बळी - ३ Amita a. Salvi द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बळी - ३

बळी - ३
रंजनाच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या वैवाहिक जीवन कसं असेल; या विषयी केदारला शंका वाटू लागली होती; पण त्याने मनातले विचार झटकून टाकले,
" मी उगाच घाबरतोय! हे कदाचित ती इथे नवीन असल्यामुळे असेल--- ती काही दिवसांनी नक्कीच बदलेल! माणसाची पारख व्हायला थोडा काळ जावा लागतो! ---- " तो स्वतःची समजूत घालू लागला.
"मी विचारलं---- थोडा वेळ गार्डनमध्ये बसूया का? आपण खूप लवकर निघालो आहोत! सिनेमा सुरू व्हायला वेळ आहे! ---" तो रंजनाला विचारू लागला,
"नको! आपण अगोदर माझ्या ताईकडे जाऊन तिला ह्या वस्तू देऊया, आणि मग थिएटरला जाऊया! आता तिचाच फोन होता! तिला केसची तयारी करण्यासाठी ही पुस्तकं अर्जंट हवी आहेत! मी तिला म्हटलंय, की आम्ही तुझ्याकडे यायला निघालोय! फार वेळ जाणार नाही. तिची पुस्तके देऊन लगेच निघूया!" रंजना त्याला अडवत म्हणाली.
खरं म्हणजे केदारला मनातून तिचा राग आला होता, पण तो वरकरणी हसत म्हणाला,
"जाऊया की! त्यात काय एवढं मोठं! थिएटरच्या रस्त्यातच तिचं घर आहे! पण ताईशी गप्पा मारत तिथेच थांबणार नाहीस नं? नाहीतर आपल्याला सिनेमाला जायचंय हेच विसरून जाशील!"
यावर रंजनाने हसून मान वेळावत त्याच्याकडे पाहिलं.
केदारच्या दृष्टीने रंजनाला आनंदी ठेवणं महत्वाचं होतं. खरं म्हणजे आज प्रथमच दोघं एकत्र बाहेर चालले होते; त्याला तिच्याशी खूप बोलायचं होतं ; तिला जाणून घ्यायचं होतं ; हास्य- विनोद करायचा होता, पण रंजनाला त्याच्या मनाची जराही कदर आहे, असं तिच्या वागण्यावरून वाटत नव्हतं. केदार मात्र स्वतःच्या भावनांकडे लक्ष देण्यापेक्षा रंजनाच्या कलाने घेऊन तिचं मन सांभाळण्याचा प्रयत्न करत होता.
केदारची बुद्धी त्याला विचार करायला सांगत होती, पण रंजनाच्या सौदर्याने असेल; किंवा ती त्याच्यासाठी आपल्या माणसांपासून इतक्या दूर आली आहे, या तिच्या कांगाव्याने असेल---- त्याच्यावर एवढी जादू केली होती ; की रंजना पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे; त्यामुळे तिच्या भावना जपणं; हे आपलं कर्तव्य आहे --- आपल्याकडून तिच्या मनाविरूद्ध काही घडता कामा नये, हे त्याने ठरवून टाकलं होतं! केदारसारख्या सरळमार्गी माणसावर भावनिक दबाव आणून तिने जणू त्याला तिचा गुलाम बनवलं होतं. ती म्हणेल त्याप्रमाणे तो वागत होता!
*******
केदारने जवळ उभ्या असलेल्या एका टॅक्सीला हात केला ; आणि रंजनाच्या दीदीचा पत्ता सांगितला.
टॅक्सी ड्रायव्हर खूपच बोलघेवडा होता. त्याने इकड-तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली.
