अधांतर - २५ (अंतिम भाग) अनु... द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अधांतर - २५ (अंतिम भाग)

"फूलों में ढली हुई ये लड़की
पत्थर पे किताब लिख रही है।
फूलों की ज़ुबान की शायरा थी
काँटों से गुलाब लिख रही है।"

आज जेंव्हा स्वतःच्या आयुष्याचा प्रवास पाहते तेंव्हा उर्दू गझलकारा इशरत आफ़रीं यांच्या या ओळी आठवतात...आज असं बघितलं तर सगळंच आहे माझ्याकडे, म्हणजे भौतिक सुखं तरी सगळीच आहेत...तरीही एकटीच आहे....असायलाही पाहिजे..हे सगळं मिळवण्यासाठी, स्वतःच्या निवडलेल्या मार्गांवर चालण्याची किंमत मोजली आहे मी...'काही मिळवायचं असेल तर खूप काही गमवाव लागतं' हे खरंच कळत होतं मला...पण या सगळ्यांत एक जाणीव झाली होती, की आयुष्य हे गुलाबाच्या फुलसारखच आहे, सुंदर आहे पण काटेही भरपूर आहेत...आणि त्या काट्यांवर चालूनच मला आयुष्याची किंमत कळली आहे...

तीन वर्ष....!! तीन वर्ष लागले मला पुन्हा माझ्या पूर्व आयुष्यात यायला...जेव्हापासून मी मसुरीला गेली होती, भरपूर बदल झाला होता माझ्यामध्ये...तस तर बदल अभय सरांनीच घडवून आणला होता, पण मसुरीला गेल्यावर नवीन मित्र मैत्रिणी भेटले होते, त्यांच्या यशाच्या कथा, त्यांची मेहनत, त्यांचे दुःख जेंव्हा पाहीले तेंव्हा वाटलं की माझं सगळं कमीच आहे...त्यामुळे मी आता माझ्या आयुष्यात काय घडलं, कोण माझ्या सोबत आहे कोण नाही याचा विचार करायचा सोडून दिला होता...आणि LBSNAA चा शेड्युल इतका व्यस्त होता की बाकी काही करायला वेळच मिळायचा नाही...नागपूर सोडून गेल्यापासून अभय सरांशी बोलणं व्हायचं कधी कधी, पण आता मीच कामाव्यतिरिक्त बोलायचं टाळत होती, कारण मला वाटायचं की कळत नकळत मी त्यांना दुखावलं आहेच...एकदा ते मला भेटायला ही आले होते मसुरीला, पण तेंव्हा ही मी त्यांना स्पष्ट सांगून दिलं होतं की त्यांनी उगाच माझ्यासाठी कोणताही त्रास करून घेऊ नये..मग हळूहळू मी पण त्यांना बोलणं कमी केलं, आणि त्यांचेही फोन बंद झाले..अकॅडमी मध्ये त्यांची ओळख होती काही, त्यामुळे त्यांना माझी खबर मात्र बरोबर मिळायची...मला माझ्या वागणुकीसाठी कधी कधी खूप वाईट वाटायचं की मी त्यांना असं एकदम दूर करायला नको, जेंव्हा की त्यांच्यामुळेच तर आज मी इथे आहे...पण माझ्यामुळे ते कोणत्याही भावनिक विवंचनेत फसू नये असंही वाटायचं...पण त्यांच्या बद्दलचा आदर, आपुलकी मात्र सुतभरही कमी झाली नव्हती...

मला हरयाणा कॅडर मिळालं होतं, त्यामुळे सुरुवातीला पोस्टिंग ही इकडेच होती, त्यामुळे जेंव्हा फेज 1 ट्रेनिंग पूर्ण झालं, मला इकडे नागपुरात येण्याची काही जास्त ओढ नव्हतीच, आणि येणार तरी कोणासाठी होती..सगळंच तर सुटलं होतं, आई बाबही..! पण अभय सर होते, ज्यांनी मला पुन्हा जाणीव करून दिली की नाते असे दुराव्याने तुटणारे नसतात आणि त्याच एका गोष्टीने मला तीन वर्षांनंतर परत आणलं होतं...मी नागपूर सोडायच्या आधीच विक्रमला त्याची शिक्षा मिळाली होती, देवाने त्याच्याकडून त्याचे आईबाबा ही हिरावून घेतले होते...मी मसुरीला असतांना बोलता बोलता एक दोन वेळा अभय सर त्याच्याबद्दल बोलून गेले होते माझ्याजवळ, पण त्याच्याविषयी रागाने भरलेल्या माझ्या हृदयाने काही ऐकलंच नाही...इकडे आल्यावर जेंव्हा बाबा मला थोडे कटू शब्द बोलले, तेंव्हा अभय सरांनी किती सोप्या भाषेत सांगितलं की 'सगळं काही विसरू नको, पण माफ जरूर कर विक्रमला'...त्यादिवशी ऐकलं नाही मी त्यांचं, पण आता मला सतत वाटत होतं की मी विक्रमला एकदा भेटायला पाहिजे.. त्याच्याविषयी जो द्वेष मी मनात साठवून ठेवला आहे कदाचित त्यामुळेच इतकं सगळं मिळवून ही मला समाधान नाही... आणि म्हणूनच मी आज अभय सरांसोबत विक्रमला भेटायला निघाली होती....

बाबांनी दिलेली प्रत्येक शिकवण, त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला अजूनही लक्षात होती, मग ते त्यांनी दिलेले संस्कार असो किंवा मुलींबद्दल त्यांचे मागासलेले विचार असो...काहिच विसरली नव्हती... पण एक गोष्ट मी विसरली होती... बाबा नेहमी बोलायचे की आपल्यावर कितीही वाईट प्रसंग आला किंवा कोणी आपल्या सोबत कितीही खराब वागले तरी आपण आपल्या मनातली करुणा कमी होऊ द्यायची नाही...नाहीतर त्या द्वेषाच्या अग्नीत चूक केलेला कमी जळतो पण आपल्याला मात्र त्याच्या पेक्षा जास्त झळा लागतात...आणि विक्रम बद्दल मला खूप तिरस्कार निर्माण झाला होता, माझा रागच तेवढा होता, आणि असायलाही हवा होता..त्याने केलेले गुन्हे सहजासहजी माफ करण्यासारखे नव्हते...पण या सगळ्यांमध्ये माझ्या मनातली करुणा संपली होती, आणि मी जेंव्हा स्वतःला बाबांच्या नजरेतून पाहिलं तेंव्हा कळलं की मी खूप चुकीचीच आहे त्यांच्यासाठी, ज्या समाजात त्यांनी आयुष्य घातलं, तिथेच त्यांची नामुष्की केली मी..पण त्यांच्यतली करुणा अजुनही जिवंत असावी त्यामुळे माझा राग असूनही त्यांनी तीन वर्षानंतर मला घरात घेतलं...पण त्यांनी अजूनही विक्रम सोबत संबंध तोडले नव्हते, ते नेहमी विक्रमला भेटत आणि असं का?? याच प्रश्नांची उत्तरं घ्यायला आज मी विक्रमला भेटणार होती...

विक्रमने इतकं काही वाईट केलं होतं की आता तो चांगला वागेल यावर विश्वास नव्हता, त्यामुळेच अभय सर सोबत आले होते...दोन तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो..आणि विक्रमची नवी जागा पाहून मी थोडावेळ स्तब्ध झाली...गाडीतून उतरल्यावर मला पाऊलं उचलायला जड झाली, आणि मी अडखळत अभय सरांना बोलली,
"हे आपण कुठे आलोत?? विक्रमला इथे ठेवलंय, सांगितलं नाही आजपर्यंत तुम्ही मला?? का??"
आम्ही NGO च्या गेट वर उभे होतो, जिथून माझ्या आयुष्याने कलाटणी घेतली होती तिथेच येऊन उभी होती मी आज...

"विक्रम जवळ घर कुठे आहे नैना आता राहायला, आणि त्याची कोणी फॅमिली ही नाही, आणि गेल्या काही दिवसांत त्याची तब्येत ही बरी नव्हती, त्यामुळे तो इथे आहे आणि मलाही तेच योग्य वाटलं."

"तब्येत?? म्हणजे? ,मला काही कळत नाहीये..."

"आतमध्ये चल, मग कळेल..."

गेल्या काही वर्षांत NGO चा चेहरा मोहाराच बदलला होता, आधी फक्त स्त्रीयांसाठी येथे काम चालत होत पण आता जे पुलीस अधिकारी काही कारणाने अपंग झाले आहेत, ज्यांना घर नाही, कुटुंब नाही, वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी ही अभय सरांनी काम सुरू केलं होतं...आणि अश्या ठिकाणी आता मला विक्रम भेटणार होता...विक्रमला सगळीकडे शोधल्यावर कळलं की तो बाहेर त्या बेंच वर बसला आहे जिथे कधी काळी मी एकटीने रडत होती...मी तिथे गेली, विक्रमकडे पाहिलं तर आधी विश्वास बसला नाही की हा विक्रमचं असावा...वाढलेली दाढी, कोजलेला चेहरा, निस्तेज डोळे आणि थकलेला विक्रम...कधीकाळी आपल्या दिसण्यावर विक्रमला खूप गर्व होता, त्याला पाहून खूप मुली घायाळ व्हायच्या म्हणे, आणि असा विक्रम माझ्या आयुष्यात आहे यासाठी मी देवाचे खूप आभार मानावे असं तो नेहमी बोलायचा...हं...किती छोटं असावं अहंकाराचं आयुष्य..!! नेहमी कमी वयात खूप काही मिळवलं याचं गुणगान करणारा, आज खूप कमी वयात सगळं गमावून ही बसला होता...आज त्याला मी सांगूनच जाणार होती की त्याने काय गमावलं आहे आणि मी काय मिळवलं आहे..

"विक्रम..." आणि त्याने मागे वळून पाहिलं,

"ओहहह, मॅडम तुम्ही?? काय बघायला आलीयेस?? मी किती बरबाद झालोय ते, की मला खाली पाडून तू किती उंचीवर पोचलीस ते??"

"तुमचा घमंड, तुमची मग्रुरी अपेक्षेप्रमाणे तशीच आहे, हे माहीत होतं मला, पण तरीही का भेटायला आली मी तुम्हाला काय माहीत??"
माझं बोलणं ऐकून विक्रमने फक्त एक उपहासात्मक हास्य दिलं आणि बोलला,

"ये, बस इथे, मग सांगतो..."
आणि विक्रमने बोलायला सुरुवात केली...मी तर त्याच्या आयुष्यातुन निघून गेली पण त्याच आयुष्य किती खराब झालं याचा मी विचार ही केला नाही...घटस्फोट तर होणारच होता, पण डिपार्टमेंट च्या गोष्टी मध्ये तो खूप फसला..त्याने केलेले गुन्हे माफ करण्यासारखे नव्हते, त्यात सगळे पुरावे, माझी साक्ष त्याला दोषी सिद्ध करून गेले...त्याला डिपार्टमेंट ने काढलं आणि तिकडे नक्षलवादी ही त्याच्या मार्गावर होते, त्याच्या जीवावर बेतले होते..चुकीच्या मार्गाने कमावलेला सगळा पैसा, सगळी संपत्ती, काहीच उरलं नाही.. रिकव्हरी इतकी मोठी होती की बाबांची कमाई ही कमी पडली...त्या टेन्शन मध्ये आई गेली आणि त्यापाठोपाठ बाबाही..विक्रम व्यसनात बुडाला, त्यामुळे त्याची तब्येत ही खालावत होती आणि त्यामुळेच माझे आई बाबा त्याला बघायला जात होते...त्यांनंतर तो कायम आजारी होता त्यामुळे दुसरी कोणतीही जागा नसल्याने तो इथे आला...आणि अशाप्रकारे विक्रम नावाच्या दुनियेत सूर्यास्त झाला...त्याचं सगळं ऐकून घेतल्यावर मनात कुठेतरी एक कळ निघाली..

आयुष्यात आपण नेहमी सुखाच्या मागे धावतो, आणि ते सुख मिळायला लागलं की दुःख नावाची गोष्ट ही जगात असते हे विसरून जातो, आणि ते विसरलो की जन्म होतो अहंकाराचा, कारण सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडत गेलं की बाकी कोणाची कदर राहतच नाही, आणि त्यामुळेच दुसऱ्यांचे दुःख दिसत नाही...आणि म्हणूनच दुःख ही अनुभवावं...कधी तरी जे दुःख मी अनुभवलं होतं त्यामुळेच इतका तिरस्कार मनात असूनही मला विक्रमच्या दुःखाची तीव्रता कळत होती...मी स्वतःला संभाळत विक्रमला बोलली,

"विक्रम...तुमच्या सोबत जे झालं त्याचा मला आनंद होतो किंवा तुम्हाला खाली दाखवून मला काही सुख मिळते असं नाही, मी तुमच्या सारखी नाही..मी तर ब.."
माझं वाक्य मधातच तोडत विक्रम बोलला,

"....तेच बोलतो मी, तू माझ्यासारखी नाही आणि कधी तू माझ्यासारखी होऊ ही नको नैना..कारण जेवढं दुःख सगळं गमावण्याचं होतं त्यापेक्षाही जास्त दुःख याचं होतं की आपण आपला अहंकार अबाधित ठेवू शकलो नाही...त्यामुळे असे कटू शब्द तुझ्या तोंडून बरे वाटत नाही.. राहिला प्रश्न माझा तर, माझ्यासोबत तर हे होणारच होतं.. काय म्हणते तू ते, तुझ्याभाषेत...अम्म्म...हं.. कर्माचे फळं.. बरोबर ना? आज तुला एक गोष्ट सांगू मी, माझ्यासोबत असं का घडलं??"

"हम्म, बोला"

"तुला आठवते, तू एकदा माझी तुलना रावणासोबत केली होती...रावण युद्ध का हरला माहितीये?? तो तर अमर होता, त्याने युद्ध जिंकण्यासाठी नऊ दिवस घटात बसून नवरात्रीचे उपवास ही केले पण दहाव्या दिवशी मात्र त्याचा व्रत भंग झाला आणि रामाने त्याचा संहार केला...एवढे व्रत करूनही कोणत्याही देवीने त्याला वाचवलं नाही, कारण एक स्त्रीलाच बंदी बनवुन तिचा मान कमी करून तो एका स्त्रीचीच आराधना करत होता, कसं जिंकला असता तो?? अहंकाराला स्त्रीशक्तीचं हरवू शकते नैना...माझंही तेच झालं..माझ्या घरात जोपर्यंत लक्ष्मी प्रसन्न होती तोपर्यंत मी सुख उपभोगलं, आणि स्वतःच्या पोटच्या लक्ष्मीची हत्या केली, शिक्षा तर मिळणारच होती मला..."

मी अवाक होऊन विक्रमला बघत होती, विश्वास होत नव्हता की हाच तोच विक्रम आहे..पण आज पहिल्यांदा त्याच्या बोलण्यात सच्चेपणा जाणवला...खरं तर आज मी विक्रमला खूप काही सूनवायला गेली होती पण आज त्याने माझी बोलती बंद केली होती...हा तोच विक्रम होता ज्याने मला वयाच्या पंधराव्या वर्षीच भुरळ पाडली होती, पण काळानुसार तो बदलत गेला आणि मी मात्र त्या बदलेल्या विक्रम मध्ये तोच लहानपणीचा विक्रम शोधत राहिली...आज सापडला तो, पण आज परिस्थिती बदलल्या होत्या...खरंच म्हणतात पहिलं प्रेम कोणीच विसरू शकत नाही...

"काय झालं?? माझ्या शब्दांवर विश्वास ठेवणं कठीण होतंय ना तुला, माहीत आहे मला..." मी काहीच बोलत नाहीये हे पाहून विक्रम बोलला,

"नाही असं नाहीये, आज कित्येक वर्षांनंतर तुमच्या वर विश्वास ठेवावं असं मन बोलत आहे..का विक्रम ?? का?? का इतका उशीर केला तुम्ही हे सगळं समजून घ्यायला..आज जे तुम्ही आहे, ते आधीच असते तर आपलं आयुष्य काहीतरी निराळं असतं ना..."

"पण तुझ्यासाठी बरंच झालं ना नैना, जर सगळं चांगलं असतं तर आज तू हे आहेस ते नसतीस...आणि आज तू जे मिळवलं आहे, त्यात माझाही हातभार आहेच म्हणा..जर मी खूपच चांगला असतो तर तू इथे पोचली असती का?? आणि मला कळलं ही नसतं हे सगळं आधी..घरात कोणी बहीण नाही, आईबाबांनी मुलगा म्हणून अति लाड केले, जसं कळायला लागलं तेंव्हापासून हेच सांगितल्या गेलं की मुलींची जागा फक्त किचनमध्ये असते..त्यामुळे मानसीकता ही तीच बनत गेली...तू आयुष्यात आली तेंव्हा तुलाही तशीच वागणूक दिली...पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट खरी सांगतो नैना, ज्यादिवशी पहिल्यांदा तुला पाहिलं होतं तुझ्या मावशीच्या घरी, जेंव्हा तू चोरून चोरून आतमधून मला बघत होती, तेंव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो... पण मला ते टिकवता नाही आलं...."

"विक्रम...खरं तर मनात राग घेवूनच आली होती, तुमच्या मुळे आईबाबा आजही माझ्याशी बोलत नाहीत यासाठी तुम्हाला जाब विचारायला आली होती..पण आता कळलं आहे की न्याय तर मिळतोच पण त्यासोबत बरंच काही हातातून निघूनही जातं... असो, बरं झालं भेट झाली, आज कित्येक दिवसांनी मन खूप शांत वाटत आहे, कदाचित माझ्या द्वेषाचा ज्वालामुखी थंडावला आहे...एक सांगू..?"

"काय??"

"तुम्हाला इथे बरं वाटत नसेल तर तुम्ही माझ्यासोबत चला, किंवा नागपूर ला आईबाबांसोबत रहा..."

"नैना, विसरू नको, तूच बोलली होती, आता आपले मार्ग कधीच एक होणार नाहीत, मग का तसे प्रयत्न आहेत तुझे, माझ्यावर दया येत आहे का?? मला बरं वाटतं इथे, कारण हेच माझं प्रायश्चित आहे...तुझं आणि माझं आयुष्य खूप वेगळं आहे..."

"दया नाहीये विक्रम...मनातून बोलत आहे मी, पण तुम्हाला इथेच बरं वाटत असेल तर ठीक आहे..."

"नैना...तू माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं जीवनसाथी पात्र करते..असं एकटी किती दिवस राहणार आहेस....त्यामुळे तू..."
मला माहीत होतं विक्रमला काय बोलायचं आहे पुढे, पण तो काही बोलायच्या आधीच मी बोलली,

"बस विक्रम...पुढे काही बोलू नका, कायद्याने आपल्याला वेगळं केलं आहे पण याचा अर्थ असा नाही की मी एकटी राहू शकत नाही... माझ्या आयुष्यात प्रेम, परिवार हे सगळं अनुभवून झालं माझं...आता लोकांसाठी जगायचं आहे...निघते मी, काळजी घ्या..."

काय विचार करून आली होती आणि काय दिसलं मला...कळत नव्हतं अजून आयुष्याचे किती रूपं बघायचे बाकी आहेत...विक्रमची अवस्था पाहून डोळ्यांतून अश्रू येत होते..अस वाटत होतं जर त्याला त्याच्या चुकांचा पस्तावा आहे आणि जर तो बदलला आहे तर अजून किती शिक्षा त्याला मिळावी..आणि बाहेर आली तर अभय सर काही कामात गुंतले होते, पण माझे पाणावलेले डोळे पाहून त्यांनी विचारलं मला आणि मी सगळं बोलून दाखवलं त्यांना, नेहमीप्रमाणे अभय सरांनी यावेळी ही समाधान दिलं मला..ते बोलले,
"नैना, मनुष्याला जर त्याने केलेल्या चुकांचा पश्चाताप होतं असेल पण जर त्याला शिक्षा मिळत नसेल तर त्या पश्चतापाला काही अर्थ उरत नाही, आणि ती शिक्षा असतेच त्यासाठी की पुन्हा त्याने काही चुकीचं करण्याआधी दहा वेळा विचार करावा..आणि कदाचित यालाच कर्माची फळं म्हणावी ना.? त्यामुळे जास्त विचार नको करू..."
परतीच्या वाटेत मी हाच विचार केला की बरं झालं आज मी विक्रमला भेटली, नाहीतर माहीत नाही अजून किती दिवस मला त्याच्या स्वप्नांनी त्रास दिला असता..अजून एक गोष्ट मला कळली की राग नेहमीच अहंकाराला जन्म देतो, विक्रम वरच्या रागाने मला सगळं मिळवुन तर दिलं होतं पण त्याच रागाने मला अहंकाराच्या उंबरठ्यावर आणून सोडलं होतं, आणि त्यामुळेच कदाचित मी विक्रमला तुच्छ समजून त्याला सूनवायला गेली होती पण बरं झालं विक्रमच्या बदललेल्या रूपाने मला तो उंबरठा ओलांडू दिला नाही आणि माझे पाय जमिनीवरच राहिले...

संध्याकाळी घरी पोहोचली, आईबाबांना घरात पाहून त्यांच्या गळ्यात पडून रडावं वाटलं पण बाबांनी अजून मला माफ केलं नव्हतं किंवा ते त्यांना तसंच दाखवायचं होतं मला...त्यादिवशी विक्रमला भेटून आल्यावर अभय सर मला काहीच बोलले नाहीत..त्यांनंतर फोन ही केला नाही त्यांनी मला..माझ्याही सुट्ट्या संपत आल्या होत्या, मला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं पोस्टींग साठी त्यामुळे मीच अभय सरांना फोन केला..स्टेशन ला भेटतो असं बोलून त्यांनीही फोन ठेवला...तीन वर्षानंतर आई बाबाना भेटून परत जाताना गहिवरून आलं होतं मला..पण मी माझ्या भावनांना आवर घातला, पण यावेळी जेंव्हा बाबांच्या पाया पडली, डोक्यावर हात ठेवत बाबा बोलले,
"तुझं कर्तृत्व कितीही मोठं असलं तरी मी त्यापेक्षा जास्त आयुष्य जगलो आहे, आणि तेही याच समाजात, जेंव्हा तू घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता तेंव्हाच माझा शब्द होता की तू माझ्यासाठी कोणीही नाहीस आणि आज तुझ्याकडे सगळं असूनही मला तोच शब्द पाळायचा आहे..आणि तुला माहीत आहे माझ्यासाठी मी दिलेलं वचन सगळं काही आहे...काळजी घे..."

बाबांच्या बोलण्यातून मी समजून गेली काय समजायचं ते...पण काळानुसार जो समाज बदलत नसेल, परिस्थिती नुसार जर तुम्हाला तुमची कृती बदलता येत नसेल तर तो समाज नेहमी मागासलेलाच राहू शकतो...बाबांना हे कळलं नाही आणि आता ते बदलतील असं त्यांचं वयही नव्हतं, त्यामुळे मी पण निरर्थक प्रयत्न केले नाही... मी स्टेशनवर जाऊन पोहोचली, अभय सर ही आले, मला बोलले,

"नैना, तीन वर्षांपूर्वी मी तुला काहीतरी विचारलं होतं आणि त्याचं उत्तरही मला माहित आहे, पण काल तू विक्रमला बोलली, तुझं मन शांत झालं, आणि आता मला पुन्हा तोच प्रश्न विचारावा वाटतोय, पण आजही तुझं उत्तर तेच असावं असंच वाटतंय मला... तरीही सांगतो की तू जेंव्हा मागे वळून बघशील मी आहे..."

"मला माहित आहे सर,की तुम्ही नेहमीच आहे आणि असणार आहे, पण प्रेम ही भावना जबरदस्तीने तर नाही येऊ शकत ना मनात? माझ्या आयुष्यातलं प्रेम करून झालंय माझं...आणि कधी काळी मी विक्रमला खूप मनातून बोलली होती की तो नेहमी एकटाच राहणार, त्यानेही तसेच शब्द त्याच्या अंतकरणातून काढले असतील माझ्यासाठी... मग जर माझे शब्द खोटे झाले नाही तर विक्रमचे कसे होणार.? आणि तसही तुम्ही मला आता अजून एका उपकारच्या ओझ्याखाली दाबलं आहे..तुम्ही बोलले नसते तर मी विक्रमला भेटली नसती आणि हे सगळं मला कळलं नसतं.. कदाचित मलाही कधीतरी स्वतःवर घमंड झाला असता की मी विक्रमला नमवलं, पण तुम्ही मला ही भेट घडवून पुन्हा हे शिकवून दिलं की खरं कर्तृत्व हे पाय जमिनीवर ठेवण्यातच आहे...एकाच आयुष्यात किती आणि काय काय शिकवण देणार तुम्ही?? आणि हा जो आदर आहे तुमच्या साठी माझ्या मनात तो बाकी सगळ्या भावनांपेक्षा खूप मोठा आहे..."

"शिकवणारा कितीही चांगला असला तरी त्याची किंमत तेंव्हाच राहते नैना जेंव्हा शिष्य तो आत्मसात करेल आणि तू माझ्यापेक्षा ही पुढे जाशील हे माहीत आहे मला..."

"ते माहीत नाही, पण आता योगः कर्मसु कौशलं हेच लक्षात ठेवून जनसेवा करायची आहे... आणि तुम्ही प्लिज कोणत्याही भावनिक बंधनात अडकुन राहू नका...आणि माझ्यासाठी तर अजिबात नको..."

"नको काळजी करू, नाही राहणार..."

"आणि अजून एक..."

"...माहीत आहे, लक्ष असेल विक्रम वर माझं..."

माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अभय सरांनी ते ओळखलं...विक्रम माझ्यासोबत खूप वाईट वागला होता, पण तो भूतकाळ होता आणि आज मला वाटत होतं की जर आज त्याला सुख ही मिळावं...मला वाटतं, युद्ध, न्याय, सत्य, असत्य यापेक्षा ही मोठं काही असेल तर ती आहे माणुसकी...!! आणि मानवधर्म कधीही विसरू नये... आता माझाही परतीचा प्रवास सुरु झाला होता.. आठवडाभर सुट्टी घेऊन आली होती आणि खूप काही सोबत घेऊन जात होती...विक्रमला शेवटी माफ केलं मी, कारण अंतिम सत्य हेच आहे की तुम्ही कोणाचा कितीही राग केला, त्याला नमवण्यासाठी किती डावपेच आखले आणि त्याच्यापेक्षा कितीही पुढे गेले तरी खरं समाधान, शांती तेंव्हाच मिळते जेंव्हा तुम्ही सगळं विसरून पुढे जाता... मी पण पुढचाच मार्ग धरला होता..एक यशस्वी ऑफिसर म्हणून मी सगळं जग जिंकल्यासारखं होतं पण एक मुलगी, बायको म्हणून माझं आयुष्य अधांतरीच होतं... पण एक स्त्री म्हणून माझ्या अस्मितेचा मान राखण्यास मला ते अधांतरीचं आयुष्य ही मंजूर होतं...!!!
---------------------------------------------------------
समाप्त.
( Dear readers... आज विक्रम, अभय आणि नैना सोबतचा अधांतरचा प्रवास इथेच संपला...काही लोकांना हा शेवट आवडेल, काहींना आवडणार ही नाही... पण माझं वैयक्तिक मत मला हेच सांगते की नैना चा निर्णय योग्य होता.. कारण ज्याने आपल्यावर खूप उपकार केले असतील त्यालाच पून्हा जीवनसाथी बनवून आपल्या आयुष्याची धुरा त्याच्या हातात देणं म्हणजे मला तर योग्य वाटत नाही...पण ठीक आहे, प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते, तरीही अपेक्षा करते की माझं लिखाण आणि माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे जरूर तुम्ही समीक्षा करून सांगाल....

बऱ्याच लोकांनी प्रश्न केला की 21व्या शतकातही इतकं सहन करून घेणारी मुलगी असू शकते का??? माझं उत्तर 'हो' आहे...मला वाटते आपल्या समाजात, भारतात अजून 21 शतकं लागतील, अगदी खेड्यापाड्यात ही आधुनिक विचार डेव्हलप व्हायला...मी एका छोट्या शहरातून मुंबई मध्ये आली, त्यामुळे बरीच तफावत दिसली मला...प्रत्येक शहराची एक संस्कृती असते आणि त्यामुळे अजूनही खेड्यात किंवा लहान शहरांमध्ये तुम्हाला कितीतरी नैना आणि विक्रम दिसतील...नैना अगदी तशीच, सगळं गपगुमान सहन करणारी, लग्न जर तुटलं तर समाजात आईवडील काय तोंड दाखवतील म्हणून आपल्या तोंडाला कुलूप लावून, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारी...आजही सर्रास कितीतरी मुली पोटातच मारल्या जातात आणि त्या आईला पत्ताही नसतो...असे कितीतरी दवाखाने मी स्वतः पाहिलेत, माझ्या नातेवाईकांनी आपल्या मुलीला, सुनेला, बायकोला तिथे नेऊन अश्या हत्या केलेल्या मी स्वतः पाहिल्या आहेत...आधी तर हिम्मत नव्हती त्याविरुद्ध बोलण्याचीही आणि जेंव्हा बोलायला लागली तेंव्हा सगळ्यांनी 'हिला काय कळतं' म्हणून मला मूर्खात काढलं..'चार पुस्तकं वाचून अक्कल येत नाही' हे टोमणे मारले....

खूप नैनाच्या वडिलांना हे समजून घेण्याची गरज आहे की शब्द पाळणं गरजेचं आहे, पण जर ते वचन पाळून कोणाचं आयुष्य खराब होत असेल तर ते वचन तर श्रापच आहे..समाजहितासाठी जर काही वचन तुटत ही असतील तर त्याला काही हरकत नाही...मुलांना डोक्यावर नाचवता नाचवता हे विसरू नये की त्या मुलाने ही स्त्रीच्या गर्भातून जन्म घेतला आहे....

खूप मेहनत करून अधिकारी झालेले 'विक्रम' माझ्या आजूबाजूला, माझ्या घरातच पाहिले मी...जेवढी मोठी त्यांची पोस्ट, तेवढा 'भाव' त्यांना मिळतो...आणि हे अधिकारी, हुंडाबळी, स्त्री पुरुष समानता यावर मोठं मोठे निबंध लिहून परीक्षा पास होतात, इंटरव्ह्यू मध्ये आम्ही किती सत्यवान म्हणुन तेही क्लिअर करतात आणि मग खऱ्या आयुष्यात त्यांचे रूप दाखवतात..अश्या लोकांपेक्षा मला अशिक्षित लोकं चांगले वाटतात, कारण ते जसे आहेत तसेच दाखवतात, ते ढोंगीपणा करत नाहीत....

'अभय' खूप कमी आहेत, आणि जसे 'विक्रम' मी पाहिले आहेत, तसे 'अभय' पाहण्याचा त्यांच्यासोबत जगण्याचं सौभाग्य ही मला लाभलं आहे..पण त्यांना ही खूप वेळा मर्यादा येतात...कारण असे अभय तर तयार असतात कोण्याही नैनाला मदत करायला, पण ती नैनाच असते जी, जग, दुनिया, शेजार, पाजार यांचा विचार करून मागे होते... त्यामुळे असे अभय इच्छा असूनही काही करू शकत नाही...

'नैना' काय बोलावं हिच्याबद्दल...अश्या नैनाला हे कळत नाही की विक्रमच्या आयुष्यात राहूनही नरक यातनाच आहे आणि त्याला सोडूनही सुख नाहीच ...पण अन्याय सहन करून तीळ तीळ मारण्यापेक्षा, त्यातून बाहेर पडून थोडा त्रास सहन केलेला बरा.... पण जसं की अभय बोलतो, अश्या त्रासातून वेळेतच बाहेर पडता यायला हवं...पण दुर्दैवाने प्रत्येक नैनाला नाही पडता येत बाहेर...प्रत्येक वेळी कोणी अभय येऊन तुमचा तारणहार बनेलंच असं नाही, खूप वेळा स्वतःलाच स्वतःची मदत करावी लागते, जो स्वतःची मदत करतो, देवही त्याची मदत करतो...आणि का तुम्हाला अभयचा आधार हवा...कोणताही आधार आपल्याला अपंग बनवतो... त्यामुळे जर कोणत्याही नैना सोबत चुकीचं होत असेल तर अभय ची वाट न पाहता स्वतः लढण्याची तयारी ठेवावी...आयुष्य तर नेहमीचं कठीण असणार आहे, अभय सोबत असो किंवा नसो...पण स्वतःच आत्मसन्मान अबाधित ठेवणं गरजेचं आहे...
सरतेशेवटी, मी काही प्रोफेशनल राईटर नाही..आणि लेखक म्हणून तेवढी परिपक्व ही नाही, त्यामुळे माझ्या लिखाणातून नकळत मी कोणाचं मन दुखावलं असेल तर त्यासाठी मनस्वी क्षमा मागते मी..तुमच्या समीक्षा नेहमीच स्वागतार्ह आहेत...STAY HOME, STAY SAFE....)

तुमचीच,
अनु...🍁🍁