8
सर्व मंडळी महाली परतली. सेवक घोडे घेऊन येतील, आता सर्वांनी मोटरगाडीनेच जावे असा प्रस्तावबरहुकूम दोन्ही राजांनी ऐकवला तेव्हा कोणीच काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
सायंकाळी दोन्ही राजे आणि सूर्यनाग यांची गुप्त बैठक झाली, ज्यात परकीय संकटावर चर्चा आणि त्यावर एकत्र राहून, एकजुटीने सामना करावा, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते ठेवून, आपल्या जनतेला कमीतकमी कसा त्रास होईल, यासाठी प्रयत्न करावा असे ठरले. सूर्यनागाने आराखडा सर्वांसमोर मांडला. दोन्ही देशांच्या सीमा, त्यांना जोडणारे इतर देश, त्यांच्यातील आपसीसंबंध, त्यांचे परकीयांशी संबंध, त्यांचे आपल्याशी संबंध, सगळ्याचा विचार सूर्यनागाने संपूर्ण मांडला त्या दोघांसमोर.
सुरजप्रतापसिंह अत्यंत प्रभावित होऊन, त्याचे मुद्दे ऐकत होते. अगदी असाच जामात हवा होता या राज्याला. हुशार, धोरणी, प्रजेचं हित जपणारा, कणखर, प्रसंगी लढाऊ वृत्ती दर्शवणारा. सुवर्णमतीच्या बुद्धीमत्तेला आव्हान देणारा. पण तिचा कल तर चंद्रनागाकडे दिसतो. ते विचारात पडले.
दुसऱ्या दिवशी मंडळी परतण्यास निघाली तेव्हा राणीसरकार अंत:पुरात जाऊन, सुवर्णमतीस भेटून, काही दिवस विश्रांती घेण्यास सांगून आल्या. बाकी कोणालाच ती भेटली नाही.
मंडळी परतली खरी, परंतु प्रत्येकजण मनात सुवर्णमतीस घेऊन आला. राजे आणि राणीसरकार तिला भावी सुनेच्या रुपात, चंद्रनाग तिला आपल्या कवेत, सूर्यनाग त्या दोघांना एकमेकांच्या कवेत. ते दृश्य काहीकेल्या त्यास मनावेगळे करता येईना. सैरभैर होऊन गेला तो. ‘उद्या जेव्हा ती खरेच चंद्रनागाची वधू बनून येईल तेव्हा काय करशील?’ त्याचे मन त्यास खिजवू लागले. अंगाची लाहीलाही होऊ लागली. राज्यकारभारात लक्ष लागेना. न्यायशास्त्राच्या चर्चा त्यास अत्यंत प्रिय, परंतु त्यातही मन रमेना.
एवढा राज्यकारभारात मुरलेला तरुण, पण प्रेमज्वराने हैराण झाला. स्वतःचाच संताप येऊन त्याने अधिकाधिक राज्यकारभाराच्या व्यापात स्वतःला बुडवून घेतले.
राजे शेषनाग यांनी, ही अपेक्षा केली नव्हती. प्रिय पुत्राची अवस्था त्यांना पाहवेना. आणि मनोमनी त्यांनी एक निर्णय घेतला. कुणालाही काहीही न सांगता राजदूत गंगानगरी धाडला.
राजदूताने खलिता खुद्द महाराजांच्या हातीच दिला. मजकूर वाचून, राजे मात्र चांगलेच विचारात पडले.
राजदूताची उत्तम सरबराई करण्यास सांगून आणि त्यास एक दिवस विश्रांती घेण्यास सांगून, ते तडक राणीसाहेबांच्या महाली आले. एव्हाना राजदूत आल्याची बातमी, अंत:पुरात पोहोचलीच होती. महाराजांनी एकांताचा हुकूम दिला. सेविका बाहेर गेल्या आणि त्यांनी मुख्य दरवाजा बंद केला. महाराजांनी जास्त वेळ न घालवता सरळ खलिताच वाचून दाखवला. दोघेही काळजीत पडले. ‘सुवर्णमतीस हे सांगावे कसे?’ तिच्या कौलाचा त्यांना अंदाज होता. राजाजींनी सरळ सरळ प्रस्ताव सूर्यनागाचा पाठविला होता. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. राजाजींना नाही म्हणणेही शक्य नव्हते आणि प्रिय कन्येला तिच्या मनाविरूद्ध विवाहास भाग पाडणे तर त्याहूनही शक्य नव्हते.
बराच वेळ दोघेही स्तब्ध बसले. मग राणीसरकार म्हणाल्या "प्रथम आपण सुवर्णमतीचे मत घेऊ. नंतर ठरवू पुढे काय निर्णय घ्यायचा ते". सुवर्णमतीस बोलावणे न पाठवता, दोघेही स्वतःच तिच्या कक्षात पोहोचले. सुवर्णमतीस आश्चर्य वाटले. "पिताजी आपण का तसदी घेतली, मला बोलावणे नाही का पाठवायचे?" दोघानाही काय बोलावे कळेना. "काही घडले आहे का?काही समस्या आहे का? आपण दोघे काही बोलत का नाही? सखी म्हणाली शेषनागरीहून राजदूत आला आहे, काय खबर आणली त्याने? "
राणीसरकारांनी मग सरळ विषयालाच हात घातला. तिच्यासाठी सूर्यनागाचा विवाह प्रस्ताव राजाजींनी धाडल्याचे स्पष्ट केले. दोघेही तिच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागले. खाली मान घालून ती स्वत:च्याच पायांची नखे निरखू लागली. दोघांना काय बोलावे कळेना.
शेवटी सुरजप्रतापसिंह उठले. लेकीकडे आले, तिच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले " बेटा, तुझ्यावर कसलेच बंधन नाही. तुझा विवाह तुझ्या इच्छेनुसारच होईल. मी राजाजींना नकार कळवतो.”
सुवर्णमतीने चमकून पिताजींच्या मुखाकडे पाहिले आणि म्हणाली "पिताजी, आपणास ते पसंत नाहीत का?" आणि नंतर मात्र लाजेने तिचे मुख अधिकच गुलाबी लाल झाले. आता आश्चर्यचकित होण्याची वेळ मातापित्यांची होती.
पुढे विषय न वाढवता सुरजप्रतापसिंह तडक आपल्या महाली आले. दिवाणजींबरोबर सल्ला मसलत करून नवा खलिता तयार केला. त्यात प्रस्तावाची स्वीकृती लिहीली आणि लवकरच पुढील गोष्टी ठरवण्यास आम्ही स्वत: आपल्याकडे येऊ असे कळवले. सगळ्या महाली पुनश्च उत्साह भरला.
इकडे राजदूत निरोप घेऊन पोहोचला आणि शेषनागांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी ताबडतोब सर्व कुटुंबियांना पाचारण केले आणि हर्षभरल्या आवाजात सुवर्णमतीच्या पिताजींकडून सूर्यनागासाठी विवाहप्रस्ताव आल्याचे सांगितले. दोघेही पुत्र एकाच वेळी."परंतु पिताजी" एवढेच बोलून थबकले. त्यावर "सुरजप्रतापसिंह लेकीच्या मनाविरुद्ध कोणताच निर्णय घेणे शक्य नाही" या एका वाक्यात त्यांनी दोघांचेही बोलणे थांबवले. राणीसरकारांनाही जरा आश्चर्यच वाटले परंतु त्या मौन राहिल्या.
चंद्रनाग काहीच न बोलता आपल्या महाली आला. सूर्यनागही सर्वांचे अभिनंदन स्वीकारून आपल्या महाली आला खरा पण त्यालाही काही सुचेना. एक मन त्यास आनंदी होण्यास सांगत होते तर दुसरीकडे नजरेसमोर ती दोघे एकमेकांच्या कवेत सतत दिसू लागली. त्याची तडफड कित्येक पटीने वाढली. प्रेमज्वर, त्यातून संशयाने पीडित, पिंजऱ्यात बंदिस्त वाघासारख्या सूर्यनाग येरझाऱ्या घालू लागला.
‘गंगानगरीस असताना संपूर्ण कल चंद्रनागाकडे दिसत होता राजकुवारीचा, मग आता असे काय बदलले की माझ्यासाठी प्रस्ताव यावा? सुरजप्रतापसिंहांनी, पिताजींचा माझ्यावरचा विश्वास, पुढेमागे राजसिंहासनाचा वारस, या सर्व गोष्टी सांगितल्या असाव्यात का? राजसिंहासनाचा मोह भल्याभल्याना वाट्टेल ते करावयास भाग पाडतो.
पण एका दिवसात राजकुवारीची चंद्रनागावरची प्रीत लगेच बदलली? एकनिष्ठा हा सर्वात मोठा गुण, तोच नसेल तर काय कामाचे ते स्वर्गीय सौंदर्य?
सरळ दूताकरवी नकार कळवून टाकावा. ही आग भावाभावात वितुष्ट आणेल. राज्यच्या राज्य स्रीमोहापायी जळून खाक झाल्याची उदाहरणे आहेत इतिहासात.
परंतु मी नकार दिला, तर पिताजी चंद्रनागास पुढे करतील. तो साधा सरळ कुंवर अलगद सापडेल तिच्या तावडीत. पिताजींना विश्वासात घेऊन सर्व सांगावे काय?
पण असे केल्यास पिताजी सरळ नकार कळवून मोकळे होतील. सुवर्णमती आपल्या राज्याची बहू नाही झाली तर शत्रूच्या राज्यात होईल तिचा रिश्ता. आणि मग राज्याची एक सीमा कायमची अधू होईल.
काय करावे? कसा सोडवावा हा पेच?
पण बरे झाले की तिथून माझ्यासाठी हा रिश्ता आला. चंद्रनागासाठी येता तर आपल्याला संशयही आला नसता. उगाच झुरत राहिलो असतो.
हम्म ! आता हे विष आपल्यालाच पचवावे लागणार. सर्व राज्याच्या, कुटुंबाच्या, चंद्रनागाच्या हिताच्या दृष्टीने हेच योग्य होईल. विषकन्या आहे ती.’
निर्णय झाला होता. प्रेमविव्हळ राजपुत्रावर धोरणी राज्यकर्त्याने मात केली होती. आता फक्त काळजी होती चंद्रनागाची. त्याला जपावे लागणार होते.
पण सर्वप्रथम पिताजींशी सल्लामसलत करून स्वीकृतीचा खलिता पाठवायला हवा. सूर्यनाग पिताजींच्या महाली दाखल झाले.