लघुकथाए - 5 - नि:शब्द Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लघुकथाए - 5 - नि:शब्द

६ नि:शब्द

लाजाळूची पानं एक एक करत मिटत गेली सईच्या नाजूक बोटांच्या स्पर्शाने. मिटता मिटता त्यांच्या कडून आलेली आनंदाची लहर सई आणि तिच्या अवती भवती रुंजी घालणाऱ्या इवलुशा पिवळ्या फुलपाखरापर्यंत पोहोचली. फुलपाखराचे पंख किंचित वेगाने फडफडले आणि सईच्या गालांवरची खळी अधिक खोल झाली.

दंग्या बाजूलाच झोपलेला. ती लहर तशीच पुढे त्यालाही स्पर्शून गेली आणि जराशी मान उचलत त्याने शेपूट हलवली.

मग सईने हळूच गवतफुलाला कुरवाळलं आणि परत एकदा तशीच आनंदी लहर वाऱ्यालाही सोबत घेवून सभोवतालच्या झाडा पानांवर अलगद पसरली. हलकेच पानांच्या टाळ्या वाजवून त्यांनी तो आनंद व्यक्त केला.

सई, आनंदी बाईंची पाच वर्षांची पोरकी नात. मुलगा व सून यांच्या कारला झालेला अपघात, सुनेची वेळेपुर्वी झालेली डिलीव्हरी, पतीपत्नीचा लगेचच झालेला मृत्यू, व साठीत पदरी आलेलं हे गोंडस बाळ! सारं काही इतक्या झपाट्यात घडलं की कित्येक दिवस त्यांचा घडलेल्या घटनेवर विश्वासच बसेना.

पण जितं जागतं चैतन्य पदरी असताना गेलेल्यांचा विचार करत बसणं आनंदीबाईना शक्य नव्हतं. निवृत्त आयुष्याची ठरवलेली रुपरेखा पार उलटी पालटी होऊन गेली.

हळू हळू कमी दिवसांची जन्मलेली सई (हे नाव मात्र मुलगी झाली तर ठेवायचं असं त्यांच्या मनात आधीपासूनच होतं) अतिशय वेगळं बाळ असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. डॉक्टरी तपासण्या झाल्यावर तिला जन्मत:च झालेल्या अपघातामुळे पूर्ण बहिरेपण आहे व ते दुरुस्त होऊ शकणार नाही हे कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बाकी मेंदुला आता तरी काही इजा दिसत नव्हती. पण तिची बुद्धीमत्ता कितपत विकसित होईल याविषयी डॉक्टरांच्या मनात शंका होती. आपल्यामागे या पोरीचं कसं होणार या विचाराने त्यांचं मन सैरभैर झालं.प्रथमच त्या परमेश्वरावर रागावल्या. “माझा मुलगा, सून नेलेस , मी एका शब्दाने तुला दोष दिला नाही. त्यांचे व माझे प्रारब्ध, असे समजून पदरी आलेलं तुझं हे देणं प्रसाद समजून स्विकारलं. पण आता मात्र तुझी शंकाच येतेय रे बाबा. वयाच्या शर्यतीत मी या पोरीच्या सहा दशके पुढे , तुला थोडाही विचार करावासा नाही का रे वाटला? कसं आयुष्य जगावं हिने पुढे? श्रुती काम करत नाही म्हणजे वाचाही बंद. अश्राप जीवाने कसं जगावं माझ्यानंतर? दुसरं कोणी नात्याचं नाही. माझ्या या शेताच्या घरापासून शेजारही कोसभर दूर! करावं तरी कसं?”

सई दिसामासाने वाढू लागली. तिच्या चेहऱ्यावरचं दैवी स्मितहास्य फारसं कधी विरलं नाहीच. निसर्गाच्या कुशीत हे बाळ त्यातलाच एक घटक बनत गेलं . आनंदी बाईंच्या लक्षातही ही गोष्ट यायला ही वर्ष गेलं तिच्या जन्मानंतर.

एकदा सईला अंगणात चटईवर ठेवून त्या काही वाचत बसल्या. कसा कोण जाणे अचानक दंग्या जोरजोरात भुंकू लागला. चिमणी ही जरा कर्कश आवाजात ओरडतेय असा भास त्यांना झाला. नकळत त्यांचे लक्ष सई कडे गेले पहातात तर एक मोठा विंचू सईच्या अगदी पायाजवळ आलेला. बाईंनी झट्कन सईला उचलले. विंचू त्याच्या मार्गाने निघून गेला. दंग्या भुंकायचा थांबला. चिमणी ही शांत झाली.

मग त्या लक्षपुर्वक पाहू लागल्या. सई ने दुडू दुडू पावले टाकत झाडाकडे जावे आणि झाडाची फांदी अलगद सईकडे झुकावी. फुलाने आपली मान वळवून तिच्याशी गुज करावे आणि सईची खुदकन खळी खोल व्हावी.

कधी एखाद्या पक्षाने सरळ सईच्या हातावर येवून बसावे. रंगीत पंख फडफडवून तिचे मनोरंजन करावे. वाऱ्याने मंदपणे वाहून तिला जोजवावे. तिनेही त्या अलवार झोक्यांवर गुंगत झोपून जावे.

तिचे पाऊल पडण्यापुर्वीच गवताच्या पात्याने हळूच एका बाजुला झुकून आपली टोकदार धार कमी करावी.

बाई विचार करू लागल्या. जर ही झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी, बिनाआवाज हिच्याशी संधान बांधू शकतात तर मी पण करू शकेन, शकेन का?

मग प्रयत्नपुर्वक त्याही सईशी आंतरिक संवाद करण्याचा प्रयत्न करू लागल्या. जसं त्यांना तिला जवळ बोलवायचं असल्यास त्या भावनिक पातळीवर ती जवळ आल्याची भावना मनी निर्माण करत. सुरवातीला सवयीने मनी शब्दच उमटे पटकन आणि मग संधान बांधलं जायचं नाही. हळू हळू शब्दांना तडीपार केलं त्यांनी. हळू हळू फक्त भावना, शुद्ध भावना उमलू लागल्या आणि मग सई चं आणि त्यांच संधान नीट जुळू लागलं.

सई निसर्गाच्या कुशीत प्राण्यांच्या पक्षांच्या, वृक्ष वल्लरींच्या समवेत हुंदडत बागडत मोठी होत होती. प्राणी पक्षीही एकमेकांशी त्यांच्या खास भाषेत बोलतात. पण जणू हिच्याबरोबर ते ही सगळे मूक आंतरिक संवाद करायला शिकले होते.

आता तिचं असं खास अनोखं, नि:शब्द अथांग जाणिवांनीच फक्त भरलेलं जग तिच्यासाठी अस्तित्वात आलं होतं.

पुढे काय हा विचार आनंदीबाई चुकून जरी मनी आला तरी हद्दपार करू पाहत कारण आता तेही सई पर्यंत पोहोचू लागले होते थेट.

विचार कळला नाही तरी काळजीची भावना तिच्यापर्यंत पोहोचत होती. ती अशा वेळी सैरभैर होऊन त्यांच्याकडे पाहू लागते हे त्यांच्या लक्षात आले होते.

एकदा माकडांची एक टोळी शेतावर आली. जवळपास दहापंधरा माकडांची टोळी. माकडं, माकडिणी, त्यांच्या पोटाशी पिल्लं. या झाडावरून त्या झाडावर. कधी अंगणापर्यंत ही यायची ही वरात.. परत ची ची करत उड्या मारत झाडांवर. एक धिटुलं तर पार पायरीपर्यंत आलं. आनंदीबाईंना काळजी वाटली, नुकतीच केळींची बाग उतरवून कंत्राटदार मार्केटमधे गेला होता घेऊन, नावाला काही घड शिल्लक होते, माकडांनी त्यावरच ताव मारला होता. पण आता पायरीपर्यंत आली म्हटल्यावर त्या जरा काळजीत पडल्या.

सई मात्र हसत होती. हात पुढे करत होती. ते धिटुलं ही मग पुढे आलं , सईचा हात धरून हळूच तोंडाने चाटू लागलं. सईला गुदगुल्या झाल्या. ती अधिकच हसू लागली. काही अंतरावरून धास्तावलेल्या आनंदीबाई, आणि अंगणातून त्या धिटुल्याची आई , सावध पवित्र्यात एकमेकींचा अंदाज घेत उभ्या होत्या.

ते सईला चावलं तर ही काळजी आनंदीबाईंना वाटत होती. माकडिणीलाही आपल्या बाळाला इजा करेल का ही? असंच वाटत असावं.

पण तेवढ्यात त्या धिटुल्याने एक कोलांटी उडी मारली नी ते आपल्या आईकडे गेलं. आनंदीबाईंची काळजी सईपर्यंत पोहोचली होतीच, ती ही मग त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली.

सईने सुपातल्या भुईमुगाच्या शेंगा उचलल्या व ती त्या माकडिणीकडे पळत सुटली, भेदरून माकडीण आधी उड्डाणाच्या पवित्र्यात सज्ज झाली पण नंतर सईची इच्छा तिच्याहीपर्यंत पोहोचली असावी, ती थांबली, तिने त्या धिटुल्याला आपल्या पोटापासून सोडवून समोर ठेवले , ते ही मग लुटूलुटू चालत सईसमोर येऊन बसलं. सईने शेंगा समोर ठेवताच काही उचलून परत आईकडे पोबारा केला. मग हळू हळू सावध पणे माकडीण पुढे आली. तिने शेंगा उचलल्या व मग मात्र पिल्लाला घेऊन ती दूर गेली.

सई हसत हसत त्या दोघांकडे पहात बसली. आणि आनंदीबाई भरल्या डोळ्यांनी तिला...

आज एक गोष्ट त्या कळून चुकल्या होत्या. निसर्गाकडून सई ला कसलाही धोका होण्याची शक्यता नव्हती!!!!

श्रुती आणि वाचा जरी काम करत नसले तरी अथांग जाणीवांनी भरलेला हा निसर्ग सईला पुरेसा होता !