प्रकरण ९
सर वयक्तिक भेट घेऊन प्रत्येकाची खुशाली विचारत होते.सर्व मुलं बागेत खेळत होती. परंतु चंदू व लक्ष्मी दोघे अभ्यास करत होते. हे बघून सरांना त्यांच्या विषयी कुतुहूल वाटले. त्या दोघांना बघून ज्ञानू व काशीची आठवण झाली.त्या दोघात ज्ञानू व काशीला बघू लागले. आज जर या दोघांना आसरा मिळाला नसता तर हि दोघे बिचारी बालमजुरी करून जीवन व्यतीत करत राहिले असते. लक्ष्मीला कोणी पळवून कोठीवर विकले असते.तर चंदू कुठे पाठीला पोक येईपर्यंत, हाताची नखं रक्तबंबाळ होईपर्यंत तर कुठे अंगावर उकळते तेल उडून अंगावर व्रण उठे पर्यंत बारा बारा तास काम करत राहिला असता---या विचारानेच सरांच्या अंगावर भीतीचे रोमांच उभे राहिले.
" चंदू बेटा, तू खेळायला गेला नाही---?
" नाही सर, आधी आम्ही आमचं होमवर्क पूर्ण करतो आणि मग आम्ही खेळायला जातो---"
" लक्ष्मी, तुला इथे बरं वाटतं नं---? तुझ्या चाचाची आठवण तर येत नाही नं---? ते तुम्हाला एक महिन्याने भेटायला येतीलच---तुम्हाला काहीही हवे असेल तर मला सांगायचं---खूप अभ्यास करायचा आणि खूप मोठं व्हायचं---" असे म्हणून सरांनी दोघांना प्रेमाने कुरवाळले आणि वाडीत झाडांची पाहणी करायला गेले.
दुसऱ्या दिवशी सर नेहमीप्रमाणे नाश्ता करून आजीकडे तिची चौकशी करायला गेले. आजी पलंगावर बसलेलीच होती.
" आजी , नाश्ता झाला कां---?
" हो हो , तू माझी किती काळजी घेतोस. आजपर्यंत या मंजुळाची काळजी घ्यायला कोणी नव्हतं---तरुण होते तोपर्यंत पैशाच्या हव्यासाने शेवंता बाय इचारत व्हती, गोड कौतुक करत होती. जेव्हा जेव्हा मी आजारी पडून झोपून राहायचे तर चीड चीड करायची---म्हणायची कि " अगं मंजुळा , असं झोपून राहून कसं चालेल---? तुझी गिराहीक नाराज होऊन निघून जातील---कोणाला नाराज होऊन परत पाठवायचं हे आपल्यात शोभत नाही---चल उठ , हि गोळी घे आणि लवकर तयार हो---" अशी शेवंता बाईची किट किट असायची. लहान वय असतानाच कोठीवर आणले गेले. लहानपणापासून जे काही बघितलं ती हीच आहे दुनिया असं मनाचा समज झाला होता. सुरवातीला कोणी अंगाला हात लावला कि नको वाटायचे. परंतु जस जशी मोठी झाले तसे ते संस्कारच पडून गेले. सर्व काही अंगवळणी पडून गेले. कोवळ्या मनावर पडलेले संस्कार पक्के होतं गेले. मी काही चुकीचे करते हा विचारच मनात येत नव्हता. परंतु आत कुठेतरी ज्ञानूची, माय-बापूची आठवण मनाला कुरतडत होती. त्या आठवणीने बालपणीची स्वप्न पुन्हा जागृत व्हायची आणि मन उदास होतं असे---कोणाचाही स्पर्श नकोसा वाटतं असे. इथून पळून जावे आणि मायच्या कुशीत शिरून मनसोक्त रडावे. ज्ञानूकडे जाऊन नेहमीप्रमाणे भांडावे---गजऱ्यासाठी हट्ट करावा---झोपडपट्टीत जाऊन पुन्हा तो लपाछपीचा डाव खेळावा---परंतु मी कुठे राहते त्या गावाचे नाव हि मला सांगता येत नव्हते आणि आजही मला गावाचे नाव माहित नाही. किती मी अडाणी राहिले. माझं तर जाऊदे पण माझा ज्ञानू तर एक ऑफिसर झाला असलं---त्याला सुद्धा शिकायची लई आवड व्हती. पण आम्हा गरिबांना कोण शिकवणार---? आमच्या गरिबीचा फायदा घेऊन मुलांना मजदूर बनवतात आणि मुलींना कोठीवर विकून टाकतात. हे दलाल आमच्या जीवावर आपले खिसे भरतात. गरिबी हा लई मोठा शाप हाय---काल तू एक मुलगा आणि एका मुलीला आश्रम मध्ये घेऊन आलास. ती मुले कोण व्हती---? "
" आजी , तो चंदू आणि त्याची बहीण लक्ष्मी---ती मुलं सुद्धा गरीब व आई-बाप विना रहात आहेत---" सर म्हणाले.
" तू लई चांगलं काम करतोस---या मुलांना खूप शिकिव आणि मोठं कर---लक्ष्मीला माझ्यासारखी मंजुळा होऊ देऊ नकोस---" एवढं सगळं बोलेपर्यंत आजीला धाप लागली होती.
सरांनी तिला तांब्यातून कोमट पाणी दिले आणि तिला पलंगावर झोपवून म्हणाले " तू किती बडबड करतेस---जास्त बोलू नको म्हणून सांगितले तरी ऐकत नाही. आता जरा आराम कर---मी वाडीत जाऊन येतो.
वाडीमध्ये शंभू आणि परशा आंब्याच्या झाडांची नवीन कलमे लावत होते---मनोज व राम त्यांना मदत करत होते. सर तिथे जाताच शंभू व परशाने सरांना नमस्कार केला आणि म्हणाले " सर, आता नारळ काढायला झाले आहेत. तसेच केळीचे घड सुद्धा काढायला हवेत---"
" या वेळेला केळी व चिकू आश्रम मध्ये सगळ्यांना वाट आणि बाकी विकायला पाठवून द्या---" असे म्हणून सर आश्रमाच्या शाळेकडे वळले. सर चंदू व लक्ष्मीच्या क्लासमध्ये प्रवेश करताच सर्व मुलांनी उभे राहून सरांना नमस्कार केला.
" बसा---बसा मुलांनो, असे म्हणून सरांनी क्लास टिचरला बाहेर बोलावून घेतले आणि विचारले " चंदू आणि लक्ष्मी अभ्यासात कसे आहेत---तसं विचारायचे कारण म्हणजे ते दोघेही नवीनच आहेत. शिवाय वयाने सुद्धा थोडे मोठे आहेत. म्हणून त्यांना पाहिलीत न बसवता एकदम तिसरी इयत्तेत बसविले तर---? म्हणजे त्यांचेही नुकसान होणार नाही. तुम्हाला काय वाटत---? हा त्यांच्या विषयीचा निर्णय योग्य आहे नं---?" सर आपला चष्मा सावरत म्हणाले.
" हो---हो तुमचा निर्णय योग्यच आहे. तसे ते दोघंही फार हुशार आहेत. लक्ष्मी तर खूपच चुणचुणीत मुलगी आहे---" क्लास टीचर म्हणाले.
" तर मग त्यांची परीक्षा घेऊन त्यांना आपण पहिलीतून तिसरीत एडमिशन देऊया---असे म्हणून सर घाईघाईत निघून गेले.
रस्त्यातच डॉक्टर भेटले---गुडमॉर्निंग डॉक्टर---"
" गुडमॉर्निंग---"
" बरं झालं तुम्ही भेटलात---मी तुमच्याकडेच येत होतो---" सर म्हणाले.
" आता मंजुळा आजीची तब्येत कशी आहे---? काही टेस्ट वगैरे करण्यास गरजेचे आहे कां---? "
" तसे आम्ही गरज असल्यास टेस्टिंग करतच असतो---परंतु आता काय त्यांचे वयही झाले आहे त्यामुळे औषधं लवकर लागू पडत नाही. दिवसेन दिवस अशा उतार वयाच्या लोकांची प्रतिकार शक्तीही कमी कमी होत असते---शिवाय आजी सुद्धा खूप विचार करत असतात. नर्सही बोलत होती कि आजी झोपेमध्ये कधी ज्ञानू ज्ञानू बोलतात तर कधी शेवंता बाई , शेवंता बाई म्हणून बोलत असतात. असं वाटते कि या ज्ञानू , शेवंता बाई यांचा तिच्या जीवनाशी काहीतरी जवळचा संबंध असावा---त्यांच्या पासून आजीने खूप काही सोसलेले दिसते.तरी सुद्धा आम्ही आमच्या कडून शक्य तितके प्रयत्न करतच असतो---" डॉक्टर म्हणाले.
" डॉक्टर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तरी आश्रमातील प्रत्येक सदस्य माझ्या परिवारातील आहे असे मी समजून असतो. आश्रमातील प्रत्येकाची काळजी घेणं हि माझी जबाबदारी आहे---" सर म्हणाले.
" तरीसुद्धा या मंजुळा आजीची तुम्ही फारच देखभाल करता. तुमच्या या ओळखीमधील आहेत कां---? " डॉक्टरांच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे हे सरांना समजत नव्हते---सरांनी नुसते कोरडे हसू आणून डॉक्टरांच्या हातात हात मिळवून आपल्या रूमकडे वळले.