चुकीचे पाऊल! - ०९ Khushi Dhoke..️️️ द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

  • गोळ्याचे सांबार

    🟡गोळ्यांचे सांबार🟡माझी आई नोकरीवाली होतीपण अनेक पदार्थात तिच...

श्रेणी
शेयर करा

चुकीचे पाऊल! - ०९





आता पर्यंत आपण बघीतले.

प्रियांका गावडे यांनी माझी सगळी हकीगत संवेदनशीलपणे ऐकली आणि आम्ही वर्गाच्या दिशेने निघालो. पण, मनात एक प्रश्न पडताच मी त्यांना थांबवून घेतले!

आता पुढे..!

"मॅडम, माझ्या घरच्यांना हे समजलं तर?" : मी घाबरतंच त्यांना प्रश्न केला, जो मला पडणं स्वाभाविक होता.

"तुझ्या घरच्यांना आपण समजावून सांगू. ते नक्की समजतील." : त्यांनी माझी समजूत काढली.

"नाही मॅडम, माझी आई खूप कडक स्वभावाची आहे. ती मला कधीच समजून घेणार नाही." : मी लटक्या सुरात त्यांना सांगितले.

"कसं असतं बेटा, आपल्याला नेहमी हेच वाटतं की, पुढचा आपल्याला समजून घेणार नाही आणि आपण त्याच गैरसमजातून मोठ-मोठ्या चुका करून बसतो. एकदा चुकीचे पाऊल पडले की, परत ते मागे घेता येत नाही. म्हणून आपण आधीच, काही चुकीचं घडत असताना मोठ्यांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यांच्या सांगण्याची पद्धत चुकेल मात्र, उद्देश कधीच चुकणार नाही! हे नेहमी लक्षात ठेवशील." : प्रियांका गावडे यांनी माझी समजूत काढली.

"मॅडम, मला घरी जायचं आहे." : मी लगेच बोलले.

"थांब, पोलिस येतीलंच एवढ्यात! त्यानंतर आपण तुझ्या घरीच जाणार आहोत. तिथे तुझ्याकडून तुझ्या पालकांसमोर स्टेटमेंट घेण्यात येईल. न घाबरता त्यांना सर्व सांगायचं." : प्रियांका गावडे यांनी समजावून सांगीतले.

त्यांच्या सांगण्यावरून हा प्रकार किती धोकादायक याचा अंदाज मला आला होताच.

थोड्याच वेळात तिथे पोलिसांची एक तुकडी आणि काही शासकीय अधिकारी हजर झाले. प्रियांका गावडे यांनी त्यांच्याशी काही संवाद साधला आणि आम्ही दोघी परत वर्गात आलो. लैंगिकता शिक्षण गटाचा सेमिनार इतक्यात संपला होता. प्रियांका गावडे यांनी परत विद्यार्थ्यांच्या लैंगीकतेविषयी असणाऱ्या गैरसमजुती दूर करणाऱ्या मुद्द्यांवर भर देत आमच्याशी संवाद साधला.

"मुलांनो आम्हाला सर्वांशी संवाद साधताना असं जाणवलं की, तुमच्या कोवळ्या मनात असंख्य प्रश्न येतात! मात्र, त्यांचं निरसन करायला तुम्ही कोणाशीही बोलायचं धाडस करत नाहीत. पण, यानंतर असं होणार नाही. या शाळेत प्रत्येक महिन्याच्या शेवटी आमचा एक गट येऊन स्वतः तुमच्याशी संवाद साधेल. त्यांना आपले प्रश्न सांगा. नक्कीच, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करतील." प्रियांका गावडे, विद्यार्थांचे मार्गदर्शन करत बोलल्या.

त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून काही अधिकाऱ्यांना सोबत घेत प्रियांका गावडे यांच्या गटासोबत सर्व माझ्या घरी रवाना झाले.

काहीच तासात आम्ही माझ्या घरी पोहचलो!

माझ्यासोबत त्यांना आलेलं बघून आई-बाबांना काळजी वाटली. सोबत पोलिसांना बघून ते दोघे भीतीने थरथरले!

"घाबरू नका, काहीही झालेले नाही." : वरिष्ठ अधिकारी सीमा राज यांनी दोघांना धीर देत शांत राहायला सांगितले.

लहान बहिणीला एका महिला शिपायाकडे सोपवत बाहेर घेऊन जाण्याचे आदेश देण्यात आले. महिला शिपयांनी तिला काही तरी सांगून बाहेर जाण्यास तयार केले. ते निघून गेल्यावर संभाषण सुरू झाले.

प्रियांका गावडे यांनी घडलेला प्रकार सर्वांना सविस्तर सांगितला. ते सर्व ऐकून आई-बाबांना धक्काच बसला! ज्या शामलने मला त्यांच्यासमोर बहीण मानले होते, तो असा करेल यावर त्यांचा विश्वासंच बसत नव्हता! आणि ओंकार! त्याच्या विषयी तर ते नव्यानेच ऐकत होते!

बाबांचा राग इतका अनावर झाला की, त्यांनी माझ्यावर रागातंच एक नजर भिरकावली! त्यांच्या रागावण्याची ती पहिलीच वेळ असल्याने नकळत डोळ्यांतून न थांबणाऱ्या अश्रुधारा वाहू लागल्या! प्रियांका गावडे यांनी मला सावरले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कडक शब्दात त्यांना शांत राहण्यास सांगितले.

"हे बघा, शांत व्हा! तुम्ही तिला समजून घेतलं नाही आणि म्हणून ही परिस्थीती तुमच्यावर ओढवली आहे. तुम्ही कधी तरी तिला जवळ घेतले होते? कधीतरी मायेने विचारपूस केली होती? पहिल्यांदा चेहऱ्यावरील हावभावावरून तिच्या मनात काय आहे, हे विचारण्याचा प्रयत्न केला होता? नाही ना! मग हे सर्व घडणारंच नाही हा आत्मविश्वास तुमच्या मनात का?" वरिष्ठ अधिकारी सीमा राज यांनी त्यांना महत्वाचे प्रश्न विचारत त्यांची चूक दाखवून दिली.

एवढं सर्व सांगून सुद्धा माझ्या आईला अजूनतरी तिच्याकडून चूक झाली असल्याचे मान्य नव्हते आणि पुढे तिच्या तोंडून नको ते शब्द बाहेर पडलेच!

"हो पण म्हणून या सटवीनं असं करावं! आमच्या मागे आणखी किती जणांसोबत?......"

आई पुढे काहीही बोलणार तोच प्रियांका गावडे जागेवरून उठत चांगल्याच भडकल्या!

"यापुढे मी तिच्याविषयी एक शब्दही ऐकून घेणार नाही! खबरदार जर आणखी अपशब्द वापरलेत! अरे तुम्ही आई आहात तिच्या, तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती!"

"इतकाच पुळका आला असेल, तर सोबत घेऊन जा ही घाण! नको इथे आम्हाला!"

आईच्या अशा बोलण्यावर माञ मी आणखीच दुखावले!

प्रियांका गावडे यांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही फायदा झाला नाही. शेवटी आई-बाबांनी माझ्याशी नातं तोडण्याची भाषा केलीच!

"आजपासून हीचा आमच्याशी काहीही संबंध नाही!" : आईने स्पष्ट सांगितले.

आई-बाबांना केवळ त्यांच्या अभ्रू नुकसानीची भीती होती आणि त्यांच्याकडून हे सामाजिक दबावाखाली घडत होते.

"हे बघा, तुम्हाला काहीही करून दिशाला घरात ठेवावेच लागेल. नाहीतर मला नाईलाजास्तव तुमच्यावर कायदेशीर कारवाईसाठी विचार करावा लागेल!" : सीमा राज यांना शेवटी कायद्याची भाषा बोलणे भाग पडले.

कायदेशीर कारवाईचे नाव ऐकताच आई शांत झाली.

"हे बघा, तुमची मुलगी अल्पवयीन आहे. तिच्यावर झालेला अत्याचार आपणच थांबवू शकला असता, पण आपण नकळत तिला यासाठी मजबूर केले. तिच्या भावना आपण समजून घ्यायला हव्या होत्या, असं तुम्हाला नाही का वाटलं?"

"जाऊद्या ना, आता या सर्व गोष्टी बोलून काय फायदा? जे झालं ते झालं!" आई स्वतःची जबाबदारी घ्यायला तयारंच होत नव्हती.

"पुरे, इतकं सांगून सुद्धा तुम्हाला विषयाचे गांभीर्य कळत नसेल, तर सांगून काहीही अर्थ नाही! असो...! मला शामल विषयी माहिती हवी आहे. सध्या तो कुठे आहे? काय करतो? राहतो कुठे? सर्व एकूण-एक माहिती हवी आहे." : सीमा राज यांनी आई-बाबांना जाब विचारले.

त्यांचा कडक स्वभाव कळताच बाबांनी बोलायला सुरुवात केली.

"तो सध्या एका कंपनीत नोकरी करतो आणि तिथे जवळच एका खोलीत भाड्याने राहायला आहे."

"मिस. प्रियांका आम्हाला दिशा कडून ओंकार विषयी विचारणा करावी लागेल! ती सांगण्याचा मनःस्थितीत आहे का? तुम्ही तिच्याशी याविषयी बोलून बघा." वरिष्ठ अधिकारी सीमा राज यांनी प्रियांका गावडे यांना सांगीतले.

"बाळा, जे काही तू मला ओंकार विषयी सांगीतले, ते यांना सांग. तुला मी मघाशी याबद्दल सांगीतले होते ना?" प्रियांका गावडे यांनी विश्वासात घेत मला बोलायला सांगीतले.

"हो मॅडम!" मी त्यांच्या सांगण्यावरुन माझं स्टेटमेंट द्यायला तयार झाले.

शामल आणि ओंकार विषयी संपूर्ण माहिती घेत पोलिसांकडून तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. लगेच पोलिसांच्या तुकड्या आम्हाला सोबत घेत आधी शाळेत रवाना झाल्या.
.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके.