Suvarnamati - 3 books and stories free download online pdf in Marathi

सुवर्णमती - 3

3

आजचा दिवस होताच तसा विशेष! कन्या उपवर झाली की सर्व मायबापाना असते तशी हुरहूर महाराज आणि राणीसरकारांनाही होती. पोटची एकुलती एक सौंदर्यवती, गुणवती, कन्या, तिच्या रुपाला, बुद्धीमत्तेला साजेसा अनुरूप वर मिळणे गरजेचे होतेच, पण त्याचबरोबर या राज्याची चढती कमान तशीच उत्तुंग ठेवायला लायक असा जमाईराजाही राज्याला हवा होता. महाराजांना आपल्या कन्येच्या कुवतीचा आणि महत्वाकांक्षेचा अंदाज आणि अभिमान दोन्ही होते. परंतु जनतेला "राजा" हवा असतो राज्यकर्ता म्हणून, हेही ते जाणून होते. अनेकांनी सुचवूनही दत्तकविधान करण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता तो केवळ सुवर्णमतीच्या अफाट बुद्धीमत्तेवरच्या असलेल्या त्यांच्या विश्वासावर.

आज राजे शेषनाग त्यांच्या पत्नी आणि दोन पुत्रांसह गंगानगरीत येणार होते खास पाहुणे म्हणून. वर वर पाहता, ही एक सदीच्छा भेट असली तरी अनेक सूप्त हेतू या भेटीमागे दडले आहेत हे एक उघड गुपित होते.

राजे शेषनाग यांचे राज्य सर्वच बाबतीत गंगानगरीच्या राज्यापेक्षा उजवे होते. राज्याच्या सीमा पाचपट मोठ्या होत्या. सैन्यबळ कमितकमी यांच्यापेक्षा चौपट होते. संपत्तीचा तसा अंदाज बांधणे शक्य नसले, तरी सीमांतर्गत असणाऱ्या सुवर्णरुप्याच्या खाणी असणे एवढेच पुरेसे होते. परंतु गंगानगरीशी सोयरीक म्हणजे राज्याची एक सीमा सुरक्षित असे सरळ गणित होते.

अलिकडच्या काळात सैन्य हे तसे मानापुरतेच उपयोगाचे ठरत होते. परकीयांशी दोन हात करणाऱ्या राज्यांची झालेली अवस्था पाहता, त्यांच्याशी मुत्सद्दी हातमिळवणी करून शक्य ते सर्व हक्क आपल्याकडे ठेवून घेण्याचे धोरण दोन्ही राज्यांनी ठेवले होते. यांच्या राज्याच्या सीमा मोक्याच्या ठिकाणी असूनही अजून तरी परकीय फौजा यांच्या राज्यात ठाण मांडण्यास आल्या नव्हत्या. इथल्या संपत्तीची म्हणावी अशी हाव परकीयांना पडली नव्हती. किंबहुना त्यांना त्याची कल्पनाच नव्हती. या दोन राज्यांचा मिलाफ दोन्ही राज्यांना अधिक मजबूत बनवणार होता.

राजे शेषनागांना तिन्ही पुत्रच. थोरले राजकुंवर शंखनाग, रुप राजबिंडे, वृत्तीही राजस. त्यांचा विवाह चंद्रनगरीच्या राजाची सुस्वरूप कन्या सौमित्रेशी काही वर्षांपूर्वी झाला होता. मित्रमंडळींबरोबर शिकारीस जावे, रात्री गायन वादन नृत्य अशा मनोरंजनात घालवाव्यात, कधी मनी आले तर वडिलांच्या आग्रहाखातर राज्यकारभारात थोडेफार लक्ष घालावे असा एकंदर नूर. पत्नीही सर्वच बाबतीत शंखनागांच्या ‘हो’ ला ‘हो’ करणारी. एकूणच राजे शेषनागाना ज्येष्ठ पुत्राने काहीसे निराश केले होते.

दुसरे राजकुंवर सूर्यनाग. भरपूर उंची, रुंद खांदे, मजबूत बांधा, काहीसा सावळा वर्ण, तीक्ष्ण नजर. पाहताक्षणी राजपुत्र कमी, आणि योद्धा जास्त वाटावे असे व्यक्तिमत्व. परंतु कमालीची अफाट बुद्धीमत्ता. डोळ्यातली चमक त्याची ग्वाही द्यायची. लहानपणापासूनच राज्यकारभारात प्रचंड रस आणि गतीही. मुत्सद्देगिरीत हातखंडा. न्यायशास्त्राची उत्तम जाण. लहान वयातच आपल्या बुद्धीमत्तेची चुणूक दाखवून दरबारी दबदबा निर्माण केला होता त्यांनी. आता कोणताही निर्णय,राजे शेषनाग, सूर्यनागाशी मसलत केल्याखेरीज घेत नसत. शेषनागाचें मंत्रिमंडळ आणि प्रजाजन सूर्यनागांकडेच भावी राजा म्हणून पाहत, यात नवल काहीच नव्हते. जितके मुत्सदी, तितकेच गोरगरीब जनतेसाठी कनवाळू, आणि युद्धभूमीवर शत्रूसाठी कर्दनकाळ अशी त्यांची ख्याती होती. कर्णोपकर्णी ती ख्याती गंगानगरीच्या राजदरबारी येऊन पोहोचलीच होती. पंचमनगरीच्या आक्रमणादरम्यान त्यांने केलेली मदत गंगानगरी कधीच विसरणार नव्हती.

जेव्हा सुवर्णमती उपवर झाल्याची आणि राजे सुरजप्रतापसिंह लेकीसाठी सुयोग्य वर शोधत असल्याची बातमी कानी आली तेव्हा राजे शेषनाग सरळ सरळ सूर्यनागाचा विवाहप्रस्ताव घेऊन राजदूत पाठवण्याच्या तयारीत होते, तेवढ्यात गंगानगरीहून सदिच्छाभेटीच्या निमंत्रणाचा खलिता आला. मग सूर्यनागाने त्यांना रोखले, सरळ विवाह प्रस्ताव न पाठवता, चौघांच्या सदीच्छाभेटीचा प्रस्ताव पाठवावा, आपण दोघे, माता आणि धाकटे राजकुंवर चंद्रनाग, असे पित्यास सुचवले.

राजा शेषनाग एकाचवेळी पुत्राच्या हुशारीस मनोमन दाद देते झाले आणि त्याचवेळी, या सगुणी परंतु सावळ्या रुपाच्या राजकुवंरासाठी त्यांचे मन भरून आले. सूर्यनागाचा, धाकट्या बंधूस तेथे नेण्याच्या प्रस्तावाचा अर्थ न कळण्याइतके राजे दुधखुळे नव्हते. सुवर्णमतीच्या स्वर्गीय सौंदर्याची तारीफ एव्हाना सर्वत्र पसरली होतीच. न जाणो आपले सावळे रूप पाहून हा विवाह होऊ शकला नाही, आणि इतर कोणत्याही राजघराण्याशी सुवर्णमतीचा विवाहसंबंध जुळून आला, तर शेषनगरीच्या राज्याला कायमचा एका हददीकडून धोका राहाणार होता. परकीयांची सध्याची चाल पाहता, चारी दिशाना आपलीच मित्रराज्ये असणे केव्हाही हिताचे ठरणार होते. त्यादृष्टीने धाकटा चंद्रनाग हुकुमाचा एक्का ठरणार होता.

धाकटा राजकुवंर चंद्रनाग, अत्यंत देखणा, गोरा तजेलदार वर्ण, धारदार नाक, पाणीदार डोळे, भरपूर उंची, रुंद खांदे, भरदार छाती, कमावलेली उत्तम शरीरयष्टी. उत्तम बुद्धीमत्ता. सर्व प्रकारच्या मैदानी खेळात प्राविण्य. तरूण वयास शोभणारा काहीसा उताविळपणा, त्यांच्या आकर्षकतेत भरच घाली. विलायतेत शिक्षण घेऊन आल्याने एक वेगळाच, चालण्याबोलण्यातला आत्मविश्वास होता.

गंगानगरीच्या जनतेने मनोमन यांना आपला भावी राजा म्हणून सहज स्विकारले असते आणि सुवर्णमतीस आपला भावी पती यांच्यात नक्कीच दिसला असता, हा सूर्यनागाचा कयास शेषनागांच्या लगेच लक्षात आला. क्षणभर, चंद्रनागास नेण्यास विरोध दर्शवावा असेही मनी आले. पण अर्थातच बापावर राज्यकर्त्याने कुरघोडी केली आणि सूर्यनागाने सुचवल्याप्रमाणे चौघांच्या सदीच्छा भेटीचा प्रस्ताव गंगानगरीस रवाना झाला. प्रस्तावाचे अर्थातच गंगानगरीच्या राजाकडून स्वागतच झाले आणि पाहतापाहता आजचा दिवस उगवला होता.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED