चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ८) Priyanka Kumbhar-Wagh द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ८)

प्रेमाचे वर्णन करावे कसे
जणू सप्तसुरांतील सूर भासे
व्यक्त न करण्याजोगे सख्या,
तुझे अन् माझे हे प्रेम असे

'प्रेम' ही भावनाच मुळात खूप अल्लड असते. प्रेमात बेधुंद होऊन कधी नाचावेसे वाटते तर कधी लहान मूल होऊन आनंदाने बागडावेसे वाटते. कधी मन थोडं खट्याळ होत खोड्या करते तर कधी कधी आवडीच्या व्यक्तीवर रुसूनही बसते. कधी मन समजूतदार होते तर कधी त्याच व्यक्तीवर रागावते. कधी आपल्याला हसवते तर कधी दुःखाच्या खोल दरीत ढकलते. कधी त्या व्यक्तीच्या सतत जवळ राहावेसे वाटते तर कधी त्याच्या सुखासाठी आपल्याला आपोआप दूर करते. असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. प्रेमात काय चूक - काय बरोबर , काय चांगलं - काय वाईट हे कळत नाही. पण प्रेम हे फक्त प्रेम असतं.

मे महिन्याची सुट्टी सुरु झाली आणि सगळेजण अभ्यासातून निवांत झाले. आता दोन महिने खूप धम्माल करायला मिळणार म्हणून सगळेच विद्यार्थी खूप खुश होते. मुग्धाच्या काही मैत्रिणी आज रात्रीच गावी जाण्यासाठी निघणार होत्या तर स्नेहल पुढच्या आठवड्यात कोकणात फिरायला जाणार होती. मुग्धाने सुद्धा आई जवळ हट्ट धरला होता. तिलाही कुठेतरी छान फिरायला जायची इच्छा झाली होती. त्यामुळे ती सकाळपासून आईच्या मागेच लागली होती. पण आईने बाबांना विचारते असं सांगून तिला गप्पं केले होते.

दुपारची वेळ झाली होती. बाहेर खूप कडक ऊन पडलं होतं त्यामुळे मुग्धा आज घरीच निवांत बसली होती. तितक्यात दाराची बेल कोणीतरी वाजवली.

"मुग्धा, बघ जरा जाऊन कोण आलंय ते . " स्वयंपाक घरातून मुग्धाची आई मोठ्या आवाजात म्हणाली.

"हो आई. बघते. " मुग्धा दाराच्या दिशेने जात उत्तरली.

"अय्याsss! स्नेहल तू ! बरं झालं तू आलीस. आज सुट्टीचा पहिलाच दिवस आहे आणि मला आतापासूनच खूप कंटाळा आला आहे. देवजाणे हे दोन महिने कसे जाणार आहेत." मुग्धाने दार उघडल्या उघडल्या स्नेहलला पाहून आनंदाने तिला मिठी मारत बोलली.

"अगं, हो हो. आधी मला आत तर येऊ देशील कि नाही? दारातच उभी राहून गप्पा मारणार आहेस का? " स्नेहल मुग्धाच्या मिठीत असतानाच म्हणाली.

"सॉरी हा मॅडम. विसरलेच होते मी. या. आत या." मुग्धा हसतच म्हणाली आणि स्नेहलचा हात पकडून तिला आत तिच्या रूमकडे घेऊन गेली.

दोघीही रूम मध्ये येऊन बसल्या. आज खूप दिवसांनी दोघींनाही उसंत मिळाली होती. परीक्षेमुळे त्यांना बरेच दिवस झाले मनसोक्त गप्पा मारायला मिळाल्याच नव्हत्या. त्यामुळे स्नेहल आज चांगलाच वेळ काढून मुग्धाकडे आली होती. शिवाय सुट्टी असल्यामुळे कोणी रागवणारही नव्हतं. मुग्धा स्नेहलसाठी पाणी आणायला आत स्वयंपाक घरात जाणारच तितक्यात मुग्धाची आई थंडगार कैरीचं पन्हं घेऊनच आली.

"वाह! कैरीचं पन्हं..." कैरीचं पन्हं बघून तर स्नेहल खूपच सुखावली.

"मस्त थंडगार आहे. घ्या पिऊन पटकन." मुग्धाची आई पन्हं देत म्हणाल्या.

"काकू, तुम्ही तर अगदी माझ्या मनातलं ओळखलं. बाहेर भयंकर ऊन आहे. उन्हातान्हात कशी आले मी माझं मलाच माहित." पन्ह्याचं घोट घेत स्नेहल म्हणाली.

"काही लागलं तर सांगा." गोड स्मित हास्य देत मुग्धाची आई रूम मधून जात म्हणाल्या.

आई जाताच मुग्धाने रूमचा दार लावून घेतला. पन्ह्याचा आस्वाद घेत दोघींचीही गप्पांना सुरुवात झाली. अचानक स्नेहलला कालचा प्रसंग आठवला आणि तिने हळू आवाजात मुग्धाला विचारले.

"मुग्धा, तू हर्षचा काही विचार केलास का? तुला तुझे उत्तर मिळाले का? हे प्रेम आहे कि फक्त आकर्षण? " स्नेहल एकदम गंभीर आवाजात मुग्धाला प्रश्न विचारू लागली.

"अगं, हो हो. एकाच वेळेस किती प्रश्न विचारतेस. सगळं सांगते. जरा धीर धर." मुग्धा हळू आवाजात पटकन बोलून गेली.

"बरं बाई. सांग ना आता लवकर." स्नेहल उत्सुकतेने म्हणाली.

मुग्धा पुढे बोलू लागली. "स्नेहल, आधी मला असं वाटत होतं कि मला भास होत आहेत. नंतर वाटू लागलं कि हर्षचा सतत विचार करून करून मला वेड लागलं आहे. माझं मन कशातही लागत नव्हतं म्हणून एक दिवस मी माझ्या आईसोबत बोलायचे ठरवले."

"काय??? तू काकूंना हर्ष बद्दल सगळं सांगितलंस!!!" स्नेहल आश्चर्याने म्हणाली.

"अगं ए वेडाबाई, आधी माझं नीट ऐकून तर घे." मुग्धा रागातच पण हळू आवाजात उत्तरली.

मुग्धाने पुन्हा पुढे सांगायला सुरुवात केली. "मी आईला माझी एक मैत्रीण प्रेमात पडलीये असं सांगितलं आहे. त्यामुळे हर्षबद्दल आईला काहीच कल्पना नाहीये. शिवाय ती मुलगी मीच आहे हे ही तिला माहित नाहीये. प्रेमाचे मला माहित नाही गं, पण आईच्या सांगण्यावरून मला हे तर कळले आहे कि मलाही हर्ष खूप आवडायला लागला आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे कि नाही हे अजून मला स्पष्टपणे कळत नाहीये पण मला त्याला बघून खूप छान वाटते. त्याच्याशी बोलायला माझं मन खूप आतुर झालंय. अभ्यासामुळे काही दिवस मी हा विचार बाजूला ठेवला होता. पण खरं सांगू, मला त्याची खूप आठवण येत होती. काल शाळेत तो आलेला हे मला कळल्यावर मी खूप आनंदी झाली होती. मलाही त्याला बघायचं होतं पण माझी नजर त्याच्याकडे जाताच तो लपून बसला आणि मला त्याला बघताच नाही आले."

"मुग्धा, इतकं सगळं तुझ्या मनात सुरु आहे आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस." स्नेहल लटक्या रागात म्हणाली.

"स्नेहल, अगं मला हे सगळं तुला सांगायचंच होतं पण आपली परीक्षा सुरु झाली आणि मी अभ्यासात लक्ष केंद्रित केले. विचार केला कि तुला हे सगळं निवांत सांगेन." मुग्धा स्नेहलला समजवत म्हणाली.

"अगं, आता तर तुला पटलं आहे ना कि हर्ष तुला आवडलायला लागला आहे. मग वाट कसली बघत आहेस. जा. जाऊन सांग त्याला हे सगळं. त्याच ही तुझ्यावर खूप प्रेम आहे गं. " स्नेहल कौतुकाने म्हणाली.


"मी त्याच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला. त्याला भेटण्याचाही प्रत्यन केला. पण कदाचित त्याला आता माझ्याशी बोलायचे नाहीये. तो माझ्याशी बोलायचे तर लांबच आजकाल माझ्याकडे बघतही नाही." मुग्धा उदास मनाने बोलली.

"अंग, मूर्ख मुली. तू स्वतःच त्याला तुझ्याशी बोलू नकोस असं सांगितलं आहेस. तूच त्याला तुला भेटण्यास मनाई केली होतीस. मग तो बिचारा करणार तरी काय?" स्नेहल मुग्धाला तिच्या कटू शब्दांची आठवण करून देत म्हणाली.

"हो. आठवलं मला सगळं. हर्षसोबत मी खूप वाईट वागले गं. पण आता मला त्याच्याशी बोलायचे आहे. एक मित्र म्हणून मला त्याला गमवायचे नाहीये. मला त्याला भेटून सगळं सांगायचं आहे. स्नेहल माझं एक काम करशील? प्लीझ." मुग्धा स्न्हेलला लाडीगोडी लावत म्हणाली.

"अरे, ये क्या पुछने वाली बात हुयी. तेरे लिए तो जान भी हाजीर है. तू बोलून तर बघ." स्नेहल उत्तरली.

मुग्धा पुढे बोलू लागली. " मला हर्षला भेटायचे आहे. त्याच्याशी बोलायचे आहे. त्याला सॉरी म्हणून पुन्हा आमच्या मैत्रीचे नाते घट्ट करायचे आहे. तू त्याच्याशी बोल आणि आमची भेट करून दे प्लिझ."

"हो नक्की. चल. आता मी निघते. खूप उशीर झाला आहे. भेटू लवकरच. " स्नेहल म्हणाली.

स्नेहल गेल्यानंतर पुन्हा एकदा मुग्धा हर्षच्या विचारांमध्ये गुंतली. त्याला पुन्हा एकदा भेटण्याची स्वप्नं रंगवू लागली. हर्षची माफी मागून त्याला पुन्हा एकदा मैत्री साठी विचारायचे असे तिने ठरवले.


असेच दोन दिवस निघून गेले. घरात बसून बसून मुग्धा खूपच कंटाळली होती. बाहेर ऊन खूप असल्यामुळे घरातच पुस्तके वाचण्यास सुरुवात केली होती. तर एकीकडे हर्षचा नेहमीचा दिनक्रम सुरु होता. अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असल्याने त्याने सुट्ट्यांमध्येच अभ्यास करायला सुरुवात केली होती. तर संध्याकाळी संगीताचा क्लास सुरूच होता.

आज संध्याकाळी श्री राम नवमीच्या पावन मुहूर्तावर चौकात नादयुक्त गीत - गायन, वाद्य आणि नृत्यकलेचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रणही नगरसेवकाने घरोघरी जाऊन दिले होते. बऱ्याच मुला - मुलींनी, स्त्री - पुरुषांनी त्यात सहभाग घेतला होता. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरु होणार होता. स्नेहल मुग्धाची वाट बघत होती पण बहुतेक मुग्धाला या बद्दल कल्पनाच नव्हती. म्हणून तिने तिच्या शेजारी बसलेल्या काकूंचा मोबाईल घेतला आणि मुग्धाच्या घरचा नंबर पटापट मोबाईलवर टाईप करून मुग्धाला कॉल लावला.

"हॅलो. कोण बोलतंय?" मुग्धा ने फोन उचलताच प्रश्न विचारला.

"मुग्धा, अगं मी स्नेहल. तू चौकातल्या कार्यक्रमाला अजून कशी आली नाहीस? मी केव्हाची वाट बघतेय. ये लवकर. कार्यक्रम सुरु होईल आता. " स्नेहल म्हणाली.

"अरे हो. मी तर विसरूनच गेले. थोड्याच वेळात पोहचते तिथे." असं बोलून मुग्धाने कॉल कट केला.

मुग्धाने पटापट कपाट उघडले. एक ड्रेस कपाटातून काढतच होती तेव्हा तिच्या अचानक मनात आले ,"हर्ष तिथे असेल ना. तो सुद्धा येईलच या कार्यक्रमाला. कदाचित माझी वाट बघत असेल. " आणि मुग्धा या विचाराने जरा लाजलीच. तो ड्रेस पुन्हा कपाटात ठेवत ती दुसरा छान ड्रेस शोधायला लागली. खूप वेळानंतर तिने एक छान मोरपिसी रंगाचा अनारकली ड्रेस शोधून काढला आणि आरशात बघून अंगाला तो ड्रेस लावत स्वतःलाच बघत बसली. आज ती पहिल्यांदाच इतकी नटून थटून तयार झाली होती आणि सारखं सारखं आरशात जाऊन स्वतःलाच निरखून बघत होती. हर्षच्या विचाराने तिच्या मनात लाज दाटली होती. तिचा चेहरा खुलला होता. लाजेने तिचे गाल गुलाबी झाले होते. तर डोळ्यात वेगळीच चमक होती. पुन्हा एकदा स्नेहलचा कॉल आला आणि ती घाई घाई मध्ये एकदा सगळं नीट आहे ना हे बघण्यासाठी आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःशीच पुटपुटली.

जाणून घे सख्या तू
भाव माझ्या मनातले,
असावे एक सुंदर नाते
निखळ मैत्रीचे आपले

क्रमशः

***************** यापुढे दर आठवड्याला कथेचा पुढील भाग प्रकाशित केला जाईल. ******************

(टिप : या कथेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती सौ. प्रियांका कुंभार - वाघ यांची असून , या कथेचे सर्व अधिकार फक्त सौ. प्रियांका कुंभार - वाघ यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कथा ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी ही नम्रविनंती. )