कामिनी Sanjay Kamble द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामिनी


कामिनी

By Sanjay Kamble

रात्र बरीच झाली होती. मार्केट मधून जवळजवळ आवश्यक त्या सर्व साहित्याची खरेदी करून झालेली... त्या आलिशान दुकानातून बाहेर पडताच लख्ख चमकलेल्या वीजे सरशी त्याची नजर वर आकाशात गेली आणि तो काहीसा अस्वस्थ झाला... काळ्याकुट्ट ढगांनी आकाशात गर्दी करायला सुरुवात केलेली.......दिवसभर वाहनांनी गजबजलेल्या या रस्त्यावर आता वाहनांची तुरळक ये-जा सुरू होती... एकंदरीत सारं वातावरण पाहून तो ही झपाझप पावलं टाकत जरा वेगातच बस स्टॉप च्या दिशेने चालू लागला. चालताना मात्र त्याच्या मनात नको नको ते विचार येत होते...
' आज आपल्याला उशीर झाला..! आणि आजच आपल्याला उशीर झाला.. पण आजच आपल्याला उशीर का झाला..? या सगळ्या गोष्टी मला काही संकेत देत आहेत का...? आणि जर त्या संकेत देत असतील तर कोणता संकेत..? माझ्या सोबत काही वाईट घडणार आहे का...? म्हणजे आकाशात जमा होणारे हे काळेकुट्ट पावसाळी ढग, अचानक चमकून काळजाचा ठोका चुकवणा-या वीजा, उंच उंच इमारतींच्या मधून वाट काढत झेपावणाऱ्या थंडगार वा-याचा घुंssssss घुंssssss असा मनात भिती जागवणारा आवाज जो या रात्रीच्या निरव शांततेत अधिकच भेसुर वाटतोय, आणि मला राहून राहून असं का वाटतंय की या साऱ्या गोष्टी मला भूतकाळात घडलेल्या त्या भयान घटनेची आठवण करून देत आहेत जी लाख प्रयत्न करूनही माझ्या मनातून जात नाहीये... ते काही नाही... मला रात्रीची शेवटची साडेदहा ची बस काहीही करून चुकवायची नाही...'
तोच रस्त्याने जाणार तपकीरी रंगाच अस्थीपिंजर अस एक गावठी कुत्र अगदी काही पावलांवरच त्याच्याकडे पहात उभा असल्याचं त्याला जाणवलं... त्याला असं समोर पाहून तो काहीसा घाबरून स्वतःची पुटपुटला...
''दगड उचलावा का..? मग अंगावर आलं तर...? 14 इंजेक्शन घ्यावी लागतील,. १४ नाही, आता पाच झालेत... पण घ्यावी तर लागतीलच ना..?"
स्वतःशी पुटपुटच तो तसाच उभा राहिला... तोच ते भटकं कुत्र त्याच्याकड पाहून दूर कुठेतरी जंगलात कोल्हेकुई व्हावी तस आउsssssssssss असा सुर काढत रडू लागल...
" देवा हा काय अपशकुन म्हणायचा..? हे कुत्र तर माझ्याकडच पाहून रडतय... पण हे माझ्याकडे बघून रडतय, की माझ्या पाठीमागे कोणालातरी पाहून रडतय..?"
मनात आलेल्या या विचारांनी तो काहीसा भयभीत झाला... क्षणभर थांबून त्याने हिम्मत करून मागे वळून पाहिलं... पण रस्ता ओस पडलेला... वर्दळ जवळजवळ नव्हतीच.. आणि मागही कोणी नव्हतं... त्यान पुन्हा समोर त्या कुत्र्याकड पाहिलं तर त्याच केकाटणं अजुनही तसंच सुरू होत... इतक्यात एका बंद दुकानाच्या दारात पांघरून घेऊन झोपलेल्या भिका-यान उषा शेजारी ठेवलेल्या आठ तास दगडांमधला एक दगड उचलून त्या कुत्र्याच्या दिशेने भिरकावला तसं ते कुंईssss कुंईssss आवाज करत धावत कुठेतरी अंधारात नाहीस झालं...
सुटकेचा निश्वास सोडत तो पुन्हा झपाझप पावल टाकत चालू लागला... काही पावलांवरच बस स्टॉप होता पण या बस स्टॉपवर त्याला थांबायचं नव्हत ... म्हणजे या बस स्टॉपच्या आजुबाजुच्या परिसराबद्दल त्याच्या मनात थोडी भीतीच होती.. दुसऱ्या बसस्टॉप वर जायचं म्हंटलं तर पुन्हा पंधरा मिनिटांच अंतर कापाव लागणार... आणि तेवढ्यात आपली बस निघून गेली तर..? खरंतर आज त्याचा नाईलाजच झालेला.... बस स्टॉप काही पावलांवरच होता इतक्यात मुसळधार पावसाची जोराची सर आली... हातातली छत्री उघडली आणि चालण्याचा वेग वाढवत घाईघाईनेच तो बस स्टॉप मध्ये शिरला तशी धोधो पाऊस कोसळायला सुरुवात झाली.... बसस्टॉपच्या स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यावर पावसाच्या पाण्याचे थेंब तडातडा बरसत होते...बस स्टॉप मध्ये शिरताच छत्री बंद केली आणि खांद्यावर एका बाजूला घेतलेली काळी आॉफिसबॅग समोर धरत मागच्या लोखंडी बाकड्यावर थोडा आकसुनच बसला... पायाचे चंपे हालवत तो हताशपणे समोरच्या त्या पावसाच्या सरींच रौद्ररूप पहात होता... मागील कित्येक वर्षांपासून त्यानं या बस स्टॉपच्या परिसरात रात्री येणं टाळलं होतं... या जागी विषयी त्याच्या मनात एक प्रकारची भिती, दहशतच निर्माण झालेली. . तसा हा परिसर त्याच्यासाठी नवा नव्हता. रोज संध्याकाळी सातला ऑफिसमधून सुटल्यावर चालत पंधरा मिनिटात हा बस स्टॉप यायचा, सव्वासातची बस पकडली की तासाभरात घरी. हा त्याचा रोजचा दिनक्रम... पण रात्री आठ नंतर ह्या बस स्टॉप वर थांबणं म्हणजे जिवावर यायचं... इथं येताच त्याच मन बेचैन व्हायच, आणी एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात घोंगावत रहायचे.. या परिसरात घडलेल्या घटना त्याच्यासारख्या सभ्य माणसान ऐकण्या पहाण्यासाठी योग्य नव्हत्या.. म्हणजे सभ्य लोक अशा मर्यादा वा बंधन स्वतालाच लाऊन घेतात... या परिसरातील हॉटेल, लॉज मधे कोणी आत्महत्या केलेली तर कोण्या अनोळखी स्त्रीचा खुन केलेला, इतकंच नाही तर पैसे देऊन आणलेल्या कॉलगर्लच्या अमानुष खुनानंतर हा परिसर बराच बदनाम झालेला ...आणि अशा बदनाम परिसरात एका सभ्य माणसांन रात्री उशिरा थांबणे हे त्यांनी स्वतः लावून घेतलेल्या बंधना च्या विरुद्ध होतं... पण आज त्याचाही अक्षरशः नाईलाज झालेला.. म्हणजे आधी अॉफसमधल काम आवरायला उशीर झाला. त्यात उद्या बायकोचा वाढदिवस. तिच्यासाठी तिची आवडती साडी, गोड मिठाई आणी रातराणीचा सुगंधी गजरा ज्याचा मनमोहक दरवळणारा सुगंध त्याच्या बॅगेमधून बाहेर त्याला येत होता... आणि ह्याच सुगंधी गाज-याची त्यालााा भिती वाटू लागलेली.. म्हणतात ना रात्रीच्यायावेळी सुगंधी गजरा, सुगंधी अत्तर, शिजवलेल अथवा कच्चे मांस अशा गोष्टी सोबत ठेवणे म्हणजे आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या नकारात्मक शक्तींना आपल्याकडे येण्यासाठी निमंत्रण दिल्यासाखच असतं आणि त्यामुळच रातराणीीच्या गज-याच्या मनमोहक सुगंधान त्याचं मन अस्वस्थ झालेलं...
तिशीतला तो तरुण तसा कमालीचा सभ्य.. अंगाने तसा मध्यमच.. गोरा रंग आणी किंचित उभा चेहरा. दाढी-मिशा मात्र नेहमीच चकचकीत.. एका बाजूला नीट बसवलेले काळेभोर केस.. चेहऱ्याला साजेशा नाकावर नेहमी चौकोनी फ्रेमचा चष्मा.. आणि हो, नेहमी इनशर्ट केलेला. म्हणजे एका सभ्य माणसानं जितकं सभ्य असाव त्याहून थोड अधिकच त्याच्यात होतं....

जसजशी वेळ पुढे सरकत होती तसतसा तो कधी हातातील घड्याळात वेळ पहायचा तर कधी धो-धो कोसळणार्‍या पावसाने धुसर दिसणाऱ्या निर्मनुष्य रस्त्याकडे डोळे लावून बसायचा.. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या खांबावरील पांढऱ्या एलईडी बल च्या प्रकाशात आकाशातून कोसळणाऱ्या पावसाकड तो हताश पणे पहात मनात म्हणाला..
" अरे बाबा, मी घरी पोहोचेपर्यंत थांब.. पोहोचलो की काय लागायचा तो लाग.."
बोलतच चोरट्या नजरेन त्यानं बसस्टॉपच्या डाव्या बाजूला असणाऱ्या त्या पुलाकड पाहिलं आणी काळजात भिती दाटली... जेमतेम वीस-एक पावलांवर असलेल्या उड्डानपूलावर घडलेल्या एका घटनेमुळ तो तरूण जरा जास्तच भयभीत दिसत होता.... त्या चौपदरी रस्त्याच्या मधून लोकांनी ये-जा करून वाहनांना अडथळा करू नये किंवा अपघात होऊ नयेत यासाठी तो उड्डनपुल तयार केलेला... खांबावरील पांढ-या बल्बच्या प्रकाशान प्रशस्त लोखंडी पाय-यांवरून खाली येणार पावसाचं पाणी सुरेख चमकत सैरभैरपणे नाल्याच्या दिशेन धावत होतं..

घड्याळात पाहिलं तर साडे दहा वाजून गेलेले.. बस चुकली आहे, की अजून यायची आहे, हे त्याला माहित नव्हतं. तसाच गोंधळलेल्या अस्वस्थ चेहऱ्यान आजूबाजूला नजर फिरवताना पुन्हा त्याची नजर त्या उड्डाणपुलाखाली गेली.... त्याला काही मुली आणि महिला तीथं उभ्या दिसल्या... काहींच्या अंगावर तोडके आणि भडक कपडे होते तर काहीजणी साडी नेसलेल्या.. रस्त्यावरून जाणारी एखादी दुचाकी तर कधी चारचाकी मोटार त्यांच्याजवळ येऊन थांबायची आणि त्यातील एक मुलगी वा महिला कमी व्हायची.. आता एका सभ्य माणसानं अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नसतं म्हणून त्यानं नजर फिरवली पण चोरट्या नजरेने का असेना तो हा सर्व प्रकार पाहत होता...

रस्त्यावरील वाहनांची वर्दळही आता कमी झालेली, पण पाऊस मात्र तसाच बरसत होता... आता त्याची अस्वस्थता अधिकच वाढू लागली.. आज त्याची बस चुकली होती.. एखादी रिक्षा थांबवावी तर येणारी रिक्षा पॅसेंजर घेऊनच जाताना दिसायची... तो आपल्या विचारात बुडाला होताच की एक महिला बसस्टॉपवर त्याच्या शेजारीच येऊन उभी राहिली... तिची भडक रंगाची साडी पावसाच्या पाण्याने गुडघ्याखाली थोडीशी भिजलेली.. पाठमोरी उभी ती स्त्री अंगाने तशी नाजूकच पण कमालीची देखणी.. तीच्या काळ्याभोर मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये रातराणीच्या पांढ-या शुभ्र फुलांचा गजरा अधिकच खुलून दिसत होता.. तिची पाठमोरी 'काया' तो अगदी भान हरपून पाहत होता... हातातील छत्री बंद करत तिची नजर त्याच्यावर गेली.. तिचं मादक सौंदर्य पाहून मघापासून ची त्याची अस्वस्थ मनस्थिती क्षणात नाहीशी झालेली... देखण्या गोल चेहऱ्याला साजेशा नाकात छोटीशी रिंग, कोरलेल्या नाजुकशा भुवया आणी काजळ घातलेले हरणीसारखे रेखीव डोळे ज्यातुन सुटणारे तिर त्याच्या काळजात आरपार घुसत होते..... चाापून चोपून नेसलेल्या गडद रंगाच्या साडी मधून तिचा आकर्षक बाांधाा अगदीच उठून दिसत होता... त्याची पुरषी नजर तिच्या कमरेेवरून छातीवर रेंगाळत वर सरकली आणि तिच्याा नाजुक फिक्कट गुलाबी ओठांच्या हालचालीवरून त्याच्या लक्षात आलं की ती काहीतरी आपल्यालाच विचारतेय... आणि अचानक तो भानावर आला..
" ओ साहेब, टाईम काय झालाय..?"

" हां..‌‌? अ.. हा..! टाईम काय..? हा.. टाईम बघा..११ वाजलेत..?"
आणि घड्याळ पाहता पाहता याच्या चेहऱ्याचा मात्र रंग उडाला.. बराच वेळ झाला होता म्हणजे शेवटची बस चुकलेली.. आणि आता एखादी रिक्षा करावी लागणार होती...
त्याच्या रंग उडालेल्या चेहर्‍याकडे पाहात ती स्त्री काहीशी हसून म्हणाली..
" इतके काय घाबरताय..? "

" अहो अकरा वाजलेत.. म्हणजे माझी शेवटची बस चुकली.."

" मग रिक्षा करायची.. त्यात इतक घाबरण्यासारखं काय..? अकराच तर वाजलेत.."

" म्हणजे इतक्या रात्री बाहेर फिरताना तुम्हाला भीती नाही का वाटत..? ते ही अशा ठिकाणी..?"

"साहेब आमचं काम रात्रीच सुरू होतं. मग रात्रीची भीती वाटून कशी चालेल..?"

" र.. रात्री...? म्हणजे..." बोलतच त्यानं आपली नजर खाली त्या महिलेच्या पायांकडे वळवली.. पण टाचेपर्यंत साडी असल्यान तिचे पाय दिसत नव्हते..
" खाली काय बघताय..? काही पडलं का.. ?"

" नाही... तुमचे पाय बघत होतो.." तो गंमतीन अगदी सहज बोलून गेला.. त्याचं बोलणं ऐकून ती ही काहीशी हसुन म्हणाली

" पाय उलटे आहेत का...? साहेब मी भुतं नाही... अहो माझं मेकअप बघून तरी तुमच्या लक्षात यायला पायजे होतं ."

" म्हणजे..? "

" म्हणजे इतक्या रात्री, जिथे पुरुषांची वर्दळ जास्त असते एका अशा पुलाशेजारी , तिथं इतकं नटून थटून, भडक मेकअप करून, आकर्षक साडी नेसून, मोकळ्या केसांमध्ये रातराणीचा गजरा घालून एक स्त्री का बरं थांबली असेल..?"

" म्हणजे तुम्ही भूत आहात तर...?"
तो काहीसा गंभीरपणे म्हणाला.. पण त्याच्या बोलण्यावर किंचित हसून ती म्हणाली..
" भुताचे पिक्चर जास्त बघा वाटतं..? नाही म्हणजे इतकी सुंदर स्त्री समोर उभी असतानाही तुम्हाला तिच्यात भूत दिसतं.."

" आता लहानपणापासून फिल्म, सिरीयल, कथा यामध्ये वाचत आणि पहात अलोय की अशा निर्जन ठिकाणी एक आत्मा सुंदर स्त्रीच्या रूपात येतो आणि मग एखाद्या व्यक्तीवर झडप घालतो आणि त्याला ठार मारतो.."

"साहेब मी भुतं नाही... कॉलगर्ल आहे... आणि कोण्या पुरुषावर झडप घालायला नाही , तर कस्टमर शोधायला येथे उभी आहे.. विश्वास नसेल तर पैसे द्या आणि चला माझ्या रूमवर.."

"क ..क...कॉलगर्ल...?"
अडखळत बोलत तो तिच्यापासून थोडा दूर झाला... त्याच्या या वागण्याने काहीशा निराश आवाजात ती म्हणाली..
" साहेब इतकं घाबरायला काय झालं..? कॉलगर्ल तर आहे.. तुम्ही असं दचकलात की जशी मी भुतच आहे.."
पण तिच्या या प्रश्नावर त्यांन कसलीच प्रतिक्रिया दिली नाही.. तिच्यापासून अंतर ठेवूनच तो धो धो कोसळणार्‍या पावसाला पहात उभा राहिला... ... तोच त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलच्या रिंगच्या आवाजान तो सावध झाला ... घाईघाईतच त्याने खिशातून फोन काढला तर त्याच्या बायकोचा कॉल होता...

"हैलो... हा बोल ना..?"

" काय हो..! किती वाजलेत..? कुठे आहात इतका वेळ..? घरी येणार आहात की नाही..? आणि आज इतका कसा उशीर झाला..?"

आता बायकोला सरप्राइज द्यायचं होतं म्हणून त्यांना खरं सांगायचं टाळल आणि काहीसा अडखळत म्हणाला..
"अग काम जास्त होतं ना म्हणून बाहेर पडायला उशीर झाला.. थोड्यावेळातच घरी येईन... तू काळजी करू नकोस.."

" काळजी करू नकोस कसं..? साडेअकरा वाजायला आलेत तरी नवरा घरी आलेले नाही कुठल्या बायकोला चैन पडेल..?"

तो काही बोलणार तोच बसस्टॉप समोरून जाणा-या एका दुचाकीस्वाराला ती महीला म्हणाली..
" ओ साहेब.. येणार काय..?"
आणि फोनवर ऐकू आलेला एका महिलेचा तो आवाज त्याच्या बायकोनं अचुक टिपला ...

" आणखी कोण आहे तुमच्यासोबत...?"

आपण एकटे आहोत असं सांगितलं तर बायको खूपच काळजी करत राहील म्हणून तिच्या समाधानासाठी तो सांगु लागला...
" एक मुलगी आहे सोबत..."

" कोण मुलगी...? आणि तुमच्या सोबत काय करतेय.?" बायको अधिकच घाबरली..

" मला काय माहिती..? कॉल गर्ल आहे अस म्हणाली.. तू घाबरू नकोस मला शंभर टक्के खात्री आहे की ती भूत नाही..."

त्याचं बोलणं ऐकून मात्र त्याच्या बायकोचा पारा अधिकच चढला..
" ती भूत असुदे नाहीतर हाडळ असुदे, तिच्या झिंज्या उपटून तिच्या हातातच देते... मिच आता रिक्षा करून तिथं येते... मला खरं खरं सांगा नेमकं कुठे आहात..?"

"आमच्या ऑफिसच्या बाजूच्या बस स्टॉप वर... पण तू कशाला इकडे येतेस..? रिक्षा सापडेल मला थोड्यावेळात.."

'' ते काही नाही, मी येतेय म्हणजे येतेय.."

"अगं पाऊस कसला भयंकर लागतोय, त्यात रात्रीची वेळ , अशा पावसात गाड्यांचे अपघात होतात... तू अजिबात येऊ नकोस, मी येतो लगेच.."

एवढं बोलून त्याने फोन कट केला.. आणि त्या कॉल गर्ल पाहत म्हणाला..
" या बायका ना, विनाकारण काळजी करतात.."
ती मात्र विस्मयकारक चेहऱ्याने एक सारखा त्या माणसाकडे पाहत होती.. तीच्या या आश्चर्यचकित मुद्रेला पाहून त्यान विचारल
" असं काय पाहतेस..?"

त्याच्याकडे पहातच नकारार्थी मान डोलावत ती स्त्री शांतपणे म्हणाली..
"साहेब, एखादा पुरुष माझ्यासोबत झोपला असताना जर त्याच्या बायकोचा फोन आला तरी आपल्या बायकोशी खोटं बोलून तो पुरुष ती वेळ मारून नेतो.. पण तुम्ही काहीच न करता थेट आपल्या बायकोला सांगितलं की मी कॉलगर्ल सोबत आहे.. मानलं पाहिजे तुम्हाला.."

त्या महिलेचा बोलणं ऐकून काहीशी छाती फुगवत तो म्हणाला..
" हे बघा, मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही.. एक खोटं बोललो तर ते लपवण्यासाठी आणखी खोटं बोलावं लागतं... असं करत करत खोट्या गोष्टींचा डोंगर तयार होतो, त्यामुळ आधीच सांगितलेलं बरं.."

बोलतच त्यान पुन्हा आपली चाणाक्ष नजर खाली तिच्या पायांकडे नेली.. पण तिच्या साडीमुळ तिचे पाय काही केल्या दिसत नव्हते... त्या स्त्रीने मात्र त्याची ती नजर हेरली...
" साहेब पुरुषाची नजर बाईच्या कमरेवर, छातीच्या उभारांवर खिळलेली मी आजवर अनुभवलीये, पण तुमची नजर मघापासून माझ्या पायावरच का रेंगाळत आहे..?"

त्या महिलेचा असा प्रश्न ऐकून तो काहीसा गंभीर होत म्हणाला...
" काही वर्षांपूर्वी याच पुलावर एक भयानक घटना घडलेली... तेव्हापासून एक तरी इथे थांबत नाही आणि जरी थांबलो तरी कोणाशी मी बोलत नाही.."

तशी ती महिला आश्चर्याने म्हणाली...
" घटना...! ती ही भयानक ..? आणि या पुलावर...? साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय... मी किती तरी वर्ष याच पुलाखाली बसून धंदा केलाय.. मी तर या पुलाखाली अशी कोणतीच घटना घडलेली ऐकलेली नाही, आणि पाहिलेली देखील नाही...."

तिच्याकडे पाहत तो किंचित हसून म्हणाला..
" तुला माहित असलं तरी तू सांगणार नाहीस, कारण भीतीने लोक इथे यायचे बंद झाले तर तुमचं पोट कसं चालणार..?"

" ते पण आहेत की हो साहेब... देवाने आम्हाला पोट दिलं, आणि ते पोट भरण्यासाठी शरीर.. "

तिचा हताश चेहरा पाहून त्याला काहीस अपराधी वाटतं...
" एम सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं....प्लीज डोन्ट माईंड.. सॉरी म्हणजे मनाला लावून घेऊ नकोस..."


"माझं जाऊ दे हो साहेब, इथ काय झालेलं ते सांगा मला.." म्हणतच त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने ती पाहू लागली..
तसा त्या पुलाकडे पाहात तो गंभीर आवाजात म्हणाला..
" त्या रात्रीही असाच धोधो पाऊस कोसळत होता, रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. होता तो लख्ख काळोखात बरसणारा पाऊस... त्या रात्री ही तुझ्या सारखीच एक महिला याच पूलावर उभी होती. 'कामिनी' , हो कामिनीच नाव होतं तिच.. म्हणजे तिच्या सोबतच्या महीला तिला या नावानं बोलवायच्या म्हणुन मला माहीती... खुप आकर्षक होती... शुभ्र पांढरी साडी घातलेली, काळ्याभोर मोकळ्या केसात रातराणीचा गजरा आपल्या सुगंधान एखाद्या आंधळ्या माणसाला ही आपल्याकडे आकर्षित करायचा... देखण्या चेहर्‍यावर उमटणार खट्याळ हास्य तिथुन ये जा करणाऱ्या पुरुषांना वेड लावण्यासाठी पुरेसं होतं , इतकं कमी की काय म्हणून काजळ घातल्यासारख्या नैसर्गिक कोरलेल्या डोळ्यांमधून सुटणारे बाण कोणा पुरुषाच्या काळजात रुतले नाही तरच नवल... ती देखील तुझ्यासारखीच गिऱ्हाइकांची वाट पाहत या पुलावर उभी होती... तोच चार-पाच जणांच एक टोळकं तिथ आलं... अगदी दारू पिऊन गच्च, त्यातील दोघांना तर नीट उभेही राहता येत नव्हतं.. ते कामिनी सोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागले... थोडावेळ बोलून तीनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली... पण पोटात गेलेल्या दारू ते बेभान झालेले... त्यातल्याच एकाने दारूच्या नशेत तिचा पदर छातीवरून खेचला आणी वाद वाढला... येडा करणारे लोक तमाशा फक्त पहात होते... तशा बाजूला उभ्या दोन-तीन महिला पुढ आल्या आणि त्या दारुड्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न करू लागल्या.. पण दारुड्यांनी दारूच्या नशेत कामिनी ला पुलावरून खाली फेकल आणि एकच गोंधळ माजला...ते दारुडे वाट दिसेल तिकड धावत सुटले... त्या महिला मदतीसाठी आरडाओरडा करू लागल्या... काळ्याभोर डांबरी रस्त्यावर निष्प्राण, निपचित पडलेल्या त्या महिलेची नजर आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींवर स्थिरवलेली. तिच्या सोबत असणाऱ्यााा महिला मात्र तशाच मदतीसाठी रडत ओरडत किंचाळत राहिल्या..."

त्याचं बोलणं ऐकून ती स्त्री कहीशी हताशपणे म्हणाली..
" त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी ती किंचाळली, ओरडली तरी तीच्या मदतीला येणार तरी कोण..? ती एक वेश्या होती, कोणाला तिची दया येणार..?"
पण आपल्या चेहऱ्यावर आलेले निराशेचे भाव लपवत ती अगदी सहज बोलू लागली..
" खरतर प्रत्येक स्त्री सारखं आम्हाला ही देवाने एक हळवं नाजूक मन दिलं, पण त्या मनातील भावना कोण ऐकणार..? इतर महिलांसारखाच आमच्या शरीराला देखील त्रास होतो, यातना होतात, आजारपण येतं. दूखणं खुपण सारं काही होत. तेव्हा काळजी घेणारा मायेचा एखादा हात आम्हालाही हवा असतो. थकलेल्या शरीराला आरामाची गरज असते. तापाने फणफणा-या या शरीराला औषधाची ही गरज असते.. पण तुम्हाला माहित आहे का साहेब, तापान भाजणा-या ,फणफणणा-या अशा शरीराचा उपभोग घेऊन झाल्यावर गि-हाईक म्हणत, 'अंगात लय गर्मी आहे ग तुझ्या, मजा आली.'
साहेब आमच्या शरीराला होणा-या यातनांनी, वेदनांनी देखील आमचं गिराईक खुश होतं.."

एका वाक्यातच तीन शांतपणे आपलं भयाण आयुष्य उलगडलं .... काळजात खोलवर घाव घालणारे ते शब्द ऐकून तो सुन्न झाला होता पण तिच्या चेहऱ्यावर मात्र किंचित हसू पसरलेल.. डोळ्यात पाणी नव्हतं की ओघळणारे अश्रू नव्हते, कि सहानुभूतीची हाकही नव्हती... कदाचित रोजच्या यातना, त्रास, दुःख सहन करून तिच्या डोळ्यातलं पाणीही आटलं असावं... पुरुषांनी आपल्या गरजे साठी तयार केलेल्या या जगात तिला आणि तिच्यासारख्या असंख्य महिलांना सारं काही सहन करत राहायची आता सवय झालेली.... पण तिचं बोलणं ऐकून त्याला मात्र खूपच वाईट वाटत होतं...
" साहेब, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका , आमचं आयुष्य असंच आहे.. पण साहेब ,आम्हाला कोणाची साथ नसली तरी आम्ही मात्र एकमेकींना साथ देतो... एकमेकींच दुःख वाटून घेतो... एकमेकींना आधार देतो.. पण साहेब एक गोष्ट मात्र मला आजवर समजली नाही...''

तिच्या या वाक्याने त्यानं आपल्या भुवया किंचित आकसल्या.. आणि तिच्याकडे पहात विचारलं..

" कोणती गोष्ट...? ...?"

तशी ती समोर धोधो कोसळणार्‍या पावसाला पाहत म्हणाली..
" जेव्हा वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर एखादी बातमी झळकते की डिप्रेशन मध्ये आत्महत्या केली , किंवा प्रेमात अपयश, पैशाची चणचण, नोकरी गेली अशा कारणांनी जीव देणा-यांबद्दल वाचतो पाहतो तेव्हा आम्हाला खरंच विचार पडतो.."

" विचार... कसला विचार पडतो..?" त्यानं भुवया आकसून विचारलं तशी ती शांतपणे म्हणाली..

" म्हणजे या आत्महत्या करणाऱ्यांच्या मनाला होणारा त्रास, हा आमच्या त्रासापेक्षा जास्त असेल का...? म्हणजे रोज दहा पंधरा वेगवेगळ्या पुरुषांना आपलं शरीर विकून पोट भरणाऱ्या माझ्यासारख्या वैश्येच्या त्रासापेक्षा जास्त यांचा त्रास असेल का ?"

तिच्या तोंडातून बाहेर पडलेल्या या वाक्याने तो खरंच निशब्द झाला.. प्रश्नार्थक नजरेन त्यान तिच्याकड पाहिलं... तिची नजर समोर कुठेतरी शून्यात हरवलेली... पण काळजात कुठेतरी दाबून ठेवलेले शब्द मात्र अलगद तिच्या ओठावर येत होते... किंचित हसून ती पुढे म्हणाली..

" साहेब, जगातला कुठलाही मनुष्य कितीही वाईट परिस्थितीमधे अडकला असेल तरीही नव्याने आयुष्याची सुरुवात करू शकतो.. पण एक वैश्या आयुष्याची नवी सुरुवात करू शकेल...? हा समाज तील स्वीकारले..?"

तिच्या बोलण्यान तो मात्र अनुत्तरीत झाला... तसं ती ही चुकीचं बोलत नव्हती.. तिच्या या प्रश्नातही बरीच उत्तर लपलेली आणि त्या उत्तरांमध्ये ही बरेच प्रश्न.. क्षणभर दोघेही तसेच अबोल बसून राहिले समोर कोसळणार्‍या पावसाकडे पहात... तो पुढे काही बोलणार तोच त्याची नजर उजव्या बाजूला रस्त्यावरून येणार्‍या एका वाहनावर गेली... धो-धो कोसळणार्‍या पावसामुळ गाडीचे दोन हेडलाईट तितकेच धुसर चमकत होते.. पण काही वेळातच चित्र स्पष्ट झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर थोडी भीती दाटली.. समोरून येणाऱ्या त्या गाडीला पाहून आपली बॅग सावरत तो हळुवारपणे उभा राहिला... गाडी त्याच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली.. ती पोलिस व्हॅन होती... गाडीतील ड्रायव्हर न गाडीची काच खाली घेतली तस आतील खाकी युनिफॉर्म घातलेल्या पोलीस कॉन्स्टेबलन त्याच्याकडे पाहिलं..

" ओ साहेब , एकटेच काय करताय इथं., बारा वाजायला आले, इतक्या उशिरा बस नसते हे माहित नाही का तुम्हाला...? आणि या एरियाबद्दल माहिती आहे ना..? विनाकारण स्वताच्या डोक्याला ताप करून घेऊन आमच्या डोक्याला ताप देऊ नका... रिक्षा पकडा आणि घराची वाट धरा...."

सूचना संपल्या तशी गाडीची काच वर घेत ती पोलिस व्हॅन निघून गेली..
हा मात्र विचार करत खाली बसला...
" पोलीस आंधळा होता की काय.. माझ्या बाजूची ही महिला त्या पोलिसाला‌ दिसली नाही काय..?"
बोलतच त्यानं डाव्या बाजूला पाहिलं आणि सुन्न झाला.. मघापासून बडबड करत असलेली ती महिला कुठच दिसत नव्हती...
'या धोधो कोसळणाऱ्या पावसात आणी या भयान परिसरात पसरलेल्या नीरव शांततेत आपण एकटेच या बसस्टॉपवर उभे आहोत' हे त्याच्या लक्षात आलं तसा तो काहीसा घाबरला... आपली बॅग छातीशी कवटाळत तो शांतपणे खाली बसला... मेंदूत विचारचक्र एकसारखं घुमू लागलं...
' याचा अर्थ मघापासून आपण ज्या महिलेसोबत बोलत होतो तो एक आत्मा होता..?'
डोक्यात चमकून गेलेल्या या विचारान त्याच्या काळजातली भिती आणखी दाट झाली... आणी झटकन त्यांनं आपली मान त्या पुलाच्या दिशेने वळवली तसा सुन्न झाला.. त्याचं उरलं सुरलं अवसान ही गळून पडलं... जरी आजुबाजुला धो-धो पाऊस कोसळत असला तरी भितीन मात्र त्याच्या घशाला कोरड पडलेली... कारण त्या पुलावर तीच महिला एकटक त्याच्याकडच पाहत उभी होती.. तिला पाहताच त्याच्या अंगावर सरसरून काटा आला... विस्फारलेल्या डोळ्यांनी तो त्या महिलेला पाहू लागला... ती मात्र अगदी शांत ,भावनाशून्य नजरेने त्याच्याकडे पहात होती.. हवेच्या एक हलक्याशा झोक्या सरशी त्या महिलेचे काळेभोर केस तिच्या चेहऱ्यावर येत होते..तिला असं पाहताना त्याच्या काळजाची धडधड मात्र कमालीची वाढलेली.. काही गोष्टींचा उलगडा झाला... काळजातले शब्द नकळत ओठांवर आले..
'' म्हणजे त्या रात्री झालेल्या झटापटीत या पुलावरून पडून मृत्युमुखी पडलेली महिला हीच होती तर... म्हणजे आपली भीती खरी ठरली... या महिलेचा आत्मा आजही या पुलावर भटकतोय...''
डोक्यात विचार आला की या धोधो कोसळणाऱ्या पावसातच ईथून धावत सुटाव आणि शक्य तितक्या दूर निघून जावं... पण हा आत्मा मला इथुन सोडेल...? त्याला संपूर्ण परिस्थितीची जाणीव झाली होती...
'हा एक मृत्यूचा सापळा होता माझ्यासाठी... ऑफिस मधून बाहेर पडायला उशीर होण... माझी बस चुकणं... या मुसळधार पावसाला सुरुवात होणं आणी या परिस्थितीत मी या जागेवर अडकून पडणं... कदाचित मघाशी माझ्याकडे बघून रडणाऱ्या कुत्र्यान मला आधीच्या मृत्यूचा संकेत दिला होता... सारं काही या आत्म्याने घडवून आणलं'
एक ना अनेक विचार वाळवी लागल्यासारखा त्याचा मेंदू पोखरू लागले होते...
''देवा काहीही कर पण मला येथून सोडव..''
धडधडत्या काळजाने तो देवाकडे प्रार्थना करू लागलाच होता की एका रिक्षाच्या हॉर्नच्या आवाजान काळीज छाती फाडून बाहेर आल्यासारखा दचकला...काही समजायच्या आत फिक्कट गुलाबी पंजाबी ड्रेस घातलेली पंचविशीतील महिला त्या रिक्षातुन उतरली आणि छत्री उघडून घाईघाईतच त्याच्या दिशेने चालत आली...
" कुठे आहे ती...? सांगा लवकर..?"

त्याची बायको रिक्षा पकडून त्या बस स्टॉप पर्यंत आलेली... त्याचा चेहरा खुलून गेला, भीतीची जागा समाधानाने घेतली, सुटकेचा निश्वास टाकला..कारण या क्षणाला रागाने लाल झालेली त्याची बायकोही त्याला साक्षात परमेश्वरासारखा वाटत होती... आपल्या बायकोला समोर पाहून देवाला हात जोडतच म्हणाला...
''खरच देवासारखी आलीस ग..'
इतक बोलून तसाच तो घाईघाईतच रिक्षात बसला आणि रिक्षाचालकाला म्हणाला..
" ये भावा लवकर चल इथुन... च्यायला लय डेंजर एरिया आहे हा..''
त्याच्या पाठोपाठ त्याची बायको रिक्षात बसत त्याला म्हणाली..
" मी काहीतरी विचारतेय..?"

" हा .. ती.. ती होय ..अगं ती इथे कशाला थांबेल..? ती गेली तिच्या कामाला.. बरं झालं रिक्षा घेऊन आलीस.. बराच वेळ झाला मला रिक्षा सापडत नव्हती.."
विषय टाळण्यासाठी त्यान बैगची चेन उघडली आणि कैरिबैगमधली ती पैठणी साडी आपल्या बायकोसमोर उघडली...
" अय्या... किती छान पारख आहे हो तुमची.. इतकी सुंदर साडी...?"
एखाद घबाड सापडल्यासारखी त्याची बायको साडी पहात होती... टर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज करत रिक्षा सुरू झाली आणि त्याची भयभीत नजर पुन्हा वर त्या पुलाकडे गेली... ती स्त्री अजुनही त्या पुलावर उभी त्याच्याकड अगदी तशीच भावनाशून्य नजरेने पहात होती... तीच्याकड पहाताना बैगेत त्याच्या हाताला एक कागदी चिठ्ठी सापडली... किंचित भुवया आकसून तो ती चिट्ठी वाचू लागला...‌
' दारूच्या नशेत ज्या टोळक्यान त्या वेश्येला पुलावरून खाली टाकलं त्यांच्यात तुम्हीही एक होतात, आणी त्या गोष्टीचा पश्चाताप आजही तुमच्या डोळ्यात दिसत होता ... खरतर कुठल्याच वैश्येच्या जगण्या-मरण्यान कोणालाच फरक पडत नाही.. पण तुम्ही या गुन्ह्यात तुरुंगात गेला असतात तर तुमच्या मागे असणार तुमच कुटुंब संपून गेल असतं.. आणी कुटुंब, एकमेकांची सोबत, सुखी संसार जगातल्या कुठल्याही मौल्यवान संपत्तीपेक्षा जास्त आहेत, या सगळ्यांचं महत्त्व माझ्यासारख्या स्त्रीयांपेक्षा जास्त कोणी समजू शकणार नाही.. साहेब 'कामिनी' न माफ केल तुम्हाला... कारण मीच 'कामिनी' आहे.. त्या रात्रीच्या झटापटीत पुलावरून पडून मी जखमी झाले, पण वाचले. कदाचित नशिबाचे अजून भोग संपलेले नाहीत . पण त्या घटनेनंतर तुमच्यातील माणूस जागा झाला यातच मी सारं काही कमावला..
कामिनी'

चिठ्ठी वाचून तो अगदी निशब्द झालेला.. हातातील ती चिठ्ठी पुन्हा बॅगेत सरकवली आणि रिक्षातून मान बाहेर काढून मागे त्या पुलावर पाहिलं तर ती महिला अजूनही तिथेच उभी होती आणि महत्त्वाचं म्हणजे ती जिवंत आहे हे पाहून त्याच्या काळजावर दडपण, भिती, सारं काही कमी झालेल.... पण काहीही झालं तरी आपण तिचे अपराधी आहोत ही चल त्याच्या मनाला लागत होती... अपराधी भावनेन तीच्याकड पहात त्यान आपले दोन्ही हात जोडत मुकेपणीच तिची माफी मागितली... तसा तीनही किंचित हसून प्रतीसाद देत किंचित हात उंचावला तसा त्यानही आपला हात थोडा उंचावला... तोच एक वाटसरू तिच्याजवळ आला आणी क्षणभर बोलून ती महीला थोडी लंगडत चालत त्या व्यक्तीसोबत निघून गेली.. त्याने पुन्हा आपली नजर आपल्या पत्नीकड वळवली... अजूनही ती साडी पाहण्यातच गुंग होती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता... तीच्याकड पहाताना एक विचार त्याच्या डोक्यात आला..
' खरच आम्हा पुरूषांमुळ स्त्रीया सुरक्षीत आहेत का..? कदाचित नाही.. कोणाचीही मुलगी, पत्नी, बहीण घरात सुरक्षित आहे ती त्यांच्या घरातील पुरुषामुळ कींवा जगातील कुठल्याही पुरुषामुळ नाही. तर त्या सुरक्षित आहेत कारण एक वैश्या बाजारात स्वतः शरीर विकतेय यामुळं....'
ती महिला अजून जिवंत आहे हे पाहून आज त्याच्या काळजावरच एक खूप मोठ ओझ काहीसं कमी झालेल... मोकळ्या मनान त्यान एक निश्चिय केला..
' काहीतरी मदत नक्की करायची आपण कामिनीला... हं.. कामिनी. छान नाव आहे.'
मोठ्या समाधानानं तो धोधो कोसळणार्‍या या पावसाला पाहत राहिला
आणी काचेवर पडणार पावसाच पाणी व्हायपरन बाजूला करत त्यांची रिक्षा घराच्या दिशेन धावू लागली...


समाप्त...