Gavaran books and stories free download online pdf in Marathi

गावरान

रविवारची गावरान मेजवाणी

कित्येक वर्षानंतर जावई आपल्या घरी येणार आहे ही बातमी ऐकून दामोदर आणि सुनंदा खूपच आनंदात होते. सुमन ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. जिचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी राजेश सोबत झाले होते, जो की शहरातल्या नामांकित कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करत होता. तसे त्यांचे भांडण, वाद विवाद असे काहीच नव्हते मात्र राजेशला कंपनीच्या कामातून सुट्टीच मिळत नव्हती त्यामुळे ते कोठे जाऊच शकत नव्हते. मात्र दोन दिवसापूर्वी सुमनने फोन करून सांगितले की, येत्या रविवारी आम्ही सर्वजण घरी येणार आहोत. हे ऐकून दामोदर, सुनंदा, त्यांचा मुलगा संकेत, सुन लक्ष्मी सारेचजण खूप आनंदी झाले होते. संकेत आणि लक्ष्मीचे दोन लहान मुले देखील आत्याच्या मुलांसोबत मजा करता येईल म्हणून जाम खुश होते. सुमन फोनवर बोलत होती, ती बाबाला म्हणाली, बाबा, जावई एका अटीवर येण्यास तयार झाले आहेत. त्यावर बाबांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर उमटली, ते म्हणाले , " कोणती अट ?"
" अट फार सोपी आहे, जावईसाठी गावरान कोंबड्याचे चिकन केले तरच जावई घरी येणार असे ते म्हणाले"
यावर बाबांनी एक मोठा सुस्कारा सोडला " एवढंच ना, नक्की, जावई बापूसाठी गावरान चिकन होणार, या मग रविवारी" एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला.
दामोदरला गावरान कोंबडा आणणे ही फार मोठी गोष्ट नव्हती. फार वर्षांपूर्वी दामोदरच्या घरी गायी, म्हशी आणि भरपूर कोंबडया होत्या. मात्र काळ बदलत गेला आणि हळूहळू गायी, म्हशी आणि कोंबड्या कमी होत गेल्या. पूर्वी घरकी मुर्गी दाल बराबर अशी त्यांची स्थिती होती मात्र आज त्यांच्या घरी कोणतेच पाळीव प्राणी नव्हते. जावयाची ही मागणी अजून चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा दामोदर विचार करू लागला.
शनिवारी सकाळी राजेश आणि सुमन आपल्या कारने गावी जाण्यास निघाले. चार-पाच तासाच्या प्रवासानंतर दुपारच्या वेळी गावी पोहोचले. मुलगी, जावई आणि नातवंडांना पाहून दामोदरला खूप आनंद झाला होता. गावातील एका म्हातारीकडून दामोदरने आकर्षक व लालभडक रंगाचा कोंबडा विकत आणला होता. त्याला घरात टोपलीखाली झाकून ठेवण्यात आले. सायंकाळचे जेवण आटोपुन सारेजण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत झोपी गेले.
कु कुच कु कोंबड्याच्या आरवण्याने राजेशला जाग आली. सकाळ झाली आणि चिलेपिले देखील जागी झाली. सकाळचा चहा-फराळ करून राजेश गावात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. इकडे घरातील लहान मुलांना कोंबडा पाहण्याची ईच्छा निर्माण झाली. कोंबड्या तहानभूक लागली असेल त्याला काही तरी खाण्यास द्यावे म्हणून घरातील ही बाल मंडळी कोंबड्याला पाणी पाजवण्यासाठी टोपली उचलली तसा तो कोंबडा पळून गेला. हा हा म्हणता कोंबडा घराबाहेर, अंगणातून दिसेनासा झाला. घरातील सारे मंडळी त्या कोंबड्याच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागली. पण कोंबडा काही सापडेना, आता काय करावं ? सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पडला. कोंबड्याला शोधण्यात तास-दोन तास निघून गेले. जावई बापू एवढ्यात येतील त्यांनी येण्याच्या अगोदर काही पर्यायी व्यवस्था करायलाच पाहिजे असा विचार सर्वांनी केला. आता गावात फिरून काही कोंबडा मिळणार नाही. त्याऐवजी शहरात जाऊन चिकन आणण्याचा विचार पक्का झाला आणि संकेत आपली मोटारसायकल घेऊन शहराकडे निघाला. काही वेळाने राजेश घरी आला. कालचे प्रसन्न वातावरण आज दिसत नव्हते, सर्वजण गप्प गप्प झाले होते. राजेशला काही कळायला मार्ग नव्हता. पोरं काहीतरी सांगून टाकतील म्हणून त्यांना आधीच घराबाहेर हाकलून लावले होते. राजेशने स्नान आटोपून पेपर वाचत पहिल्या घरात बसले होते. स्वयंपाक घरातून मसाले कुटण्याचा आवाज येत होता आणि घमघमाट देखील सुटला होता. काही वेळात गावरान कोंबडा खाण्याची मजा घेता येणार याचा विचार करता करता त्याला कधी झोप लागली कळालेच नाही.
दुपारची वेळ टळून गेली. संकेतला यायला जरा वेळ लागला. शहरातून त्याने गावरान कोंबड्याचे चिकन आणले होते आणि सोबत येताना भाऊजीसाठी दारूची बॉटल देखील घेऊन आला होता. त्याला माहित होतं की भाऊजी चिकनसोबत थोडी दारू घेतात. त्याने चिकन बहिणीच्या हातात दिली आणि पहिल्या खोलीत येऊन बसला. थोड्याच वेळात राजेशला जाग आली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यानंतर संकेतने हळूच दारूची बाटली काढली. राजेशने सुरुवातीला नकार दिला पण संकेत काही ऐकत नव्हता. कोणी पाहणार नाही तुम्ही घ्या. संकेतने जास्तच आग्रह केल्याने राजेश तयार झाला. चकणा म्हणून भाजलेले शेंगदाणे तो सोबत आणला होता. स्वयंपाकघरात सर्व तयारी चालू होती. भाजीला फोडणी बसली तसा घरभर त्याचा वास पसरू लागला. हळूहळू सायंकाळ होत आले होते. इकडे राजेश पॅगवर पॅग घेत होता, सोबत संकेतचे बोलणे चालू होते. अधूनमधून तो स्वयंपाक घरात जाऊन चौकशी करत होता. भाजी कुठपर्यंत आले ? भाजी काही केल्या शिजत नव्हती. सुमनने त्याला विचारले, गावरान चिकनच आणलंस ना ? की दुसरं काही आणलंस ? यावर संकेत म्हणाला, ताई, गावरान कोंबडाच होता. पण का शिजत नाही मला काय माहीत ? त्याने एका मित्राला फोन लावला आणि ही समस्या सांगितली असता त्याला कळाले की, शहरातील लोकं, गावरान चिकन म्हणून हैद्राबादी चिकन देतात. त्याला खात्री पटली की, त्याला देखील गावरान चिकन म्हणून हैद्राबादी देण्यात आलंय. त्या चिकनला शिजवण्यासाठी सुमन अनेक तंत्र वापरले पण त्यात काही यश मिळाले नाही. पाहता पाहता सूर्य मावळू लागला. राजेश इकडे दारू पिऊन पेंगु लागला होता. अखेर बाटली रिकामी झाल्यावर राजेशने जेवण्याचे फर्मान सोडले. भाजी ज्या परिस्थितीमध्ये होती तसेच त्यांच्या ताटात वाढण्यात आले, सुमनला माहीत होतं, या भाजीविषयी त्यांना काही कळणार नाही. भाजीचा दरवळ नाकापर्यत झोबत होते. नशेतच त्यांचे जेवण झाले. चिकन शिजले नाही पण रस्सा छान जमलंय असा शेरा राजेशकडून मिळाला. अखेर त्याचे जेवण संपले. तो जागेवरून उठला आणि झोपायच्या खोलीत जाऊन आडवा पडला. घरातील सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सर्वांनी जेवून घेतले आणि गप्पा न मारता झोपी गेले.
कु कुच कु कोंबड्याच्या आरवण्याने राजेशला जाग आली. कोंबड्याच्या आवाज घरातून नाही तर घराच्या पाठीमागून येत होता. राजेश उठला आणि त्या कोंबड्याच्या आवाजाच्या दिशेने गेला. कालच्या सारखाच आकर्षक व लालभडक कोंबडा त्याच्या दृष्टीस पडला. त्याला आश्चर्य वाटले, रात्री आपण खाल्लेला कोंबडा होता की दुसरं अजून काही होतं...! तो या विचारात असतानाच संकेत तेथे आला. त्याने भाऊजीच्या मनातील विचार ओळखला आणि म्हणाला, " काय भाऊजी, या कोबड्याची पण भाजी खायचा विचार चालू आहे काय ? हा शेजाऱ्याचा कोंबडा आहे. पुढील रविवारी या, पुन्हा अशीच रविवारची मेजवाणी करू " यावर राजेश म्हणाला, " नको, नको, मला दर रविवारी यायला कोठे वेळ मिळते. बघू कधीतरी " असे म्हणून निघण्याची तयारी करू लागले. राजेश, सुमन आणि त्यांची लेकरे कारमध्ये बसून टाटा बाय बाय केली आणि दामोदरचा जीव देखील भांड्यात पडला. रविवारची गावरान मेजवणी म्हटले की, आज ही सगळे दिलखुलास हसतात आणि या प्रसंगाची आठवण करतात.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED