Suvarnamati - 9 books and stories free download online pdf in Marathi

सुवर्णमती - 9

9

उतावळ्या स्वभावाच्या चंद्रनागास विचार करत बसणे शक्यच नव्हते. तो तडक गंगानगरी जाण्यास निघाला. अर्थात कोणालाही कसलीच कल्पना न देता.

मोटरगाडी गंगानगरीजवळील एका खेड्यात ठेवून तिथून घोडा घेऊन, वेशांतर करून तो गंगानगरीस पोहोचला. या वेळेस तो अर्थातच राजमहाली जाणार नव्हता. तिथल्याच एका मुसाफिरखान्यात त्याने स्वत:साठी राहण्याची सोय पाहिली. मुसाफिरखान्यात मुद्दामच 'आपण हिऱ्यामोत्यांच्या दागिन्यांचा व्यापारी असून काही खास विलायती दागीने आपल्याजवळ आहेत. इथल्या राजकुमारीस ते आवडतील आणि आपल्यास चांगली किम्मत मिळेल या आशेने आपण आलो असल्याचे त्याने सर्वांना सांगितले.'

माझी मुलगी राजकुमारीच्या सखीची सखी असून ती तुझी काही मदत करू शकेल असे मालकाने म्हणताच चंद्रनागास अत्यानंद झाला.

मालकाच्या मुलीने त्या सखीस दुसरेच दिवशी बोलावून घेतले. तिची भेट या व्यापाऱ्याशी घालून दिली. चंद्रनागाने साठीच्या आसपास वय दिसावे असे वेशांतर केल्याने सखीस कोणतीच शंका आली नाही. तिने दागीने पाहण्यास मागताच, “ते मी फक्त राजकुवारीसच दाखवीन” असे त्याने स्पष्ट सांगितले. “राजकुंवारीस ते आवडले नाहीत तर माझ्यावर बेतेल” असे सखीने म्हणताच “त्यांना ते आवडले नाहीत तर खुशाल म्हणाल ती शिक्षा भोगेन” असे त्याने ठणकावून सांगितले. यावर मात्र ती सखी काही न बोलता “बघते कसं करायचं ते” असं म्हणून गेली. आता वाट पाहण्याशिवाय चंद्रनाग काहीच करू शकत नव्हता. त्याला सुवर्णमतीस भेटण्याची उत्कट इच्छा होती परंतु घाई करण्यात अर्थ नव्हता.

सुवर्णमतीही वाट पहात होती. तिच्या खास हेराने चंद्रनाग वेशांतर करून गंगानगरी पोहोचल्याची बातमी तिला दिली होती आणि चंद्रनागाकडून पुढची हालचाल होण्याची ती वाट पाहत होती. तिने नियतीचेही आभार मानले. नियतीने राजाजींना सूर्यनागाचा प्रस्ताव तिच्यासाठी पाठवण्याची बुद्धी देऊन तिची योजना मार्गी लावण्यात मोठाच हातभार लावला होता.

अपेक्षेप्रमाणे हालचाली घडू लागल्या. सखी व्यापाऱ्याची वार्ता घेऊन आली. तिने त्यास महाली लगेच न बोलावता आपण कळवू तेव्हा यावे, सध्या जरा व्यस्त असल्याचा निरोप सखीसोबत पाठवला. सखीने व्यापाऱ्यास निरोप दिल्यावर तो अत्यंत बेचैन झालेला दिसला. मग “आपण फार लांबून आलो आहोत आणि स्वगृही परत जाण्याचे वेध लागले आहेत. कृपा करून राजकुवारीची लवकरात लवकर भेट घडवून आणावी” अशी याचना सखीजवळ करू लागला.

सखीने दुसऱ्या दिवशी परत सुवर्णमतीकडे त्याचा विषय काढला. ‘तो कसा वयस्क असून प्रवासाने शिणला आहे, आपल्या भेटीने त्याचे कसे भले होईल’ वगैरे करूण वर्णन ती करू लागली तेव्हा मात्र सुवर्णमतीस हसू आवरणे कठीण झाले.

मग ती म्हणाली “आमची व्यस्तता तुला दिसतेच आहे. घोड्यावरून पडल्यापासून आमचे चित्त ठिकाणावर नाही. उद्या परत आम्ही वनमंदिरी जाऊन परमेश्वराच्या सान्निध्यात एकांतात काही घटिका ध्यानस्थ बसावे म्हणतो. तू सायंप्रहरी त्या व्यापाऱ्यास घेऊन ये. परंतु त्यास बजावून सांग की सकाळच्या प्रहरात त्याने अजिबात येण्याची घाई करू नये. आम्ही एकांतात परमेश्वराच्या समीप काही घटका घालवू इच्छितो.”

सखीने सारा वृतांत चंद्रनागास येऊन सांगितला. आपण कसे त्याच्यासाठी शब्द टाकला आणि कसे मन विचलित असूनही केवळ आपल्या शब्दाखातर राजकुवारी भेटीस तयार झाली आणि सकाळचे काही प्रहर ती वनमंदिरी जाऊन एकांतात घालवू इच्छिते वगैरे सर्व वृतांत . सायंप्रहरी व्यापारासाठी तयार राहण्यास बजावून सखी गेली.

आता चंद्रनागाच्या जीवात जीव आला. तो भल्या पहाटेसच उठला आणि घोडसवार होऊन वनमंदिर परिसरी जाऊन पोहोचला. मग त्याने आपले सर्व वेशांतर उतरवले. आपल्या पूर्वस्वरूपात येऊन त्याने आत जंगलाकडे कूच केले. राजकुवारी कितीही म्हणाली, एकांत वगैरे, तरी तिच्यासोबत एखादी सखी आणि काही सैनिक हे असणारच. तत्पूर्वी घोड्यास लपवणे आवश्यक होते. घनदाट जंगलात शिरून त्याने एक भरपूर उंच वृक्ष शोधला. त्यास खुणेची दोरी बांधून तो आणखी थोडा आत गर्द झाडीत शिरला. हातातील कोयत्याने झुडपे छाटत मोकळी जागा बनवून घोड्यास तिथे सैलसर बांधले आणि परत मागे येऊन त्या उंच वृक्षाच्या शेंड्यावर चढून बसला. इथून सुवर्णमतीच्या येण्याचा रस्ता स्पष्ट दिसत होता.

तिला भेटण्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. त्याला धीर धरवत नव्हता. आधीच उतावळा स्वभाव, त्यात प्रेमबाधा झालेली. आपण काय बोलणार, त्यावर ती काय म्हणेल, याची वारंवार उजळणी मनातल्या मनात होत होती. आपलं चुकलंच जरा. मागच्या वेळेस परत जाण्यापूर्वीच तिची भेट घेऊन आपली प्रेमभावना स्पष्ट बोलून दाखवली असती तर एवढं रामायण घडलंच नसतं असं वारंवार त्यास वाटत राहिलं.

काही घटका अशाच गेल्या ज्या त्यास युगांप्रमाणे भासल्या.

अचानक लांबवरून एक ठिपका जवळ येताना दिसू लागला. घाई करण्यात अर्थ नव्हता. सैनिक पुढे टेहळणीसाठी आला असावा. हळूहळू घोडेस्वाराची आकृती जवळ जवळ येऊ लागली. जिथे सुवर्णमती पडली होती तिथे येऊन ती थांबली. घोडेस्वार पायउतार झाला. त्याने घोड्यास थोपटून लगाम सोडून दिला. डोक्याचा फेटा सोडला आणि सुवर्णमतीचे लांबसडक केस पाठीवरून खाली रुळू लागले.

चंद्रनाग अनिमिष नेत्रांनी पाहत राहिला.

सुवर्णमती तलावाकाठी आली आणि पाण्याकडे पाहत बसून राहिली. बराच वेळ झाला तरी दुसरं कोणीच आलं नाही, तेव्हा चंद्रनाग झाडावरून खाली उतरला. झरझर जंगल पार करून मागील बाजूने सुवर्णमतीच्या दिशेने आला आणि सावकाश ती दचकणार नाही अशा पद्धतीने तिच्यापासून काही अंतरावर तिच्यासमोर येऊन उभा राहिला. दोघांची नजरानजर झाली आणि सुवर्णमती आसपास नजर टाकत झट्कन उठून उभी राहिली. "राजकुंवर, आपण? आणि एकटेच? इथे कसे? काहीच खबर नाही आपल्या येण्याची".

आपल्या येण्याने सुवर्णमती पुरती गांगरून गेली आहे हे चंद्रनागास स्पष्ट दिसत होते. मग त्यानेच बोलावयास सुरवात केली.

"राजकुंवारी, मागच्या वेळेस आपण जेव्हा भेटलो, तेव्हा आपणा दोघात काही सुंदर बंध निर्माण होत आहेत असे आम्हास जाणवत होते, मग आपण या स्थळी आलो व ते बंध अधिक दृढ झाले, निदान आम्ही तरी तसेच समजत होतो. परंतु नंतर आपल्या पिताजींनी आपला विवाहप्रस्ताव सूर्यनागांसाठी पाठवला आणि सगळाच संभ्रम निर्माण झाला. सरळ आपल्याशी बोलून हा तिढा सोडवावा म्हणून आम्ही तडक इथे निघून आलो."

सुवर्णमतीच्या मनात प्रचंड गोंधळ माजल्याचे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. ती आर्तपणे म्हणाली "आपल्या बंधूंचा प्रस्ताव आपल्याच पिताजींनी पाठवला. शेषनगरीचा प्रस्ताव फेटाळण्याचे साहस गंगानगरीत नाही आणि तसे करावे तरी कशासाठी? आपल्या बंधूंविषयी माझे मनात अपरंपार आदर आहे. आणि जीवनसंगिनी होण्यास माझ्या दृष्टीने हे पुरेसे आहे."

चंद्रनाग आश्चर्याने पाहतच राहिला. झटक्यात पुढे होत म्हणाला, "सुवर्णे काहीतरी मोठाच घोटाळा आहे हा. राजाजी म्हणतात प्रस्ताव तुझ्या वडिलांकडून आला, तू म्हणतेस राजाजींनी पाठवला, खरे काय ते शोधून काढलेच पाहिजे प्रिये!" असे म्हणत सुवर्णमतीचा हात हाती घेण्यास चंद्रनाग पुढे सरसावला.

तत्क्षणी राजकुंवारी दोन पावले मागे सरकली. "थांबा कुंवर, आपण काय बोलता आहात? कोणास खरे कोणास खोटे ठरवणार आहोत आपण? आपल्या स्वत:च्या पिताजींना? विवाहप्रस्तावाच्या स्विकाराची वार्ता एव्हाना सर्वत्र पसरली असेल. आता, ही गंगानगरी आणि शेषनगरीच्या इभ्रतीची बाब आहे. जेव्हा आपण राजघराण्यात जन्म घेतो तेव्हा आपल्यावर सर्वप्रथम अधिकार आपल्या राज्याचा असतो, मग आपल्या मातापित्यांचा आणि नंतर आपला स्वत:चा. आता हा प्रस्ताव मोडणे कदापि शक्य नाही. तो विचारही मनातून काढून टाका."

काय करावे हे त्यास सुचेना. आयुष्यात प्रथमच त्याला इतके असहाय्य वाटत होते. सुवर्णमती जे बोलत होती त्यातील शब्द न् शब्द बरोबर होता. आता हा प्रस्ताव मोडणे आणि चंद्रनागाबरोबरचा प्रस्ताव पाठवणे हे दोन्ही राज्यांच्या नाचक्कीचे मोठेच कारण ठरते. वर सुवर्णमतीच्या चारित्र्याविषयी उलट सुलट चर्चेस उधाण आले असते ते वेगळेच. भावनांचा प्रचंड कोलाहल माजला त्याच्या मनात. पराजीत भावनेने तो एकदम खाली बसला. सुवर्णमती त्यास म्हणाली, “कुंवर आता आपण आपल्या राज्यास परतावे हे बरे. आपण सर्वतोपरी कोणत्याही राजकन्येच्या स्वप्नीचे राजकुवर होण्यास लायक आहात. आपण बोट दाखवाल ती राजकन्या आपल्या मागून येण्यास तयार होईल." असे म्हणताच राजकुंवरने सुवर्णमतीकडे बोट दाखवले. सुवर्णमती खिन्न हसली. हळूहळू चालत घोड्याकडे गेली आणि पाहतापाहता घोड्यावर बसून दिसेनाशी झाली. राजकुंवर त्याच रात्री शेषनगरी परतले.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED