Valentine day...
By Sanjay kamble.
" Please... Please.." आपले जखमी हात जोडून ते केविलवाण्या नजरेने प्रत्येकाला विनंती करत होते.
" प्लीज आम्हाला मारू नका... Please सोडून द्या. .." थरथरत्या आवाजात दोघे आपल्या जीवनाची भीक मागत होते, त्यांच्या नजरेत भीती होती ती मृत्यूची, जो कधीही त्यांच्यावर झडप घलणार होता, आपला मृत्यू अटळ आहे हे माहीत असूनही ते दोघे आपल्या जीवनाची भीक मागत होते, पण त्या उंच इमारतीच्या टेरेसवर जमलेल्या समुहापैकी कुणाच्याही मनात किंचितही दया नव्हती. रात्रीच्या काळोखात त्या जागेवर एक भयाण घटनासत्र सुरू होतं.. काही तासांपासून एक समुह त्या दोघांचा थरारक पाठलाग करत होता, रात्रीच्या निरव शांततेत पावसाच्या सरी धो धो कोसळत होत्या, आणि दिवसा गजबजलेल्या या रस्त्यावर रात्री एक भयाण शांतता पसरलेली, पडत धडपडत ते दोघे या ओसाड रस्त्यावरून सैरावैरा धावत होते, आणि त्यांच्या मागे होतं वीस एक जणांचं टोळकं. हातात हॅकी स्टीक्स, स्टंप्स , काठ्या ज्याला जे सापडलं ते त्याने उचलला आणि त्या दोघांच्या मागे लागला, या टोळक्या पासुन आपला जीव वाचवण्यासाठी ते दोघे ही वाट दिसेल तीकडे जिवाच्या आकांताने धावत सुटले आणि या इमारतीत ते शिरले.. पण ते आता पुरते जाळ्यात सापडले होते, धो कोसळणा-या पावसात तीथला प्रत्येक जण धापा टाकत होता. पावसाच्या पाण्याने चींब भिजला होता. तर त्यांच्या समोर उभे ते दोघे शरिरावर झालेल्या जबर जखमांनी अक्षरशः विव्हळत होते, कण्हत होते. जखमांनी भरलेलं शरिर वेदनांनी अक्षरशः टाहो फोडत होतं. ते हात जोडत होते पण त्यांना नीट उभही रहाता येईनास झालेलं. तोच त्या गर्दीतून एक जण पुढे येऊन रखरखत्या नजरेन त्या दोघांना पाहु लागला.
आणि..
काही क्षणातच उंच इमारती वरून त्या दोघांनाही निर्दयीपणे खाली फेकून दिले. एक गगनभेदी आर्त किंकाळी आसमंतात भरून राहिली.. काही सेकंद हवेत अंतराळी असलेली त्यांची शरिरं धप्पकन खाली पांढ-या शुभ्र फरशीवर आदळली तसं सारं काही शांत झालं. रडणं, ओरडण, जीवनाची भीक मागण, सारं काही शांत झालं............ आवाज होता तो फक्त आभाळातून कोसळणा-या एकट्या पावसाचा, खाली जमीनीवर निपचित पडलेल्या त्यांच्या शरिरातुन वहाणार रक्त आत त्याच पावसाच्या पाण्यात मिसळून फिक्कट होत पाण्याबरोबर वाहून जात होतं... पण हे सारं भीषण दृश्य कोणीतरी पहात होत..... कोणीतरी...जे त्या इमारतीसमोरच्या रस्त्याकडेला असलेल्या भिंतीचा आडोसा घेऊन तयार केलेल्या एका झोपडीत बसलेल. 'एक वेडा'... हे सारं अगदी शांतपणे पहात होता ..
*****
३ वर्षा नंतर.............
'रोज'..., तुला पहावस वाटत, पाहील की सार दुख: आटत, नाही दिसलीस की काळीजच फाटत, तुझ्या आठवणीने ह्रदय माझ दाटत, आणी दिसलीस की पुन्हा जगावस वाटत,. खरच ग 'रोज', तुला पहावसं वाटतं
'रोज'...
एका कागदावर उतरवलेले आपल्या काळजातील ते सुंदर शब्द वाचत त्याने तो कागद नीट घडी घालून आपल्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवला. समोर असलेल्या त्या जुन्या लाकडी कपाटात ठेवलेल्या कोमेजलेल्या निस्तेज गुलाबाच्या फुलांवर नजर टाकत म्हणाला.
" तुम्हाला काय वाटतय. तुम्ही आता निस्तेज झालाय, कोमेजुन गेलाय म्हणुन मी तुम्हाला फेकुन देणार आहे का...? चुकून ही नाही... कारण तुम्हाला माझ्या मनातलं सारं काही ठाऊक आहे... जेव्हा ती माझ्या प्रेमाला होकार देईल ना तेव्हा तुमची प्रत्येकाची तीच्या सोबत ओळख करून देईन. प्रपोज करायला कोणता गुलाब कधी विकत घेतलेला ते.. फक्त तो द्यायचं धाडस झालं नाही एवढंच.. पन आज दिवसच खास आहे.. आज मी मनाशी निश्चय केलाय. काही झालं तरी आज तीला माझ्या मनातलं गोड गुपित सांगुन टाकणारच . आजही एक गुलाब विकत घेणार आणी तीच्या समोर दोन्ही गुडघ्यावर बसून तो गुलाब असा धरून बोलणार..."
" अरे गाडी पंक्चर झालीये.. बस ने जावं लागणार आज.." बाहेरून कोणीतरी ओरडल
" बोंबल्ल तीच्यायला.." तो झटकन उठला आणि धावत जात खिडकीतून डोकावून पाहिलं आणि सर्रर्रर्र कन बैगची चेन ओढून त्यात आपल स्डडी मटेरियल बैगेत कोंबल आणि घाईघाईने चेन ओढली...
" आज उशीर व्हायला नको."
