'पदरावर जरतारी मोर आणि हिरव्या रंगाची जरीकाठ असलेली साडी नेसून भूमी तयार होती. नाकात नथ घालून तिने ओठांवर लाल चुटुक लिपस्टिक लावली. मेकअप आर्टिस्टने तिच्या गळ्यात एक सोन्याचा हेवी असा हार घातला आणि त्यावर मॅचिंग असे मोठे कानातले कानात घातले. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला त्याच्या मध्ये मध्ये क्षितिजने पाठवलेल्या जाड पाटल्या घालून भूमीला तयार केले. ती सुंदर दिसत होती. केसात एका बाजूला खेवलेली केवड्याची आणि जरबेरिया ची लाल फुले तिच्या कानावर येऊन तिच्या चेहेर्याची सुंदरता अजूनच वाढवत होती. एक चंद्रकोर कपाळावर लावून भूमीने आरशात पहिले. खाली मंत्र पठन करायला सुरुवात झाली होती. लग्नघटिका जवळ आली होती. निधी तिला न्यायला वरती आली आणि निधी तिला नवरीच्या वेशात बघून खुश झाली. कधी नाही ते निधीच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.'
'मोरपंखी आणि सोनेरी शेरवानी सूट घालून क्षितीज तयार होता. डोक्यावरचा फेटा व्यवस्थित करत त्याने आरश्यात पहिले. आपला लूक परफ़ेकत आहे हे समजताच तो खाली लग्न मंडपाकडे निघाला. तो अगदी नवरदेव म्हणून शोभून दिसत होता. त्यात त्याने परिधान केलेला मोरपंखी शेरवानी त्यात तो अगदी राजबिंडा दिसत होता.'
'लग्न घटिका जवळ आली आहे, नवरा नवरीच्या हजर व्हावे.' म्हणत पंडितजी पाटावर येऊन बसले. मिस्टर सावंत त्याच्या जवळ आले. क्षितिजला मिठी मारून त्यांनी शुभेच्या दिल्या. आज्जो सुध्या त्यांच्या नवीन जोडीदाराशी लग्नाला उपस्थित होत्या. त्या देखील क्षितिजला येऊन भेटल्या. भूमीचे नाना व्हीलचेअर वर बसून आले होते आणि त्यांच्या सोबत माई उपस्थित होत्या, तसेच निधीचा नवरा निल देखील त्याच्या बॉस च्या लग्नाला म्हणजेच क्षितिजच्या लग्नाला आला होता. सगळयांना भेटून झाल्यावर क्षितिजने बाहेरच्या दाराकडे पहिले अजूनही त्याची आई आलेली नव्हती. त्याला अशा होती कि त्या येतीलच. म्हणून तो वाट बघत होता. एवढ्यात भूमीला घेऊन निधी वरच्या मजल्यावरून जिन्याने खाली येताना सगळ्यांनी पहिले. ती अतिशय सुंदर सजली होती. क्षितीज ची नजर तिच्यावर होती. आणि तिच्या निरागस सौंदर्यावर तो हवी झाला होता.
आज एवढ्या वर्षांनी तिला पुन्हा नवरीच्या वेशात पाहून नाना आणि माईंच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. नानांनी तिला आशीर्वाद दिला.
उपस्थित सगळ्या मोठ्या माणसांच्या पाय पडून ती स्टेजवर आली आणि क्षितिजच्या शेजारी उभी राहिली. 'छान दिसतेस.' अशी क्षितिजने तिला नजरेनेच पावती दिली. ती गोडं लाजली. ''पप्पा येणार आहेत ना?'' क्षितीज तिला विचारत होता.
''नाही, ते माझ्यावर फार रागावलात. काल मैथिलीची तब्येत अचानक बिघडली. पण लग्नाचा मुहूर्त आजच असल्याने मी सगळ्या गडबडीत हॉस्पिटल ला सुद्धा जाऊ शकले नाही.''
'''लग्न झाल्यावर संध्याकाळी जमलं तर जाऊन येऊया. मला काळजी आहे आईची. ती अजूनही आलेली नाही. ती नाही आली तर काहीच होऊ शकत नाही.'' क्षितीज पुन्हा पुन्हा दरवाज्याकडे बघत म्हणाला.
''येतील त्या. नक्कीच येतील. त्यांना यावंच लागेल.'' भूमीने त्याला समजावले.
''सावंत साहेब, मुहूर्त सुरु होतोय, सुरु करूया का?'' साठे काका मिस्टर सावंतांना विचारत होते. आणि क्षितिजने पुन्हा दाराकडे पहिले. क्षितिजच्या पप्पांनी मानेने त्याला नकार दिला. आज्जो पुढे आल्या होत्या.
''तुम्ही सुरुवात करा. ती नाही येणार.'' आज्जोने क्षितीज आणि भूमीला सांगितले. पण क्षितीज जागचा हलला नाही.
''पंडितजी त्याच्याकडे बघत बसले. भूमीचा चेहेरा साफ पडला होता. म्हणजे मी भेटून सुद्धा क्षितिजच्या आई येणार नाहीत तर? का? स्वतःच्या मूलाच्या सुखापेक्षा त्यांना त्यांचा ईमो महत्वाचं वाटतो तर?' तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला.
'क्षितीज अजूनही येऊन पाटावर का बसत नाही?'असा प्रश्न खाली लग्न मंडपात जमलेल्या सगळ्या लोकांच्या मनात निर्माण झाला.
एवढ्यात दारातून मिसेस सावंत यांची इंट्री केली होती. त्यांना बघून कोण नव्हते तो आनंद क्षितीज आणि भूमीच्या चेहेऱ्यावर दिसत होता. त्या थेट क्षितीज च्या जवळ आल्या. क्षितीजला पाटावर बसवून त्या भूमीकडे वळल्या. ''साठे काक सुरुवात करा.'' म्हणत त्यांनी हातातली शाल भूमीच्या अंगावर टाकली. आणि तिच्या हाताला धरून तिला पाटावर बसवले.
''आई, हे लग्न तुला नक्की मान्य आहे ना?'' क्षितिजने त्यांच्याकडे बघत त्यांना विचारले.
''होय, काल माझी होणारी सून मला भेटायला आली होती. ज्या कंपनीच्या पार्टनरशिप मुळे किर्लोस्कर आणि आपले संबंध बिघडले होते ती कंपनीचं तिने आपल्याला परत केली आहे. तेही बेशर्त. पन्नास टक्के च्या पार्टनरशिप वर क्षणात लाथ मारून त्याबदल्यात तिने माझ्याकडे तुझी साथ मागितली. आणि मला इथे यायला भाग पाडलं. भूमीपेक्षा अजून कोणतीही निस्वार्थी मुलगी मला सून म्हणून मिळणे शक्य नाही. याव तर लागणार ना?''
''म्हणजे? भूमी काल तुला भेटायला आली होती?'' क्षितीज त्यांना पुन्हा विचारत होता.
''होय, पण आपण या विषयी नंतर बोलू, आधी लग्न मुहूर्त सुरु झाला आहे. काका तुम्ही सुरुवात करा.'' म्हणत त्या स्टेजवरून बाजूला झाल्या. आणि साठे काकांनी क्षितीज आणि भूमीच्या लग्नाला सुरुवात केली. क्षितिजच्या आत्ता लक्षात आले होते, कि भूमीमुळे आपली आई इथे लग्नाला आली आहे. त्याला खूप समाधान वाटले. भूमी मात्र काही न बोलता तशीच शांत बसून त्याच्याकडे बघून हसली.
लग्न अर्ध्यावर आले होते, सप्तपदीसाठी क्षितीज आणि भूमी दोघेही उभे राहिले. आणि दारातून कोणाची तरी चुळबुळ सुरु झालेली त्यांना ऐकायला आली.
मिस्टर किर्लोस्कर आतमध्ये येण्यासाठी दारावरील शिपायावर ओरडत होते. आणि शिपाई त्यांना आत सोडायला तयार नव्हता. हे बघून क्षितिज आणि भूमी फेरे घेता घेता जागीच थांबले.
मिस्टर सावंतांनी पुढे होवून शिपायांना बाजूला केले आणि मिस्टर कोर्लोस्कर लगबगीने आत घुसले.
''माझ्या मुलीचे लग्न, आणि आमच्या शिवाय कसे काय होवू शकते?'' ते थेट जाऊन भूमीच्या शेजारी उभे राहिले आणि विचारू लागले.
''बाबा प्लिज शांत व्हा.'' भूमी त्यांना शांत करत होती.
''मला इथे कोणतीही गडबड नको आहे, लग्न होऊद्या. प्लिज.'' मिस्टर सावंत तिथे येत म्हणाले.
''मी आशीर्वाद द्यायला आलो आहे, काही गडबड होणार नाही.'' म्हणत त्यांनी भूमीला मिठी मारली. आणि त्यांचे डोळे अश्रुनी भरले.
''बाप म्हणून मी सपशेल हरलो, मला माफ कर, एका मुलीला फितवून सावन्तांची कंपनी अडकवली. आणि तुला लहानपणीच वाऱ्यावर सोडून बापाच्या नावाला काळिमा फसला. आता मला माझं कर्तव्य करू देत. कन्यादान करू देत.'' ते भूमीला सांगून रडत होते.
''बाबा, काय म्हणताय तुम्ही ? आणि माफी कशाला?'' मैत्रीला काही सुचेना झाले होते.
''मैथिली पूर्णपणे शुद्धीवर आलेय, तिने मला सांगितलं कि क्षितीजमूळे तिचा अपघात नाही झाला. तर हे त्या मुखर्जी, वेदांत आणि इतर सहकाऱ्यांचा कारस्थान होत. मैथिलीला हे माहित झालं म्हणून त्यांनी चंदिगढला असताना त्यांच्या गाडीचा अपघात घडवून आणला. मला सगळं समजलेले आहे, मी विनाकारण क्षितीज ला दोष देत राहिलो. क्षितीज मला माफ कर.'' ते क्षितिजला सांगत होते.