️️Sunday ️️ books and stories free download online pdf in Marathi

️️रविवार ️️

रविवार उजाडतो तोच मुळी आळस घेऊन.... तिला नेहमी प्रमाणे सकाळी लवकर जाग येऊनही अंथरुणात लोळत पडावस वाटतंय...

पूर्ण आठवडाभर शनिवार आणि रविवारसाठी मनात आखलेले कितीतरी बेत फसलेले असतात.. ते सगळे नेहमीप्रमाणे बारगळलेले बेत आठवून तिला खुदकन हसू येतं...

घड्याळाचा काटा त्याच्या नेहमीच्या गतीने पुढे पुढे जात असतो...

तो बाजूलाच शांतपणे झोपलेला असतो..

आज त्याला कामावर जायची घाई नाही की लोकल पकडायची चिंता नाही.. त्याचा तो शांत चेहरा निरखत असताना एक खट्याळ विचार तिच्या मनात चमकून जातो आणि ती त्याच्या गालावर हळूच चिमटा घेत , "अहो उठताय ना? आठ वाजले, आठवडाभराची राहिलेली किती काम उरकायची आहेत आपल्याला??

पण आज तोही इतका निवांत असतो की , तिचा हात पकडुन तिला आपल्याकडे खेचत , "अगं , आज तरी शांतपणे झोप थोडी .काम रोजचीच आहेत तुझी.अजून पूर्ण दिवस पडलाय. होतील नंतरही "..

त्याचा तो लाडिक आग्रह तिलाही मोडवत नाही.. ती तशीच त्याच्या बाजूला शांत पडून राहते..

तो , तिला आपल्या बाहुपाशात घेऊन परत शांत झोपी जातो... त्याची ती मिठी, तिला कितीतरी आश्वासक वाटते.. त्याचा तो गरम श्वास तिच्या कानशिलांना जाणवत राहतो. असचं नुसतं काहीही न करता, त्याच्या बाहुपाशात पडून राहणंही किती सुंदर आहे हे तिला जाणवतं..

तो क्षण ती अगदी उत्कटतेने जगतेय. मनात साठवतेय.

असं क्षणिक जगता आलं तर आयुष्य किती सुंदर आहे..

हळूच त्याची ती मिठी सोडवत ती उठते.. साडी ठिकठाक करून स्वयंपाकघरात जाते.. आज बाहेरही किती शांतता आहे.. असं वाटतंय की, कोणालाच कसलीही गडबड नाही आहे.. खिडकीतून दिसणारा रस्ताही आज जरा शांतच वाटतोय.. त्याच्यावरही रविवारचा अंमल जाणवतोय.. रोज कितीतरी गाड्यांना , माणसांना आपल्या निधड्या छातीवर तो झेलत असतो.. आज तोही जरा निवांत आहे..

ती चहा टाकते. आज काय जेवणाचा बेत करावा हा विचार मनात चालू असतानाच स्वारी पाठीमागून हळूच येऊन तिला जवळ ओढते..
"आज खूप वेळ आहे. मांजरासारखं तुझ्याभोवती घोटाळत सकाळ काढायची आणि मग...."

"हात तिथंच राहुद्या हं , तुमचा.. खूप लाडात येऊ नका. " अशी लाडिक तक्रार करत तीही त्याच्या अंगावर रेलून खळखळून हसते..

" काल तुम्ही म्हणाला होतात की उद्या लवकर उठायचं आणि सगळी राहिलेली काम करायची..".. त्याच्या केसातून हात फिरवत ती बोलते ..

"आणि आज उशिरा उठलात" ..

"अगं खूप वेळ आहे अजून.. करू की सगळी कामं " असं बोलून तो परत तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो..

तिला एकंदरीत त्याच्या मूडचा अंदाज आलेला असतो पण ती मात्र प्रेमळ दम देऊन त्याला अंघोळीला
दामटवते..

"तुझी झाली का आंघोळ.". तो..

"नाही, तुम्ही करा, मी सगळ आवरते तोपर्यंत. मग करेन..
आणि हो.. आंघोळ करून , बाजारातून सामान घेऊन या.".

पण त्याच्या मनात आज कुठंही जायचं नसतं.. तिला असं स्वयंपाकघरात काम करत असताना नुसतं न्याहाळत बसायचं असतं..

ती आंघोळ करून बाहेर येईल तेंव्हा तिचं ते रसरशीत शरीर, डोक्यावर गुंडाळलेला ओला टॉवेल आणि त्यातून डोकावणाऱ्या ओल्या केसाच्या कपाळावर आलेल्या बटा.. बघून धुंद व्हायचं असतं.

नेमके त्याच वेळी, त्याच्या रसिक शेजाऱ्याच्या घरातून सुधीर फडके आणि आशा भोसलेंनी गायलेल्या गाण्याचे स्वर कानावर पडतात आणि तो धुंद होऊन जातो..

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना!!

तुझ्या जीवनी नीतीची जाग आली
माळरानी या प्रीतीची बाग आली!!

सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा
तुझा शब्द की थेंब हा अमृताचा!!

तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा!!

चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची!!

युगांचे मिळावे रूप या क्षणांना!!!

ती त्याची समाधी भंग करते.. तो मिश्किल हसत तिच्याकडे पाहतो..

रोजचीच धावपाळ आहे.. रोजचचं ऑफिस, तोच साहेब,तिच लोकल,.तीच गर्दी ,आणि तेच चेहरे .. नेहमीच्याच जबाबदाऱ्या..आणि चाकोरीबद्ध जगणं... ह्यातून आज थोडासा वेळ काढून हा रविवार असाच तिच्या सहवासात जावा..हाच तो सतत प्रयत्न करतोय.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED