बळी - ६ Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बळी - ६

बळी - ६
केदार बेशुद्ध नाही; तर नाटक करतोय, हे त्या गुंडांपैकी कोणाच्या लक्षात अजूनपर्यंत आलं नव्हतं.
पण बहुतेक राजेशला संशय आला. तो केदारच्या जवळ आला,
" याला क्लोरोफॉर्म देऊन खूप वेळ झाला, अजून शुद्धीवर कसा आला नाही? ओव्हरडोस तर झाला नाही?" तो त्याला हलवून बघत म्हणाला.
दिनेश त्याला थांबवत म्हणाला,
" हा दिसायलाच हीरो आहे! तब्येत नाजूकच दिसतेय! आणि तू कशाला काळजी करतोस? ओव्हरडोस होऊन कोमात गेला असला; तरी काय फरक पडतो? नाही तरी आपल्याला त्याला ढगात पाठवायचाच आहे! तूच माझं काम करून टाकलं असशील, तर बरंच झालं! माझे श्रम वाचतील!" त्याच्या स्वरात सैतानी क्रौर्य होतं.
"तू याचं काय ते कर! माझ्यावर ढकलू नको! आणि यापुढे या प्रकरणात माझं नाव घेऊ नकोस!" राजेश चिडून म्हणाला.
तो थोडा अस्वस्थ वाटत होता.
"आता मी निघतो! माझं काम झालं! मला टॅक्सी बारा वाजण्यापूर्वी मालकाकडे पोचवायची आहे!" राजेश निघण्याच्या तयारीत म्हणाला.
"यार! दिनेश खूप दिवसांनी आम्हाला भेटलाय! त्याच्यासाठी आम्ही जंगी तयारी केली आहे! रात्री पार्टी करायची आहे! तू पण थांबलास; तर जास्त मजा येईल! आज रात्री इथेच थांब! " भीमा त्याला म्हणाला.
"नको! पार्टीला थांबलो; तर सकाळपर्यंत इथेच थांबावं लागेल! टॅक्सी रात्रभर गेटजवळ उभी राहिली, तर पोलिसांच्या नजरेत येईल! शिवाय मालक दिवसाच्या हिशोबासाठी रात्री वाट बघत थांबलेला असतो--- तो रागावेल --- आता जाऊन टॅक्सी त्याच्या हवाली केली; की उद्या रजा घ्यायला मी मोकळा! आज खूप त्रास झालाय-- उद्या दिवसभर आराम करणार आहे! याला इथपर्यंत आणायचं काम माझं होतं; पुढे काय करायचं, ते तुम्ही बघा! मी निघालो!" राजेश निघायची घाई करत म्हणाला. त्याला यापुढे जे काही घडेल; त्याचा साक्षीदार व्हायचं नव्हतं --- किंवा ते बघण्याची हिम्मत त्याच्याकडे नव्हती.
"माझा माल टॅक्सीमध्ये नीट ठेवलायस नं?" दिनेशने त्याला थांबवून विचारलं.
"हो रे बाबा! सगळं काही जपून ठेवलंय; आणि आता टॅक्सी लाॅक केलेली आहे! काळजी करू नकोस! तू उद्या माझ्या घरी ये! तुझा ऐवज तुला मिळेल! उद्या दिवसभर मी कुठेही जाणार नाही -- घरीच आहे!" राजेश घाईघाईत निघताना म्हणाला.
"टॅक्सी मालकाकडे ठेवताना ती बॅग आठवणीने बरोबर घ्यायला विसरू नकोस!" दिनेश तो थोडा दूर गेल्यावर त्याला ऐकू जाईल, अशा मोठ्या आवाजात म्हणाला.
केदार विचार करत होता, "यांनी माझ्याकडून काहीच घेतलं नाही; मग हे कशाविषयी बोलतायत? बहुतेक यांनी आणखी कुठेतरी डल्ला मारलेला दिसतोय! ---"
राजेश लगबगीने उतरला आणि लाँच चालू झाली.
********

केदारने बेशुद्ध असल्याचे नाटक चालू ठेवलं!. आता जरी त्याने सुटकेचा प्रयत्न केला असता, तरी हत्यारे बाळगणा-या इतक्या गुंडांसमोर त्याची डाळ शिजली नसती; याची त्याला खात्री होती. पाण्याची भिती केदारला वाटत नव्हती. तो पट्टीचा पोहणारा होता शाळ - काॅलेजमध्ये असताना स्विमिंगची अनेक बक्षिसे त्याने जिंकली होती. त्यामुळेच अजूनही त्याला जगण्याची आशा वाटत होती.
केदारला भीती फक्त एकाच गोष्टीची वाटत होती. अनेक वर्षे त्याचा पोहण्याचा सराव बंद होता; आणि दुसरं म्हणजे तो मघापासून बघत होता, हे सगळेच लोक खुनशी प्रवृत्तीचे होते; त्यांचा काही भरवसा नव्हता; अगोदर त्याचा जीव घेऊन त्यानंतर त्याला समुद्रात फेकण्याची कल्पना जर कोणाच्या सुपीक डोक्यात आली असती; तर मात्र त्याचं काही खरं नव्हतं.
इतक्यात दिनेश तिथल्या एका माणसाला म्हणाला,
"अरे भीमा! तुझी अंगकाठी साधारण याच्याएवढीच आहे! याचे कपडे तू घाल; आणि तुझे याला चढव! लांबून का होईना--- पोलीसांनी त्याला आपल्याबरोबर पाहिलं आहे; इतकं किंमती ब्रँडेड शर्ट ते नक्कीच विसरणार नाहीत! जर उद्या वहात याच किना-याला लागला; तर हा आपल्याबरोबर होता, हे कपड्यांवरून ओळखता कामा नये; कारण तसं झालं; तर तुझ्या बोटीमुळे ते आपल्याला लगेच शोधून काढतील!" तो बरोबरच्या एका माणसाला म्हणाला,
केदारचे महागडे कपडे आपल्याला मिळणार; म्हणून भीमा खुश झाला, दिनेशच्या आदेशाची अंमलबजावणी त्याने जराही वेळ न घालवता - पटकन् केली.
तो कपड्यांची अदलाबदल करत होता; तेव्हा त्याला केदारच्या खिशात त्याचा मोबाईल आणि पाकीट मिळालं.
भीमा ते हळूच चाचपून बघत होता; तोच दिनेशची नजर त्याच्यावर गेली; आणि तो म्हणाला,
"नव्या नवरीला फिरायला घेऊन चालला होता! पाकीटात भरपूर पैसे असतील; तू एकटा नको घेऊ; सगळे जण वाटून घ्या!" दिनेश म्हणाला. भीमाने चेहरा कसानुसा करत पाकीट काढून एका साथीदाराच्या हातात दिले.
"पण मोबाईल मात्र मी ठेवणार!" किंमती मोबाईलकडे आशाळभूतपणे पहात तो म्हणाला.
"नाही! भलती हाव घरू नकोस! त्या मोबाईलचा नंबर आणि लोकेशन ट्रेस करून पोलीस कधीही तुझ्यापर्यंत पोहोचतील! तो मोबाईल समुद्रात फेकून दे!" दिनेशने त्याला समज दिली.
जड मनाने भीमाने मोबाईल पाण्यात फेकला. केदारसाठी हा मोठा धक्का होता. मित्रांशी किंवा नातेवाईकांशी संपर्क साधण्याचं साधन नष्ट झालं होतं. घरचा सोडला, तर इतर कोणाचे फोन नंबर त्याला पाठ नव्हते. सगळं जग आपल्यापासून दूर गेलं आहे, अशी विचित्र हुरहूर त्याला वाटू लागली!
"नाहीतरी पाण्यात मोबाईल बंद पडला असता! माझ्याजवळ असता तरी उपयोग नव्हता!" त्याने स्वतःच्या मनाचं समाधान केलं.