"नवीन लग्न झालेलं दिसतंय! खूप छान जोडा आहे तुमचा! ----- पण ताई मुंबईच्या वाटत नाहीत! ---- सोलापुरकडच्या आहेत असं वाटतं---" तो एकटाच बोलत होता. केदारला अनोळखी माणसाचं असं सलगीने वागणं आवडत नव्हतं. त्याने त्याच्या बोलण्यावर उत्तर दिलं नाही; फक्त " हं! " म्हणून गप्प झाला; पण रंजना म्हणाली,
" होय! तुम्ही कसं ओळखलं? मी सोलापूरपासून बरंच आत काटेगाव नावाचं गाव आहे, तिथली आहे!" यावर ड्रायव्हर हसला आणि म्हणाला,
" मी तुमच्या शेजारच्या आंबेगावचा आहे! तुम्हाला पाहिलं - तुमचं बोलणं ऐकलं, आणि वाटलं, की तुम्ही आमच्याच भागातल्या आहात; म्हणून तुम्हाला विचारलं! बघा--- मी बरोबर ओळखलं की नाही?"
"आमची शाळा आंबेगावलाच होती! खूप सुंदर गाव आहे तुमचं! " रंजना म्हणाली.
"शाळेजवळच आमचं घर आहे! पण मी गेली काही वर्षे शिक्षणासाठी पुण्याला काकांकडे होतो; म्हणून आपण एकमेकांना कधी पाहिलं नसेल! माझं नाव राजेश!" ड्रायव्हर म्हणाला.
यानंतर अनेक विषयांवरून दोघांचं चाललेलं संभाषण केदार फक्त ऐकत होता. रंजना तो आपल्या बरोबर आहे हे जणू विसरूनच गेली होती. त्याला आठवलं ; काही वेळापूर्वीच रंजना म्हणाली होती की " मला अनोळखी माणसांमध्ये लवकर मिसळता येत नाही!" पण प्रत्यक्षात तिचं वागणं वेगळंच होतं. खूप दिवसांनी एखादा मित्र भेटावा, तशी ती त्या ड्रायव्हर - राजेशबरोबर बोलत होती. तिचं वागणं केदारला खटकलं, तरीही तो काय करू शकत होता?---- रंजनाला काही बोलू शकत नव्हता. तिचा मूड खराब करून आजची संध्याकाळ त्याला वाया घालवायची नव्हती.
त्यांच्या गावच्या गप्पा ऐकून केदार कंटाळून गेला! दीदीचं घर कधी येतंय याची वाट बघत होता. रंजनाशी चार गोष्टी शेअर करणं त्याला आजही शक्य झालं नव्हतं. "त्या टॅक्सी-ड्रायव्हरचं निमित्त करून ती आपल्याशी बोलणं टाळतेय --- " हा विचारही एकदा त्याच्या मनात डोकावला --- पण त्याने दुर्लक्ष केलं.
मधेच रंजना म्हणाली ,
"केदार! ऊन खूप आहे ; मी पाण्याची बाटली घ्यायला विसरले. खूप गरम होतंय --- जीव घाबरल्यासारखा होतोय! माझ्यासाठी थंड पाणी घेऊन याल का? "
तिथून दीदीचं घर फार लांब नव्हतं; पण तरीही केदारने एका हॉटेलजवळ टॅक्सी थांबवली ; आणि तिच्यासाठी थंड पाण्याची बाटली घेऊन आला. तिथे त्याला फार वेळ थांबावं लागलं नव्हतं.
परत आला, तेव्हा त्यानं पाहिलं; की राजेश आणि रंजना दोघं गंभीर चेहरे करून काहीतरी बोलत होते, पण केदारला पाहताच दोघंही चपापली आणि गप्प झाली, बहुधा तो इतक्या लवकर येईल याची त्यांना कल्पना नव्हती.
*******
अंधेरीला नेहा दीदीच्या घराजवळ टॅक्सी थांबली; केदार खाली उतरून ड्रायव्हरला पैसे देणार, तोच रंजना म्हणाली,
" दीदीसाठी आपण मिठाई घेतली नाही! घरी लहान मुलं आहेत; त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ घेतल्याशिवाय जाणं बरं दिसणार नाही! माझ्या लक्षातच राहिलं नाही! आता काय करायचं? इथे सगळ्या बिल्डिंग आहेत! दुकानं दिसत नाहीत!"
"आपण जरा पुढे जाऊन बघूया! एखादं चांगलं दुकान आजूबाजूला नक्कीच असेल!" केदार म्हणाला.
" पुढच्या रस्त्यावर एक मोठं मिठाईचं दुकान आहे! चला मी दाखवतो तुम्हाला! आणि ताई तुम्ही कशाला येताय एवढ्या उन्हातून? तुम्ही घरी जा! मी साहेबांना घेऊन जातो !" राजेश म्हणाला.
"ठीक आहे! मी इथेच उतरते! तुम्ही पुढे जाऊन बघा; आणि लवकर या! आपल्याला लगेच निघायचं आहे; नाहीतर सिनेमाची सुरूवात चुकेल!" असं म्हणून रंजना टॅक्सीतून उतरून मागे न पाहता, झपाझप दीदीच्या बिल्डिंगकडे चालू लागली; आणि केदार परत टॅक्सीत बसला.
********
राजेश टॅक्सी चालू करणार; तोच केदारच्या बाजूचा दरवाजा उघडून एक माणूस आत बसला. केदार आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला, आणि चिडून म्हणाला,
"अजून मी उतरलेलो नाही! तुम्ही असे कसे सरळ टॅक्सीमध्ये बसलात? मी पुढे चाललोय------ प्लीज खाली उतरा!"
राजेश म्हणाला,
" माझा मित्र आहे साहेब! तुम्ही इथे उतरणार होतात ; म्हणून फोन करून बोलवून घेतला होता! माझ्या गावचा शाळासोबती आहे! खूप दिवसांनी भेटतोय आम्ही! आपल्याबरोबर आला, तर चालेल नं? तुम्हाला जवळच तर जायचं आहे! पाहिजे तर मी परत इथपर्यंत आणून सोडतो!" तो इतक्या अजीजीने बोलत होता, की केदारला नाही म्हणणं जड गेलं.
राजेशचा मित्र देखणा, नीटनेटका- सुसंस्कृत वाटत होता -- केदारच्याच वयाचा होता. केदारला परत आणून सोडायला ड्रायव्हर तयार झाला होता, त्यामुळे केदार त्याला टॅक्सीत घ्यायला तयार झाला.
"हरकत नाही! मिठाईचं दुकान जवळच आहे नं? चल लवकर! मला उशीर होतोय!" तो घाई करत म्हणाला.
"यांची बायको आपल्या सोलापूरकडची आहे बरं का! आपल्या आंबेगावच्या शाळेत होती--- तू जरा उशीर केलास; नाहीतर भेट झाली असती-- आताच उतरून गेल्या --- नवीन लग्न झालंय! आपले पाहुणे आहेत हे! " त्या नवीन माणसाला केदारची माहिती देत ड्रायव्हरने गाडी चालू केली. त्याने हळूच डोळा मारला; हे केदारच्या नजरेतून सुटलं नाही. पण काही विचारून विषय वाढवणं त्यानं टाळलं.
त्याचा आगाऊपणा केदारला आवडत नव्हता ; पण तो स्वतःला शांत ठेवत खिडकीतून एखादं मिठाईचं दुकान दिसतंय का; हे शोधू लागला.
बराच वेळ झाला; तरीही दुकान सापडेना ----- केदारला थोडा संशय येऊ लागला, कारण त्या दोघांची चाललेली नेत्रपल्लवी त्याला समोरच्या आरशात दिसत होती. तो काही न बोलता त्या दोघांचं हालचालींचे निरीक्षण करत होता. तो दुसरा माणूस आता त्याला खेटून बसला होता. ते दोघे मित्र आहोत असं केदारला म्हणाले होते, पण ते आता मित्रांप्रमाणे एकमेकांशी बोलत नव्हते, वातावरण मैत्रीचं नव्हतं-- कोंदट वाटत होतं. केदारचं मन त्याला धोक्याची सूचना देत होतं.
******** contd. - Part 4.