लेडीज ओन्ली - 14 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेडीज ओन्ली - 14

|| लेडीज ओन्ली - १४ ||

( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन -

शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)

" लेडीज ओन्ली "

[ भाग - १४ ]

सायंकाळचे साडेचार पाच वाजले असतील. विजयाताई आज दुपारीच घरी आल्या होत्या. अश्रवी आईच्या आदेशाचं पालन करीत दुकान सांभाळायला लागली होती. आणि तेही अगदी काळजीपूर्वक. व्यवस्थित. रोज जेनी जायची तिच्यासोबत. पण त्या पत्र्याच्या दुकानातली उष्णता काही तिला सहन होत नव्हती. तिची गोरीगोमटी त्वचा लालबुंद पडायची. सगळ्या अंगाची लाही लाही व्हायची. तरीही अश्रवीला कंपनी म्हणून ती सोबत जायचीच. शेवटी आज अश्रवी रागावली. तिने जेनीला सक्तीने घरी थांबायला लावले. जेनी आज घरीच होती.
" काय वाटतं जेनी तुला?" विजयाताई कशाचेतरी फॉर्म भरत बसल्या होत्या. जेनी त्यांच्या बाजूला बसूनच कसलंसं भलं मोठं पुस्तक वाचत होती. आणि काम करता करताच विजयाताईंनी गप्पांसाठी वेगळा विषय काढला. " कशाच्या बाबतीत आई?" जेनीला कळलं नव्हतं. तिने पुस्तक बाजूला ठेवून विचारलं.
"नाही... तुझ्या अन् अश्रवीच्या नात्याबद्दल.. " आपलं काम करतच त्या बोलत होत्या.
" वी आर बेस्ट फ्रेंड्स... "
" फक्त फ्रेंड्स? "
" नो... मोअर दॅन दॅट... आमचं नातं खूप वेगळं आहे आई.... "
" नाती नुसती वेगळी असून उपयोग नसतो जेनी... ती टिकाऊही असली पाहिजेत... " समोरची कागदं उलटत त्या बोलल्या," तुमचं नातं टिकेल असं वाटतं तुम्हाला? "
" नातं टिकावं म्हणूनच मी माझा देश, मॉम डॅड सोडून अश्रुसोबत आलेय इथपर्यंत... " गहिवरल्या स्वरात जेनी बोलली," पण आमचं चुकलंच... आम्ही फक्त आमच्यापुरताच विचार करत होतो. मी अश्रुचा अन् ती माझा.. आम्ही तुमचा विचार करायला हवा होता. तुम्हाला काय वाटेल... तुम्ही आमच्या नात्याला स्विकाराल की नाही... या गोष्टींचा विचार करायला हवा होता...आम्ही एकमेकींच्या प्रेमात आंधळ्या होऊन बसलो... " जेनीने ओलावलेले डोळे पुसले," मी त्या दिवशीचं तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलंय आई... मी अश्रूवर प्रेम केलंय... मला तिला आनंदात राहताना बघायचंय... तुमच्या दोघींमध्ये वितुष्ट निर्माण करून मला माझं रिलेशन पुढे न्यायचं नाहीये.... म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय आई... "
" निर्णय? कसला निर्णय? " समोर ठेवलेले सगळे कागद बाजूला सारून विजयाताईंनी विचारले.
" आई... मी... मी लवकरच इथून जाणार आहे... परत.. माझ्या देशात..! " जेनीनं सांगितलं.
" काय? तू परत जाणार आहेस? " विजयाताई उठून जेनीजवळ आल्या," असं का म्हणतेस बाळा.. मी म्हणाले म्हणून.. "
" नो नो... तुम्ही तुमच्यावर ओढवून घेऊ नका प्लीज... " जेनी त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली," आम्ही खरोखरच आमच्या नात्याच्या आधी तुमचा विचार करायला हवा होता. तुम्हाला काय वाटेल... तुमच्या मनावर काय परिणाम होईल... याचा विचार आम्ही केलाच नाही. आम्ही फक्त आमच्या आनंदाचा विचार करत राहिलो... "
" असं नाही गं पोरी... तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे... " विजयाताई समजावण्याचा प्रयत्न करू लागल्या.
" नाही आई... तुमच्या दोघींच्या नात्यात माझ्यामुळे दुरावा आलेला मला सहन होणार नाही... मला मायलेकींच्या मायेत फूट पाडायची नाहीये... म्हणूनच... मी परत जाणार आहे... " जेनी तिच्या निर्णयावर ठाम होती. तिच्या त्या निर्धाराने बोललेल्या वाक्यावर विजयाताई काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी काहीसा विचार केला. अन् विचारले,
" तू अश्रुला सांगितलंयस का.. तुझ्या निर्णयाबद्दल? "
" नाही.. तिला कसं सांगावं याचाच विचार करतेय... " जेनी तिच्या जागेवरून उठली. खिडकीतून दूर बाहेर बघू लागली," ती सहजासहजी मला जाऊ देणार नाही... भांडण करावं लागेल... तिचं मन दुखवावं लागेल... पण मी ते करीन. नक्की करीन... "
" कशासाठी गं बाळा.... माझी चूक झाली.. मी नाही समजू शकले तुमच्यातल्या नात्याला.. मला माफ कर पोरी.. " विजयाताईंनी जेनीपुढे हात जोडले. जेनी त्यांच्या जवळ आली. गळ्यात पडली," नाही आई... गॉड कधी चुकत नसतो.. तुम्ही आमच्यासाठी गॉड आहात.. माझ्या मुळे तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब झालंय यासाठी मीच तुमची माफी मागते. अश्रुच्या प्रेमात आंधळी होऊन इथे येण्याची एक चूक केलीय मी . आता परतण्याचा घेतलेला निर्णय बदलून दुसरी चूक नाही करणार. " जेनी बाजूला सरकली. विजयाताईंचे डोळे पाणावले होते. जेनीने त्यांच्या डोळ्यातले पाणी पुसले," आणि काय फरक पडेल... थोडे दिवस त्रास होईल... एकमेकींना मिस करू आम्ही.. दुरावा छळायला लागेल.. पण होईलच की सवय हळूहळू.. असंही दोन वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात मी नव्हते.. माझ्या आयुष्यात ती नव्हती... तरीही आम्ही जगत होतोच की.. या दोन वर्षांत आमचं आयुष्य बदलून गेलंय हे खरंच.. जगणं समृद्ध झालंय हेही खरंच... या दोन वर्षांच्या सहवासाच्या सुंदर आठवणींवर इथून पुढचं आयुष्य जगत राहू... आणि आयुष्य शिकवतंच माणसाला.. प्रत्येक परिस्थितीत जगायला.... " विजयाताई पुन्हा एकदा निःशब्द झाल्या.
' पोरींनो... कुठून आलं गं इतकं शहाणपण तुमच्यात? तुमच्या नात्यातला देहनिष्ठेचा अंश मला पटत नाहीये हे खरंच... पण तेवढा एक डाग सोडला तर किती स्वच्छ आहे गं नातं तुमचं... मलाच करंटीला ते समजून नाही घेता आलं... खरंच माफ करा पोरींनो मला... ' असं बरंच काही त्यांना बोलायचं होतं. शब्द अगदी ओठाशी येऊन थांबले होते. पण नाही बोलल्या त्या. बोलण्याची इच्छा असूनही असं बोलता न येणं जीवाला गुदमरून टाकतं. त्यांचाही श्वास कोंडल्यागत झाला होता.
' टिंग टाँग ' दारावरची बेल वाजली. जेनीने जाऊन दार उघडले. राधाबाई होत्या.
"ओह.. वेलकम राधामावशी... " जेनीने त्यांचे स्वागत केले.
" ठांकु ठांकु जेनाबाई... " राधाबाई हसत घरात आल्या," आज नाय गेल्या व्हय मित्रीणीसंगं बुक ष्टोरावर...?"
" राधाबाई? आता ह्या वेळेला कशी काय वाट वाकडी केलीत? " विजयाताईंनी विचारले.
" सहीजच... कामं धामं आवरले व्हते... अन् आज बजाराचा दिस.. मनलं काही हेजीटेबलं आणून द्याचे आसले तर बघावा.. मनूनशान चक्कर टाकली... बाकी काही इशेस न्हाई... " विजयाताईंच्या नजरेला आपली नजर न भिडवता इकडे तिकडे बघत राधाबाई उत्तरल्या.
" अहो बरं झालं आलात तुम्ही... भाजीपाला आणायचाच होता आज..." विजयाताईंनी पैसे काढण्यासाठी आपल्या पर्समध्ये हात घातला, "पण... तुम्ही तेवढ्यासाठी आलाय असं नाही वाटत मला.. काही अडचण आहे का राधाबाई?" विजयाताई राधाबाईंना खूप चांगलं ओळखत होत्या. मागच्या सात आठ वर्षात केवळ मोलकरीण म्हणून नाही तर एक जिवाभावाची मैत्रीण म्हणून दोघींचं नातं घट्ट झालं होतं. राधाबाईंचा चेहरा बघूनच त्या काहीतरी अडचणीत आहेत हे विजयाताईंनी ओळखलं.
" आता तुमच्यापासून काय लपवावा बाईसायब... दादल्याची तब्येत बिघडलीया... हासपिटलात नेलतं ... लिवर का काय असतंय ते सुजलं मनले डाकदर...आप्रीशन करावा लागतंया... " राधाबाईंनी डोळ्याला पदर लावला," जितं जितं काम करते तितं जाऊन काही तडजोड व्हतीया का ते बघत व्हते.. काही जणायनी देतो मनले.. काहींनी नगदी देले.. काहीजण न्हाईच मनले... सताठ थावजंड झालेत जमा... आखरीच्याला तुमच्या कडं... "
" किती खर्च लागेल म्हणालेत डॉक्टर? " विजयाताईंनी विचारलं.
" पन्नासेक लागतेल... "
" माझ्याकडे आत्ता हे पाच हजार रुपये आहेत.. तेवढे घेऊन जा... खरंतर या इलेक्शनमुळे नाही म्हटलं तरी पैसा खर्च होतोच आहे.. तरीही उद्या सकाळपर्यंत मी तुम्हाला आणखी दहा हजार रुपये देते... " विजयाताईंनी पर्समधून पाच हजार रुपये काढून राधाबाईंच्या हातावर ठेवले. " लय उपकार झाले बाईसायब तुमचे.. " राधाबाईंनी विजयाताईंचे पायच धरले.
" अरे अरे... काय करताय राधाबाई तुम्ही हे? " विजयाताईंनी त्यांना उठवून त्यांच्या खांद्यावर हात ठेवला," तुम्ही माझ्या घरातल्या सदस्यांपैकी एक आहात.. मी तुम्हाला कधीच परकं समजत नाही.. तुमच्यावरचं संकट ते माझ्यावरचं संकट.. "
राधाबाईंचे डोळे भरून आले. त्या विजयाताईंच्या गळ्यात पडून रडू लागल्या," सांभाळा.. राधाबाई स्वतःला... काही होणार नाही किसनरावांना... काळजी करू नका... प्रसंग कितीही गंभीर असला तरी तुम्ही खंबीर राहायला हवं... तुमच्या कुटुंबाचा मजबूत आधारस्तंभ आहात तुम्ही... एकटीच्या बळावर चार पोरी अन् दारूडा नवरा सांभाळायला खूप मोठी धडपड करावी लागते .. ती खूप जबाबदारीने करताय तुम्ही...! " विजयाताईंनी त्यांना समजावलं," आणि आता मला भाजीपाला आणून द्या... "
" वक्के वक्के.. " राधाबाईंनी पदराने डोळे पुसले," लगेच निघते.. " हातातले पैसे ब्लाऊजमधल्या पर्समध्ये ठेवून त्यांनी पर्स पुन्हा झंपरात खोसली.
" मी येऊ राधामावशी तुमच्या सोबत? " घरी बसून कंटाळलेल्या जेनीने विचारले..
" आवो कशाला जेनाबाई.. उगंच दगदग तुमची? "
" येऊ द्या राधाबाई... अशीही घरी बसून बोअर झालीय ती आज.. " विजयाताईंनीही परवानगी दिली.
" येस्स..!! " जेनी खुश. राधाबाईंनी बाजारासाठीच्या दोन पिशव्या अन् विजयाताईंकडून पैसे घेतले. त्या आणि जेनी दोघी घराबाहेर पडल्या.
विजयाताई विचारात पडल्या. एकाबाजूने जेनीने इथून जाणंच योग्य आहे असं त्यांना वाटत होतं. तर दुसऱ्याच क्षणी एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन मैत्रीणींची, दोन जीवांची आपण ताटातूट करतोय हा विचारही त्यांच्या मनात सलत होता. अनेक संकटांच्या प्रसंगी ठाम भूमिका घेणाऱ्या विजयाताईंना आज समोर उद्भवलेल्या परिस्थितीत आपण नेमकी काय भुमिका घ्यावी हेच कळत नव्हतं. त्या द्विधा मनस्थितीत अडकल्या होत्या. खूप विचार करूनही कोणत्याही निर्णयाप्रत त्यांना पोचता येत नव्हतं. माणसाचं मन जेव्हा एखादा निर्णय घेण्यास अक्षम ठरतं तेव्हा तो निर्णय काळावर सोपवून द्यावा हेच खरं..!!

© सर्वाधिकार सुरक्षित -

© शिरीष पद्माकर देशमुख ®


{ 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
'लेडीज ओन्ली' कथामालिका कादंबरीच्या संदर्भातली सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®