सुवर्णमती - 10 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

सुवर्णमती - 10

10

शेषनगरीतून गेलेला चंद्रनाग आणि गंगानगरीतून परतलेला चंद्रनाग या दोन भिन्न व्यक्ती होत्या असेच म्हणावे लागेल. सळसळत्या उत्साहाच्या धबधब्याला अचानक बांध लागल्यासारखे झाले. तो फारसे कोणाशी बोलेना. आपल्यातच मग्न राहू लागला. मनोमनी सुवर्णमतीसाठी झुरू लागला.

तो महालातून नाहीसा झाल्यावर सूर्यनागाने गुप्त हेर त्याला शोधण्यासाठी पाठवले होते. त्यांनी चंद्रनाग गंगानगरी जाऊन राजकुवारीस भेटला आणि भेट संपताच तडक शेषनगरीस परतला असा वृत्तांत दिला. ही भेट काही पळांचीच होती असेही त्यास कळले. सूर्यनागास चंद्रनागाचे झुरणे पाहवेना. त्याने चंद्रनागाशी बोलण्याचा प्रयत्न केला. अर्थात तोही निष्फळ ठरला कारण, आता परिस्थितीत कोणताही बदल घडू शकत नाही हे चंद्रनागाच्या मनाने पक्के ठरवले होते. किंबहुना सुवर्णमतीने ते त्याच्या मनावर बिंबवले होते.

दिवस हळूहळू पुढे जात होते. राजे सुरजप्रतापसिंह यांनी सपत्निक येऊन विवाहविषयीचे पुढचे निर्णय घेण्याविषयी इच्छा व्यक्त करणारा खलिता पाठवला. शेषनागांनी त्याविषयी सर्वांना सांगितले. त्यांच्या आगमनाची तयारी चोख करण्याची जबाबदारी चंद्रनागाने उचलावी असा प्रस्ताव पुढे ठेवला तेव्हा चंद्रनागाने पुढील शिक्षणासाठी विलायतेत परत जाण्याचा विचार बोलून दाखवला. त्यावर राजाजींनी विवाह विधी संपन्न झाल्यावर जावे असे सूचित केले. या प्रस्तावास नाही म्हणणे कुवरास शक्य झाले नाही.

ठरल्याप्रमाणे सुरजप्रतापसिंह आणि चारुलतादेवी बाकी लवाजम्यासह शेषनगरी येऊन, विवाहविषयी सर्व बोलणी करून, लगेचचाच मुहुर्त पक्का करून परतले. बारात सात दिवस गंगानगरी राहील, सर्व सोपस्कार, विधी पार पाडून सातव्या दिवशी गोरज मुहुर्ती फेरे होतील, आणि बारात नववधुसह शेषनगरी परतेल अशी योजना ठरली. परकीय पाहुण्यांना या समारंभात आमंत्रित न करता त्यांच्यासाठी नंतर शेषनगरी मेजवानीचा बेत करावा असे ठरले. याच वेळी दोन्ही राज्यांचे दिवाणजी या विवाहानिमित्त दोन्ही राज्यांमधे कोणकोणत्या प्रकारची देवाण घेवाण होणार, सीमा कशा जोडल्या जाणार, आपसात कसे व्यापारी, आर्थिक आणि सेनेचे करार होणार याविषयी खलबते करत होते.

चंद्रनाग केवळ पिताजींनी सोपविलेल्या कामगिरीस योग्यप्रकारे निभावण्याच्या हेतूने सहभागी होत होता. सुवर्णमती मातापित्यांबरोबर न आल्याने चंद्रनाग एकीकडे मनातून खट्टू झाले तर एकीकडे काहीसे सुटल्यासारखेही झाले. ती आसपास असताना कामात लक्ष घालणे फारच कठीण झाले असते. सूर्यनागासही तिचे न येणे हुरहूर लावून गेलेच. ती येती तर आपल्याला तिचा हेतू अधिक जोखता आला असता असे त्यास वाटले.

इकडे सुवर्णमती नव्याने आलेल्या, खास इथल्या संस्थानिकांसाठी बनवलेल्या कायद्याविषयी, वाचत बसली होती. ‘आपल्या विवाहामुळे या आपल्या राज्यावर काही आपत्ती तर येणार नाही ना? परकीयांच्या आजपावेतो फारसे डोळ्यांत न खुपलेले आपले राज्य, न जाणो मोठ्या राजघराण्याशी संबंध आल्याने सर्वांच्या नजरा आपल्या राज्यावर रोखल्या गेल्या तर? तसे झालेच तर काय करावे म्हणजे विनासंघर्ष यातून मार्ग निघेल?’ तिला नकळत सूर्यनाग आठवले. ‘याविषयी त्यांच्याशी एकदा बोलायला हवे. त्यांना स्त्रियांनी राज्यकारभारात लक्ष घातलेले आवडेल? आपण जेव्हा त्यांच्याशी या विषयावर बोलावयाची इच्छा प्रकट केली तेव्हा त्यांना अतिशय आश्चर्य वाटल्याचे दिसले परंतु त्यात नाराजी नव्हती. उलट एक प्रकारचे कुतुहल होते त्यांच्या नजरेत. आता दिवाणजींबरोबर काय निरोप येतो ते पाहू. या राज्याने व त्यांच्या राजकुंवरने याआधीही आपल्याला संकटातून वाचवलेच आहे. हे नाते जुळले तर अधिक सुरक्षित होईल आपले राज्य.’

‘चंद्रनागास मात्र यात काहीच रस नसावा.’ चंद्रनागाचा विचार मनात येताच सुवर्णमतीस काहीसे अपराधी वाटले. परंतु तसे वागणे तिच्या योजनेस पुढे नेण्यासाठी किती गरजेचे होते या विचाराने तिने मनातील अपराधी भावनेस मुळापासून उपटून टाकले.

शेषनगरीतून कन्येकडील लवाजमा बाहेर पडताक्षणीच सूर्यनागने दिवाणजींना बोलावून घेतले आणि दिवाणजी दोन्हीकडच्या करारातील बारीक सारीक तपशील कुवरांस आणि राजाजींना सांगू लागले.

एका मुद्यावर बोलता बोलता दिवाणजी अडखळले तेव्हा कुंवर चमकून त्यांच्याकडे पाहू लागले. महत्वाच्या बोलण्यात अडखळण्याची त्यांना सवय नव्हती. “माफी असावी कुंवर पण काही मुद्दे असे आहेत की......”

“दिवाणजी जे असेल ते सांगावे.”

"गंगानगरीच्या राज्यावर वरवर पाहता, कागदोपत्री राजा म्हणून आपले राज्य असेल, तसा तुमचा राज्याभिषेकही होईल, परंतु निर्णयाचे सर्व हक्क राजकुवारी आणि आपण, राजाजी आणि राजे सुरजप्रताप यांच्या कडे विभागून राहतील. प्रामुख्याने प्रजेच्या हितसंबंधांच्या निर्णयाचे सर्व हक्क! तसेच शेषनगरीतील राज्यकारभारात सुवर्णमतीस एका मताचा अधिकार असावा.”

सूर्यनागचे डोळे नकळत बारीक झाले. भुवयांच्या मधे एक बारीक आठी उमटली.

"हे राजांनी ठरविलेले मुद्दे आहेत?"

दिवाणजींनी पुन्हा एकदा घसा खाकरला. "नाही कुंवरजी, हे राजकुवारींनी स्वत: जातीने दिवाणजींबरोबर बसून ठरवलेले मुद्दे आहेत."

सूर्यनाग हसले. त्यांचे कुवारीविषयीचे अंदाज बरोबरच होते.

"दोन्ही मुद्द्यांना मान्यता द्या दिवाणजी." दिवाणजींनी एकदा राजाजींकडे पाहिले. त्यांनीही मान डोलावली तसे पुढे काही बोलण्यास उरलेच नाही.

विवाह, तोही राजकन्येचा. गंगानगरी उजळून निघाली. मान्यवरांना आमंत्रणे, आहेर पोहोचवले गेले. तसेच सर्व जनतेला राजांनी हत्तीवरून साखर वाटत, विवाहाचे भोजनाचे आमंत्रण दिले. “प्रजेचे भोजन फेऱ्यांच्या एक दिवस आधी होईल, आणि स्वत: राजकुंवारी आणि जमाई राजे जातीने हजर राहतील याची नोंद घ्यावी होsss ! सर्व जनतेने भोजनाचा आस्वाद घेण्यास आणि राज्याच्या कन्येस आशिर्वाद देऊन विदा करण्यास हजर रहावे होssss!” दवंडी पिटत हुजऱ्या चौकाचौकात जात होता.

विवाहासाठी जय्यत तयारी सुरू झाली. कुवारीचे जेवर, कपडे, तिच्याबरोबर सासरी पाठवण्याचे पेटारे, कशाकशात काही कमी राहू नये यासाठी मातपित्याची गडबड सुरू होती. जागोजागी मांडव घालण्यात आले. सर्व बगिच्यांना सुशोभित करून कारंजी उडू लागली. महालात तर रोषणाईच करण्यात आली. गंगानगरीच्या प्रजेने नव्या राजाच्या स्वागताप्रित्यर्थ घरोघरी गुढ्या तोरणे उभारली. रस्ते रांगोळ्यांनी सुशोभित झाले.

विवाहाचे सात दिवसही प्रजेस, घरी अन्नच शिजवू नये, असे सांगण्यात आले. ठिकठिकाणी मिष्टान्नाचे लंगर, भोजन पुरवत राहिले. प्रजा विवाहाचा आनंद लुटत राहिली. पारंपारिक पद्धतीने हळदीचा कार्यक्रम झाला. आधीच सौंदर्यखणी, त्यातून नववधू, सुवर्णमतीच्या सौंदर्याने दोन्हीकडचे पाहुणे दिपून गेले. चंद्रनाग आतल्याआत जळत राहिला.

फेऱ्यांच्या आदल्या रात्री प्रजेसाठी खास भोजनसमारंभ होता. प्रथम राजकुंवारीकडून प्रत्येकास काही सुवर्णमुद्रा देण्यात आल्या. त्याचे वाटप दिवाणजी स्वत: जातीने करत होते. नंतर राजकुंवारी स्वत: येऊन सर्वांना अभिवादन करून म्हणाली, "प्रत्येक कन्येचे विवाह करून सासरी जाण्याचे स्वप्न असते, परंतु ती वेळ आली की तिचा पाय अडतो. मातपित्यास सोडून जाणे जीवावर येते. मी तर राज्याची कन्या. आपण सर्वच माझे मातापिता. सर्वांना सोडून जाणे मला किती जड जात असेल हे तुम्ही सर्व जाणताच. आपला आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी असेल आणि त्याच्या बळावर मी ससुराल आणि मायका दोन्हीस जोडून ठेवू शकेन असे मला वाटते." नकळत सुवर्णमतीचे डोळे पाणावले. स्वर हळवा झाला आणि या क्षणी मात्र त्यात अभिनयाचा लवलेशही नव्हता!

प्रजेचे डोळेही पाणावले. उस्फुर्त पणे राजकुवारीचा जयजयकार सुरू झाला आणि मग भोजन परोसण्यास सुरवात झाली.

राजकुवारीच्या प्रस्थानानंतर कुवर सूर्यनागही येऊन प्रजेस त्यांच्या कन्येची आणि या राज्याचीही यथायोग्य काळजी घेण्याचे वचन देऊन गेले. “तुम्ही आपली कन्या मला दिलीत, मी आपले तन, मन, धन, आपल्या साठी खर्ची घालेन. दोन्ही राज्ये एकत्र आली तर अधिक बळकट होतील. एकजुटीने आपण आपली राज्ये अधिक सुरक्षित करू.”

दुसऱ्या दिवशी वधू फेऱ्यांसाठी सजून आली आणि घुंगटही दुल्हनच्या सौंदर्यावर गर्व करता झाला. जोतो, दुल्हा किती नशीबवान आहे, याचीच चर्चा करत होता आणि ही चर्चा पुढे बरेच दिवस सुरू रहाणार यात काहीच शंका नव्हती.

फेरे झाले आणि बिदाईचा समय आला. राजे सुरजप्रतापसिंह आणि चारुलतादेवींचे डोळे भरून आले. सुवर्णमतीच्या सख्या, सेवकसेविका रडू लागले. सुवर्णमतीने मात्र निग्रहाने अश्रू अडवले. तांदुळाच्या साळ्या डोक्यावरून आईच्या पदरी घालून, मागे वळून न पाहता शेषनगरीची बहू डोलीत जाऊन बसली. डोली उठली तसा पिता अश्रूभरल्या डोळ्यांनी डोलीबरोबर चालू लागला. त्याच्या पाठोपाठ सर्व प्रजाही आपल्या लाडक्या राजकन्येस विदा करण्यास वेशीपर्यंत चालत आली. सर्वांच्याच डोळ्यात अश्रू मावत नव्हते.

डोली वेशीबाहेर पडल्यावर मंडळी परतली. पुढचा प्रवास मोटरगाडीने झाला.

प्रथम निघाल्या सैन्याच्या मोठ्या गाड्यांचा ताफा, मधे सेनापती, राजे आणि राणीसरकार, त्यामागे सूर्यनाग आणि सुवर्णमती, चंद्रनागाने त्यांच्या गाडीचे सारथ्य करण्याचे ठरवले. मागे शंखनाग आणि सैमित्रेची गाडी, आणि त्यानंतर इतर काही नातेवाईक, खास दरबारी, यांची गाडी, आणि सर्वात शेवटी परत सैनिकांची मोठी गाडी. मोटरगाड्या निघाल्या आणि सुवर्णमतीचा इतका वेळ कसाबसा अडवून ठेवलेला बांध कोसळला. मोठे मोठे अश्रू गालांवर ओघळू लागले. पालथ्या, मेंदीने रंगवलेल्या हाताने, ती ते पुसू लागली. सुरमा, काजळ, गालांवर ओघळू लागले. दुसऱ्या कोपऱ्यात बसलेल्या आणि स्वत:च्याच विचारात पूर्णपणे गुरफटलेल्या सुर्यनागाच्या लक्षात ही गोष्ट येण्यापूर्वीच, समोरच्या आईन्यात चंद्रनागास हे दिसले आणि त्याने चट्कन गळ्यातील शेला काढून तिच्या पुढे धरला. तिने शेल्याचा स्वीकार केला. इतका वेळ बेखबर असलेल्या सूर्यनागाने, नेमके हे पाहिले आणि त्याच्या कानशिलावरची नस तडतडू लागली. पुढचा चार एक तासाचा प्रवास निःशब्द पार पडला. या विषकन्येपासून चंद्रनागास कसे वाचवावे हा एकच विचार प्रवासभर सूर्यनागास वेढून राहिला.

सुवर्णमती थोडीशी सावरल्यावर तिने डोळ्यांच्या कोपऱ्यातून सूर्यनागाकडे पाहिले. पण तो संपूर्णपणे स्वविचारात गुरफटलेला तिला दिसला.