचार करू लागल्या. शेवटी न राहवून पुन्हा एकदा जागेवरून उठल्या. स्वयंपाक घराच्या मागच्या बाजूला टॉयलेट बाथरूम होतं. त्या कानोसा घेत आत गेल्या. टॉयलेटच्या दरवाजाला बाहेरून कडी लावलेली होती. फुसफुसण्याचा अन् खुडखुडीचा आवाज बाथरूममधून येत होता. विजयाताईंच्या पोटात पाय शिरले. नक्कीच पोरीचं पोटबीट दुखत असावं. त्या बाथरूमच्या दरवाजापर्यंत आल्या. त्या पोरींना आवाज देऊन काही विचारणार तोच दोघींचं हळू आवाजात फुसफुसत चाललेलं बोलणं त्यांच्या कानावर पडलं...
" व्हॉट आर यू डूईंग अश्रू... वेट.. युवर मदर विल वेकप.. "
" नो शी इज स्लीपींग... इट्स आफ्टर अ लाँग टाईम.. यू आर इन माय आर्म्स.. "
" येस डिअर... बट इट्स नॉट अ गुड टाईम.. जस्ट थिंक.. इफ युअर मदर नोज अबाऊट अस... देन व्हॉट विल हॅपन.. "
" आय डोन्ट नो... बट अॅट दीस मोमेन्ट आय जस्ट नीड यू... प्लीज.. हग मी... किस मी... "
दोघींमधला तो चेतलेल्या श्वासांचा संवाद कानावर पडला अन् विजयाताई हादरूनच गेल्या. हा काहीतरी खूप विचित्र प्रकार आहे असं त्यांना वाटू लागलं. असं काही असतं याबद्दल त्यांनी दुकानातल्या नियतकालिकांमधील लेखांमधून वाचलेलं होतं. पण हे माझ्या घरात? त्यांचा विश्वासच बसत नव्हता. 'हे सगळं खोटंय.. सगळं खोटंय..' मनातल्या मनात स्वतःशीच घोकत त्या तिथून दूर झाल्या. त्यांच्या बेडवर येऊन बसल्या. 'नाही नाही.. हे शक्य नाही... माझी अश्रवी असं काही करूच शकत नाही.. जेनी फक्त मैत्रीण आहे तिची. बाकी दोघींमध्ये दुसरा कसलाही संबंध नाही. मी ऐकलंय ते खोटंय. मला जे जाणवतंय तो भ्रम आहे.' त्या स्वतःची समजूत काढू लागल्या. बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. आपण जाग्या आहोत हे मुलींना कळू नये म्हणून त्या पटकन बिछान्यावर आडव्या झाल्या. तोंडावर पांघरूण घेऊन गुपचूप पडून राहिल्या. दोघी मुली आल्या. एकमेकींशी काहीही न बोलता आपापल्या जागेवर जाऊन झोपल्या.
विजयाताईंना वाटलं त्या दोघींमध्ये काही संवाद होईल पण नाही झाला. विजयाताईंच्या मस्तकात विचारांचं काहूर उठलं. माझी अश्रवी आणि हा असला.. इतका गलिच्छ प्रकार...? नाही नाही.. चुकतेय ती. भरकटतेय ती. मी तिला समजावलं पाहिजे. या विषयावर तिच्याशी बोललं पाहिजे. पण कसं? मी आई आहे तिची. तिच्या असल्या संबंधांवर मी कशी बोलू तिच्याशी.. मला नाही बोलता येणार.. नाही.. पण मला बोलावेच लागेल.. माझ्या लेकराचं आयुष्य मी अशारितीने उद्ध्वस्त होऊ देणार नाही.. मला तिला समजवावं लागेल. योग्य मार्ग दाखवावा लागेल... '
विजयाताई रात्रभर विचार करत राहिल्या. त्यांच्या डोळ्याला डोळा काही लागला नाही. काय बोलावं कसं बोलावं याचीच त्या मनाशी जुळवाजुळव करीत राहिल्या. त्यातच अख्खी रात्र सरली..!!
" अश्रू... तू आजपासून स्टोअर वर जायचंस बसायला.. निवडणूकीच्या कामांमुळे मला वेळ मिळत नाहीये.. तेव्हा पुढच्या काही दिवसांसाठी बुक स्टोअर सांभाळायची जबाबदारी तुझी..." सकाळी चहा पिता पिताच विजयाताईंनी वेगळाच अनपेक्षित विषय काढला.
" काय हे आई... दुकान चालवण्यासाठी फॉरेनला शिकायला पाठवलं होतंस का मला..? " अश्रवीनं हसून आईला विचारलं.
" म्हणजे? फॉरेनहून आलेल्या उच्चशिक्षित लोकांनी दुकानदारी करू नये असं लिहून ठेवलेलं आहे का कुठं? " आईचा प्रतिप्रश्न.
" नाही खरं.. पण मी जॉब करण्याच्या विचारात होते... त्यादृष्टीने इकडच्या तिकडच्या शक्यताही सर्च करतेय नेटवर... काही ठिकाणी सीव्ही पाठवलाय सुद्धा.. " अश्रवीने तिला काय करायचंय ते सांगितलं.
" अगं छानच की मग.. पण मी काय म्हणते.. जॉबचं कन्फर्म होईपर्यंत दुकान चालव की आपलं. तेवढाच व्यवहारही कळेल तुला.. " त्यांनी अश्रवीच्या कल्पनेला पाठिंबा तर दिलाच पण स्वतःची इच्छाही पुढे रेटली.
" ओके.. तू म्हणतेच आहेस तर... तुझी इलेक्शन बिलेक्शनची धावपळ आटोपेपर्यंत बसत जाईन मी दुकानात. त्यानंतर मात्र तुझं तू बघ बाई... " अश्रवीने स्पष्ट केलं.
आज राधाबाई आल्या नव्हत्या अजून. बहुधा उशीरच होणार होता त्यांना. अश्रवीचं चहापाणी होईपर्यंत जेनी अंघोळीला जाण्यासाठी सज्ज झाली होती." बघ आई.. तिकडे महिनोन्महिने अंगाला पाणी न लावणारे हे इंग्रज भारतात आले की कसे सचैल स्नानाचा आनंद घेतात.. " तिच्या या वाक्यावर जेनी खळाळून हसली. विजयाताईंचा चेहरा मात्र अतिशय गंभीर झालेला होता. जेनी 'ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिये..' हे गाणं गुणगुणत बाथरूममध्ये गेली.
" अश्रू मला तुझ्याशी काही बोलायचंय... " विजयाताई मनात खदखदत असलेल्या विषयाला वाट करून देण्याचा प्रयत्न करू लागल्या.
" हं बोल ना आई... " टेबलावर पडलेलं वर्तमानपत्र चाळत अश्रवी बोलली.
" ही जेनी... "
" हं.. जेनीचं काय? "
" काही नाही.. म्हणजे.. ती.. भारत बघायला आलीय ना इथं... " विजयाताई अडखळू लागल्या. त्यांना मनातला विषय मांडताच येत नव्हता," तर.. मग... "
" अगं ततपप काय करतेस आई..? " कोणाच्याही समोर स्पष्ट आणि परखड शब्दात व्यक्त होणाऱ्या विजयाताईंचे शब्द आज लेकीपुढे मात्र धडपडायला लागले होते. त्यांनी क्षणभर डोळे मिटून घेतले. दीर्घ श्वास घेतला आणि मनाचा हिय्या करून बोलायला सुरुवात केली.
" ही जेनी आणखी किती दिवस इथं राहणार आहे? " त्यांचा आवाज कठोर झाला होता.
" का? असं का विचारतेयस आई? " आईकडे न बघता पेपरात डोकं खुपसून अश्रवीने विचारले.
" अगं परक्याचं लेकरू ते... ते ही परदेशातलं.."
"ती स्वतः आलीय.. स्वतःच ठरवील की कधी परत जायचं ते.. "
" आणि जर तिने परत जायचंच नाही असं ठरवलं तर? "
" मग राहिल की इथेच... तुला काही प्रॉब्लेम आहे का आई? की शेकडो बायांना आधार देणाऱ्या माझ्या आईला एक मुलगी जड व्हायला लागलीय? " आता अश्रवीने पेपर बाजूला ठेवला.
" जड होण्याचा प्रश्नच नाहीये.. मी अगदी माझ्या मुलीसारखा तिचाही सांभाळ करायला तयार आहे.. पण माझी मुलगी तिला बहीण समजतेय का? हा मुख्य प्रश्न आहे. " विजयाताई मुद्द्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू लागल्या.
" का? बहीणच का समजायला हवं? मैत्रीण आहे ती माझी...आमच्यातलं नातं खूप खोल आहे... " अश्रवीनं सांगितलं .
" प्रॉब्लेम इथेच तर आहे ... नात्यांना खोली नसावी... उंची असावी बेटा.... खोल नाती खोलात घेऊन जातात..! " विजयाताईंनी उठून अश्रवीच्या खांद्यावर हात ठेवला," अश्रूबाळा, मी रात्री एक भयंकर स्वप्न बघितलं... एका मोठ्या जंगलात आपण दोघी हरवलो आहोत. दाट झाडी, वेलींची सळसळ, हिंस्र श्वापदांचे जीवाला घाम फोडणारे आवाज.. आणि अचानक तू माझा हात सोडलास... जंगलाच्या आत कुठेतरी... एका नव्याच रस्त्याने तू जायला लागलीस. मी तुला थांबवतेय.. आवाज देतेय... पण तू थांबत नाहीस... मी तुझ्यामागे धावत येतेय... अडखळते... पडते... रक्तबंबाळ होते.. अन् तू त्या जंगलात हरवून जातेस. मी मात्र एकटीच रडत बसते फक्त... अश्रू आणि रक्त ढाळीत... "
" आई... या स्वप्नाच्या आडून काय सांगायचंय तुला? "
" बाळा तू मला कधी सोडून तर जाणार नाहीस ना? "
" असं का वाटतंय आई तुला? "
" तुझं आणि जेनीचं नातं.... "
" ओह्ह... म्हणजे तुला आमच्यातल्या नात्याबद्दल लक्षात आलंय तर... " अश्रवीही उठून दूर जाऊन उभी राहिली.
" होय.. आणि मला ते आजिबात आवडलेलं नाही.. " विजयाताईंनी आपला विरोध व्यक्त केला.
" का? का आवडलं नाही तुला.. "
" अगं हा काय प्रश्न झाला? एका मुलीचे दुसऱ्या मुलीशी असले संबंध कोण स्वीकारणार आहे? "
" अच्छा.. म्हणजे जेनीऐवजी कुणा एखाद्या जॉनशी मी असे संबंध ठेवले असते तर चाललं असतं तर तुला... ते तुही स्विकारलं असतंस अन् तुझ्या सोकॉल्ड समाजानेही.. होय ना? " अश्रवीने प्रतिप्रश्न केला.
" होय... तुझ्या अशा कोणत्याही निर्णयाच्या पाठिशी मी ठामपणे उभी राहिली असते.. कारण ते किमान निसर्गाच्या विरोधात तरी असलं नसतं... "
" म्हणजे? माझ्या भावना या अनैसर्गिक आहेत असं म्हणायचंय तुला? "
" होय... "
" हे तू तुझ्या या विषयात असलेल्या अज्ञानातून बोलत आहेस आई... "
" मग तू ज्ञान दे आता मला... "
" तुला नेमका प्रॉब्लेम कशाबद्दल आहे? जेनी बाबत की तिच्या माझ्या मैत्रीबाबत...? "
" तुझ्या आणि तिच्यामधल्या अनैतिक संबंधांबाबत.. "
" अनैतिक? हे कुणी आणि कशाच्या आधारावर ठरवलं? "
" मला स्वतःला ते तसंच वाटतंय... "
" आई.. तुला समजतच नाहीये... "
" तू समजावून सांग ना मग... "
" ओके... " अश्रवीने एक दीर्घ श्वास घेतला," हे बघ आई... जेनीची अन् माझी भेट झाली.. मैत्री झाली.. माझा स्वभाव तिला आवडला, तिचा स्वभाव मला आवडला... मनं जुळली.. मैत्रीचं नातं अधिकच घट्ट झालं.. आम्हाला एकमेकींचा सहवास आवडू लागला.. आम्ही जास्तीत जास्त वेळ सोबत घालवण्याचा प्रयत्न करायला लागलो... हसायचो.. बोलायचो.. एकमेकींचा हात हातात घ्यायचो.. कधी एकमेकींना मिठी मारायचो.. आणि माझ्या लक्षात आलं की तिचा तो स्पर्श मला हवाहवासा वाटतोय... आई तुला कदाचित खोटं वाटेल पण लोकल ट्रेन आणि बसमधून प्रवास करताना काही पुरूष मुद्दामहून अंगाला स्पर्श करायचे... त्या स्पर्शाची किळस वाटायची... रूमवर गेल्यानंतर कपडे घासायच्या ब्रशने कितीदा तरी अंग घासलंय मी माझं... एकीकडे पुरूषांच्या स्पर्शाची इतकी घृणा वाटत असताना जेनीचा स्पर्श मला सुखावह वाटत होता. का ते कळत नव्हतं पण मी जेव्हा जेव्हा घाबरायचे.. जेव्हा जेव्हा तुझ्या आठवणीने अस्वस्थ व्हायचे तेव्हा तेव्हा जेनी माझा हात हातात घ्यायची... अन् धडधडणारं काळीज थरथरणारं शरीर शांत व्हायचं... मला कळत नव्हतं हे असं का व्हावं ते....पण तिच्या स्पर्शात जादू होती...माझ्या प्रत्येक धगधगत्या अस्वस्थ क्षणांना निवविण्याची ताकद तिच्या स्पर्शात होती... सुरूवातीला हवाहवासा वाटणारा तिचा स्पर्श माझ्यासाठी गरज कधी बनला ते लक्षातच नाही आलं माझ्या.. त्या स्पर्शाची सवय लागली.. अन् सवयीचं रूपांतर व्यसनात झालं.. आज आम्ही एकमेकींची मूलभूत गरज आहोत आई... " विजयाताईंनी अश्रवीचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. जरावेळ थांबून त्या आपल्या मुलीला समजावू लागल्या," हे बघ बाळा, वयाच्या या टप्प्यावर काही चुकीच्या सवयी, वाईट व्यसनं लागू शकतात. हे मीही समजून घेऊ शकते.. पण अशी वाईट व्यसनं वेळीच सोडूनही दिली पाहिजेत. नसता ती संबंध आयुष्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात... " अश्रवी अजूनही आईला तिची भुमिका पटवून देऊ शकत नव्हती...
" आणि याच प्रकारचा संबंध मी एखाद्या मुलाशी ठेवला असता तर..? "
" तरीही मी तुला असंच समजावून सांगितलं असतं... "
" आणि मला 'त्या मुलाशी लग्न करायचंय' असं म्हटलं असतं तर...? " जेनीने खूप महत्वाचा प्रश्न विचारला होता," माझ्या पसंतीच्या मुलाशी माझं लग्न लावून दिलं असतंस की नाही तू..? "
" मी अजूनही तुझ्या पसंतीच्या मुलाशीच तुझं लग्न लावून देणार आहे... " विजयाताईंनी एक आई म्हणून आपली भूमिका मांडली.
" का? अगं जर 'मला पुरूषाच्या स्पर्शाची घृणा वाटते' असं मी म्हणतेय तर.. मग तू तोच स्पर्श सहन करत राहण्याची शिक्षा मला देण्याचा विचार का करत आहेस? " अश्रवी कळवळून बोलली.
" घृणा वगैरे वाटणं ही कल्पना आहे तुझी.. एका स्त्रीचं पुरूषाशीच लग्न होत असतं.. आज जरी तू तिरस्कार वगैरे म्हणत असलीस तरी हळूहळू त्या स्पर्शाची सवय लागून जाईल तुला.. " चेहऱ्यावरची रेषाही हलू न देता अतिशय कोरडेपणाने विजयाताई बोलल्या.
" आई.. अगं तू बोलतेयस हे? " अश्रवीचा विश्वासच बसत नव्हता," अगं माणसाचं मन म्हणजे काही चुंबक नसते.. विजातीय ध्रुवांनीच आकर्षित व्हायलाच हवे असा त्रिकालाबाधित नियम मांडायला. आणि.. आणि तू मला पुरूषाच्या स्पर्शाची सवय करून घ्यायला सांगतेयस? "
" मग काय करू? " विजयाताई उसळून बोलल्या," तुझ्या या अनैसर्गिक संबंधांतून जुळलेल्या नात्याला मान्यता देऊ? तुझं आणि त्या पोरीचं लग्न लावून देऊ? " विजयाताईंचा आवाज बराच चढला होता. श्वासही वाढला होता. अश्रवी मात्र शांत होती.
" अगदी शास्त्रोक्त पद्धतीने लग्नच करून दिले पाहिजे असे काही नाही... " अश्रवीने जणू ठाम विचार केलेला होता," पण आम्ही दोघी एकत्र राहणार आहोत हे निश्चित. लोक त्याला लग्न म्हणोत, लिव इन म्हणोत की आणखी काही... "
" हा मुर्खपणा आहे अश्रवी.. अगं आपण भारतात राहतो... दोन मुलींचं लग्न ही कल्पनाच स्विकारली जाणं शक्य नाही... आणि.. मला सांग काय भवितव्य असणार आहे तुझ्या या नात्याला? तू जेनीच्या आईबापाला शिव्या घालतेस.. त्यांनी स्वार्थासाठी वेगवेगळे संसार मांडले म्हणून... तुम्ही काय वेगळं करताय? तुमच्या विक्षिप्त शरीराची विचित्र वासना भागवण्यासाठीच एकत्र येताय ना? निर्माण काय होणार आहे त्यातून ना एखादं नातं... ना कुटूंब... मग कशासाठी हा शरीरवासनेचा आंधळा खेळ अश्रू?? " विजयाताईंच्या मनात अनेक प्रश्न थैमान घालत होते .
" आंधळा खेळ आजिबात नाही आई.. अगदी डोळस.. या एका वेगळ्या नात्याच्या पायऱ्या चढताना वरच्या टोकावर पोचेपर्यंत आम्ही कमावणार आहोत आणि काय गमावणार आहोत याचा विचार अगदी पहिल्या पायरीवर असतानाच केलाय आम्ही आई... तुझं बरोबरच आहे, आपल्या देशात आमचं नातं स्विकारलं जाणार नाही. लोक शिव्या घालतील. वाळीत टाकतील. पण लोकांच्या अशा विचारांना आणि वर्तणूकीला भीक घालायची नाही या संस्काराचं बाळकडू तूच तूझ्या दुधातून पाजलंयस आई मला. भारतात आम्हाला त्रास होवू शकतो म्हणून मी तिच्याच देशात राहावं असा जेनीचा आग्रह होता. पण मला जेनीही हवी होती अन् माझी आईही..!! आणि तू या नात्याचं भवितव्य विचारलंस ना...
तुला सांगू आई... आयुष्याचं खूप छान स्वप्न रंगवलंय मी आई. तू... माझ्यावर सावली धरणारी माझी माय. तुझ्या प्रेमाच्या सावलीतच माझं अन् जेनीचं एक प्रेममय विश्व.. छान सोबत राहायचं. हसत, खेळत, आनंदात. मजेत जगायचं. सगळ्या वेदना, सगळी दुःख विसरून. आपलं तिघींचंच एक जग वसवायचं. गरजेपुरते पैसे कमवायचे. आनंद मात्र गरजेपेक्षा जास्त मिळवायचा. आणि मग कधीतरी मातृत्वाची भावना जागी होईल मनात... माझी मातृत्वाची संकल्पना खूप वेगळीय आई... मातृत्व हे स्त्रीच्या काळजात असतं. आपल्याच पोटातून खेचून काढलेल्या पिलांची माय तर ती मांजरीही असतेच की. पण भूक लागली की ती आपल्याच पिलांना खायला मागेपुढे पाहत नाही. नुसते खडक फोडून पाणी बाहेर काढलं म्हणजे तिथे तीर्थक्षेत्र निर्माण होत नाही ना आई? तो पाझर आतून असावा लागतो. स्वयंभू...! आई तुला सांगू... रस्त्यावर कुणीतरी फेकून दिलेल्या अर्भकाचा टाहो कानावर पडल्यानंतर केवळ त्या आर्त आवाजाने ज्या बाईचं ब्लाऊज भिजतं ना.. ती खरी माय...! ते खरं मातृत्व.! ते माझ्यामध्ये आहे की नाही ते माहीत नाही मला. पण मनात जेव्हा वात्सल्याचे ढग दाटून येतील तेव्हा त्या पावसात न्हाऊ माखू घालण्यासाठी मी आणीन एक छानशी परी. अनाथ आश्रमातून. मुलाला वंशाचा दिवा मानणारे आपले लोक कितीतरी पणत्या विझवतात ना आई? अशीच एखादी कुणीतरी उकिरड्यावर भिरकावलेली पणती उचलून आणूयात. तिच्यात आयुष्याची आनंदाची ज्योत चेतवूयात.. आपल्या जगण्याचे आसमंत उजळून निघेल बघ तिच्या प्रकाशात. तू कुटूंब म्हणालीस ना... माझ्या कल्पनेतलं कुटूंब हे असं आहे आई.. त्यात कुठेही पुरूष नाही... लेडीज ओन्ली..!! " बोलता बोलताच अश्रवीचा स्वर गहिवरला. विजयाताईंचे डोळे पाणावले. आपल्या लेकीचे विचार इतके प्रगल्भ झालेत याचं त्यांना कौतुक वाटत होतं अन् अभिमानही...
" हे नातं वासनेच्या आधारावर जुळलेलं नाही आई... यात वासना असली तरी.. वहीच्या पांढऱ्या शुभ्र पानावर पेनाने काढलेल्या ठिपक्याएवढी ती आहे... आहे ते प्रेम... निखळ प्रेम..!! त्या प्रेमाचंच विश्व मला वसवायचंय... त्यासाठी तू हवीयेस.. तुझे आशीर्वाद हवे आहेत.. " अश्रवीने विजयाताईंना मिठी मारली. दोघींचेही डोळे चिंब भिजले होते. एक आई आपल्या लेकराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करीत होती.
" आणि आई... मी जेव्हा कधी विचार करते की माझ्या बाबतीत हे असं का होत असावं... पुरुषाच्या स्पर्शाचा एवढा तिरस्कार का? पुरूषांबद्दलचे विचारही एवढे घृणास्पद का वाटतात मला? या प्रश्नांची उत्तरं मला तुझ्या आयुष्यात सापडतात आई... तुझ्यावर झालेल्या बळजबरीने माझं बीज रुजल्या गेलं आणि त्याचवेळी रुजल्या गेला पुरूषांबद्दलचा क्रोध, त्या नराधमांबद्दलची किळस... त्यातूनच कदाचित मी ही घडत गेले.. पुरूषांबद्दल कधी आकर्षण वाटलंच नाही गं आई.. वाटत राहिली ती घृणाच.. अन् मला वाटतं ती तुझ्या रक्तातूनच माझ्या रक्तात संक्रमित झालीय... "
" मान्य आहे... तुझ्या मनात असलेली पुरूषांबद्दलची चीड मला मान्यच आहे... खटकतंय ते स्त्रियांबद्दल तुला वाटणारं आकर्षण... " विजयाताई बऱ्याच सौम्य झाल्या होत्या.
" ते मी स्वतः निर्माण केलेलं नाहीये आई... आपोआप निर्माण झालंय... म्हणूनच तर मी या आकर्षणाला नैसर्गिक म्हणतेय. तुला ते अनैसर्गिक वाटतंय कारण तुझ्या भवतालात तुला ते बघायला मिळत नाही, बघायला मिळालेलं नाही. पण आपण न बघितलेल्या किंवा आपल्याला न पटणार्‍या गोष्टी विश्वात अस्तित्वातच नसतात असं नसतं ना आई. किंवा त्या आपल्याला मान्य नाहीत म्हणून अस्तित्वातच असू नयेत असा आग्रहही धरू शकत नाहीत ना आपण. मलाही बरेचदा असं वाटतं या जगात पुरूषच नसते तर किती बरं झालं असतं. सगळ्या स्त्रियाच. कुणाचा छळ नाही. अत्याचार नाही. कुणावर बलात्कार नाही. हुंडा नाही. त्यासाठी जाळणं नाही. अॅसिड हल्ला नाही. चेहऱ्यांचं करपणं नाही. एक सुंदर जग. स्त्रियांच्या सौंदर्य दृष्टीने सजलेलं. नाजूक. टापटीप. सुव्यवस्थित. सुंदर. किती छान असलं असतं ना आई असं जग... मी ह्या सबंध विश्वाला फक्त स्त्रियांचं घर नाही बनवू शकत. पण मी माझ्या घरात फक्त स्त्रियांचं विश्व निर्माण करू शकते... आणि मला ते करायचंय आई..! "
अश्रवी बोलत होती. विजयाताई भान हरपून आपल्या लेकराचं बोलणं ऐकत होत्या. " किती मोठी, किती शहाणी.. झालीयस गं बाळा तू." त्यांना तिच्या जगाबद्दलच्या अन् जगण्याबद्दलच्या कल्पना ऐकून कौतुक वाटत होतं.
" नाही गं आई... खूप लहान आहे मी... एका अतिभव्य वटवृक्षाच्या सावलीत वाढलेय ना... त्या झाडाच्या फांद्यांचा स्पर्शातून आलेला हा सगळा शहाणपणा आहे आई..."
" बाळा.. वडाच्या झाडाला गर्व कशाचा असतो माहितीये? आपल्याच पारंब्या आपल्यापेक्षा मोठी झाली की त्याला त्यांचा अभिमान वाटायला लागतो.... मला तुझ्या वैचारिक प्रगल्भतेचं कौतुक वाटतंय बाळा.. " विजयाताईंनी अश्रवीच्या डोक्यावर हात ठेवला. तिचं अन् जेनीमध्ये असणारं नातं अजूनही त्यांच्या मनाला पटत नव्हतं तरीही त्या नात्याबद्दल त्यांच्या मनात असणारे सगळे गैरसमज धुवून गेले होते. त्यांचा विरोधही बराचसा सौम्य झाला होता.
जेनी बाथरूममधून बाहेर आली. तीही बऱ्याच वेळेपासून मायलेकीमध्ये चाललेला संवाद ऐकत असावी. पण तिने तिच्या चेहऱ्यावरून तसं आजिबात जाणवू दिलं नाही. " और... व्हाट्स गोईंग आॅन?.. मायलेकरात?" जेनीने विचारलं.
"नथिंग.. जस्ट गप्पा टप्पा... " अश्रवीने सारवासारव केली. त्यांच्या नात्याबद्दल आईला कळलंय हे तिला जेनीला कळू द्यायचं नव्हतं.
" अरे फिर हमें भी महफिल में शामिल करवा लो... " जेनीनेही आपल्या काही माहीत आहे असं जाणवू दिलं नाही.
" चलो चलो.. हमारा तो कामपे जानेका वक्त हो गया... " विजयाताई उठल्या अन् आपली पर्स खांद्यावर अडकवून निघाल्या," अश्रू तुला दुकानावर जायचंय. लक्षात ठेव. चावी रॅकला अडकवलेली आहे. " त्यांनी जाता जाता आठवण करून दिली.
" येस मॉम... " विजयाताई घराबाहेर पडल्या," चलो जेनी डार्लिंग... टुडे आय विल टीच यू अ न्यू थिंग... "
" व्हॉट.. तुझ्या न्यू थिंग्ज मला परेशान करतात यार... " जेनीने काही वेगळाच अर्थ लावला होता.
" शट अप यार... आय अॅम टॉकिंग अबाऊट अवर दुकान.. नॉट अबाऊट दॅट... "
" ओह्ह.. सॉरी सॉरी... आय अॅम स्टील इन लास्ट नाईट्स हँग ओव्हर.. "
" ओ रिअली... "
" ओ या...!! "
" चल... बस झाले नाटकं तुझे... मला आवरू दे... वेळेवर दुकान नाही उघडलं तर आई फटके देईल... " आणि अश्रवी आपली कामं आवरू लागली.
सगळं आवरल्यानंतर दोघीही आपल्या पुस्तकांच्या दुकानात गेल्या. फॉरेनला जाण्यापूर्वी अश्रवी बरेचदा दुकान चालवायला बसायची. त्यामुळे तिला तो अनुभव होता. जेनी मात्र आज पहिल्यांदाच इंडियन बुक स्टोअर बघणार होती. आणि सोबतच इथला बाजार, रस्ते, पब्लिक.. सगळंच..! जेनीसाठी हा एक नवाच अनुभव होता. अन् अश्रवीसाठी जुन्या अनुभवाची नव्याने अनुभूती..!!


© सर्वाधिकार सुरक्षित -

© शिरीष पद्माकर देशमुख ®

{ 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
'लेडीज ओन्ली' कथामालिका कादंबरीच्या संदर्भातली सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®