Chahul - First Love... - 6 books and stories free download online pdf in Marathi

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ६)

घराच्या दिशेने जाताना अचानक मुग्धाची पाऊले थांबली. हृदयाची जलद गतीने होणारी धडधड तिला तीव्रपणे जाणवू लागली. जणू हर्ष इथेच कुठेतरी जवळपास आहे, असे तिचे मन तिला सांगू लागले. खरंतर असे का होत आहे, याचे उत्तर तिच्याकडेही नव्हते. पण मनातील शंका दूर करण्यासाठी तिचे डोळे मात्र चोहीकडे भिरभिरू लागले. ती हर्षला शोधू लागली. जसजशी ती एक एक पाऊल पुढे टाकत होती तसतशी हृदयाची धडधड तीव्र होऊ लागली. थोड्याच अंतरावर गेल्यावर तिला दोन चार मुलांची उन्हात पडलेली सावली दिसली. ती अगदी निरखून त्या सावलीकडे पाहू लागली आणि अचानक घाबरून तिने तिची पाऊले मागे घेतली. हो. ती तीच सावली होती ज्याची तिला अपेक्षा होती. हर्ष त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्याची सावली पाहून मुग्धा दचकली. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता, कि ती हर्षचीच सावली आहे. ती एका झाडाच्या आडोशाला उभी राहिली आणि त्या मुलांच्या आवाजावरून कानोसा घेऊ लागली. तिला फार काही स्पष्ट ऐकू येत नव्हते. पण तरीही तिथे हर्ष नक्कीच आहे, असे तिचे मन तिला सांगत होते. त्या मुलांच्या गप्पा ऐकत असताना अचानक तिच्या मनात एक विचार आला आणि ती स्वतःशीच पुटपुटू लागली,

"मुग्धा, अगं वेड लागलं कि काय तुला? नक्कीच तुला भास होत आहे. अगं वेडे, असं कधी होत का? अचानक तुझ्या हृदयाचे ठोके जलद काय होतात, तुला त्याची सावलीच काय दिसते. काहीही हा... मला तर वाटतंय, तू त्याचा सतत विचार करत आहेस ना, म्हणून तुझ्यासोबत असं काहीतरी अजब गजब घडत आहे. तू सोडून दे त्याचा विचार. आता चल लवकर घरी आई वाट बघत असेल." हर्षाचा विचार डोक्यातून काढून मुग्धा घरच्या दिशेने जाण्यास निघणारच तेवढ्यात हर्ष त्याच्या मित्रांसोबत तिच्या समोरून गेला.

हर्षला समोर पाहून मुग्धा स्वतःचे भानच हरपून बसली. हृदयावर कोणीतरी हातोडीने वार करतंय जणू इतक्या जोरजोराने तिला ठोके ऐकू येऊ लागले. तिचे सर्वांग थरथर कापू लागले. हा भास नाही, तर हे प्रत्यक्ष घडत आहे याची जाणीव झाल्यावर तिला थोडावेळ गरगरल्या सारखे वाटले. हर्ष कधी तिच्या डोळ्यांसमोरून गायब झाला तिला कळले देखील नाही. काहीवेळ तिथेच स्तब्ध उभी राहून ती विचारांच्या खोल दरीत बुडाली.

असेच काही दिवस गेले. मुग्धाला दोन तीन वेळा तोच अनुभव आला. हर्ष जवळपास असला कि आपोआप तिच्या हृदयाचे ठोके जलद गतीने वाढायचे. या अनुभवाने तिला हर्ष आपल्या अवतीभोवती असल्याची जाणीव व्हायला लागली. दिवसेंदिवस ती हर्षमध्ये गुंतायला लागली. झोपेत असताना स्वप्नात, तर दिवसा तिच्या विचारांमध्ये हर्षने वर्चस्व करायला सुरुवात केली . मुग्धाला अजूनही कळत नव्हते, हे नेमकं आकर्षण आहे कि प्रेम?

हर्षचा सतत विचार करून मुग्धाला अगदी वेड लागायची पाळी आली. तिला सतत वाटत होते, कि हर्ष तिच्याशी बोलत नसल्यामुळे तिला असं होत आहे. तिचे ना अभ्यासात लक्ष होते, ना घरातील कामात. तिचे मनही कोणत्याच गोष्टीमध्ये लागत नव्हते. आता तिच्याकडे एकच पर्याय उरला होता. तिची आई!!!

'आई' ही एक अशी डॉक्टर आहे जी कोणत्याही आजारावर गुणकारी औषध देऊन अचूक इलाज करते. तिला आजार आणि त्यामागचे लक्षण कळण्याची फक्त गरज असते, कि लगेच उपचार सुरु होतात. मुग्धाची आई तर तिची खास मैत्रीण. खरंतर इतकं सगळं होऊनही तिने आईला यातले काहीच सांगितले नाही, हे नवलच!

आज रविवार असल्यामुळे सकाळी मुग्धा आरामात उठली. तसे रात्री तिने मनाशी ठरवले होते, कि आज आईला मनात जे काही आहे ते सगळं विचारायचं. त्यामुळे उठल्या उठल्या ती आईला सगळीकडे शोधू लागली. आई नेहमीप्रमाणे दाराभोवती रांगोळी काढत होती. मुग्धा आई जवळ येऊन बसली.

"काय गं वेडाबाई, उठल्या उठल्या अंघोळ करायची टाकून इथे काय येऊन बसली आहेस. जा लवकर आवरून घे. तोपर्यंत मी गरमागरम पोहे करते." आई रांगोळी काढत असताना मुग्धाला म्हणाली.

"आई गं, मला तुला काहीतरी विचारायचे आहे. " मुग्धा अगदी लडिवाळपणे आईला म्हणाली.

"अस्स होय. आता आठवण आली तर तुला आईची. काय गं, तुला काय वाटतं, आईला काहीच कळत नाही का? सगळं कळतंय बरं मला. पण मीसुद्धा वाट पाहत होते, तू कधी येऊन मला सांगशील हे सगळं याची. " आई थोड्या लटक्या रागातच मुग्धाला म्हणाली.

"आई, ऐकून तर घे ना. प्लिज... " मुग्धा लाडात म्हणाली.

"बरं बरं.. बोल लवकर. मला बाकीची पण कामं आहेत. " आई मुद्दाम राग दाखवत म्हणाली.

"आई, प्रेम म्हणजे काय असतं गं ?" मुग्धाने लाजतच हा प्रश्न विचारला.

आई मुग्धाकडे आश्चर्याने बघत म्हणाली, "प्रेम!!! पण तुला हा प्रश्न अचानक का पडलाय, आधी ते तर सांग? "

"काही नाही गं आई, माझी एक मैत्रीण आहे ना कदाचित ती प्रेमात पडलीये. पण ते प्रेम आहे कि फक्त आकर्षण हे नेमकं तिला अजून कळत नाहीये. बस इतकचं! " इच्छा नसतानाही आज मुग्धा पहिल्यांदा आईशी खोटं बोलली. का ? याचे उत्तर तिच्याकडेही नव्हते.

"अंग, तिचं वय काय आणि ती करतेय काय? या वयात तिने अभ्यास करायचा सोडून हे प्रेम वैगरे करत बसली आहे? " आई म्हणाली.

"पण आई प्रेमाला वयोमर्यादा असते का गं ?" मुग्धाने पुन्हा प्रश्न विचारला .

"हम्म. खरंतर प्रेमाला काहीच वयोमर्यदा नसते. पण तू का गं तिची एवढी बाजू घेऊन बोलत आहेस? खरं सांग हा मुग्धा, ती मुलगी तूच तर नाहीस ना ? " आई मुग्धाकडे निरखून पाहत म्हणाली.

"छे छे... काहीही काय तुझं! आई तू सांग ना. नको ते प्रश्न का विचारत आहेस? " मुग्धा चेहऱ्यावरील भाव स्पष्ट लपवत म्हणाली.

"बरं ऐक. ही रांगोळी बघ. अगदी पांढरी शुभ्र आहे. जेव्हा आपण या रांगोळीने जमिनीवर एखादी नक्षी काढतो, तेव्हा ती सुरेख दिसतेच पण जर याच रांगोळीमध्ये आपण विविध रंग भरले तर ती रांगोळी आणखीनच सुंदर दिसू लागते. नानाप्रकारच्या रंगानी ती भरलेली दिसते. त्या रांगोळीतील प्रत्येक रंग आपल्याला तिच्या सौंदर्याची प्रचिती देत असतो. हो कि नाही ? " आई मुग्धाला विचारते.

"हो. अगदी बरोबर. पण आई, जेव्हा आपण ही रांगोळी पुसून काढतो तेव्हा तर ते सगळे रंग त्या रांगोळीमध्ये एकत्रित होऊन जातात. मग ते मिश्रण काय कामाचे? " मुग्धा म्हणाली.

"अगं वेडे, तीच तर खरी खासियत आहे. रांगोळी आणि रंग या दोन्ही गोष्टी निःस्वार्थी वृत्तीने नक्षीची शोभा वाढवण्याचे काम करतात. जेव्हा रांगोळी पुसली जाते तेव्हा साहजिकच आहे, कि ते एकमेकांमध्ये एकरूप होतात. याचा अर्थ असा नाही कि ते मिश्रण वाया जाते. उलट त्यातून तर एक नवीन रंग तयार होतो. " आई म्हणाली.

"आई, पण याचा प्रेमाशी काय संबंध ?" मुग्धाने विचारले.

"प्रेमाचेही अगदी असेच आहे. जेव्हा दोन व्यक्तींच्या मनात एकमेकांबद्दल निस्वार्थ भावना असतील, तिथेच प्रेमाचा जन्म होतो. रांगोळी आणि रंगाप्रमाणे या दोन्ही व्यक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न करता फक्त आपल्याकडे जे काही असेल ते समोरच्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच एकरूप होण्याचा प्रयत्न करत असते. शरीराने नाही बरं का, फक्त मनाने! कारण शरीराने एकरूप झालेल्या प्रेमामध्ये फक्त वासना असते. पण जेव्हा दोन व्यक्ती आधी मनाने एकरूप होतात, तिथेच दीर्घकाळ आणि कधीही न तुटणारे प्रेम निर्माण होते. याचाच अर्थ त्या मिश्रणापासून तयार झालेला तो नवीन रंग. " आई म्हणाली.

"रंग आणि रांगोळी यांना नंतर कोणी वेगळं करायचा प्रयत्न केला तर?" मुग्धाने आणखी एक प्रश्न विचारला.

"हम्म. एकदा तूच प्रयत्न करून बघ. रांगोळी आणि रंग वेगळे होत आहेत कि नाही, याचे उत्तर तुला नक्की मिळेल. " आई म्हणाली.

"मला तरी नाही वाटत, की हे काम इतकं सोपं आहे. " मुग्धा हसत म्हणाली.

"प्रेम ही असेच असते. एकदा दोन व्यक्तींची मने एकरूप झाली, कि कोणतेही वादळ त्यांना वेगळे करू शकत नाही. " आई स्मीत करून म्हणाली.

"आई गं, प्रेमात भास पण होतात का ग? " मुग्धा उत्सुकतेने विचारू लागली.

"मुग्धा, अगं किती प्रश्न विचारतेस? मला खूप काम आहेत. बस कर आता. " आई रांगोळीचा पसारा आवरत म्हणाली.

"आई सांग ना गं. हा शेवटचा प्रश्न आहे. प्लिज सांग ना. " मुग्धा आईला लाडीगोडी लावत म्हणाली.

"आपण एखाद्या व्यक्तीचा दिवसरात्र विचार करत असतो किंवा त्या व्यक्ती बद्दल आपल्याला काळजी वाटत असते. दिवसा आपल्या डोळ्यांसमोर तर रात्री आपल्या स्वप्नात एकच व्यक्ती दिसत असेल, तर साहजिकच आहे कि त्या व्यक्तीचा भास होऊ शकतो. " आई म्हणाली.

"समजा, ती व्यक्ती आपल्या जवळपास असेल, तर आपल्याला जाणीव होते का ?" मुग्धा म्हणाली.

"अरे, मगाशी तर बोललीस कि हा शेवटचा प्रश्न आहे. आता परत नवीन प्रश्न! " आई वैतागून म्हणाली.

"आई, हा खरंच शेवटचा प्रश्न आहे. प्लिज सांग ना. " मुग्धा म्हणाली.

"हो. कदाचित जाणीव होऊ शकते. कारण प्रेमाचं नातं हे असच असतं. दोन जीवांमध्ये एक घट्ट नातेसंबंध तयार होत. दोघांचेही मन जोडले गेलेले असते. त्यामुळे कदाचित जाणीव होऊ शकते." आई घाईघाईत आत जाताना म्हणाली.

रांगोळीकडे पाहत आईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींवर मुग्धा विचार करत बसली. तितक्यात टेलिव्हिजन वर गाणे सुरु झाले.

"कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कशी सावरू रे, आवरु रे मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला

क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तूही जवळ वाटे पण काहीच नाही हाती
मी अशीच हसते, उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला पाहते, तुझ्याचसाठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला

मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस खरा कसा रे
तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू
नवे रंग सारे, नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला... "

आज या गाण्यातील प्रत्येक शब्द न शब्द ती नव्याने जगत होती. जणू पहिल्यांदाच तिला या गाण्याचा खरा अर्थ समजला होता. खरंतर हे गाणं ती काही पहिल्यांदा ऐकत नव्हती. गाणे ऐकता ऐकता मुग्धा हर्षमध्ये कधी हरवून गेली तिला कळलेच नाही.

क्रमशः

(सूचना : "आभास हा" हे गाणे केवळ वाचकांच्या मनोरंजनाच्या हेतूने कथेत वापरण्यात आलेले असून लेखकाचा या गाण्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. कृपया याची नोंद घ्यावी.)

(टिप : या कथेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कथेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कथा ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED