उन्हाळी सुट्याला सुरुवात झाली होती आणि सुधा आपल्या मामाच्या गावी गेली. तिचं मामाचे गाव म्हणजे सीतापूर जे की हरिपूरला लागून होतं. सीतापूरच्या बाजूने एक नदी वाहते तिचे नाव सीता नदी. या नदीवरून त्या गावाचे नवा सीतापूर असे पडले होते. या नदीमुळे सीतापूर गावातील सर्वच लोकं सुखी, समृद्धी आणि समाधानी होते. बारमाही पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांची शेती चांगली होती आणि त्याच कारणामुळे कोणीही चिंताग्रस्त नव्हते. तिचा मामा त्या गावातील ग्रामपंचायत मध्ये सेवक म्हणून काम करत होता त्यामुळे संपूर्ण गाव त्याला किशनमामा या नावाने ओळखत होते. सर्वांच्यलायाच एक मुलगा आणि मुलगी होती. ज्यांच्यासोबत सुधा हसत खेळत सुट्टीचा आनंद घेऊ लागली. रोज शेतात जायचं, आंब्याच्या वनात जाऊन पाडाचे आंबे खायचे, खेळ खेळायचे खूप मजा करायचे. त्याच गावात सखाराम नावाचे एक सावकार राहत होते. ज्यांना एक मुलगा होता दीपक जो की लाडाने खूपच बिघडून गेला होता. त्याचं लग्न लावून दिलं तर त्याच्यात सुधारणा होईल असा विचार सावकारच्या मनात चालत होता. त्याचवेळी सुधाच्या बाबत त्याला कळाले आणि मुलगी गावात त्यांच्या मामाकडे आली आहे हे ही कळाले. त्यांनी दुरूनच सुधाला बघितले, पाहताक्षणी सावकारला सुधा खूप आवडली. काही ही करून आपल्या दिपकचे लग्न सुधासोबत लावण्याचा तो विचार करू लागला. तसा संदेश किशनमामाच्या कानावर गेलं. किशनमामाने तसा संदेश सुधाच्या आई-बाबांना कळविले. त्याबरोबर ते दोघे धावत पळत सीतापूरला आले.
घरात सुधाच्या लग्नाची तयारी चालू झाली. तिच्या कानावर ही गोष्ट गेली. तशी ती लग्नाला विरोध करू लागली.
मला आताच लग्न करायचे नाही, दहावी पास झाल्यावर बघू.
चांगलं स्थळ आहे, अशी संधी वारंवार मिळत नाही
आईने तिला समजावत बोलत होती. मात्र सुधा आपल्या बोलण्यावर ठाम होती. काय करावं ? हे काही सुचत नव्हतं. सावकार एकसारखे किशनमामाच्या मागे हात धुवून लागला होता. हो नाही करता करता सुधा लग्नाला तयार झाली. सीतापूर गावात सखाराम सावकार एक प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यांच्या घरात सर्व सुख सोयी होत्या. त्यांच्याकडे गायी, म्हशी, अशी जनावरे देखील होती. सुधा ला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही एवढं ऐश्वर्य होतं. मुलाच्या घरूनच मागणी आल्यामुळे मुलीला नापसंद करण्याचा प्रश्नच नव्हता. ठरल्याप्रमाणे किशनमामाने सुधाच्या लग्नाची बोलचाली करण्यासाठी गेला.
" सुधा लग्नाला तयार झाली, तिचे आई-वडील खूप गरीब आहेत, लग्नात वधू पित्याकडून काही ही मिळणार नाही, कन्यादान करून मुलगी तेवढं आपल्या पदरात देतील, हे मान्य असेल तर बोला"
" किशनमामा, आम्हांला सर्व काही मान्य आहे. मुलगी तेवढं पदरात द्या. बाकी सर्व आम्ही करू". सर्वाना मुलगी पसंद होती आणि मुलाच्या बाबतीत काय सांगायचं ? साऱ्या गावाला माहीत होतं दीपक कसा आहे ते ? दीपक हा एक लाडात वाढलेला सावकाराचा एकुलता एक मुलगा. गावात कोणसंगे ही भांडण करायचं, दादागिरी दाखवायची ही त्याची सवय होती. काही दिवसापासून त्याला काही वाईट सवयी देखील लागल्या होत्या. किशनमामाला हे सारं ठाऊक होतं. त्यामुळे तो सुधाला अगोदरच सर्व काही सांगून ठेवलं होतं. सुधा सुरुवातीला याच गोष्टीमुळे नकार देऊ लागली होती. पण लग्न झाल्यावर दीपक मध्ये सुधारणा होईल म्हणून सर्व विचाराअंती तिने होकार दिला. सुधाची सोयरीक झाली ही गोष्ट तिच्या मैत्रिणीला आणि शाळेत देखील कळाले. एवढ्या लहान वयात लग्न करू नये असा सल्ला शिक्षक मंडळींनी तिच्या वडिलांना सांगितला. पण माधव मुलीच्या काळजीत काहीएक ऐकायला तयार नव्हता. त्याला कायद्याची बाब देखील सांगून बघितलं पण तो काही ऐकत नव्हता. बिचारी सुधा ती काहीच बोलत नव्हती. तिला एवढ्या लहान वयात लग्न करायचं नव्हतं, तिला खूप शिकायची इच्छा होती मात्र वडिलांच्या परिस्थिती चा देखील तिला विचार करणे आवश्यक होते. वडिलांना सुधाची जशी काळजी वाटत होती तशी सुधाला देखील वडिलांची काळजी वाटत होती. आई-वडिलांचा विचार करून तिने या लग्नाला होकार दिला. उद्यापासून तिच्या जीवनाची दुसरी पहाट सुरू होणार होते, त्याच स्वप्नात ती गाढ झोपी गेली.