ह्या सगळ्या प्लॅनचा कर्ता- धर्ता दिनेश होता, हे स्पष्ट होतं! पण कघीही संपर्कात न आलेला हा माणूस हे सगळं का करतोय, , हे केदारसाठी एक कोडं होतं. या हुशार माणसाने रचलेल्या मोठ्या चक्रव्यूहात केदार बेसावधपणे अडकला होता. त्यातून बाहेर पडणं खूप कठीण दिसत होतं.
दिनेशच्या हातातल्या वाॅटरप्रूफ घड्याळाकडे मात्र नशीबाने कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. किंवा ते किती किंमती आहे, याची कल्पना त्यांना आली नव्हती.
*********
बोट चालू होऊन बराच वेळ झाला होता; "म्हणजेच आपण समुद्रात खूप आत आलो आहोत--" हे लक्षात आलं; आणि केदार दचकला.
"आणखी किती खोल समुद्रात नेणार आहेत मला?अाणि नक्की कुठल्या दिशेला नेतायत?" त्याचं हृदय आता धडधडू लागलं होतं. अज्ञात भीतीने अंगातली शक्ती कमी होऊ लागली होती.
दिनेशबरोबरचे लोक आता कंटाळले होते.
"ए बाबा! दिनेश! आता खूप झालं! आपण खूप आत आलो आहोत! आपल्याला परत जाताना पुन्हा एवढाच वेळ लागणार आहे; हे विसरू नकोस! आताच पोटात कावळे ओरडू लागलेयत! इथून गावात जायला दोन तास लागतील! इथेच सोडू या का ह्याला?" एकजण म्हणाला.
" काय लहान मुलांसारखा भूक भूक करतोस?" पण जरा विचार करून तो म्हणाला,
" ठीक आहे! तुझं बोलणं बरोबर आहे---रात्र सुद्धा वाढतेय! किना-यापसून खूप दूर आलो आहोत आपण! खोल पाण्यातले मोठे मासे खाऊन टाकतील याला! बाॅडी मिळाली नाही, की पुढची सगळी चौकशी ठप्प होते! --- म्हणून इतक्या बोट लांब आणली! --- मला पोलीसांचा ससेमिरा पाठीशी नकोय! इथेच फेका याला समुद्रात!" दिनेशची संमती मिळताच. बोटीवर गडबड सुरू झाली.
"पण याला पोहता येत असेल तर? आपण ह्याचे हात- पाय बांधून या का?" एकजण म्हणाला.
हे ऐकून केदारचा श्वास क्षणभर अडकला; पण दिनेश त्या माणसाला वेड्यात काढत म्हणाला,
"तू वेडा आहेस का?बेशुद्ध माणूस कधी पोहताना पाहिलायस का तू? उगाच नसत्या शंका घेऊ नकोस! "
तो पुढे आपला प्लॅन त्यांना समजावून सांगू लागला.
"आपल्याला ह्याने आत्महत्या केली, असं चित्र निर्माण करायचं आहे! हात पाय बांधले; आणि जर हा आपल्या दुर्दैवाने किना-यावर आला; तर खून करण्यासाठी कोणीतरी समुद्रात बुडवलं, हे पोलिसांना कळेल, आणि ते त्या दिशेने शोध घेतील! आपल्याला संशयाला जागा नकोय! ह्याला असाच फेकून द्या! माशांनी खाल्लं; तर प्रश्नच नाही; पण यदाकदाचित् लाटांबरोबर किना-यावर आला, तरी कोणाला संशय येणार नाही! आत्महत्येची केस ठरवून पोलीस फाईल बंद करतील!"
दिनेशने सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केलेला दिसत होता.. बोलताना त्याचा आवाज थरथरत होता. या शेवटच्या टप्प्यात त्याच्या मनावरही प्रचंड ताण आला होता. केदारवरचा त्याच्या मनातला खुन्नस त्याच्या प्रत्येक शब्दात भरलेला होता! तो शुद्धीवर आहे याचा जरा जरी सुगावा लागला असता, तर त्याला गोळी घालायला त्याने मागेपुढे बघितलं नसतं.
********* contd.- part 7.