स्वता:शी पुटपुटतच तो आपल्या रूम मधून बाहेर पडला... आज VALENTINE DAY चा सुंदर दिवस.. काॅलेजपरिसर मित्र मैत्रिणी, प्रेमीयुगुलांनी भरून गेला होता. इतरांपेक्षा आपण अधिक देखणे, सुंदर, आकर्षक दिसाव याची जणु चढाओढ या दिवशी असते, लहान मुलांमध्ये जसा दिवळीच्या दिवशी एक अनोखा उत्साह असतो तसाच युवक युवती, प्रेमी युगुलामधे या Valentine's day दिवशी असतो..
पाठीवर बैग अडकुन तो चालत पुढं आला, तर गरमा गरम वडापावचा खामंग रूचकर गंध येत होता... वीस एक पावलांवरच एक हाॅटेल होतं. काॅलेज जवळच असल्याने तरूण तरुणी प्रेमी युगुलांची गर्दी नेहमीचीच.. हाॅटेलमधे समोरच ठेवलेल्या एका मोठ्या अॅल्युमिनियमच्या परातीमध्ये गरम रुचकर वडापावचा खच भरलेला. बाजुला एक जाड माणुस उकळत्या तेलात वडे तळत हातातली झारी सराईतपने कढईत फिरवत होता. तर एका बाजूला गरम चहा शेगडीवर उकळत आपल्या सुगंधाने वाटसरूंना आपल्याकडे खेचत होता.
तो चालत येताना दिसताच ते छोटंसं हाॅटेल चालवणाऱा मुलगा त्याला म्हणाला..
" सतीश. इकडं ये.. गरमागरम वडा पाव खा रे.. तुझ्यासाठीच ठेवलाय... आणि आज गुड न्यूज दे." वड्याच्या खमंग वासाने सतीश च्या पोटात भुकेने गोळा आलेला.. घाईघाईने तो वडा हाती घेत म्हणाला..
"हो... आज काही झालं तरी तीला प्रपोज करणार... बर भावा.आज कसा दिसतोय सांग.?" सतीश त्या मुलाकडे पाहून विचारू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह ओसंडून वाहत होता.
" भावा लय भारी.. बोले तो एकदम झकास." हाॅटेलवाल्या मुलाने हाताचा अंगठा वर करत उत्तर दिले तोच बाजूला आपल्या गर्लफ्रेंडसोबत चहा पीत बसलेला एक मुलगा त्याला म्हणाला..
" हिरो दिसतोयस बघ. एकदम सलमानच.'' ते ऐकून सतीश आणखी खुश झाला मात्र त्या मुलाच्या गर्लफ्रेंडला सतिश कडे पाहुन किंचित हसु आलं. आपली स्तुती ऐकून सतीश खुशीतच रस्त्याने चालू लागला. पण हाॅटेल वाल्या मुलाला त्या बाजूला बसलेल्या मुलाच बोलणं आवडलं नाही...
आपल्या गर्लफ्रेंडसोबत बसलेल्या त्या मुलाने खिशातून एक छोटीस गिफ्ट काढलं आणि त्या मुलीच्या हातात दिलं. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तीने ही ते गिफ्ट अलगद पने उघडलं. एक सुंदर नाजूकस घड्याळ त्यातून बाहेर काढत त्याने त्या मुलीच्या हातात बांधलं..
"How sweet.." हातात बांधलेलं ते घड्याळ पहात ती म्हणाली.
" तुम्ही कधी खरा प्रेम केलंय का..?" हॉटेलवाल्या मुलाच्या या प्रश्नांन आपल्या गर्लफ्रेंड सोबत बाजूला बसलेला तो मुलगा गोंधळून गेला. तशी ती मुलगीही भुवया आकसुन हाॅटेलवाल्या मुलाकडे पाहू लागली.
" क . काय...? हो . म्हणजे काय. करतोय की. हे काय विचारणं झालं.?" त्यांन अडखळत उत्तर दिले.
तसा तो हॉटेलवाला पुढे म्हणाला.
"किती दिवसांपूर्वी तुम्ही एकमेकांना भेटलात..?"
" काही दिवस झाले असतील..? हो ना ..?" तो मुलगा आपल्या गर्लफ्रेंडकडे पहात म्हणाला...
" म्हणजे मागच्या Valentine's day ला तुम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतात... आणि पुढच्या valentine day ला सोबत असाल याची गैरेंटी कमीच...?"
" ये.. हे काय बोलतोयस..? " तो जरा रागातच बोलू लागला आणि आपल्या गर्लफ्रेंडचा हात हातात घेत म्हणाला,
" मी तुझी साथ कधी नाही सोडाणार.. कधीच नाही..
(पुन्हा त्या हाॅटेलवल्या मुलाकडे पाहून म्हणाला) ये...आपण सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो हीच्यावर.. समजल काय .."
" असाल ही.... पन ..?" हाॅटेलवाला बोलता बोलता थांबला..
" पण काय?" चहाचा एक घोट घेत जरा रागातच ती मुलगी हाॅटेलवाल्याला विचारू लागली..
कदाचित आपल्या बाॅयफ्रेंड ला असं बोललेल तीला आवडल नसावं.
तसा तो हाॅटेलवाला मुलगा बोलू लागला..
" आज valentine day आहे ना.. मी तुम्हाला एका अशा प्रेमाची गोष्ट सांगणार आहे ज्याने तुमच्या या काॅलेजमधल्या सगळ्यांचच आयुष्य बदलुन टाकलं..ते प्रेम आणि त्यासोबत सुरू झालेलं घटनासत्र.."
बोलता बोलता समोरच्या त्या काॅलेजच्या भव्य आणि उंच इमारतीवर त्याची नजर खिळली. किंचीत गंभीर आवाजात तो मुलगा बोलु लागला...
"या घटनेला तीन वर्षे उलटून गेलीत. या काॅलेज मधला एक मुलगा, त्याच्याच वर्गातील एका मुलीवर खुप प्रेम करायचा....प्रेम... हळव निष्पाप प्रेम... निस्वार्थी निरागस प्रेम... कोणतीही आपेक्षा न करता फक्त तीच्या चेह-यावर समाधान दिसाव यासाठी धडपणार त्याच प्रेम... पन तीच्या मनातल कुठ याला माहीत होत,'कदाचित ती आपल्याला एक चांगला मित्र मानत होती.... मित्र.... कॉलेज मधे आपल्याला ओळखणारे , आपल्या ओळखीचे असतात तसे मित्र, त्यांच्या पैकी 'हा' पन एक..'
हा तसा थोडा निराळा होता.... तीची प्रत्येक गोष्ट याच्या मनात जणू कोरलेलीच असायची, म्हणजे तीच्या वाढदिवसासाठी आधी महिनाभर याची तयारी.. तयारीे कसली, तर एक जॉब करायचा आणी येतील ते पैसे तीच्या वाढदिवसाला खर्च करायचा, आणी गम्मत म्हणजे तीला गैर वाटु नये यासाठी यासाठी मित्र मैत्रिणींची नाव पुढ करुन आम्ही सर्वानी ही पार्टी ऑर्गनाईझ केलीये म्हणुन सांगायचा.... त्यामुळ त्याची ओळख कॉलेज मधला तीचा 'मजनु' अशीच होती.. आज तीला प्रपोज करायच ठरवल होत , याने नाही पन सर्व मित्रांनी याला तयार केलेल, काॅलेजच्या पहिल्या वर्षात सुरू झालेली ही प्रेमकथा शेवटच्या वर्षात आली तरी तीला प्रपोज करायचं धाासड त्याला होईना. शेवटी ही प्रेमकथा पुर्णत्वाकड नेण्यासाठी त्याचे मित्र मैत्रिणी सर्व त्याच्या मानगुटीवर अक्षरशः वेताळासारखे बसले होते, आणी तो ही तयार झाला, . मनात दुगदूग , हुरहूर होती, नकाराची भीती होती. दिवस ठरला मोठ्या मॉल मधे जाऊन छानसा ड्रेस खरेदी केला , तीच्या साठी एक गिफ्ट घेतल.
दिवस उजाडला....
'जसा आज VALENTINE DAY' आहे तसा तो ही दिवस valentine day चा होता. तयारी पुर्ण झाली. जसा प्रत्येक प्रियकर लिहितो तशी यानेही एक छानशी कविता तिच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी आपल्या वरच्या खिशात निट ठेवली ... येता येता कोप-यावरच्या फुले विकणा-याकडुन त्याच्या टोपलीतल सर्वात सुंदर गुलाब खरेदी केल आणी कॉलेज च्या दिशेन निघाला, बस मधुन येताना त्याच लक्ष केवळ त्या गुलाबाकड होत., ते गर्दीत कुस्करल जाऊ नये, त्याच्या पाकळ्या पडु नयेत , कारण तो तीच्यासाठी आहे... तीच्या साठी.... जीच्यावर आजवर फक्त भरभरून प्रेम केल कोणत्याही आपेक्षेवीना, निस्वार्थीपने, तीच्यासाठी.. डोळे बंद केले आणी तीचा गोड निरागस चेहरा समोर उभा राहिला..जेव्हा पासून ती त्याच्या आयुष्यात आली होती तेव्हापासून त्याच जग खूपच सुंदर झाल होत..
कॉलेज वर पहोचला खरा पन आता तीला विचारायच धाडस होईल का....? तसा तो धाडशी होता पन हे धाडस वेगळ होत... तीचा नकार म्हणजे तीची मैत्रीही गमावण्याची रिस्क होती.... पन कधी ना कधी हे धाडस करावच लागणार होत.... मित्रांनी पुन्हा थोडी हिम्मत भरली, ती क्लास रुम मधेच होती मैत्रीणींसोबत गप्पा मारत बसलेली...
तीला पाहिल आणी काळजाची धडधड आणखीनच वाढली... काय होईल आता...? काय उत्तर असेल तीच....? चालताना शर्टच्या आत लपवलेल्या गुलाबाचे काटे अंगात किंचात टोचत होते... ती आता समोर होती... दोघी मैत्रीणी सोबत होत्या तर मित्र बाहेरच उभे होते... एका मैत्रिणीच्या मोबाईलची रिंग झाली तशी ती दुस-या मैत्रिणीला घेऊन बाहेर गेली... आता फक्त ती आत होती.. 'ती' बेंचवर ठेवलेल्या आपल्या वहीत मुंडक खुपसुन तीच वाचन सुरु होत...चेह-यावर येणारे मोकळे केस मधेच कानामागे सरकवत होती. तीचा मोहक चेहरा तो क्षणभर डोळे भरुन पहात राहीला, तीच मात्र लक्ष होत ते वाचनाकडे...
" hi...." धाडस करून त्याने तीला हाक दीली.
" hi.... आज उशीर केलास रे..." तीनं उत्तर दिले
" हो थोडा.... आणी बाकीची कंपनी कुठाये..? आज कोणीच दिसत नाही..."
" हो असतील बाहेर ...." बोलतच दिर्घ श्वास घेत पुढ म्हणाला .."तुला काही सांगायच होत..."
" बोल ना... विचार कसला करतोयस..?"त्याच्या काळजाची धडधड वाढलेली.. ती समोर होती आणी सोन्या सारखी संधी होती.. आपल्या शर्टमधुन तो गुलाब बाहेर काढतच त्यान तीच्या समोर धरला तशी तीच्या गालावर त्या गुलाबाला लाजवेल अशी लाली उमटली, क्षणभर त्याच्याकड पहात राहीली, तीच्या चेह-यावरचा तो रंग पाहुन त्याला थोडा धीर आला... त्यान तो गुलाब तीच्या समोर धरला .. पन तो काही बोलणार इतक्यात तीच म्हणाली ...
"पुरे ना आता.... आता तरी नाव सांग कोण आहे हा मजनु..." ती काकुळतीला आलेली.
" म्हणजे.....?" त्यान थोड आश्चर्यान विचारल.
''आपल्या ग्रुप मधल्या प्रत्येक मुलान , प्रत्येक मुलीन मला गुलाब दिलाय आणी सांगितलय की आज तुझा मजनु तुला प्रपोज करणार आहे....''
बोलतच तीने बेंचवरचा तो फुलांचा गुच्छ दाखवला..
" सांग आता .... आणी कोणावर नसला तरी तुझ्यावर माझा विश्वास आहे..."
तीच्या या शब्दांनी त्याला थोड बळ मिळाल..
" सांगु....?"
"हो रे plz...."
" डोळे बंद कर..."
" आता हे रे काय...."
" मग नाही सांगत....."
" बर बर..... करते...." आणी तीने आपल्या पापण्या अलगद मिटवल्या... तो तीच रूप डोळ्यांत साठवत होता.. किती निरागस , किती गोंडस, किती निष्पाप होती ती..'का कुणी तुझ्यावर प्रेम करू नये, पन मला हो म्हणेल की नाही म्हणेल' या द्वीधा मनस्थीतीत अडकलेला तो काळीज मात्र कमलीच धडधडत होत, क्षणभर तो तसाच उभा होता...
"आज बोलशील का...?"ती थोडी ओरडलीच.
तसे त्याने तीच्यासमोर आपले गुडघे टेकले आणी सोबत आणलेला तो गुलाब तीच्या समोर धरला...तीन वर्ष तीच्यासाठी काळजाच्या मखमली पेटीत जपुन ठेवलेल ते गोड गुपित आज तो उघड करत होता, प्रेमात ईश्वराच स्थान दिलेल्या त्या मुली मुलीकड त्यान पहात स्वता:च्या पापण्या मिटवत ते शब्द त्याच्या तोंडातुन बाहेर पडले...
"I LOVE U" त्याच्या तोंडातुन अलगद बाहेर पडताना जणु सारी दुनिया स्तब्ध झालेली... खिडकीतुन आत झेपावलेला मंद वारा तीचे रेशमी केस उधळत जाताना तीच सर्वांग शहारल होत. दोघांच्याही बंद पापण्या सोबतच उघडल्या , पन तिच्या चेह-याकड पाहुन त्याच्या काळजाचा ठोका चुकला, ती स्तब्ध होती, शांत होती, किंचित नाराजही होती.. तीच्या चेह-यावरचे ते भाव समजुन घेताना त्याच्या डोळ्यात मात्र अश्रु तराळले...मघापासुन वेड्यासारख धावणार ते इवलस काळीज जणु बंदच पडल होत...
'आज सार काही संपवल होत... मन स्वार्थी झालेल... प्रेम मिळवण्याच्या नादात आज तीची मैत्रीही गमावली होती....मैत्री... त्याच्या डोळ्यातल पाणी पहता ती किंचीत हसली आणी त्याच्या हातातुन तो गुलाब घेत म्हणाली ..
" किती वाट पहायला लावलीस... तुला काय वाटल, तुझ प्रेम न कळण्याइतपत मी आंधळी आहे... तुझी धडपड कळत नव्हती मला.? I love u . वेड्या.."
तीच्या डोळ्यात किंचीत अश्रु दाटलेले पन तीचे हे शब्द ऐकुन जस त्याच बंद पडलेल काळीज पुन्हा धडधडायला लागल... क्षणात वरून गुलाबाच्या पाकळ्यांचा पाऊस पडावा तशा खाली येऊ लागल्या, दोघांच्या अंगावर पाकळ्यांचा वर्षाव होताना ती मात्र हुरळून जात होती... दोघेही वर पहात होते, एका मित्रान सिलिंग फॅनच बटन सुरू केल होत एक पाकळी अलगद त्याच्या चेह-यावर येताच त्यान डोळे बंद केले..........
" ये चल उतर खाली. तुझं कॉलेज आलं."
बस कंडक्टर ने हातातील पंचीग मशीन तो बसलेल्या सिटच्या लोखंडी अँगल वर जोरात आपटल तसे त्याने झटकन डोळे उघडले. तो अजुनही बसमध्ये होता. तीच्या प्रेमाचा फिव्हर जरा जास्तच त्याच्यावर चढलेला. तिला प्रपोज करायचं तो स्वप्न पाहत होता. बॅग पाठीवर अडकवली आणि घाईघाईतच बस मधून खाली उतरला. तसा खाली वाट पाहत उभारलेला त्याचा मित्र संजु धावतच त्याच्याकडे आला.
" सत्या. ती अजून आलेली नाही पण काही वेळातच येईल. इथेच थांब. आणि काहीही झालं तरी आज प्रपोज करायचं. आम्ही कोप-यावर आहे."
" च्यायला माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त काळजी.." तो हसुन च म्हणाला.
" झालं हसुन.. आता तोंड बंद, आणि काम सुरू." एवढे बोलून संजू रस्त्याच्या पलीकडे एका पानाच्या टपरीवर जाऊन उभा राहिला. तर इकडे 'तो' ही तिची वाट पाहू लागला . आज तिला प्रपोज करायचं होतं. तस कॉलेजमधल्या बऱयाच मुलांनी तिला प्रपोज केलं होतं. त्यातल्या काहीं सोबत त्याचाही वादही झालेला . तर काही दिवसांपूर्वी तिची छेड काढणाऱ्या एका रोडरोमिओला 'ती' ने भर चौकात जोराची कानशिलात लगावलेली. कान चोळत रागाने मुसमुसत तो काही बोलणार तोच सत्या आणि त्याचा मित्र तीच्या मागे उभे राहिले.. मग काय आपला गाल चोळतच तो मित्राच्या बाईक वरून वावटुळ..
काॅलेज म्हंटल की मुलींवरुन मुलांमध्ये भांडण हे काही नवीन नाही. यांच कॉलेज ही या घटनांना अपवाद नव्हत.
तो देवाप्रमाणे तिची वाट पाहत होता की अचानक त्याचे डोळे चमकले. हृदयाची धडधड अचानक वाढू लागली. तोच टपरीवर उभ्या संजुने संकेत दिला. ती चालत येत होती . सोबत एक मैत्रीण होती जी यांच्याच ग्रुपमधली होती. टपरीवर उभ्या संजुने त्या दोघींना चालत येताना पाहिले आणि खिशातून मोबाईल काढला. तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीच्या हातातील मोबाईलची रिंग झाली.
" बोल ना रे"
" वर्षा. Line clear.?"
" Ok. Done"
आणि फोनवर बोलतच वर्षा तीला म्हणाली.
" ये 'रोज'.. चल तु. मी आलेच..."
तस वर्षाने आपल्या हाताच्या अंगठ्याने संजुला खुणावले.. आणि संजुने हातानेच सत्याला खुणावलं.
"Line clear."
'रोज' ने ही सारं काही ओळखल होतं. म्हणुन कदाचित तिच्या ही चेहऱ्यावर गोड गुलाबी हसू पसरलेलं. तिच्याही मनात याच्यासाठी गोड गुपित होतं पण तिलाही मनोमन वाटत होतं की त्यानेच आपल्याला प्रपोज करावा आणि आज तो दिवस उगवला होता. दोघांची नजरानजर झाली आणि काळीज धडधडू लागलं. पंचवीस एक पावलांच अंतर राहिल असेल. आज ती नेहमीपेक्षा जास्त देखणी दिसत होती. नेहमी जीन्स टी-शर्ट, टाॅप मधे येणारी 'रोज' आज गडद्द ब्लु कलर चा घागरा चोली घालून आलेली, त्यातच काळेभोर रेशमी मोकळे सोडलेले केस डाव्या खांद्यावरून पुढे घेतलेले त्यामुळं तीचा चेहरा अधिकच सुंदर दिसत होता, कानात ड्रेसला मॅचींग ब्लु रिंग घातलेल्या तर हातातही गडद्द ब्लु बांगड्या घालून आलेली, पन प्रत्येक पावलांचे अंतर कमी होताना काळजाची धडधड वाढतच होती, अंग अंग रोमांचित होत होतं. तीला पाहताच तो अगदी हरवून गेला होता, आजुबाजुची गर्दी, गोंगाट, वाहनांचे हाॅर्न, कर्कश्य आवाज सारं काही शांत होत. जसं या जगात या क्षणाला होती फक्त ती आणी तीच... आजवर त्याने काळजात लपवून , सजवून ठेवलेले ते शब्द तिच्यासमोर व्यक्त करायचे होते. आणि त्याचे ते शब्द ऐकण्यासाठी तिचेही कान आसुसले होते. दोघांमध्ये काही पावलांचच अंतर राहिलं होतं की...? अचानक तीच्या समोरून एक बाईक आली. काही सेकंदांसाठी बाईक चा वेग कमी झाला आणि.... तीच्या अंगावर काहीतरी फेकल गेलेल... क्षणभर सार काही जागच जागेवर थांबलं... अचानक एक धुराचा लोट उठला आणि एक आर्त किंकाळी तीच्या तोंडातून बाहेर पडली... त्याला समोर पहाताच क्षणाक्षणाला खुलणारा तिचा देखणा, निरागस चेहरा मेण कागदासारखा वितळत होता.. तिच्या शरीरातून पांढ-या धूराचा जणू लोटच वर उठला आणि ती धप्पकन जमिनीवर कोसळली. हे पाहून काही अंतरावरच असलेली वर्षा जोरात किंचाळली. पानाच्या टपरीवर उभा मित्रही धावत आला. सारेच सुन्न झालेले. 'रोज' मरणयातनांनी गडागडा जमिनीवर लोळू लागली. क्षणात घडलेल्या या भीषण घटनेनं तो पुरता हादरून गेला. तो तीच्या दिशेने धावला. धडधडत्या काळजान आणि आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी तो आपल्या स्वप्नातील देखण्या परी ला, तीच्या रंगिबेरंगी स्वप्नांना राख होताना पहात होता. तो 'रोज'ला वाचावण्याची केविलवाणी धडपड करू लागला पण तीच्या वितळत जाणाऱ्या शरीराला हात लावताच त्याचेही हात जळू लागले. करपू लागले. चोहूबाजूला मांस जळणारा दर्प, पांढरट धुराचे लोट , मरणयातनांनी आक्रोश करणार्या किंकाळ्यांनी आसमंत हादरून गेला. काही क्षणापु्र्वीच्या त्याच्या सुंदर जगामधे आत सुरू होता तो असह्य मरणयातनांचा आक्रोश , आक्रोश , आणि केवळ आक्रोश ."
" भावा...? हे घे. चार वडापावचे पैसे." समोर उभ एक गि-हाईक त्या हॉटेल वाल्या मुलाला पैसे देत होत. पैसे घेऊन त्याने सुट्टे पैसे त्याच्या हाती दिले तसा मागे बसलेल्या त्या प्रेमी युगुलामधली ती मुलगी आवंढा गिळत विचारू लागली..
" काय झालं होतं तीच्या सोबत. ?"
तसा तो हॉटेलवाला मुलगा मागे वळून पाहु लागला तर बरीच मुलं मुली उत्सुकतेने हे सारं ऐकत होती.. तसा तो पुन्हा सांगु लागला.
"कोणीतरी तीच्या अंगावर अॅसिड फेकून गेलं होतं.. कुणाच्या तरी स्वार्थाने, अहंकाराने, राक्षसी वृत्तीने त्या दिवशी अनेकांच आयुष्यच बदलुन टाकलं होतं.... जमलेल्या मित्रांनी तीला दवाखान्यात दाखल केलं. तीच सर्वांग होरपळून गेलेल. चेहऱ्यावरच मांस वितळून हाडांना चिकटलेल, अॅसिडचा काही अंश तीच्या तोंडातून आत गेलेला. तशीच तळमळत विव्हळत ती हाॅस्पिटलच्या बेडवर आक्रोश करत होती. तीला वाचवताना सत्याला ही बरच भाजलेलं. पण त्याला स्वता:च्या जखमांची फिकिर नव्हती. फिकिर होती ती फक्त तीची. यातनांनी आक्रोश करणारा तीचा आवाज कानावर पडताना त्याच काळीज फाटतं होत. विचार करून करून त्यांच्या डोळ्यातून एकसारख पाणी वहात होत. पण तो हतबल झालेला. हॉस्पिटलच्या बेडवर तो सुन्नपणे बसून होता. पापण्यांची कसलीच हालचाल होत नव्हती पण डोळ्यांतुन ओघळणारी आसव मात्र एकसारखी वहात होती. राहून राहून ते भयानक दृश्य त्याच्या नजरेसमोर थैमान घालत होत. तोच त्याचा मित्र संजू रुममध्ये आला पन त्याच्या सोबत आलेल्या वर्षाला आत यायच धाडस होईना.... ती दाराजवळच उभी राहिली. आपल्या जिवलग मित्राला समोर पाहताच भरलेल्या डोळ्यांनी आपले दोन्ही हात त्याच्या समोर जोडत म्हणाला.
"मला तीला पहायचं रे.. प्लीज रे.. प्लीज मला तीच्याकडे घेऊन चल." तो आपल्या मित्राला विनंती करू लागला.
तसा भरलेल्या डोळ्यांनी आवंढा गिळत जड अंतःकरणाने संजु म्हणाला...
" हो जाऊया ना. पण... आता ती झोपली आहे रे. अगदी शांत. आणि एक सांगु का... तीच्या असह्य वेदना आता शमल्या आहेत.. डॉक्टर सांगत होते की तिला आता कसलाच त्रास होणार नाही."
बोलता बोलता त्याच्या डोळ्यात दाटलेली आसव गालांवरून ओघळु लागली. त्याचे शब्द ऐकून रूमच्या दारा शेजारी उभ्या वर्षाला अश्रू अनावर झालेले. ती हुंदका आवरता होती पण ... तसा त्याला संशय आला. हातात घुसवलेली सलाईन ची सुई झटकन उपसतच म्हणाला..
"मला तीला पहायचंय..."
आणि धावतच रुम मधून बाहेर पडला. तसा संजुही त्याच्या मागे धावला. तो धावत 'रोज' अॅडमिट असलेल्या रुम मध्ये आला. आणि जागेवरच थांबला.. मघापासुन बीप बीप बीप करणरी सारी मशीन बंद होती. संजू सांगत होता तशी ती खरच बेडवर झोपलेली. चेहरा ओळखता येत नव्हता. पन त्याच प्रेम तीला चेहऱ्यावरून ओळखणार नव्हत. ती अगदी शांत झोपलेली. ना कसल्या वेदना. ना कसला त्रास. तीच्या कमी झालेल्या वेदना पाहुन त्यालाही बरं वाटलं. तोच बाजूला उभ्या नर्स ने तीच्या अंगावरच पांढर कापड तीच्या चेहऱ्यावर ओढून झाकुन टाकलं तसा दहकणा-या विस्तवावर, रणरणत्या निखा-यांवर लालबुंद केलेला धारधार खंजीर कोणीतरी काळजात घुसवावा अशा यातना त्याच्या काळजात उमटलेल्या. काही तासांतच ती मृत्यू सोबतचा तो भीषण संघर्ष हरली होती.. 'रोज' ला देण्यासाठी सोबत आणलेल 'रोज' त्या अॅसिड मध्ये मिसळून करपुन गेला.. पुन्हा कधीच न उमलण्यासाठी.."
बोलता बोलता त्या हाॅटेलवाल्या मुलाच्या डोळ्यात पाणी दाटलेल तर मनापासून सारं काही ऐकणा-या त्या ब-याच जणांना हुंदका आवरण कठीण झालेलं... गालावरून ओघळणारी आसवं रुमालाने टिपत जड अंतःकरणाने त्या मुलीनं विचारलं
"म्हणजे...? मेली ती...? "
" हो.. मरून गेली ती.." जड अंतःकरणाने तो बोलू लागला. गॅस शेगडी वरच्या कढईत खळखळ उसळणाऱ्या त्या तेलावर त्याची नजर खिळलेली.अश्रुंनी दोन्ही डोळ्यांच्या कडा भरल्या होत्या...
"मरून गेली ती.. काही तास ती असह्य नरकयातना भोगत होती. वेदनांनी तळमळत होती, कण्हत होती.. तीला असं ओरडताना वेदनांनी किंचाळताना पाहून सर्व मित्रांच काळीज जर चिंधड्या होत होतं. तीथ तीच्यावर जिवापाड प्रेम करणा-या 'त्या' बिचाऱ्याची अवस्था काय झाली असेल...? "
"आणि ते अॅसिड फेकणारे सापडले..?"
" हो.. पण राजकीय ताकद वापरून ते काही महिन्यांत सुटले... आणि बाहेर पडताच त्यांनी या काॅलेज परीसरासोबत संपूर्ण शहरातच दहशत माजवली... पन एक दिवस समजलं की याच रस्त्यावर त्यांना कोणी तरी पळवून पळवून मारलं, आणि काॅलेजच्या टेरेसवरून त्या दोघांना खाली फेकल. ज्यात दोघेही मारले गेले."
" पण कोणी मारलं..?" त्या मुलीने उत्सुकतेने विचारल तोच चार नंबर टेबल वरुन कोणीतरी 'मिसळ' ची आॅर्डर दिली.
" हो साहेब.." आणि त्याचे हात झपाझप चालु लागले. तो प्लेट तयार करून आत गेला तोवर जवळ बसलेल्या त्या मुलीचा बाॅयफ्रेंड तीला म्हणाला.
" खुप बोअर केलं याने. चल.. उठ आता. जाऊया..."
" प्लीज.. मला पुर्ण ऐकूदे. त्याशिवाय मला चैन नाही पडणार रे .." ती मुलगी काकुळतीला येऊन विनवणी करू लागली...
" अगं आज valentine day आहे. आजच प्लानींग माहिती आहे ना..? कुठ कुठ जायचं आहे आणि काय काय करायचे आहे ते...? तुला माहित आहे ना, मी काय काय ठरवलं आहे ते....?" बोलतच त्याने हळुच खट्याळपने तीच्या मांडीवर हात ठेवून आपली बोटे रूतवलीत , तशी ती मुलगी अस्वस्थ झाली
" नको ना प्लिज. मला खुप उत्सुकता लागली आहे रे." बोलत तीने मांडीवर ठेवलेला त्याचा हात अलगदपने आपल्या हातात घेत पुन्हा बाॅयफ्रेंड ला विनंती करू लागली...
''तुम्ही मुली ना emotional fool असता... कोणीतरी काही गोष्टी सांगत आणी तुम्ही मुर्ख बनता.. आणि प्रेमात एवढा वेड कोणी होत का..? काहीही.?" तो मुलगा जरा मोठ्या आवाजात म्हणाला.
तसे कढईत वडे तळणारे काका मोठ्या आवाजात न म्हणाले...
"एखाद्या पोरगी च शरिर टार्गेट ठेवून, 'लाॅज आणि स्ट्राॅबेरी ,चाॅकलेट वगैरे फ्लेवर' डोळ्यांसमोर ठेवून प्रेमाचं नाटक केलं की कोणी 'यड' नाही होत. त्यासाठी 'प्रेम' असाव लागत. प्रेम... जेव्हा आपणास आवडलेल्या मुली पाहिल्या शिवाय दिवसच पुर्ण होत नाही... तीच्या होकारापेक्षा नकाराची भीती जास्त वाटते म्हणून दोन चार वर्षे तीला फक्त पहायचं, तीच्या पायात काटा रुतला तरी कळ आपल्या काळजात उठते, ती उदास असली की आपल्याला जग स्मशान वाटत, आणि ती हसुन आपल्याशी दोन शब्द बोलली की स्मशानातही जसा स्वर्गच वाटतो.. ती जर आपल्या डोळ्यासमोर तडफडून मेली तर तो प्रियकर नक्की वेडा होईल.."
त्या काकांचं बोलणं थांबलं तसं त्यांच्या कडे पहात तो मुलगा म्हणाला..
" Emotional fool.." त्याच्या या शब्दाचा त्या मुलीला जरा रागच आला. पन तरीही ती दबक्या आवाजात म्हणाली.
" Emotional fool...? Emotional fool तर तु ही बनवला होतस मला . आत्महत्या करेन असं बोलून प्रेमाचा होकार मागितला होतास ना माझ्याकडून. विसरलास.?"
ती झटकन बोलुन गेली. पन त्याला मात्र भलताच राग आलेला.
" कोण कुठल्या या परक्यांसाठी तु...??? मी जातोय. तु बस याच्या फालतु गोष्टी ऐकत." तो ताडकन उठला आणि तावातावाने बाहेर पडला. तशीच रागाने आपली बाईक काढली आणि सुसाट वेगाने निघूनही गेला. तीला तीथेच सोडून..
आॅर्डर देऊन तो हाॅटेलवाला मुलगा बाहेर आला.. तशी ती मुलगी उत्सुकतेने विचारू लागली.
" सांगा ना.. कोणी मारलं त्यांना..? आणि तीच्या मजनु च काय झाल..?."
" हो सांगतो.. पन तुमच्या सोबत आलेला तो..?"
" तो गेला... तुम्ही बोला... काय झालं तीच्या मजनु च..?"
पुढे सांगणार तोच वडे तळणारे काका घाबरुन म्हणाले...
" अरे याला काय झालं...?"
"कोणाला..?" तस त्या हाॅटेलवाल्या मुलाच लक्ष रस्त्यावर गेलं. सतिश हुंदके देत समोरून चालत येत होता. कपडे चिखलाने माखलेले तर त्याच्या डोक्याला झालेल्या जखमेतून भळाभळा रक्त येत होता. तो धावतच सतीशजवळ गेला. आणि कपाळावरची जखम हाताने दाबून धरत म्हणाला.
" सतिश..? कोणी...? कोण मारलं रे तुला...?"
तसा सतिश हुंदके देत रडु लागला..
" मारलं रे मला. लय मारलं रे मला. भुख लागली होती म्हणून तीथ एका गाडीवरचा वडापाव खाल्ला म्हणुन मारलं रे मला.. पैसे नव्हते माझ्याकडे म्हणुन मारलं मला.."
तो लहान मुलासारखा एका दिशेला बोट दाखवून रडु लागला...
" रडु नको. मी आहे ना... मी बघतो कोण मारलं ते... चल ती बैग काढून खाली ठेव.. " पाठीवर अडकवली बैग काढून आपल्या पोटाशी कवटाळून सतिश जमिनीवर बसत म्हणाला..
" ती आज पन नाही आली रे..."
"अरे मग उद्या येईल... तुझं प्रेम आहे ना तिच्यावर..? मग तीला यावच लागले.. विश्वास ठेव.." हाॅटेलवाला मुलगा त्याला समजावत होता...
" काका. आपल्या टेबलखालचा first aid box द्या हो."
तशी ती मुलगी उठली आणि काकांनी बाहेर काढलेला first aid box घेऊन धावत त्याच्या हातात तो बाॅक्स देत जखमेवरच रक्त कापसाने स्वच्छ करुन त्यावर थोडे आयोडिन लावत हाॅटेलवाला मुलगा तीच्या कडे पहात म्हणाला.
" बिचा-याची आई लहानपणीच गेली. सावत्र आईने सांभाळल होतं. याची सावत्र आई खुपच मायाळू होती... इतकी की दोन तीन दिवस जेवण देत नव्हती ... कधी बाहेर खेळायला गेलाच तर गॅसवर पळी गरम करून ब-याचदा चटके द्यायची.."
ते ऐकून ती मुलगी पुन्हा म्हणाली..
" चालायचच... आपली कथा अर्धवट राहीली... मग पुढे काय झाले..?."
तसा तो सतिश ला उभ करत म्हणाला..
" थांबा याला सोडून येतो.. आणि मग सांगतो..."
एवढं बोलून तो मुलगा सतीश ला घेऊन चालत रस्त्याकडेला काही अंतरावरच असलेल्या झोपडीच्या दिशेने चालू लागला. तशी त्या मुलीची नजर सतिशच्या खिशातून खाली पडलेल्या एक जीर्ण कागदावर गेली.. तो कागद उचलुन तीनं हातात घेऊन पाहीला आणि क्षणभर सुन्न झाली. ती तशीच चालत त्या झोपडीजवळ आली. तीनं आत डोकावून पाहिलं आणि खळ्ळकन डोळ्यात पाणी तराळल. झोपडीत जीर्ण सुकलेल्या गुलाबांचा खच पडला होता. खडुने बाजुच्या भिंतीवर एक कविता लिहिली होती. तीच कविता त्या जिर्ण मळकटलेल्या कागदावरही लिहीलेली...
रोज'..., तुला पहावस वाटत,
पाहील की सार दुख: आटत,
नाही दिसलीस की काळीजच फाटत,
तुझ्या आठवणीने ह्रदय माझ दाटत,
आणी दिसलीस की पुन्हा जगावस वाटत,.
खरच ग 'रोज', तुला पहावसं वाटतं
'रोज'...
कविता वाचून ती मुलगी सतीश कडे पहात आपल्या हातातील तो कागद पुढे करत म्हणाली.
"सतिश... हे घ्या.. हा कागद तुमच्या खिशातून खाली पडला होता. "
तो कागद पहाताच आपले प्राण कुणीतरी परत द्यावे असा सतिशचा चेहरा खुलुन गेला. हाताच्या काॅलर ने डोळे पुसत अलगद त्याने हात पुढे करून ती चिठ्ठी घेतली.. तसा हाॅटेलवाला बोलु लागला.
" हा असा नव्हता हो. एका घटनेनं त्याच मानसिक संतुलनच ढासळल. तो त्या एका दिवसात जगतोय. त्याच्या सावत्र आईने त्याला वेड्यांच्या हाॅस्पिटल मधे टाकलं. शाॅक दिले. उपचार कमी पन यातनाच खुप दिलेल्या. आम्ही मित्रांनी त्याला गुपचूप त्या वेड्यांच्या हाॅस्पिटल मधुन सोडवून घरी आणलं. पन याच जागेवर रहायचा त्याचा हट्ट. कधी वेळेवर अन्न पोटात जात नव्हत . फक्त भटकत रहायचा.. त्याची ही अवस्था आम्हाला सहन होत नव्हती.. खूप वाईट वाटायच"
ती झटकन माघारी फिरली. तीला आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर भेटली होती.... हाॅटेलवाल्या मुलाच्या हाती आपलं बील देत म्हणाली...
'' कोणी प्रेमासाठी वाट्टेल ते करत. आणि कोणी मैत्री साठी. हो ना संजू''
" तुम्हाला माझं नाव कसं समजलं..???." तो हाॅटेलवाला कुतुहलाने विचारू लागला.
तशी ती त्याच्या जवळ जात कानात पुटपुटली
" असंच.. आणि टेरेस वरून त्या दोघांनाही फेकणा-यांमधे तुम्हीपन होता ना.? "
तीच्या प्रश्र्नाने तो हाॅटेलवाला अनुत्तरित झाला. तशी ती मुलगी आपल्या बाॅयफ्रेंड ने आपल्या हातात घातलेल घड्याळ पहात म्हणाली.
" Emotional fool की Emotional blackmail बनवल गेलेल हे प्रेम कुठवर टिकेल माहिती नाही पन आज या valentine day ला भेटलेले तुमच्या सारखे मित्र जन्मभर टिकतील हे मात्र नक्की.. प्रेमासाठी ताजमहाल बांधणारे बरेच असतात पन आपला मित्र उपाशी राहू नये म्हणून त्याच जागेवर हाॅटेल सुरू करणारे क्वचितच. आणि हो. मी सायकाॅलाॅजी करणार आहे.. सतिश ला बर करण्यासाठी तुमच्या सोबत आता मी ही आहे.. वाट्टेल ते झाले तरी.."
" मनापासून आभार तुमचे.. पन तुमचं नाव नाही सांगातल तुम्ही...?" संजू ने तीला नव्हे तर अक्षरशः देवालाच हातच जोडले... तशी आपली बैग पाठीवर अडकवत त्याच्याकडे पहात म्हणाली.
" काय योगायोग आहे ना.. माझंही नाव...(किंचित हसून म्हणाली) 'रोज'... आणि हो ... happy valentine day."
ती चालत काॅलेजच्या गेटमधून आत आपल्या क्लासरुम च्या दिशेने जाऊ लागली आणि तो तीला पाहताच राहीला... त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होत, जे काम सायकॅट्रीक करू शकले नव्हते ते कदाचित ही मुलगी करु शकत होती... कारण प्रेमापेक्षा मोठं औषध या जगात दुसरं नाही...
समाप्त...