|| लेडीज ओन्ली - १९ ||
( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन -
शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)
" लेडीज ओन्ली "
|| एकोणीस ||
" बोला विजयाताई बोला...आपल्याच मुलीशी संबंध ठेवताना लाज कशी वाटली नाही तुम्हाला... उत्तर द्या.. बोला.. " टेबलावर दोन्ही हात आपटत निकिता मोठमोठ्याने ओरडत होती. तिच्या आवाजाने विजयाताई भानावर आल्या..
" नाही... हे खोटंय सगळं.. मी राजकारणात येऊ नये असं काही लोकांना वाटतं... त्यामुळे त्यांनी माझ्याविरुद्ध रचलेला बदनामीचा कट आहे हा... " विजयाताईंनी तेवढ्याच जोरकसपणे उत्तर दिलं.
" विजयाताई म्हणतात हा राजकीय कट आहे... त्यांचा रोख तुमच्याकडे दिसतोय शारदाताई.. " निकिताने शारदाताईंकडे चर्चा वळवली.
" मी? मी कशाला करू कटबिट? मी मागच्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहे... यांच्यासारखे पावसाळी बेडूक राजकारणात येतात अन् जातातही.. आम्ही काल राजकारणात होतो, आज आहोत आणि उद्याही राहूत. निवडणूका जिंकण्यासाठी अशा फडतूस अन् भिकार डावपेचांची आम्हाला गरज नाही...कोणाच्याही बदनामीचा गुलाल मला माझ्या विजयाच्या मिरवणुकीत उधळायचा नाहीये... विजयाताई ही परिस्थितीशी अविरत झगडा देत पुढे आलेली स्त्री आहे. मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांचं व्यक्तीगत आयुष्य असं चव्हाटय़ावर आणण्याचं घाणेरडं कारस्थान मी करूच शकत नाही... " शारदाबाईंनी दमदारपणे त्यांची बाजू मांडली.
" या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही असं म्हणताहेत शारदाताई... बरं या अशा प्रकारच्या स्त्रीने स्त्रीशी, पुरूषाने पुरूषाशी संबंध प्रस्थापित करण्याबाबत तुमची काय भुमिका आहे ? " निकिताचा प्रश्न.
" भुमिका? अहो पण मी म्हणते, अशा थर्ड ग्रेड नाटकांत भुमिका करायच्याच कशाला, " शारदाताईंमधला राजकारणी जागा झाला होता," अहो आम्ही खूप साधे भोळे लोक आहोत हो.. आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगून ठेवलंय की नर आणि मादी या भिन्न लिंगी प्राण्यांमध्ये लैंगिक संबंध असतात. आम्ही त्याचीच घोकंपट्टी करत पुढे आलो आहोत. बाकी वासनांध लोकांनी कुणाच्या शरीराशी चाळे करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांची निर्लज्ज आवड समाजाला बिघडवून टाकणार असेल तर आम्ही समाजहितासाठी उठून उभे राहणार अन् अशा संस्कार भ्रष्ट लोकांना विरोध करणार म्हणजे करणारच...! "
" शारदाताईंनी आपली भूमिका मांडली आहे.. आता मी वर्तकबाईंकडे जातेय.. अनुजाताई, तुमचं काय मत आहे? " निकिताचा प्रश्न.
" भर चौकात नागडे करून फटके द्यायला पाहिजेत अशा नालायकांना.. " वर्तकबाई उसळून बोलल्या," या शारदाबाई करत असलेला विरोध हा बेगडी आहे.. त्यांच्या सत्तास्पर्धेतून तो आलेला आहे. आम्ही मात्र या प्रकाराविरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. कारण हा प्रश्न दिसतो तितका साधासुधा नाही. या नालायक मायलेकींमधल्या घाणेरड्या नात्याच्या आडून पाश्चात्य विचारांनी बरबटलेल्या मनोविकृत लोकांना आपल्या संस्कृतीवर हल्ला चढवायचा आहे. त्यांच्या गलिच्छ 'फ्री सेक्स' संस्कृतीला आमच्यावर लादण्याचा त्यांचा विचार आहे. आपला देश कोणता, आपली संस्कृती कोणती याचं भानदेखील राहिलेलं नाही यांना... पाश्चात्य संस्कृती यांच्या डोक्यात इतकी भिनलीय की आई मुलीचं पवित्र नातंही विसरून गेल्या ह्या? अशा संस्कृती भ्रष्ट लोकांना या देशातून हाकलून लावले पाहिजे...आमच्या संस्कृती सभ्यतेवरचे हे नग्न हल्ले आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत... संस्कृती रक्षक मंच या वासनांध बाईच्या हलकट कृत्याचा तीव्र निषेध करत आहे...! "
" वर्तकबाईंच्या भावना अतिशय तीव्र आहेत... हे खरंय की आपल्या देशाच्या घटनेनं देशाच्या प्रत्येक नागरिकाला विचारांचं, अभिव्यक्तीचं, वर्तनाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे.. पण या स्वातंत्र्याचा स्वैराचार होतोय का? तेच समजून घेण्यासाठी मी आता जाणार आहे.. डॉक्टर खिरे यांच्याकडे... खिरेमॅडम, एक मानसोपचारतज्ज्ञ आणि एलजीबीटी समूहाचा अभ्यास करून त्यांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या एक चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत . मॅडम, तुम्ही या प्रकरणाकडे कसं बघता? " निकीताने चर्चेचा विषय पुढे सरकवला.
" मला वाटतं यांची मुलगी लेस्बियन असण्यात काहीच वावगं नाही. फक्त स्त्री - पुरुष यांच्यामध्येच आकर्षण आणि संबंध असतात ही थेअरी आता कालबाह्य झाली आहे. आणि हे जे पाश्चात्यांचं अंधानुकरण वगैरे म्हणताहेत ते तितकंसं खरं नाही. कुणीही कुणाच्या आंधळ्या किंवा डोळस अनुकरणातून गे किंवा लेस्बियन होऊ शकत नाही. निसर्गात जशी वनस्पती प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते तशाच प्रकारची ही मानवातील लैंगिक विविधता आहे असे म्हणता येईल. सर्वसाधारणपणे दोन भिन्न लिंगींमध्ये परस्पर लैंगिक आकर्षण असतं. पण हा आपण संकेत समजला पाहिजे. नियम नाही. काही जणांमध्ये निसर्गतःच समलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असू शकते. सगळं जग आता हे वास्तव स्विकारायला लागलंय. आपणही हे सत्य स्वीकारण्याच्या दिशेने वाटचाल करतोय.. पण आपल्यावर झालेले संस्कार आणि आपल्या परंपरा, रीतिरिवाजांचा पगडा अजूनही आपल्या विचारांवर असल्यामुळे हे नवं वास्तव स्विकारायला वेळ लागतोय. मला वाटतं कुणाही स्त्रीची किंवा पुरूषाची लैंगिक भावना 'ही अशी आणि अशीच, आम्ही म्हणतो तशीच' असली पाहिजे असा हट्ट कुणीही धरू नये.. व्यक्ती तितक्या प्रकृती हे सत्य आपण स्विकारलं पाहिजे. यांची मुलगी लेस्बियन असेल तर यात ना यांचा काही दोष आहे... ना त्या मुलीचा.. " खिरे मॅडमांनी आपले विचार मांडले.
" म्हणजे तुम्ही पर्यायाने आई मुलीतल्या संबंधांचं समर्थन करताय का खिरे मॅडम? " निकीताने प्रश्न उपस्थित केला.
" आजिबात नाही... मी फक्त तिच्या लेस्बियन असण्याबद्दल माझं मत मांडलंय... जर ती मुलगी किंवा तिची आई एकमेकींशी शरीरसंबंध ठेवत असतील तर याहून लांच्छनास्पद, घृणास्पद दुसरं काहीच नाही... जर तसं असेल तर पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या मायलेकींचा मी तीव्र निषेध करत आहे.. " खिरे मॅडम बोलल्या.
" खोटंय हे... खोटंय सगळं... हा गलिच्छ आरोप खोटा आहे... " विजयाताई मध्येच ओरडून बोलल्या.
" हे खरं आहे.. " निकिता तेवढ्याच मोठ्या आवाजात ओरडली," आमच्याकडे पुरावे आहेत. तुमच्या घरातल्या प्रत्येक काळ्या कृत्याचे अन् बेशरम वक्तव्यांचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे...मी माझ्या न्यूजरूमला विनंती करीन की त्यांनी ते व्हिडिओ महाराष्ट्राला दाखवावेत... प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की अशा पद्धतीच्या चर्चा अन् निर्लज्ज संवाद ऐकण्याचे संस्कार या महाराष्ट्रावर झालेले नाहीत. त्यामुळे टीव्ही समोर, आपल्या आजूबाजूला आपली मुलं बसलेली असतील तर ह्या व्हिडिओ क्लिप्स बघताना त्यांना बाहेर पाठवा... खरं तर आम्हालाही हे सगळं दाखवण्याची लाज वाटतेय. पण एक जबाबदार पत्रकार म्हणून हे काळंकुट्ट वास्तव समाजासमोर मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि अतिशय शरमेने आम्ही आमचं हे कर्तव्य पार पाडत आहोत... तुम्ही बघा हा व्हिडीओ.."
विजयाताईंच्या घरात त्यांच्यामध्ये अन् अश्रवीमध्ये झालेल्या संवादाच्या काही क्लिप्स पडद्यावर झळकू लागल्या.
" ठीक आहे... तुझे जेनीशी असलेले संबंध मला मान्य आहेत... स्विकारलं.. तुझ्या शरीराचं वास्तव मी स्विकारलं.. तुझ्या शरीर वासना अन् गरजांचं सत्य मी स्विकारलं... अश्रवी, माझ्यामध्ये तू तुझ्या जेनीला पाहशील...? "
हे संवाद अन् एकमेकींना मीठी मारणाऱ्या मायलेकी.. असं तुटक तुटक दृश्य टीव्हीवर वारंवार दाखवलं जाऊ लागलं.
" काय अर्थ आहे विजयाताई याचा? खोटं आहे का हे सगळं? " निकिताचे प्रश्न धडाडू लागले.
" होय खोटंच आहे... तुम्ही लावताय तसा अर्थ नाहीये त्याचा... अन् माझ्या घरात, माझ्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा हक्क कुणी दिला तुम्हाला? " आता विजयाताईही चिडल्या होत्या.
" मिडीया आहोत आम्ही... " निकिताही चवताळून बोलली," मिडीया...! या देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ.. सगळे अधिकार असतात आम्हाला... आमचे अधिकार काय ते आम्हाला विचारण्याचा अधिकार कुणालाच नाही... आणि तुम्ही खासगी आयुष्य म्हणताय? सगळं शहर तुमच्याकडे सोशल आयकॉन म्हणून बघतंय... तुम्ही राजकारणात आलात तेव्हाच तुमचं खासगी आयुष्य संपलं... तुमच्या प्रत्येक हालचालीचा समाजावर प्रभाव पडत असतो.. आणि तुम्ही हा आदर्श ठेवताय समाजापुढे? लेस्बियन मुलीच्या थिल्लर चाळ्यांना स्वीकारण्याचा आणि सपोर्टही करण्याचा? शेम आॅन यू विजयाबाई... शेम..! " निकिता आज प्रचंड ऊर्जेने शो सादर करीत होते. कॅमेरा, क्रु, न्युजरूम सगळे स्तब्ध होऊन तिचा तो तुफानी अवतार नुसता बघत होते.
" आणि आम्हाला खोटं ठरवताय तुम्ही? या विडिओंना खोटं म्हणताय ना तुम्ही? आमच्याकडे आणखी एक पुरावा आहे. जिवंत.. जिता जागता... " निकिता आणखी काहीतरी उघड करण्याच्या तयारीत होती, " दीप्ती.. आमची करस्पाँडट आता आपल्यासमोर एका अशा व्यक्तीला घेऊन येतेय... जिला बघून प्रेक्षक तर हैराण होतीलच पण खुद्द विजयाबाईंना जोरदार धक्का बसणार आहे... यानंतर त्या सत्य नाकारूच शकणार नाहीत..
दीप्ती... दीप्ती माझा आवाज येतोय तुला?"
"हो... बोल निकिता... "
" तू कुठे आहेस आता दीप्ती? "
" मी.. शहरातल्या... झोपडपट्टीतल्या एका घरापुढे उभी आहे... निकिता "
" आणि तुझ्यासोबत कोण आहे दीप्ती? "
" निकिता... माझ्यासोबत आता या क्षणी आहे एक अशी व्यक्ती जिच्या धाडसामुळे विजयाबाईंच्या घरात चाललेला वासनेचा घाणेरडा खेळ चव्हाटय़ावर आला. एक अशी व्यक्ती जिला बघून खुद्द विजयाताईंचेच डोळे पांढरे होणार आहेत... "
" ओव्हर टू यू दीप्ती... " पुढच्या काही क्षणांसाठी निकीताने कार्यक्रमाची सूत्रं दीप्तीकडे सोपवली...
" माझ्यासोबत आहेत... विजयाबाईंच्या घरी काम करणारी मोलकरीण... राधाबाई..! " अन् आतापर्यंत दीप्तीवर असलेला कॅमेरा राधाबाईंच्या चेहऱ्यावर स्थिरावला. त्या घाबरलेल्या दिसत होत्या. त्यांच्या चेहर्यावर अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत होता. डोळे पाण्याने डबडबलेले होते,
" राधाबाई... तुम्ही आजिबात घाबरू नका... फक्त विजयाताईंचं सत्य अगदी निर्भीडपणे जगाला सांगा... बोला राधाबाई बोला... "
राधाबाईंनी दोन्ही हात जोडले. त्यांचे डोळे वाहू लागले होते. त्या रडतच बोलू लागल्या," मला माफी करा बाईसायब... मला माफी करा... कपाळीचं कुकू जगविण्यासाठी इमान इकलं म्या बाईसायब... इमान इकलं... तुमच्यासंगं बेईमान झाले... मला माफी करा... मला माफी करा... " अन् राधाबाई त्या कॅमेऱ्यासमोरून दूर जाऊ लागल्या. वाट मिळेल तिकडे पळत सुटल्या. दीप्ती अन् तिचा कॅमेरामन राधाबाईंच्या मागे पळू लागले. त्यांना अजून काही प्रश्न विचारायचे होते. पण राधाबाई थांबल्या नाहीत. त्यांच्या हाती लागल्या नाहीत.
आपल्या अपेक्षेपेक्षा काहीतरी विपरीत घडतंय हे लक्षात आल्यानंतर लगेच निकिताने कार्यक्रमाची सूत्रं आपल्या हाती घेतली.
" राधाबाई बोलायला तयार नाहीत... कदाचित विजयाबाईंच्या उपकारांच्या ओझ्याने त्यांचा आवाज दाबला असेल.. पण मी माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की, विजयाबाईंच्या घरातल्या या गलिच्छ प्रकाराचं स्टिंग ऑपरेशन केवळ राधाबाईंच्या सहकार्यामुळे शक्य झालंय. आमचा कॅमेरा 'लेडीज ओन्ली' नावाच्या त्या गटार गृहात पोचू शकला तो या राधाबाईंमुळेच. त्यांच्याकडून आपल्याला बरीचशी माहिती मिळणार होती... पण असो...! "
निकिताने आता आपला मोर्चा विजयाताईंकडे वळवला," बोला मदर इंडिया. अल्ट्रा मॉडर्न मदर इंडिया... अजूनही तुम्हाला असं म्हणायचंय की आम्ही खोटं बोलतोय? "
" होय... धादांत खोटं बोलताय तुम्ही... " विजयाताई शांतपणे बोलल्या," राधाबाईंना मी खूप चांगलं ओळखते.... समजूनही घेत आलेय.. राधाबाई मला तुमची अडचण कळली.. अन् मी माफही केलंय तुम्हाला... जीवापाड जपलेलं इमान कुंकवापायी विकण्याची वेळ आली तुमच्यावर... खऱ्या पतिव्रता आहात तुम्ही राधाबाई... काही काळजी करू नका... तुमच्या सत्यवानाला नाही नेऊ शकणार यम... काळजी घ्या..! " टीव्ही अन् कॅमेऱ्याच्या माध्यमातून विजयाताईंनी राधाबाईंशी संवाद साधला. अन् दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून त्या शांत बसल्या.
" काय झालं विजयाबाई? " शारदाबाई मध्येच बोलल्या," तुम तो किसीको मुंह दिखाने के काबिल भी नहीं रहे... "
" प्रेक्षकहो.. आज आपण करतोय एका ज्वलंत अन् वादग्रस्त विषयावर चर्चा... प्रश्न आपल्या संस्कृतीचा आहे... परंपरांचा आहे... आपल्या मेंदूवर झालेलं पाश्चात्य विचारांचं अतिक्रमण थेट सामान्य माणसाच्या घरापर्यंत येऊन पोचलंय... ते कुठेतरी रोखायला हवं म्हणून हा सगळा चर्चेचा खटाटोप.... ही चर्चा आणखी रंगणार आहे.. वादळी होणार आहे..मी इथे घेत आहे एक छोटासा ब्रेक.. तुम्ही कुठेही जाऊ नका.. बघत रहा फक्त...प्रो महाराष्ट्र.. आणि विचारत राहा... सवाल महाराष्ट्राचा...! "
जाहिराती सुरू झाल्या. पॅनलवरचे सगळे सदस्य आपापल्या जागी बसून पाणी- कॉफी पिऊ लागले. विजयाताई डोळे मिटून शांत बसल्या होत्या. निकिता पाण्याचे दोन घोट घेऊन होस्ट चेअरवरून उठली. शन्नोजवळ आली," कसं वाटतंय? "
" बेस्ट.. आज तो आग लगा दी तुने.. " कॅमेऱ्यामागच्या शन्नोची प्रतिक्रिया.
" अच्छा सुन... दीप्तीको कॉल कर.. तिला सांग अर्जंटली या 'लेडीज ओन्ली' वर जा... "
" लेडीज ओन्ली? "
" अगं या विजयाबाईचं घर गं... "
" ओह.. येस येस.. "
" तिथे जाऊन या बाईच्या मुलीशी काँटॅक्ट करायला सांग... ती लाईव्ह यायला पाहिजे शो मध्ये... "
" यार तू तो आज टीआरपी का एव्हरेस्ट छु लेगी... "
" अगले एक हप्ते दो हप्ते में चीफ एडिटर बननेवाली हूं मै... तू सिर्फ देखती जा... जस्ट वेट अँड वॉच.. " निकीताने शन्नोच्या खांद्यावर थाप दिली. आपल्या जागेवर जाऊन बसली. जाहिराती संपल्या. शो पुन्हा सुरू झाला.
© सर्वाधिकार सुरक्षित -
© शिरीष पद्माकर देशमुख ®
{ 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
'लेडीज ओन्ली' कथामालिका कादंबरीच्या संदर्भातली सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}
© शिरीष पद्माकर देशमुख ®