मी एक मोलकरीण - 1 suchitra gaikwad Sadawarte द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी एक मोलकरीण - 1

( भाग 1)

लहान असतानाच वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांच्या प्रेमाचे छप्पर माझ्यावरून दूर झाले. इतक्या लहानवयात मला माझ्या आईचा आधार तर छोट्या बहिण - भावासाठी बाबा बनायचे होते. आईने तर स्वतःला आमच्या तिघांसाठी सावरले होते. मी पाचवी मध्ये शिकत होते. खरं तर मी पुस्तकापेक्षा आई कडून जास्त शिक्षण घेत होते. कदाचित म्हणून मला तेव्हा पासून शिक्षणामध्ये कमी असल्याची जाणीव झाली.

मी अकरा वर्ष, माझी बहिण पाच आणि भाव दोन वर्ष असताना आईला बाबा एकटे सोडून गेले होते. माझं शिक्षणाची आणि आमच्या तिघांची पालन पोषण करण्याची खूप मोठी जबाबदारी आईवर वयाच्या 26 व्या वर्षी आली होती. आई घरोघरी जाऊन घरकाम देण्यासाठी मागणी करत होती. आईची अवस्थाच तशी होती की तिला बघताच चार घरची काम तिला मिळाली. त्या दिवसापासून आई पहाटे पाचला उठून आधी आमच्या खाण्याची तयारी करत असे. आठ पर्यंत आधी स्वतःच्या घराची काम संपवीत मग दुस-यांच्या घरी धावत असे.मला आणि सुमाला बाजुच्या काकांकडे आणि मदन ला तिच्या सोबत जीवावर दगड ठेवून जात होती. मदनला सोबत घेवून जात असल्यामुळे कधी कधी तिला बोलणी हि ऐकायला लागत होती. माझ्या शाळेची वेळ अकराची होती मग मी पण सुमा ला तिथे काकांकडे सोडून जात असे. आई पाच वाजे पर्यंत तिची काम संपवून मला शाळेमध्ये नेण्यासाठी येत असे. नंतर आई, मदन आणि मी सुमाला घेण्यासाठी जायचो. मग आईच्या कडेवर सुमा, आणि माझ्या कडेवर मदन अशा स्थितीमध्ये घरी जायचो. सहापर्यंत घरी पोहचताच आई पुन्हा घरच्या कामाला लागत. मी खुप प्रयत्न करायचे आईला मदत करण्यासाठी पण ती नेहमी अभ्यासावर लक्ष दे नाहितर मोलकरीण होशील अस बोलायची आणि जबरदस्तीने मला अभ्यासाला बसवत असे. अशी आमची रोजची दिनचर्या चालु होती. असेच दिवस भरभर जात होते त्यात मला मी कधी सहावीमध्ये गेले समजले नाहि.पुन्हा तोच दिनक्रम सुरू होता पण मी आता आईला मदत करायला लागले होते.

आज आई घरची काम संपवून मदन ला घेवून गेली.मी आणि सुमा काकांकडे निघालो होतो पण सतत कोणीतरी मागे येत असल्याची जाणीव होत होती. मी सुमाला धावत जाऊया बोलून काकांकडे घेवून गेले.मी सुमाला काकांकडे सोडले आणि काही वेळात शाळेमध्ये निघून गेले. मला आज उशीर झाला होता म्हणून सुमाला न भेटताच धावत गेले आणि शाळेवर वेळेवर हजर झाले पण का ? कुणास ठावुक मला मनात भिती वाटत होती. कसली भिती वाटते ते ही कळत नव्हतं. सकाळी आपल्या मागे कोण होत ? कोणी पाठलाग करत होता का ? कदाचित याची भिती होती. माझं शाळेमध्ये कोणत्याच विषयामध्ये लक्ष लागत नव्हते. सुमाची काळजी वाटत होती, मनात विचार येत होते, मी माझ्या वयापेक्षा जास्त विचाराने मोठी होतं होते . या मध्येच शाळा सुटल्याची घंटा वाजली आणि मी काहीही विचार न करता आईकडे धावत बाहेर आले. आईला सतत बोलत होते ' आई सुमाकडे लवकर चल !' आई ने मला विचारलं काही झालयं का ? मी बोलले मला भिती वाटते, सुमाची काळजी वाटते खूप! खूपच! आणि नकळत रडायला लागले. आईला आता भिती वाटत होती म्हणून ती पण वेगाने निघाली.

आई मदन ला कडेवर घेवून धावत होती म्हणून तिचा वेग माझ्यापेक्षा कमी होता. मी काकाच्या घरी पोहोचले आणि माझ्या मनातील भिती जोरजोरात रडण्यामधी उतरली.काकांच्या दाराला कुलूप होते, काका आणि आमची सुमा दोघेही कुठेच दिसत नव्हते. आई पोहचली, मदनला खाली उतरवून धापा टाकीत इकडे तिकडे सुमा ! सुमा ! ओरडू लागली . आमची सुमा कूठेच नव्हती. आई आणि मी मदनला घेवून पूर्ण गावामध्ये सर्वांना सुमाला कूठे बघितले का ? असं विचारत होतो. पण कोणीच तिला बघितलय अस उत्तर दिल नाहि.शेवटी लोक आईला पोलिस स्टेशन मध्ये जा ! अस सांगू लागले. मी खूप रडत होते पण आईला माझी गरज होती. मदनला भूक लागली होती तरीही तो शांत होता. आम्ही पोलिसांना सर्व सांगितले तसेच सुमा सोबत काका हि गायब असल्याचे सांगितले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली व काही तपास लागल्यास कळवू असे सांगितले. मी आईला व मदनला घेवून घरी आले. जे झालं त्यासाठी आई स्वतःला दोष देत होती. ती ईतकी खचून गेली होती की तिच मदनकडे ही लक्ष नव्हते. मी पुढे होवून घरामध्ये काहीतरी खायला मिळतयं का? ते बघितले.थोड शिळे अन्न होत ते मदनला दिले आणि त्याला झोपवले. मी आणि आई रडत एकमेकींना आधार देत समजावत होतो की जिथे कुठे सुमा असेल तिथे ठिकच असेल असं !

आम्हा दोघींना झोप कशी लागली कळलचं नाहि. सकाळी सकाळी दारावर जोरात कडी वाजल्याचा आवाज झाला तेव्हा जाग आली. आम्ही डोळे उघडले तर समोर पोलिस ऊभे होते. ते आम्हाला कुठे तरी जायचयं लवकर चला अस काही बोलत होते. आई सुमा बद्दल काही समजल का अस विचारत होती पण कुणीच उत्तर देत नव्हते. आम्ही आवरून मदनला घेवून पोलिसांसोबत निघालो. काही वेळातच गाडी एका दवाखान्याच्या समोर उभी राहिली. आईने पुन्हा विचारले, ' माझी पोरगी ईथे आहे का ? बरी आहे ना माझी पोर ? ' पुन्हा कुणीच उत्तर नाहि दिले. तसेच आम्हाला एका खोली मध्ये घेवून गेले तिथे काही वस्तू होत्या त्या आम्हाला दाखवल्या तितक्यात आई तिथेच जोरात ओरडू लागली " हि बांगडी माझ्या लेकीची आहे, तिला काय झालयं, कुठे ती?" आता एका पोलिसाने उत्तर दिले,"आम्हाला काल दवाखान्यातून फोन आला की दवाखान्याच्या बाजूला एक मुलगी सापडली आहे,ओळख पटत नाहि !" तुम्ही सांगितलेल्या वर्णनावरून आमच्या लक्षात आले ती मुलगी सुमा असावी ! म्हणून तुम्हाला ईथे बोलवलं आहे. मदनला काही कळत नव्हते पण मला कळत होते.आई आणि मी सुमाला पाहिल्याबरोबर थक्क झालो. सुमा आम्हाला पुन्हा आधी सारखी मिळेल असं वाटत नव्हतं.मला ईतकच कळत होती ती खूप वाईट अवस्थेत आहे, पण आईला खूप काही कळून चुकले होते, ती डोक्यामध्ये मारत ओक्साबोक्शी रडत होती. तितक्यात पोलिस म्हणाले सुमावर बलात्कार करून कोणीतरी दवाखान्याच्या आसपास फेकून दिल असेल.

पोलिसांना काकांवर संशय होता आणि काका अजूनही गायब होते.

पुढे पोलिसांचा शोध सुरू झाला.

पोलिसांनी आमची चौकशी सुरू केली. काका कोण होते ? कसे होते ? काय करत होते ? आम्ही कधीपासून ओळखतो ? अशा ब-याच प्रश्नांनी चौकशी होत होती.आई पूर्ण खचून गेली होती . मला मदन आणि तिला सांभालाव लागत होत. आईची तब्येत ठिक दिसत नव्हती म्हणून मलाच सर्व बघायच होत. आई जिथे कामाला जायची ती लोक आईला बोलू लागले, कामावल काढून टाकू अस सूचना देऊ लागले. आई त्या मनस्थितित नव्हती तर मी तिला कामावर कसं पाठवणार होते. पण काम सुरू नाहि केल तर कायमच काम सोडाव लागल असत. दुःख कमी होते म्हणून कदाचित नवीन काळजावर आघात करणारी बातमी आली.

बातमी सुमाची होती ! सुमा मृत्यु बरोबर देत असलेल्या झुंजेमध्ये हारली होती.ती आम्हाला सोडून गेली होती कायमची ! आई आमच्या मध्ये असून नसल्यासारखी झाली. सुमाचे अंतिम संस्कार सूद्धा गावातील लोकांनी केले. बरेच दिवस झाले आई कामाला नव्हती ! घरातील सर्व वस्तू संपत चालल्या होत्या, आता मी कामाला जायचं ठरवलं. आई सतत ' तु अभ्यासावर लक्ष दे,' हेच सांगत होती. पण आता अभ्यासाबरोबर काम करणे हि गरज होती.

मी आई आणि मदनला घरी ठेवून, आईची कामे बघण्यासाठी साठी निघाले. चार ही घर एकमेकांपासून काही अंतरावर होती. मी पहिल्याच दिवशी सर्वांना आईच्या जागी मी येणार असल्याचे सांगितले, कोणालाच माझ्यावर विश्वास नव्हता पण एक संधीची मागणी मी सगळीकडे केली आणि ती मार्गी लागली. आता मला अभ्यास आणि घरकाम दोन्ही तितकचं महत्वाच होतं.

आजपासून मी एक विद्यार्थी तर होतेच पण सर्वासाठी एक घरकाम करणारी मोलकरीण झाले...