Chahul - First Love... Part - 2 books and stories free download online pdf in Marathi

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - २)


दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि पुन्हा शाळा सुरु झाली. तिसरा तास ऑफ असल्यामुळे वर्गातील सगळी मुले आज मैदानावर खेळत होती. मुग्धा आपल्या मैत्रीणींसोबत दिवाळीच्या सुट्टीतील गमतीजमती सांगत होती. त्यांच्या गप्पा अधिकच रंगल्या होत्या. तितक्यात मुग्धा त्या तरुणाला पुन्हा बघते. तो अजूनही फक्त तिलाच बघत असल्याचे तिला कळते. मुग्धा तिची खास मैत्रिण स्नेहलला हळूच इशाऱ्याने त्या मुलाकडे खुणावते. स्नेहलचे त्याच्याकडे लक्ष जाताच तो मुलगा गांगरून तिथून निघून जातो. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने त्या दोघी (मुग्धा आणि स्नेहल) मैत्रिणींच्या ग्रुप मधून बाहेर निघतात. मुग्धा घडलेला सगळा प्रकार स्नेहलला सांगते.


"मुग्धा, अंग हा तर हर्ष !" स्नेहल म्हणाली.

"काय !! तू या मुलाला ओळखतेस ? " मुग्धा आश्चर्याने स्नेहलकडे बघते.

"अगं हो ! आठवी 'ब' तुकडीतील ती निकिता आहे ना, ती माझ्याच बिल्डिंग मध्ये राहते. तिची खास मैत्रीण हर्षिता तिचा हा मोठा भाऊ ! " स्नेहल सविस्तर सांगू लागली.

"पण तू त्याला कशी ओळखतेस? " मुग्धा मनातील शंका विचारू लागली.

"अगं, हा आपल्याच चौकात राहतो. कामानिमित्ताने कधी कधी तो निकिताकडे येताना मी बघितलं आहे. निकिताने सुद्धा मला एक - दोन वेळा त्याच्याबद्दल सांगितले आहे म्हणून मी त्याला ओळखते . आपल्याच शाळेत दहावी 'ब' मध्ये शिकत आहे. " स्नेहलने तिला माहित असलेले इत्यंभूत सर्व सांगितले.


नववी हा दहावीचा पाया असतो असे म्हणतात. त्यामुळे मुग्धाने स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. ती रात्रंदिवस अभ्यास करण्यात मग्न असायची. शिवाय सगळ्या परीक्षेमध्ये तिचे पहिल्या तीन क्रमांकामध्ये नाव असायचे. शालेय स्पर्धांमध्ये सुद्धा ती नेहमी पुढे असायची. तर इकडे हर्ष दहावीमध्ये असतानाही त्याचे मन अभ्यासात काही लागत नव्हते. तो अभ्यास करण्याचा खूप प्रयत्न करत होता पण त्याचे मन स्थिर नव्हते. कारण ही तसेच होते. बहुदा त्याला तो रोग झाला होता. प्रेम असे त्याचे नाव ! त्याच्या ध्यानी मनी केवळ एकाच व्यक्तीने वर्चस्व प्रस्थापित केले होते. ती होती मुग्धा !!!


हर्षने त्याच्या मनातील मुग्धा बद्दल असलेल्या भावना त्याच्या मित्रांजवळ व्यक्त केल्या. काय करणार? सांगावं तर लागलंच.. अहो मित्रच ते ! असं म्हणतात, आपण आपल्या भावना एक वेळ स्वतःपासून लपवून ठेवू शकतो, पण मित्रांपासून या गोष्टी लपवणे कठीणच. हर्षमध्ये सातत्याने जाणवणारा बदल, त्याची बैचेनी त्याच्या मित्रांनी अचूक हेरली होती. त्यामुळे मित्रांपासून फार काळ लपवणे त्याला शक्य नव्हते. आता हर्ष एकटा काय कमी होता, तर त्याचे चार पाच मित्र पण त्याच्यासोबत मुग्धाचा पाठलाग करू लागले.


एक दिवस शाळा सुटल्यावर मुग्धा तिच्या मैत्रिणींसोबत घरी जात असताना अचानक चार पाच मुलांचा घोळका त्यांच्यासमोर आला. त्या घोळक्यातील एक मुलगा मुग्धाकडे बोट दाखवून म्हणाला ,"अरे, हीच का आपली वाहिनी ?" असे म्हणताच त्या मुलांमध्ये हास्यसंवाद सुरु झाले. तर इकडे सगळ्या मैत्रिणी मुग्धाकडे आश्चर्याने बघायला लागल्या. हा सगळा प्रकार पाहून मुग्धा मनातून खूप घाबरली होती पण चेहऱ्यावर एकही भाव न दाखवता ती तिथून निघून गेली. घरी आल्यावर तिने कपडे बदलले आणि आपल्या स्टडीरूम मध्ये जाऊन बसली. अभ्यासात तिचे आज जराही लक्ष नव्हते. शिवाय आईने जेवणाचा खूप आग्रह करून पण भूक नाही म्हणून तिने जेवायचे टाळले. आजचा घडलेला प्रकार तिच्या सतत डोळ्यांसमोर येत असल्याने ती खूप अस्वस्थ झाली. विचारांनी तिच्या मनावर आणि मेंदूवर वर्चस्व प्रस्थापित केलं होत. तिच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले, "कोण होती ती मुले? गणवेशावरून तर माझ्याच शाळेतील वाटत होती. पण ते मला वाहिनी का बोलत होते? कोणत्या मुलाला उद्देशून ते बोलत होते ? तो हर्ष तर नसेल ना ? माझ्या मैत्रिणींना माझ्याबद्दल काय वाटले असेल? त्या किती प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघत होत्या ... " अशा प्रश्नांनी तिच्या डोक्यावर तांडव करायला सुरुवात केली तशी मुग्धा धावतच आईच्या रूममध्ये गेली आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपली.

"काय गं मुग्धा, काय झाले? असे अचानक अभ्यास करता करता मधेच का उठून आली आहेस ? आई मुग्धाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

"आई, माझं डोकं खूप दुखतंय गं ! जरा मसाज करून दे ना..." मुग्धा म्हणाली.

"थोडा वेळ अराम पण करत जा . अभ्यासाचा जास्त ताण घेऊ नकोस. " आई काळजीच्या स्वरात म्हणाली.

"आई, एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडत असेल आणि त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असेल तर काय करायचं गं ?" मुग्धाने प्रश्न विचारला.

आईने मुग्धाकडे पहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण मुग्धा ते सफाईतपणे लपवत आहे हे तिला कळले . तरीही मुग्धाला कोणताही प्रश्न न विचारता ती तिला समजावून सांगू लागली,

"मुग्धा , एखादी गोष्ट जर आपल्या मनाविरुद्ध घडत असेल तर गरजेचे नाही कि ती गोष्ट वाईटच आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा निष्कर्ष काढण्याआधी ती गोष्ट चांगली आहे कि वाईट हे आधी पडताळून बघणे आवश्यक आहे. पण मला खात्री आहे की, एखादी गोष्ट जर तुझ्या मनाविरुद्ध घडत असेल तर ती नक्कीच वाईट असेल आणि म्हणूनच तुला त्रास होत आहे. कारण माझ्या मुलीला चांगले आणि वाईट यातला फरक कळतो हे मला ठाऊक आहे. जर तुला मनापासून वाटत असेल की, तो गोष्ट चुकीची आहे आणि तुला त्याचा त्रास होत आहे तर त्याच क्षणी तू त्या गोष्टीला प्रतिकार करावा असे मला वाटते. म्हणजे पुढे त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाही. "


दुसऱ्या दिवशी मुग्धा नेहमीप्रमाणे शाळेत गेली. शाळेत चित्रकलेची स्पर्धा आयोजित केली असल्याने जे इच्छुक विद्यार्थी होते त्यांना चित्रकलेचे साहित्य आणायला सांगितले होते. पण कालच्या घडलेल्या प्रकारामुळे ही गोष्ट मुग्धाच्या लक्षात राहिली नव्हती. म्हणून ती साहित्य घेण्यासाठी मधल्या सुट्टीत घरी जाण्यास निघाली. वाटेत तिला हर्षचा ग्रुप दिसला. आजही ते सगळे मिळून तिचा पाठलाग करत होते. मुग्धा एकटीच घरी जात असल्याने ती पटापट पाऊले टाकत होती. त्यामळे हर्ष सोबत असलेले त्याचे सगळे मित्र तिच्या मागे आरडाओरडा करत जात होते. मुग्धाला त्या सगळ्यांचा खूप राग आला होता पण तिला लवकरात लवकर साहित्य घेऊन शाळेत परतायचे होते म्हणून ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती. अचानक मागून एक मुलगा जोरात ओरडला , "अहो मुग्धा वाहिनी ,हर्ष बोलावतोय. थांबा ना... " . हे शब्द कानी पडताच मुग्धाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. तिला काल आईने सांगितलेले शब्द आठवले, "जर तुला मनापासून वाटत असेल की तो गोष्ट चुकीची आहे आणि तुला त्याचा त्रास होत आहे तर त्याच क्षणी तू त्या गोष्टीला प्रतिकार करावा असे मला वाटते. " आईचे उद्गार जणू मुग्धाच्या रागाला आणखीनच ज्वलंत करत होते. मुग्धा त्याच क्षणाला मागे वळते आणि सगळ्यांकडे रागाने तीक्ष्ण नजर फिरवते.


"कोणाची इतकी हिम्मत झाली मला वहिनी म्हणून हाक मारायची ? लाज नाही वाटत एखाद्या मुलीला त्रास द्यायला? हेच शिकता का तुम्ही सगळे शाळेत? तुमच्या बहिणींसोबत तुम्ही असेच वागता का ? खबरदार ! पुन्हा जर माझ्या वाटेल कोणी गेलं, तर मी तुम्हा सगळ्यांना शाळेतून काढून घरी बसवेन. हे लक्षात ठेवा. " आतापर्यंत मुग्धाच्या मनात साठवून ठेवलेला राग त्या मुलांवर निघाला होता. मुग्धा रागात मोठ्यामोठ्याने ओरडत असल्यामुळे तिच्या आजूबाजूला माणसांची गर्दी जमायला लागली. अजून थोडावेळ इथे थांबलो, तर सगळी जमलेली लोकं मिळून बेदम मारतील या भीतीने हर्षच्या ग्रुपने तिथून पळ काढला. मुग्धाचा राग बघून हर्ष तर थरथर कापत होता. त्याचे मित्र त्याला एकट्याला सोडून गेले याचे भानसुद्धा त्याला राहिले नव्हते. मुग्धा हळू हळू त्याच्या दिशेने जवळ येऊ लागली तसा तो जास्त थरथरू लागला.


"तुला लाज नाही वाटत दिवसरात्र माझा पाठलाग करायला ? तुलासुद्धा लहान बहीण आहे. तिच्यासोबत कोणी असे वागले तर आवडेल का तुला? " मुग्धाचे शब्द कानावर पडताच हर्ष भानावर येतो. आजूबाजूला आपल्या मित्रांना शोधू लागतो पण सगळे केव्हाच पसार झाले आहेत हे मात्र त्याला आता कळते. स्वतःला कसेबसे सावरत तो मुग्धाशी बोलण्याचा प्रयत्न करतो, "मी तुझा पाठलाग करत नव्हतो. तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. "मुग्धा पुढे बोलणारच तितक्यात तो तिथून धूम ठोकतो. शाळेत जायला उशीर होणार म्हणून मुग्धा घरी न जाता पुन्हा शाळेत जाते.


पुढचे एक - दोन आठवडे हर्ष आणि त्याच्या ग्रुपने मुग्धाला अजिबात त्रास दिला नव्हता. तिचा पाठलाग करणे तर लांबच राहिले पण त्यांचे दर्शन सुद्धा तिला झाले नव्हते. त्यामुळे मुग्धा मनातून खूप सुखावली होती. चुकीच्या गोष्टीला आपण वेळीच प्रतिकार केल्याबद्दल तिला स्वतःचाच अभिमान वाटू लागला होता.



क्रमशः


(टिप : या कथेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कथेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कथा ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी ही नम्रविनंती. )

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED