चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ७) Priyanka Kumbhar-Wagh द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ७)



(नमस्कार, रसिक वाचकहो...!

साहित्य क्षेत्रातील "चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची" ही माझी पहिलीच प्रेमकथा आहे. आज खूप दिवसांनी अर्धवट राहिलेली ही कथा पुन्हा लिहायला सुरुवात करत असल्यामुळे मनात भीती, खूप साऱ्या शंका आहेतच शिवाय तुम्हा सगळ्यांना कथा आवडेल कि नाही, याचा ही थोडाफार ताण आहे. कथेची पुन्हा सुरुवात करणे माझ्यासाठी खरच सोप्पं नाही आहे. तरीही प्रामाणिकपणे मी प्रयत्न करत आहे आणि मनातील कथा शब्दांमध्ये उतरवण्याचा पुरेपूर संघर्ष करत आहे. काही चूक भूल झाली असल्यास क्षमा करावी. आणि तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया आणि रेटिंग्सने माझा उत्साह वाढवावा ही नम्रविनंती. धन्यवाद!!!)



बघता बघता दहावीची परीक्षा संपली तर एकीकडे नववीची परीक्षा तोंडावर आली. मुग्धाच्या मनात मात्र वेगळ्याच विचारांचे काहूर माजले होते. अभ्यास करता करता ती मधेच वेगळ्या विचारांमध्ये हरवून जाऊ लागली. आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडत आहे असे तिला जाणवू लागले. तिच्या मनात अनेक प्रश्नांनी घर करायला सुरुवात केली.

खरंच, स्नेहल सांगतेय ते बरोबर आहे का ? मला हर्ष आवडायला लागला आहे का ? मी हर्षच्या प्रेमात पडली आहे का ? माझ्या आईला हे सगळं कळलं तर ती काय बोलेल ? ती माझ्या बद्दल काय विचार करेन ? ती तर मला नक्की ओरडेल. मी हे सगळे विचार का करत आहे ? माझी परीक्षा सुरु होणार आहे. मला हे सगळे विचार डोक्यातून काढून टाकले पाहिजेत आणि अभ्यासाकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे. मनातल्या मनात स्वतःची समजूत काढतच असताना मागून मुग्धाच्या आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि मुग्धा विचारांमधून झोपेतून जागी झाल्यासारखी बाहेर आली.

"मुग्धा, पुरे आता अभ्यास. चल जेवून घे." आई मुग्धाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"आई, तू हो पुढे. इतकं वाचून झालं कि, मी हात धुवून येतेच." अभ्यासाचं सोंग करत मुग्धा म्हणाली.

"बरं बाई! ये लवकर." आई तिच्या खोलीतून बाहेर जात म्हणाली.

आई बाहेर जाताच मुग्धाने मोठा श्वास घेतला आणि ती पुन्हा विचार करू लागली. आई-बाबांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी खूप मोठं व्हावं, माझं आणि त्यांचं नाव कमवावं असं त्यांना नेहमी वाटतं. मला त्यांची सगळी स्वप्ने पूर्ण करायची आहेत. मला खूप अभ्यास करून काहीतरी करून दाखवायचे आहे. आतापासूनच या सगळ्या गोष्टींमध्ये जर मी अडकून राहिली तर मला माझ्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करता येणार नाही. मला आता फक्त अभ्यास करायला हवा. फक्त अभ्यास.

नववीची परीक्षा सुरु झाली. मुग्धाने स्वतःला अभ्यासात पूर्णपणे झोकून दिले. परीक्षेच्या काळात मुग्धाने अभ्यास करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. दिवसरात्र अभ्यास करायचा आणि सकाळी उठून शाळेत जाऊन पेपर लिहून पुन्हा घरी यायचे. असाच दिनक्रम दहा ते बारा दिवस सुरु होता. तर एकीकडे हर्ष ची परीक्षा संपली होती म्हणून त्याने छंद जोपासण्यासाठी संगीताचा क्लास लावला होता. त्याला मुग्धाची प्रचंड आठवण येत होती. तिची एक झलक पाहण्यास तो खूप आतुर झाला होता. मुग्धाची परीक्षा सुरु असल्यामुळे हर्षला तिच्या अभ्यासात व्यत्यय आणायचा नव्हता म्हणून तो तिच्या समोर जाण्याचे टाळत होता.

आज मुग्धाचा शेवटचा पेपर होता. पेपर लिहून झाल्यावर त्या सगळ्या मैत्रिणी मिळून धम्माल करणार होत्या.
कारण या नंतर जवळ जवळ दोन महिने काही त्या एकमेकींना भेटणार नव्हत्या. शाळेला मे महिन्याची सुट्टी पडल्यावर कोणी आजोळी जाणार होते तर कोणी मामाच्या गावी. मुग्धाची खास मैत्रीण स्नेहल सुद्धा कुटुंबासोबत कोकणात फिरायला जाणार होती. त्यामुळे आज काही त्या लवकर घरी जाणार नव्हत्या. घरी तसं सगळ्या सांगूनच आल्या होत्या. आज त्यांच्या गप्पा खूप रंगणार होत्या.

हर्षलाही त्याच्या काही नववीच्या मित्रांकडून आज शेवटचा पेपर असल्याचे समजले होते. मुग्धाला बघण्याची त्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. आज काहीही झाले तरी मी पण मुग्धाला एकदा तरी बघेनच असे त्याने मनोमनी ठरवले.

शाळा सुटण्याची वेळ झाली होती. हर्ष शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका झाडाच्या मागे लपून मुग्धाची वाट बघत उभा राहिला होता. पेपर सुटल्यावर सगळ्या मैत्रिणी एकत्र गोळा झाल्या आणि त्यांच्यात एकच कल्लोळ सुरु झाला. आजच्या पेपरवर सगळ्यांची चर्चा सुरु झाली होती.

"कसा होता आजचा पेपर?" मुग्धाने सगळ्यांना कुतूहलाने विचारले.

"पेपर तर खूपच सोप्पा होता गं, पण मला वेळच पुरला नाही पूर्ण पेपर लिहायला." मुग्धाची एक मैत्रीण पूजा उत्तरली.

"हो ना यार. माझेही एक दोन प्रश्न सुटले. मलाही वेळ कमी पडला." स्नेहल निराश होऊन म्हणाली.

"मुग्धा, तुला कसा गेला आजचा पेपर?" पूजाने प्रश्न विचारला.

"मला तर आजचा पेपर खूपच सोप्पा गेला. मला वेळही पुरेसा मिळाला." मुग्धा खुश होऊन म्हणाली.

गप्पा मारत सगळ्याजणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ येताच हर्षची नजर मुग्धावर पडली. आज खूप दिवसांनी तो मुग्धाला पाहत होता. मुग्धाच्या कटू वाक्यांमुळे त्याने तिला न भेटण्याचा केलेला निर्धार आज कुठेतरी दूर पळून गेला होता. मुग्धाचा तो गोंडस आणि निरागस चेहरा पाहून हर्ष तिच्याकडे बघता बघता कुठेतरी हरवून गेला.

वाट पाहता पाहता
तुझ्यातच मी हरवतो
मग स्वतःलाच शोधताना
माझेच अस्तित्व विसरतो

तुझ्या निरागस चेहऱ्यात
चित्त एकाग्र होते
तुझ्या शांत स्वभावात
भान माझे हरपते

कधी भासते मजला
हा क्षणांचा दुरावा आहे
तर कधी असे जाणवते
हा कायमचा अबोला आहे

खुलता कळी खुलेना
आपुल्या नात्याची
अबोल प्रीत बहरेना
तुझ्या माझ्या प्रेमाची

हर्ष मुग्धामध्ये हरवलेलाच असताना स्नेहलचे त्याच्याकडे लक्ष जाते. ती हळूच मुग्धाला हर्ष तिथे उभा असल्याचा इशारा करते. मुग्धाची नजर त्याच्याकडे जाताच तो भानावर येतो आणि स्वतःला झाडामागे पुन्हा लपवतो. हर्षचा हा अल्लडपणा पाहून मुग्धा गालातल्या गालात हसू लागते. खरंतर तिलाही हर्षला बघण्याची खूप इच्छा होती परंतु अभ्यासामुळे तिने तिच्या भावनांना मनात दडपून ठेवले होते. आज ती त्याला बघणारच होती तितक्यात तो झाडामागे लपला. मनोमनी खुश होऊन ती सगळ्या मैत्रिणींसोबत घराच्या दिशेने निघाली.





क्रमशः

********** *********** यापुढे दर आठवड्याला कथेचा पुढील भाग प्रकाशित केला जाईल. *********** *********

(टिप : या कथेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती सौ. प्रियांका कुंभार - वाघ यांची असून , या कथेचे सर्व अधिकार फक्त सौ. प्रियांका कुंभार - वाघ यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कथा ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी ही नम्रविनंती. )