Chahul - First Love...(Part - 4) books and stories free download online pdf in Marathi

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची… (भाग - ४)

आज मुग्धाला खूपच अस्वस्थ वाटत होते. तिला सतत हर्षचे शब्द आठवत होते. आताच कुठे त्या दोघांच्या मैत्रीला छान सुरुवात झाली होती. तिला त्या दोघांची मैत्री खूप आवडायला लागली होती. पण हर्ष मधेच असं काही तिला बोलेल याचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. मुग्धाला शाळेत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण परीक्षा लवकरच सुरु होणार असल्याने तिला अभ्यासाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नव्हते. म्हणून नाईलाजाने ती शाळेत जाण्यास निघाली. तर इकडे हर्षचीही अवस्था फार काही वेगळी नव्हती. मुग्धाच्या नकारामुळे तो पूर्ण खचला. त्याला खूप उदास वाटायला लागले. घडलेल्या प्रकारामुळे मुग्धा आता कधी त्याच्याशी बोलेल कि नाही याची त्याला भीती वाटू लागली. आपण मुग्धाला प्रपोज करून चूक तर नाही ना केली ? हा प्रश्न सतत त्याचे मन पोखरू लागला. कारण एकच होते ... त्याला मुग्धाला गमवायचे नव्हते.

अभ्यासाकडे काही केल्या मुग्धाचे मन लागत नव्हते म्हणून ती ग्रंथालयात जाऊन बसली. तितक्यात हर्ष पुस्तक बदलण्यासाठी ग्रंथालयात आला आणि अचानक त्याची नजर मुग्धाकडे गेली. मुग्धा पुस्तक वाचण्यात गर्क असताना हर्ष तिच्या समोर जाऊन बसला. ती माझ्याकडे बघेन या आशेने तो तिला एकटक न्याहाळू लागला. पण मुग्धा विचारांमध्ये एवढी हरवून गेलेली कि तिला आजूबाजूच्या परिस्थितीचे भानच नव्हते. शेवटी कंटाळून हर्षने मुग्धाला आवाज दिला,"काय ग मुग्धा, कुठे हरवली आहेस? कधीपासून तुझ्या समोर बसलो आहे मी पण तुझे लक्षच नाही." हर्षचे शब्द कानावर पडताच झोपेतून खडबडून जागे व्हावे तशी मुग्धा विचारांच्या जगातून बाहेर आली. अचानक हर्षला समोर पाहून तिच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव अदृश्य झाले. त्याला कोणताही प्रतिसाद न देता ती सरळ तिथून निघून गेली. मुग्धाच्या अशा वागण्याने हर्ष मात्र खूप दुःखी झाला. ज्या गोष्टीची त्याला सतत भीती वाटत होती अखेर तेच झाले...


पुढे दोन तीन दिवस हर्ष सतत मुग्धासोबत बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण मुग्धा जाणूनबुजून त्याच्याशी बोलायचं टाळत होती. मुग्धाच्या अशा विचित्र वागण्याने हर्ष दिवसेंदिवस उदास होऊ लागला. त्याला मानसिक तणाव प्रचंड जाणवू लागला. शिवाय दहावीची परीक्षा सुद्धा तोंडावर आली होती. अभ्यास करणे अतिशय गरजेचे होते. त्यामुळे एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावायचा असे त्याने त्याने ठरवले. दुसऱ्या दिवशी मुग्धा शाळेत जात असताना त्याने तिला रस्त्यामधेच अडवले.


"मुग्धा प्लिज थांब. मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे." मुग्धाला मधेच वाटेत थांबवत हर्ष म्हणाला.


"हे बघ हर्ष, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. सो प्लिज तू माझी वाट सोड." मुग्धा रागात म्हणाली.


"नाही!!! आज काहीही झालं तरी मी तुला कुठेही जाऊन देणार नाही आणि माझं बोलून झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही." हर्ष म्हणाला.


"मला तुझे काहीही ऐकून घ्यायचे नाही आहे. मला उशीर होतोय. प्लिज मला जाऊ दे. " मुग्धा ओरडून म्हणाली.


"मुग्धा प्लिज फक्त एकदा माझं ऐकून घे. त्या नंतर तुला काही बोलायचं असेल तर बोल नाहीतर बोलू नकोस. मी तुला पुन्हा कधीच अडवणार नाही, तुझ्याशी कधीही बोलण्याचा प्रयत्न करणार नाही, तुला माझा त्रास होईल असं कधीच वागणार नाही. पण प्लिज फक्त एकदा मी काय बोलतोय ते ऐकून घे. प्लिजsss!!! " हर्ष मुग्धाला समजावण्याच्या स्वरात म्हणाला.


हर्षच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून मुग्धाचा राग अगदी शांत झाला. आणि ती पुढे म्हणाली, "ठीक आहे. बोल."


"मुग्धा, अगं आताच कुठे आपल्या मैत्रीला छान सुरुवात झाली होती. आपल्या दोघांचे ही छान जमायला लागले होते. मला मान्य आहे मी माझ्या प्रेमाची कबुली दिल्यामुळे तू माझ्याशी असं वागत आहेस. पण मुग्धा मी तुला कधी जबरदस्ती केली का ग ? तुला नाही स्वीकार करायचे माझे प्रेम तर नको करु. पण आपली मैत्री तरी नको ना ग तोडू. तुला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिले तेव्हापासूनच मी तुझ्यावर प्रेम करत आहे. खरंच माझी चूक झाली. मी माझे प्रेम आपल्या मैत्री मध्ये येऊन द्यायला नको हवे होते. एक जीवनसाथी म्हणून मला तुझी सोबत नाही लाभली तरी चालेल पण एक जिवलग मैत्रीण म्हणून मला तुझी आयुष्यभर साथ हवी आहे. प्लिज आपले मैत्रीचे नाते तोडून जाऊ नकोस." बोलता बोलता हर्षचा कंठ दाटून आला.


हर्षच्या बोलण्याने मुग्धाचेही डोळे भरून आले. स्वतःला सावरत ती म्हणाली, "हर्ष, असे वागताना मलाही फार आनंद होत नाही रे. मलाही असे वाटते, कि आपली मैत्री अशीच अखंड रहावी. पण हर्ष तुझ्या मनात माझ्याबद्दल ज्या काही भावना आहेत त्या फार काळ लपवणे तुला शक्य होणार नाही. आपण सतत बोलत राहिलो, आपली मैत्री अशीच राहिली तर तुझ्या मनातील भावना अजून प्रबळ होतील. आणि मी तुझ्या जवळ असूनही तुझी होऊ शकत नाही याचा तुला त्रास होईल. शिवाय तुझे हे दहावीचे वर्ष आहे. तुला अभ्यासात लक्ष केंद्रित करणे अतिशय गरजेचे आहे. अशा वेळेस आपण एकमेकांच्या संपर्कात राहिलो तर तुझे अभ्यासात मन लागणार नाही. तू सतत माझ्याबद्दल विचार करशील. म्हणून आपण एकमेकांशी नको बोलूया. मला माहित आहे थोडे दिवस तुला त्रास होईल. पण काही दिवसानंतर तू स्वतःला नक्की सावरशील. मला असे वाटते, कि आता ही वेळ अभ्यास करण्याची आहे. तुझं करिअर करण्याची आहे. स्वतःसाठी वेळ दे. तुझी स्वतःची ओळख निर्माण कर. तुझे अस्तित्व घडवं. काही दिवसांनंतर तुला स्वतःलाच जाणवेल कि तुझ्यासाठी मी फार महत्वाची नाही. प्रेम, लग्न या सगळ्या गोष्टींसाठी आयुष्यभर वेळ आहे. पण स्वतःची ओळख निर्माण करण्याची हीच वेळ आहे. हि संधी सोडू नकोस प्लिज. खूप अभ्यास कर. खूप मोठा हो. ALL THE BEST!!!" असे म्हणून मुग्धा तिथून निघून गेली.


आज शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. आजचा दिवस दहावीच्या मुलांचा शाळेतील अखेरचा दिवस होता. त्यामुळे इतर सर्व वर्गांना आज लवकर सुट्टी देण्यात आली. शाळा लवकर सुटली असतानाही मुग्धा हर्षची वाट बघत शाळेबाहेर बसली. आज तिला हर्षसोबत खूप काही बोलावेसे वाटत होते. कारण आजपासून हर्ष पुन्हा शाळेत येणार नव्हता. हर्षची वाट बघत असताना ती शाळेतील सगळे दिवस आठवू लागली. हर्षचे तिला सतत चोरून पाहणे, त्याच्या मित्रांचे तिला चिडवणे, तिचा पाठलाग करणे, त्या दोघांच्या मैत्रीचे सुरुवातीचे दिवस आठवून ती गालातल्या गालात हसू लागली. अचानक तिला हर्षने प्रपोज केलेला दिवस आठवला आणि तिचे डोळे पाण्याने भरले. सगळं किती छान सुरु होतं! हर्षने असं का केलं हा विचार करत असतानाच हर्ष त्याच्या मित्रांसोबत शाळेत येताना तिला दिसला. हर्षला पाहून त्याच्याशी बोलण्यासाठी मुग्धा त्याच्या समोर गेली. पण मुग्धाला पाहूनसुद्धा तिला न बघितल्याचे सोंग करत हर्ष तिथून निघून गेला. मुग्धाने हर्षला मागून खूप आवाज देण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिला कोणताही प्रतिसाद दिला नाही. हर्षला असं निघून जाताना पाहून मुग्धाच्या हृदयाचे जणू असंख्य तुकडे झाले. तिला प्रचंड तीव्रतेने काळजात होणाऱ्या वेदना जाणवू लागल्या. डोळ्यांतील अश्रू तर पावसातील सरींसारखे गालांवरून ओघळू लागले. तिचं तिलाच कळत नव्हतं असं का होतंय ते!


निरोप समारंभाला सुरुवात झाली. प्रत्येक विद्यार्थी स्टेजवर येऊन शाळेतील आठवणी,गमतीजमती सांगून शाळेबद्दल असलेले स्नेह व्यक्त करत होता. हर्ष फक्त शरीराने सभागृहात उपस्थित होता पण त्याचे मन मात्र मुग्धाला शोधत होते. त्याने हळूच उठून सभागृहाच्या खिडकीतून बाहेर डोकावले. मुग्धा अजूनही तिथेच बसलेली. तिला पाहून त्याचे मन अधिकच व्याकुळ झाले. तो थेट तिला भेटण्यासाठी निघाला तितक्यात त्याला मुग्धाचे शब्द आठवले,"आपण सतत बोलत राहिलो, आपली मैत्री अशीच राहिली तर तुझ्या मनातील भावना अजून प्रबळ होतील. आणि मी तुझ्या जवळ असूनही तुझी होऊ शकत नाही याचा तुला त्रास होईल. प्रेम,लग्न या सगळ्या गोष्टींसाठी आयुष्यभर वेळ आहे. पण स्वतःची ओळख निर्माण करण्याची हीच वेळ आहे. प्लिज माझी वाट पाहू नकोस. मला विसरून जा. " आणि तो तिथेच थांबला. तर इकडे मुग्धा अजूनही हर्षच्या येण्याची वाट बघत बसली होती. घरी जायला उशीर झाला आहे याचे तिला भान राहिले नव्हते. तिच्या मनात अजूनही घालमेल सुरूच होती. हर्ष असं काहीच न बोलता का निघून गेला असेल? त्याला माझ्या बोलण्याचा राग आला असेल का? खरंतर मी स्वतःहून त्याला माझ्याशी बोलू नकोस असे सांगितले आहे, तरीही त्याच्या न बोलण्याने मला इतका त्रास का होत आहे? अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनावर आणि डोक्यावर ताबा घेतला असताना तिला अचानक मागून आवाज आला.


"मुग्धाSSS" आईने मुग्धाच्या खांद्यावर हात ठेवत मागून हाक मारली.


"आई, तू इथे का आली आहेस ?" मुग्धा आश्चर्याने म्हणाली.


"अगं, का आली म्हणून मला काय विचारतेस ? शाळा सुटून किती वेळ झाला आहे आणि तू या कडक उन्हात कोणाची वाट पाहत आहेस ते आधी सांग ?" आईने रागारागात मुग्धावर प्रश्नांचा भडीमार केला.


"आई, मी माझ्या मैत्रिणीची वाट बघतेय. " मुग्धा अडखळत म्हणाली.


"मुग्धा, आता पुरे झालं हा ! आजकाल खूप काही लपवायला लागली आहेस तू. उन्हात बसून आजारी पडायचे आहे का? चल घरी. " आई मुग्धाचा हात पडकून तिला ओढत नेऊ लागली.


सभागृहाकडे मागे वळून पाहत असंख्य प्रश्नांना मनात घेऊन मुग्धा आईसोबत निघून गेली.


क्रमशः



(नमस्कार रसिक वाचकहो!!! साहित्य क्षेत्रातील "चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची" ही माझी पहिलीच प्रेमकथा आहे. अगदी पहिल्यांदाच कथा लिहीत असल्यामुळे मनात भीती, खूप साऱ्या शंका आहेतच शिवाय तुम्हा सगळ्यांना कथा आवडेल कि नाही, याचा ही थोडाफार ताण आहे. काही चूक भूल झाली असल्यास क्षमा करावी. आणि तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया आणि रेटिंग्सने माझा उत्साह वाढवावा ही नम्रविनंती. धन्यवाद!!!)


(टिप : या कथेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कथेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कथा ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED