Save the Lake Teach the Lake books and stories free download online pdf in Marathi

लेक वाचवा लेक शिकवा

गेल्या चार दिवसापासून राणी शाळेत आली नाही म्हणून मोळे गुरुजी तिच्या घरी सकाळी सकाळी भेट दिली. राणी भांडे घासत होती आणि बाजूला धुणे ही पडलेले होते. तिची अजून अंघोळ व्हायचे बाकी होते. तिचा अवतार पाहून मोळे गुरुजीला कसे तरी वाटले. गुरुजींनी तिला सरळ प्रश्न केला,
" राणी चार दिवस झाले तू शाळेला का आली नाहीस ? "
यावर ती म्हणाली, " सर, आईला बरं वाटत नाही, त्यामुळे आईने मला घरी थांबायला सांगितलं."
लगेच मोळे गुरुजी आईकडे वळले आणि विचारलं, " काय झालंय ? " तेंव्हा राणीच्या आईने उत्तर देतांना म्हणाली, " सर माझं तबियत बरोबर राहत नाही. त्यामुळे माझ्याने काही काम करवत नाही. त्यासाठी राणीला घरी थांबवलं हो."
पाहायला गेलं तर राणी दुसऱ्या वर्गातील जेमतेम सात वर्षाची पोरगी. पण ती घरातील सारेच काम अगदी आईच्या कामासारखी सफाईदारपणे करते असे तिच्या घरच्या आजूबाजूचे शेजारचे बाया मोळे गुरुजीला सांगू लागल्या. मोलमजुरी करून आपले पोट भरणारे ते कुटुंब, आई-बाबा दोघे जर कमाविली तर थोडं फार शिल्लक राहते. त्यात आता आई पडली अंथरुणावर आणि बाबा जातात कामाला. आलेले सर्व पैसे खर्च होतात. त्यात मध्येच दवाखाना निघाला तर पूर्ण आर्थिक परिस्थिती कोलमडून जाते. असाच विचार डोक्यात घेऊन मोळे गुरुजी शाळेत गेले तर शाळेत केंद्रप्रमुख आलेले त्यांनी लेक वाचवा लेक शिकवा अभियानाविषयी परिपत्रक दिले आणि माहिती सांगितली. मोळे गुरुजी नुकतेच राणीच्या घरी भेट देऊन आले होते त्यामुळे तिच्या विषयी विचार मनात घोळतच होते. लगेच उभं राहून मोळे गुरुजीनी मनातील दुःख सरांजवळ बोलून दाखविले आणि सर्व परिस्थिती सांगितली. केंद्रप्रमुख साहेब खूपच दयाळू होते त्यांनी लगेच राणीच्या घरी भेट देण्याचे ठरविले. मोळे गुरुजी आणि केंद्रप्रमुख परत राणीच्या घरी गेले. तेथील परिस्थिती पाहून केंद्रप्रमुख साहेब गहिवरले आणि ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाण्याचे ठरविले. शहरातील मित्राला फोन लावून सरांनी गाडी बोलावून घेतले. काही वेळातच ती गाडी आली आणि दवाखान्याकडे निघाली. मोळे गुरुजी शाळेत गेले आणि मुख्याध्यापकांना सांगून दवाखान्यात जाण्यास निघाले. राणीच्या आईला लगेच दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. डॉक्टरांनी राणीच्या आईला तपासले आणि लवकर आणलेले बरे केले, डेंग्यूची शिकायत आहे आणि पहिल्या स्टेजवर आहे, असे म्हणू लागले. आपल्या येथेच कवर होऊ शकते पण चार दिवस राहावे लागेल. राणी आणि राणीची आई दवाखान्यात राहिले. इकडे राणीचे बाबा कामावरून परतले. शेजारच्यांनी सर्व माहिती दिल्यावर ते देखील दवाखान्यात आले. चार दिवसांनी आजारातून पूर्ण तंदुरुस्त झाल्यावर ते परत आपल्या गावी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी राणीची आई राणीला घेऊन शाळेत आली आणि सरळ मोळे गुरुजीचे पाय धरू लागली. तेंव्हा मोळे गुरुजी म्हणाले, " माझे पाय कशाला धरता, केंद्रप्रमुख साहेबांमुळे हे सर्व घडलं, त्यांचे धन्यवाद माना, कोणताही आजार अंगावर काढू नये. लगेच दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी आणि हो राणीला रोज शाळेत पाठवा." राणीच्या आईला मोळे गुरुजीचे म्हणणे पटले, तिने पक्का निर्धार करत " राणीला रोज शाळेत पाठविणार " असे बोलली. लेक वाचवा ; लेक शिकवा अभियान काही अंशी सफल झाल्याचे समाधान मोळे गुरुजीच्या चेहऱ्यावर दिसू लागले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून महाराष्ट्र शासन लेक शिकवा अभियान राबवित आहे. तेंव्हा तमाम पालकांना नम्रतेची विनंती आहे की, मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. मुलगी परक्या घरची धन आहे असे मनात पक्का समज ठेवून बरेच पालक मुलींना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देत नाहीत मुलांच्या तुलनेत पाहिले तर. तिच्या शिक्षणाने संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून लेक शिकवा अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षकांना पालकांची मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे, त्यांच्या मदती शिवाय हे शक्य नाही.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

( सदरील लघुकथा काल्पनिक आहे. यातील पात्र आणि त्यांची नावं कदाचित जुळत असतील तर ते निव्वळ योगायोग समजावे. )


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED