7
घोडसवार निघाले. सर्वात पुढे सुवर्णमती होती. पाठोपाठ चंद्रनाग, सूर्यनाग, त्यांच्यामागे सख्या, सेविका आणि सैनिक काही अंतर ठेवून निघाले. राजे आणि राण्याही निघाले, परंतु ते प्रथम नगराचा फेरफटका मारून मग वनी पोहोचणार होते. जरा पुढे गेल्यानंतर सुवर्णमतीने सूर्यनागाकडे एक कटाक्ष टाकला. तो परिसराचे बारीक निरीक्षण करण्यात गुंतल्याचे तिला दिसले. किंचित दुखावलेल्या अहंकाराने, तिने चंद्रनागास शर्यत लावण्यास सांगितले. तोही ताबडतोब तयार झाला. सूर्यनाग सर्व बोलणे ऐकत होता, पण तो काहीच बोलला नाही. सुवर्णमतीने घोड्यास टाच दिली. चंद्रनागानेही घोड्यास टाच दिली. वेग वाढत गेला. सर्वांमधे आणि या दोघांमधले अंतर वाढत गेले.
सूर्यनाग त्यांच्याबरोबरीने, किंवा खरंतर त्यांच्या पुढे, जाऊ शकत होता, पण जाणीवपूर्वक तो थोडे अंतर राखून निघाला. मनातून त्याची तगमग होत होती. पण सुवर्णमतीने त्याला नव्हे तर चंद्रनागास शर्यतीबद्दल विचारले, ही बाब तो विसरू शकत नव्हता. या शर्यतीतील जीत तिच्या हृदयापर्यंत सरळच घेऊन जाणारी जीत असेल हेही तो जाणून होता. आपण ती शर्यत सहज जिंकू शकतो हेही त्याला माहित होते. पण सुवर्णमतीचा कल चंद्रनागाकडे असेल तर त्यात बाधा येऊन चालणार नव्हती. त्याला सुवर्णमती मिळण्यापेक्षाही, गंगानगरीशी रिश्ता जुळणे, राज्यहिताच्या दृष्टीने फार महत्वाचे होते. आणि राज्यहित, ही त्याची प्राथमिकता होती. काही निर्णय होणे राज्याच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाचे होते. एक काटा मात्र त्याच्या ह्रदयात सलत राहिला. राजकुंवर अंतर राखून निघाले म्हटल्यावर बाकीचेही जरा दमानेच निघाले.
शर्यत जोशात चालली. इंचाइंचाने सामना रंगत चालला. कधी सुवर्णमतीचा घोडा पुढे, तर कधी चंद्रनागाचा. दोघेही शर्यतीत इतके रंगले की त्यांना जणू इतरांचा पूर्ण विसर पडला. सुवर्णमतीचे मागे बांधलेले केस एव्हाना पूर्ण मोकळे सुटले होते. भरधाव घोड्यावरून जाताना, ते पिसाऱ्याप्रमाणे तिच्यामागे उडत होते. तंग सुरवार आणि कातडी कोटातून तिचे सौष्ठव उठून दिसत होते. चंद्रनागाचे चित्त, विचलित होत होते, परंतु या शर्यतीतील जीत त्याला सुवर्णमतीपर्यंत विनासायास घेऊन जाणार हे त्यास पक्के माहित होते. तिच्या घोडसवारीतील कौशल्यास एकीकडे त्याचे मन दादही देत होते. भल्याभल्यांना त्यास शर्यतीत हरवणे बाजूला, इतकी उत्तम स्पर्धाही करता आली नव्हती.
सूर्यनाग लांबवरून स्तिमित होऊन त्या सौंदर्यवतीकडे पाहत होता. त्याच्याही नकळत त्याने घोड्याला टाच दिली. चंद्रनाग व सुवर्णमती वनमंदिरापर्यंत पोहोचणारच होते तेवढ्यात सुवर्णमती जोरात ओरडली "मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत जो आधी जाईल तो जिंकला." दोघांनीही आपापल्या घोड्याचा वेग अधिकच वाढवला. अगदी जवळ जवळ दोन्ही घोडे वेगाने धावू लागले. मंदिराच्या पायऱ्या नजरेच्या टप्प्यात आल्या. आता अटीतटीचा सामना सुरू झाला. क्षणाक्षणाला घोडे एकाच वेगात पायऱ्यांकडे धावू लागले आणि काही कळण्यापूर्वीच सुवर्णमती घोड्यावरून खाली फेकली गेली. खाली पडताना तिने एक किंकाळी फोडली आणि ती निपचित पडली. काय झाले हे कळण्यापूर्वीच प्रतिक्षिप्त क्रियेने चंद्रनागाने घोड्याचा लगाम खेचला आणि एका उडीत तो सुवर्णमतीपर्यंत पोहोचला. तिची शुद्ध हरपलेली पाहून त्याने आसपास पाणी दिसते का पाहिले. सुदैवाने जवळच तळे दिसले. त्याने झटकन सुवर्णमतीस उचलून घेतले आणि तळ्याकाठी घेऊन आला. तिला खाली झोपवून पानाच्या द्रोणात पाणी घेऊन आला आणि तिचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. तसेच मोठी इजा नाही ना हे पाहिले. सुदैवाने सुवर्णमती जिथे फेकली गेली होती तिथे बारीक वाळूचा ढिगारा होता. त्यामुळे फारशी इजा नव्हती. थंड पाण्याच्या स्पर्शाने सुवर्णमती शुद्धीवर आली. क्षणभर आपण कुठे आहोत याचा तिला विसर पडला आणि ती चंद्रनागाकडे पाहू लागली. चंद्रनागास सर्व जगाचा विसर पडला. आणि जेव्हा घोड्यावरून फेकले गेल्याची आठवण जागली तेव्हा ती प्रचंड घाबरली. हुंदक्यांनी तिचे शरीर गदगदू लागले. चंद्रनागाने तिला कवेत घेतले. तीही त्यास बिलगली.
सूर्यनाग तिथे पोहोचला तेव्हा त्यास ते दोघे असे पाहावयास मिळाले. एकमेकांच्या कवेत.
अर्थात लगेच भानावर येत सुवर्णमती पट्कन उठली आणि काहीच न बोलता काहीशी लंगडत मंदिरात निघून गेली. चंद्रनागाने घडलेली सर्व घटना सूर्यनागास सांगितली. सूर्यनागाचा चेहरा दगडी झाला होता. ती दोघे एकमेकांच्या कवेत असलेले दृश्य तो विसरूच शकत नव्हता.
तेवढ्यात, राजे, राण्या, सेवक, सर्वच पोहोचले. घडलेली घटना ऐकून सर्वांचेच धाबे दणाणले. काहीही विपरित घडले नाही म्हणून सर्वांनीच देवाचे आभार मानले. सुवर्णमती मात्र एकदम गप्प गप्प होती. चंद्रनागाची आणि सूर्यनागाची नजर टाळत राहिली.
चारुलतादेवींना मात्र राहूनराहून एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटत राहिले की घोड्याच्या पाठीवर पाय रोवून उभी राहून पतंग काटणारी आपली कन्या घोड्यावरून पडली कशी?