श्वास असेपर्यंत - भाग १६ Suraj Kamble द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्वास असेपर्यंत - भाग १६









यंदाचं एम. ए.मराठी चं वर्ष होतं. मी आणि आनंद सोबतच होतो. आईला मी मिळालेल्या कामातून नियमित पैसे पाठवित असायचो. कधी आईसाठी काही घेऊन जायचो. तेव्हा आई मात्र भलतीच खुश असायची. पण बाबांची आठवण आली की , तिचा चेहरा पार उतरून जात असे. मी एम. ए. मराठी हा विषय घेतला असल्याने एम. ए. झालं की, कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तासिका तत्वांवर वा जमेल तर पूर्णवेळ नोकरी करायची असं स्वप्न पाहत बसायचो. कारण आतापर्यंतची सर्व शिक्षणाची कागदपत्रे म्हणण्यापेक्षा सर्टिफिकेट सर्वांच्या नजरेत येईल अशीचं होती . त्यामुळे आपण नक्कीचं प्राध्यापक बनावं, असं नेहमी वाटायचं.

आता लक्ष्मी ची सवय जास्त झालेली होती . मनात मैत्रीच्या भावने पेक्षा प्रेमाचं वादळ निर्माण झालं होतं. एक सारखे विचार चक्र फिरत असायचं. पण लक्ष्मीला सांगायची कधी हिंम्मतच व्हायची नाही. कारण

प्रश्न हा श्रीमंती आणि गरिबीचा ,
प्रश्न हा उच्च आणि नीच जातीचा,
प्रश्न हा सामाज संकुचित झालेल्या वृत्तीचा,
प्रश्न होता मैत्री चा,
कारण ती तुटली तर,
तिला आपण कायमचं गमावून बसू ,
प्रश्न होता मनाच्या तयारीचा,
प्रश्न होता सामाजिक दरी वाढण्याच्या मानसिकतेचा,
प्रश्न होता, प्रेम मिळेल की नाही याचा,
शेवटी प्रश्न हा प्रश्नचं राहत असतो ....

एके दिवशी सायंकाळी ऑफिस वरून घरी म्हणजे वसतिगृहात येत असतांना अचानक पणे लक्ष्मीची गाठ पडली. तिने मागून आवाज देत मला जवळ बोलावलं.

अरे अमर, " कुठून आलास!!!"
नेहमीचं स्मित हास्य हसणारा चेहरा आज कोमेजून दिसत होता . घामाघूम चेहरा झाला होता.

मी म्हटलं , " कामावरून आता वसतिगृहात वापस जातो आहे . हा माझा नेहमीचा वेळ आहे . "
बरं ' पण आज तू कशी काय इकडे ??? अचानक वाट वगैरे चुकली की काय???"

" नाही रे वेड्या, असं वगैरे काही नाही. काम होतं इकडे म्हणून आली होती. "
" कुठे तरी बसू का आपण ??? तुझ्याकडे वेळ असेल तर !!! मग निवांत बोलत बसू . तसही एवढ्या दिवसात तुला आणि मला एकटा सहवास कुठे मिळतो. नेहमी आपण आपल्या ग्रुपमध्ये भेटत आणि बोलत असतो. "
आम्हीं जवळचं असणाऱ्या बागेमध्ये जाऊन बसलो..

बरं ऐक ना , मग लक्ष्मीने बोलायला सुरुवात केली. " अमर काही नाही रे माझ्या घरचे माझं यंदा लग्न ठरवत आहे. बस झालं म्हणतात शिक्षण. आता लग्नाचं बघा म्हणत आहे !!"

अरे वा , अभिनंदन !!!! ही तर आनंदाची बातमी आहे. " करून घे मग तू लग्न!! एम.ए. झालं की !!"
आनंदाची बातमी असतांना तुझ्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसत आहे .

अभिनंदन म्हणताचं लक्ष्मीचा चेहरा उतरला होता. मला पण लग्न म्हटल्यावर धक्का बसला पण चेहऱ्यावर खोटा भाव आणत मी तिचं अभिनंदन केल होत. पण आतून काहीतरी आणि कुठेतरी चुकल्यासारखं जाणवत होतं.

" तुला काहीचं वाटत नाही का रे ??? माझ्या लग्नाची गोष्ट ऐकून ??? मला पाहुणे पाहायला येणार आहे आणि तू माझं अभिनंदन करतो आहेत ??? "
लक्ष्मी आता चिडक्या आवाजात बोलत होती .

" पण मी का म्हणून तुझं लग्न ऐकून नाराज होणार आहे??? वयात येणाऱ्या सर्व मुलींना लग्न करावंच लागतं आणि घरच्यांनी शोधून दिल्यावर तर नक्कीचं करावं लागेल . नाही का लक्ष्मी बरोबर ना!!"
आता मी तिला अधिकचं डिवचण्याचा प्रयत्न करू लागलो .

" सर्व तुझ्या चेहऱ्यावरचे भाव समजत आहे रे मला अमर , की कुणाच्या मनात काय आहे ते!! खोटारडे भाव तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. साधं खोटं ही तुला लपवता येत नाही . कसा आहेस तू !!!" आता मात्र लक्ष्मीच्या डोळ्यांतून अश्रुंच्या धारा येऊ लागल्या .

अमर , खरं सांगते रे , आता लक्ष्मी गंभीर होऊन बोलत होती. " तू मला खूप आवडतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला फक्त तुझ्याशीचं लग्न करायचं आहे. आठवतं असेल तुला दहावीच्या रिझल्ट च्या वेळी, तू घरी पेपर वाचायला यायचा. तेंव्हापासून तू मला आवडायचा . पण तेंव्हा ते प्रेम आहे हे माहिती नव्हतं . शेवटी आपलं कॉलेज संपल्यावर तू काही मनातलं सांगणार नव्हता म्हणून मी मनाची तयारी करून आज मोठ्या हिंमतीने ही गोष्ट तुला सांगत आहे""

" मला माहिती आहे की, तुलाही मी आवडते. मला खूप वाटायचं की तू माझ्याजवळ प्रेमाचा प्रस्ताव मांडून आपल्या मैत्रीला प्रेमाचं नवीन नाव द्यावं. पण तुझ्याकडून ते कधीच झालं नाही. आता हेच बघ ना , मी तुला दाढी काढून रहात जा एवढंच म्हटलं तर, तेंव्हापासून क्लीन शेव मध्ये राहतो. मग यालाचं प्रेम नाही म्हणायचं का ??? एकमेकांच्या आवडी-निवडी जपणं ती किंवा तो येण्याची वाट बघणं, तू किंवा तो न दिसताचं पूर्ण दिवस विरहात गेल्यासारखे वाटणं ,यालाच प्रेम म्हणायचं नाही का????"

लक्ष्मी मनातील सर्व भावना माझ्यासमोर बोलून ती मोकळी झाली. तिच्या मनावर असणाऱ्या ओझ्याला तिने हलकं करून घेतलं. म्हणजे एक प्रकारे तिने तिच्या प्रेमाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता . काय करावे काय उत्तर द्यावे सुचत नव्हते???? छातीत जोराची धडधड व्हायला लागली.

सायंकाळचा सूर्य मावळतीला आला होता . त्याने आपली काया पसरवत सर्व बाजूला तांबडा - लाल रंग पसरविला होता. आकाशात पक्षांचे थवे उडतांना दिसत होते. बहुदा ते आपापल्या घरी पोहोचत असावे. जिथे बसून होतो इथेही पाण्याचे फवारे उडत होते. कुणी एक पक्षी पाणी पिण्यास आपली चोच पाण्यात बुडवत होता, तर काही पाण्याच्या तरंगावर चिमणा-चिमणी अंग ओले करून खेळताना दिसत होते. आणि सभोवताली नजर फिरवल्यास जिकडे - तिकडे प्रेम करणारे जोडपे यांची रेलचेल चालू होती. काही जोडपी प्रेमाच्या गोष्टी मध्ये गुंतले तर , कुणी आपल्या प्रेयसीची नाराजी दूर करण्यात व्यस्त होते , कुणी एक आपापल्या प्रेयसीच्या- प्रियकराच्या हातात हात घालून बसून येरझारा मारत होते . कुणी एक हळूच आपल्या प्रेयशीच्या गालावर चुंबन करत होते . तिकडून तो म्हातारा वॉचमन सारखा जोडप्यांकडे लक्ष ठेवून असायचा. तर कुणी काही चाळी करतांना दिसलं की,मनातल्या मनात खेकसून शिव्या द्यायचा. म्हणायचा, " मेली कुठली ही आज कालची पोरं . प्रेम करायला यांना हीच जागा मिळते काय ??? आणि मध्येच त्यांना उठवून लावत असायचा.

माझ्या डोक्यात काही विचारचं नव्हते येत. मला ऐकू येत होते ते फक्त लक्ष्मी ने म्हटलेले शब्द. डोळ्यांसमोर अंधार पसरून त्या काळ्या गर्द अंधारात आठवत होता फक्त लक्ष्मीचा चेहरा. मी लक्ष्मीने टाकलेल्या प्रश्नाने विचारात गढून गेलो होतो. आमच्या दोघांमध्ये बसण्यात काही अंतर होतं, त्यामुळे आम्हांला वॉचमन काही म्हणेल याची भीती वाटत नव्हती . थोडा वेळ शांततेत बसून एक ही शब्द न बोलता दोघांत फक्त शांतता पसरली होती. अमर काय बोलेल ??? काय उत्तर देईल ??? याची लक्ष्मीला उत्कंठा लागलेली होती . शेवटी मी बोलण्यास सुरुवात केली. मनात ज्या गोष्टी येणार, त्या सरळ लक्ष्मी समोर बोलून दाखवाच्या. न लपवता!!! न लाजता!!! न संकोचता !!! असा मनात निर्धार करून मी लक्ष्मी समोर बोलू लागलो.......



क्रमशः .....