कळसूबाई शिखर ट्रेक - महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट Dr.Swati More द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कळसूबाई शिखर ट्रेक - महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट

लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात दिसणारा त्रिकोणी आकाराचा ठिपका म्हणजे कळसूबाई शिखर आम्ही वयाच्या चाळीशीनंतर सर करू असं स्वप्नात पण वाटले नव्हते.
अनिल मला नेहमी म्हणायचा आपण कळसूबाई ट्रेक करूया. पण मी , "आपल्याला जमणार आहे का? मला पाठीचा त्रास आहे. येवढं चालायला मला जमेल का? तूच जा एकटा !"असं बोलून टाळाटाळ करायचे. पण तोही एवढा हट्टी की मला एका बाजूने हळू हळू समजावत तयार करत होता तर दुसऱ्या बाजूला ट्रेकची सगळी माहिती काढत होता. ब्लॉग्ज वाचत होता, व्हिडिओ बघत होता. त्याच्या या प्रयत्नाला यश आले आणि मी एकदाची तयार झाले, कळसूबाई ट्रेक करायला!
आता हा ट्रेक म्हणजे इतर ट्रेक सारखा छोटा ट्रेक तर नक्कीच नव्हता. त्यात आमचं पावसाळ्यात हा ट्रेक करायच ठरलं. सगळ्यात अगोदर आम्ही 'Decathlon' साइटवार जावून ट्रेकिंग साठी लागणारे योग्य शूज मागवायचे ठरवले आणि हो, आमच्या बरोबर अजून एक मेंबर येणार होता, आमची लेक आर्या. त्यामुळे साहजिकच तिघांसाठी शूज मागवले गेले. त्यात आमच्या मॅडम म्हणजे एकदम चुजी ! हाच कलर पाहिजे असेच शूज हवेत! हे सगळे सोपस्कार पार पडल्यावर एकदाचे शूज फायनल झाले.
आता नवीन प्रश्न, ट्रेकिंग कोणत्या ग्रुप बरोबर करायचे. आमची शोध मोहीम सुरू झाली. आमचं हे सगळं ऑगस्ट २०२१ मध्ये चालू होत त्यावेळी बरेच ग्रुप कोरोनामुळे ट्रेक करत नव्हते. बरीच शोधाशोध केल्यावर आम्हाला ' ट्रेक अँड ट्रेल ' या ग्रुप ची जाहिरात दिसली. तारखाही आम्हाला जमतील अश्या होत्या. मग काय,मी लगेच बुकिंग करून टाकलं.
ट्रेक ला जाईपर्यंत, अनिल, मला आणि आर्या ला वेळोवेळी काही सूचना करत होता. जसं की, नवीन शूज घालून रोज चालणे.. रोजचा वॉक करताना चढ असेल तिथे एक दोन राऊंड मारणे. मी थोड तरी त्याचं ऐकत होते पण आमचं शेंडेफळ अजिबात काही फॉलो करत नव्हतं.'पप्पा मी घरात रोज शूज घालून चालते' हे तिचं नेहमीच वाक्य.'पप्पा मी आता मोठी झाली आहे, मला पण कळत की हा ट्रेक मोठा आहे.मी पूर्ण करेन हा ट्रेक ' बस मग काय, पप्पा गप्प!!
या सगळ्या रामायण महाभारतानंतर आमचा ट्रेकचा दिवस उजाडला. तिघांच्याही शोल्डर बॅगा तयार झाल्या. अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते जरुरीची औषधे, ग्लुकोज पावडर, टॉर्च, मास्क, सॅनिटाइजर सगळं नीट घेतलं. लेकीने, फायनल इन्स्पेक्शन केलं सामानाच आणि आमचं कुटुंब आमच्या ट्रेक ग्रुप ला जॉइन झालं.
आम्ही बोरिवली वरून रात्री ११ वाजता प्रायव्हेट बसने प्रवासाची सुरवात केली. कळसूबाई शिखर जाण्यासाठी तुम्ही रोड प्रवास किंवा ट्रेन प्रवास करू शकता. मुंबई ते कळसूबाई अंतर साधारण १५० कि.मी. आहे.. जवळचे रेल्वे स्टेशन कसारा आहे तिथून तुम्ही बारी गावापर्यंत टॅक्सी घेवू शकता . प्रवासाला सुरवात झाली आणि मी मनात विचार केला आता मस्तपैकी एक झोप काढायची.पण आमचे टूर लीडर, ओमप्रकाश, जील, रवी यांच्या मनात नव्हत बहुतेक कोणाला झोपून द्यायचं. त्यांनी अंताक्षरी खेळण्यास सुरुवात केली. तरीही मी तोंडावर स्कार्फ घेवून झोपण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागले. अनिल आणि आर्या मात्र अंताक्षरी छान एंजॉय करत होते. अनिलचा तर आवाजही छान आहे त्यामुळे तो गाताना छान वाटत होत. ह्या सगळ्यांच्या किलबिलिमध्ये मला कधी झोप लागली हे समजलेच नाही.
पहाटे पाचच्या सुमारास आम्ही बारी गावात पोहचलो. या गावातूनच कळसूबाई ट्रेक सुरु होतो. टूर लीडर ने सगळ्यांना आपापल्या बॅगा घेवून खाली उतरण्यास सांगितले. तिथून आम्हाला श्री संतोष खाडे यांच्या घरी फ्रेश व्हायला जायचे होते. आम्हाला वाटलं असेल पाच मिनिटांवर घर म्हणून आम्ही रमत गमत चालत निघालो. पण घर येण्याचं नावचं घेत नव्हतं. प्रत्येक घर आल की मला वाटायचं ओमप्रकाश या घराजवळ थांबेल पण नाहीच. तब्बल १५ ते २० मिनिटे चालल्या नंतर एकदाचे खाडे काकांचे घर आले. हा वॉक म्हणजे आमच्या ट्रेक लीडर्स नी करून घेतलेला आमचा ' वॉर्म अपच ' जणू.
आम्ही सगळे खाडे काकांच्या घरात स्थिरावलो. कोणी टॉयलेट कुठे आहे शोधू लागले, कोणी कपडे बदलू लागले तर कोणी आपल्या मोबाईल मध्ये स्टेटस अपडेट करण्यात गुंग होते. आम्ही पण सकाळचे प्रातर्विधी उरकून फ्रेश झालो आणि काकूंच्या हातचा गरमा गरम चहा घेतला. आम्हाला विश्रांतीसाठी जास्त वेळ मिळाला नाही कारण ट्रेक मोठा होता. कोण किती वेळ घेणार माहित नव्हते. त्यात पावसाळ्याचे दिवस. त्यामुळे लीडर्स नी घाई केली आणि आम्ही सकाळी ६ च्या सुमारास ट्रेक सुरु केला.
ट्रेकच्या सुरवातीला गावातील छोटी छोटी घरे तुमचं लक्ष्य वेधून घेतात. थोड अंतर पार केल्यावर एक ओढा तुमचं स्वागत करतो. तुम्हाला त्या ओढ्याच्या गुडघाभर पाण्यातूनच जावं लागत. पण या सगळ्याची मनाची तयारी असते त्यामुळे काही वाटतं नाही. एक छोटा चढ चढून गेल्यावर ' माता कळसूबाई निवासनी देवस्थान ' अश्या नावाच्या मोठ्या प्रवेशद्वाराने आमचे स्वागत केले. तिथेच एक माता कळसूबाई चे मंदिर आहे. आम्ही उशीर होईल म्हणून मंदिरात नाही गेलो.पण परतीच्या प्रवासात मंदिरात जावून दर्शन घेतले.
अर्धा तास चालल्या नंतर माझ्या पायांनी कुरकुरायला सुरवात केली. सतत चढ असल्यामुळे चालताना माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते . काही अंतर चालून गेल्यावर मला थांबावे लागत होते. अनिल आणि आर्या त्यामानाने छान करत होते. आर्या आमच्या ग्रुप बरोबर पुढे निघून गेली. अनिल मात्र माझ्या सोयीने चालत होता. ओमप्रकाश, आमच्या दोघांच्या बरोबर चालत होता. बाकीचे टूर लीडर आमच्या ग्रुप बरोबर पुढे निघून गेले. आम्ही ओमप्रकाशला सांगत होतो, तू पण पुढे निघून जा. आम्ही दोघे नक्की पोहचू. कारण वाटेवर खूप बाकीचे ट्रेकर्स होते आणि प्रत्येक जण चढताना एकमेकांना मदत करत होता. मग तो कोणत्याही ग्रुप चा असुदेत.पण ओमप्रकाश ने आमचं ऐकलं नाही, तो आमच्या बरोबरच चालत राहिला.
चालत चालत आम्ही पहिल्या शिडीच्या जवळ आलो. कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी काही ठिकाणी लोखंडी शिड्या लावल्या आहेत. त्यामुळे काही अवघड पॅच आपण या शिड्यामुळे सहज चढू शकतो. रस्त्यात मध्ये मध्ये खाण्याचे स्टॉल्स आहेत. तिथे तुम्ही बसून थोडा वेळ विश्रांती घेवू शकता. मी ज्या ज्या स्टॉल्स च्या येथे थांबत होते तिथे तिथे विचारायचे, अजून किती आहे काका? आणि प्रत्येक काका काकूंच ठरलेलं उत्तर.. बस आलं की जवळ. पोहचाल तुम्ही आता! सगळ्यांकडून धीर घेत घेत आम्ही एका सपाट पठारावर पोहचलो. तिथे आमचा ग्रुप आमच्या बरच आधी पोहचून आराम करत होता. त्यात आमची लेक पण होतीच. आपल्या आईवडिलांना पोहचलेले बघून तिला हायसे वाटले. त्या पठाराच्या आजुबाजूच निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं होत. सगळीकडे पिवळ्या रंगाची रानफुले उमलली होती... हिरव्या गवतावर पिवळ्या रंगाची फुले आमचं मन मोहून टाकतं होती. मध्येच धुक्यात सगळं अदृश्य होत होतं. आमच्या ग्रुप मधील काही हौशी पोरांनी आमच्या दोघांचे त्या फुलांच्या बॅकग्राऊंड ला छान फोटो काढले. ' काका शाहरुख सारखी पोज द्या' आणि काका पण लगेच हौसेने पोज देत होते. पिवळी फुलं दिसली की सगळ्यांना ' DDLJ ' आठवत. खरचं आजची पिढी आपल्याला वाटते तेवढी गर्विष्ठ आणि बेजबाबदार नक्कीच नाही आहे.
त्या पठारावर विश्रांती घेवून आमचा ग्रुप एकत्र पुढे निघाला. आता आमच्या दोघांची जबाबदारी जील ने घेतली. हव्या त्या वेळी प्रोत्साहन देत आणि कधी कधी माझा वेग मंदावला की पाठून ढकलत ती मला पुढे पुढे नेत होती. ' आण्टी अभी थोडा ही बाकी हैं, बस पंधरा मिनिट!!' तिचं हे वाक्य मी एक तासापासून ऐकत होते आणि त्या पंधरा मिनिटांच्या आशेवर मी चालत होते, चालत होते.
आणि, शेवटची शिडी आली. ही शिडी एकदम सरळ उभी आहे ८० डिग्री मध्ये. चढताना काही वाटत नाही, उतरताना काय! हा विचार माझ्या मनात क्षणिक चमकून गेला. आम्ही ती शिडी चढून गेलो आणि समोरच दृश्य बघून डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.. समोर माता कळसूबाईचे मंदिर होते.. याचा अर्थ आम्ही शिखर सर केले होते. तो क्षण शब्दात वर्णन नाही करू शकत !! मी माझ्या सर्व वेदना विसरले होते. 'आनंद गगनात न मावणे' काय असते याची प्रचिती आली. सकाळचे १०:३० वाजले होते. तब्बल ४:३० तासाचा ट्रेक करून आम्ही माथ्यावर पोहोचलो होतो. शिखरावर पोहचल्यावर सगळेजण इकडे तिकडे रेंगाळले. आम्ही पण एक जागा पकडून शांतपणे बसलो. थोडा वेळ आराम करून माता कळसूबाई चे दर्शन घेतले.. मंदिराच्या आवारात फोटो काढले.. मंदिराच्या बॅकग्राऊंड ला फोटो काढणे म्हणजे आपण शिखर यशस्वीपणे सर केल्याचा पुरावा असं काही जणांनी सांगितलं. आम्ही पण मग तिथे फोटो काढले.. आमचा ग्रुप फोटो झाला. आता तासभर आमच्या ट्रेक लीडर्स नी आम्हाला मोकळं सोडून दिलं. आमचं कुटंब आपलं बॅगेत काही खाण्याच्या वस्तू होत्या त्या शोधू लागल. कारण भूक खूप लागली होती. जे होत ते सगळ्यां ग्रूप बरोबर थोड थोड वाटून खाल्लं.
आता निर्गमनाची वेळ झाली. आम्ही शिखर उतरण्यास सुरुवात केली. मगाशी सांगितल्या प्रमाणे ज्या लोखंडी शिड्या चढताना काही वाटतं नाही पण उतरताना मनात नक्कीच धडकी भरते.पण आपल्या बरोबरचे सगळे ट्रेकर्स मदतीला एवढे तत्पर असतात की ते प्रत्येकाला हवी तिथे मदत करतात. पहिली शिडी उतरून झाल्यावर आम्ही एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. त्या ठिकाणी एक सुंदर छोटी विहीर आहे. खूप नितळ आणि स्वच्छ पाणी आहे तिचं. तुम्ही पोहऱ्याने पाणी काढून त्या ठिकाणी तोंड, हातपाय धुवून फ्रेश होवू शकता. येवढ्या उंचीवर गरमागरम भजी आणि चहा खाण्याचे सुख काही औरचं!! चहा आणि भजीचा आस्वाद घेत घेत आमच्या ग्रुप च्या गप्पाही रंगल्या.पण ट्रेक लीडर्स सतर्क होते. त्यांना माहीत होते अजून तीन तास तरी उतरायला लागणार आहेत त्यामुळे त्यांनी सगळ्यांना निघण्याच्या सूचना दिल्या.
उतरताना मी थोडी रिलॅक्स होते. मला वाटतं होत आता मला काही प्रॉब्लेम येणार नाही. हळूहळू का होईना नक्की उतरेन.पण एका नवीनच त्रासाला मला सामोरं जावं लागलं. प्रत्येक वेळी पाय टाकताना माझ्या दोन्ही अंगठ्याची नखे माझ्या शुजला लागत होती आणि ती कळ माझ्या डोक्यात जात होती. त्यात पाऊस पडल्या मुळे वाट निसरडी झाली होती.. पाय घसरत होते.. पुन्हा माझा चालण्याचा वेग मंदावला. अनिलने धीर सोडला नाही त्याने तिथूनच एका झाडाची काठी मला दिली आणि तिचा आधार घेत मला उतरायला सांगितले. माझे अंगठे काही केल्या दुखायचे थांबत नव्हते. एका क्षणी असं वाटलं की शूज काढून हातात घ्यावेत पण पायाला काही तरी लागेल या भीतीने तेही करू शकत नव्हते.
मजल दरमजल करत तीन तासाच्या मेहनती नंतर, मध्ये मध्ये विश्रांती घेत आम्ही एकदाचे प्रवेशद्वाराजवळ आलो आणि माझ्या जीवात जीव आला. पुढचा रस्ता सपाट होता. सपाट रस्त्यावर अंगठे शूजला लागत नव्हते त्यामुळे ते दुखतही नव्हते. वरती जाताना आम्ही पायथा माता कळसूबाई मंदिराच दर्शन घेतलं नव्हत म्हणून अनिल आता दर्शन घेण्यासाठी गेला. मी तिथेच एका दगडावर बसून राहिले.त्या ठिकाणावरून जवळच एक धबधबा आहे. ज्यांच्यात अजून उत्साह असतो ते जातात धबधब्यात भिजायला. आमच्यात तर अजिबात त्राण राहिलं नव्हतं आम्ही आमच्या विश्रांतीच्या घराकडे निघालो. पोहचलो तेंव्हा आमचं बाळ आमची वाटच बघत बसल होत. आपल्या मम्मीने शेवटी हा ट्रेक पूर्ण केला याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसतं होत .
सगळ्यात आधी मी शूज काढून टाकले. कसं, बरं वाटलं , सांगू !! मग आम्ही कपडे बदलून , काकूंनी बनवलेल्या चविष्ट जेवणावर तुटून पडलो.. जेवणं सादच पण रुचकर होत. जिलेबी तर अप्रतिमच !! जेवून परत थोडा वेळ तिथेच विश्रांती घेत बसलो. आता घरी जायचे वेध लागले. ओमप्रकाश ने बस बोलावून घेतली.
अश्या प्रकारे ट्रेकच्या आठवणी मनात साठवून आम्ही मुंबई कडे रवाना झालो.