यावर्षी ५ जूनला भाऊचा बर्थडे म्हणून माझे सर्व मित्र मला भाऊ, तात्या, सरपंच, सरकार, अण्णा, रावडी भाऊ अशा नाना प्रकारच्या उपाधी देऊन गौरवित होते. मला त्यांच्या या प्रशंसेचे कारण सुद्धा समजले. माझ्या मित्रांना माझ्या वाढदिवशी तांबडा आणि पांढरा रस्साची पार्टी हवी होती. मी सुद्धा मोठ्या आनंदाने ती कबूल केली फक्त एक अट टाकून! की ५ जूनचा पूर्ण एक दिवस कोल्हापूर जवळील कोणत्याही एका गडाची आपण स्वच्छता करुया.
तेव्हा ठरलं, कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर दूर असलेला भुदरगडावर निघायचे म्हणून. ५ तारखेला सकाळी ५ वाजता आम्ही सहा जण तीन गाड्या घेऊन निघालो. सोबत कोयते, फावडी, घमेली असं विविध साहित्य होते. सकाळी बरोबर सव्वा सहा वाजता थंडगार वाऱ्याचे पांघरून घेऊन भुदरगडावर आम्ही पोहचलो.
भोज राजाने बांधलेला हा किल्ला आजही चांगल्या अवस्थेत दिसत होता. गडाच्या पायऱ्या चढताना आपोआप हुरूप आणि शहारे आले. गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचताच आम्ही प्रवेशद्वारावरील भैरवनाथाच्या मंदिराचे दर्शन घेतले. भैरवनाथ मंदिरापाशी बसलेल्या काकांना विचारलं, किल्ला खूप मोठा आहे का? त्यांनी सांगितले, ‘श्री भैरवनाथाचे जागृत देवस्थान आहे. पलीकडे गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे आणि हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात.’
वाऱ्याला उधाण आले होते. थर्मसमध्ये आणलेला चहा सर्वांना दिला. चहा दिसल्या दिसल्या गडावरील इतर दोन-तीन मंडळी आमच्यासोबत जोडली गेली. जय भवानी, जय शिवाजीच्या गजराने आम्ही कामाला सुरुवात केली. आम्ही सहा जण होतो जयदेव, रोहन, प्रकाश, संजय, नितीन आणि मी. भैरवनाथ मंदिरापासूनच कामाला सुरुवात केली. तिथल्या काकांनी तूराटीपासून बनलेला झाडू दिला.
पूर्ण मंदिर झाडून घेतले. दोघांनी मंदिरासमोरील परिसर झाडून काढला. दीपमाळ आणि तोफ स्वच्छ केली. बाकीचे आमचे पैलवान दुसऱ्या कामगिरीवर होते. ते तिघे जिथं जिथं गवत वाढले होते ते उपटत होते. प्रवेशद्वाराजवळ झुडपांनी घाई गर्दी केली होती त्यांना आम्ही रेड सिग्नल दिला.
अस्ताव्यस्त असलेले मोठ मोठे धोंडे उचलून नीट रचले. मंदिराच्या मागे एक वाडा होता, त्याच्या पुढे गडावरील हेमांडपंथी शिवमंदिर होते. एका बॉटलमध्ये पाणी घेऊन आम्ही महादेवाला अभिषेक घातला. झाडू मारून, मंदिरातल्या जाळ्या काढल्या. अस वाटत होते, खूप दिवस झाले हे मंदिर कोणी झाडले सुद्धा नाही. प्लास्टिकच्या बाटल्या, खाल्लेले वेष्टन, छोट्या गोवा गुटख्याच्या पुड्या सारं काही उचलून एका पोत्यात टाकले.
आम्ही आता सभा मंडपात आलो होतो. तिथे आल्यावर आम्हाला साक्षात देवाचा साक्षात्कार झाला. समोर पाहतोय तर काय, शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा! ती जागा स्वच्छ ठेवली होती. तरीसुद्धा आम्ही सर्व भाग परत स्वच्छ करून घेतला.
रोहन, जयदेवकडे फावडी आणि कोयते होते. पुढच्या झाडीतून उत्तरेला वाट काढत गेलो असता तिथे आम्हाला छोटासा तलाव दिसला. तिथे भरपूर जणांच्या समाध्या होत्या. ‘ऐ आण रे पाणी’ म्हणत आम्ही परत कामाला लागलो. सर्व समाध्या धुवून काढल्या. सकाळचे दहा अकरा वाजत होते. वेळ कसा गेला हे समजलेच नाही. आम्ही अर्धा तास विश्रांती घेत आणलेला फराळ खाल्ला. चहा आणि बिस्कीट घेतले. आभाळ येण्याची शक्यता पाहून परत सर्वजण उठले.
आम्ही दगडी जिन्यावर आलो असता तिथे तलाव भरलेला होता. आता इथे आम्हाला काही दारूच्या, प्लास्टिकच्या बाटल्या दिसल्या. एक गडप्रेमी म्हणून आम्हाला ज्या गोष्टींची लाज वाटते तीच गोष्ट पाहताना आम्हाला प्रचंड राग येत होता. असो, दगडी जिन्याच्या भिंतीवर जणू काय यांच्या आजोबांनी गड बांधला आहे या तोऱ्यात एक दिलाचं चित्र काढून त्यावर आडवा बाण मारून त्याखाली कोण्या तरी रोमियोने आपल्या ज्युलियटचे नाव कोरले होते. आम्ही ते सर्व पाण्याने धुवून काढले.
भूयारामधून बाहेर येता क्षणी जखुबाईचे शेंदरी मूर्ती असलेले मंदिर लागले. त्याच्या अवतीभोवतीचे सर्व झुडुपे संजय, नितीन, जयने तोडली. इथून राधानगरीचे दाट अरण्य, आंबोली घाटाचा परिसर तसेच दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी स्पष्ट दिसतात. शेजारीच २ कोरड्या विहिरी आणि दोन छोटे अशुद्ध पाण्याचे तळे दृष्टी पथास आले. विहिरीमध्ये उतरण्यास पायऱ्या होत्या हे विशेष. आमच्यातील जय मोठा वाघाच्या काळजासारखा. पोते घेऊन विहिरीत उतरला. जो काही कचरा, पाचोळा पडला होता तो त्याने उचलला आणि वर आला. आम्हाला त्याचे कौतुक वाटले.
आता जवळपास सर्व काम उरकत आले होते. आम्ही आमचा मोर्चा दूध सागर तलावाकडे वळवला. दूध सागर आकाराने मोठा तलाव होता. त्याची खासियत म्हणजे यातील पाण्याचा रंग हा पांढरा होता. तळ्यातील मातीच्या गुणधर्मामुळे असे झाल्याचे तिथल्या एका काकांनी आम्हाला सांगितले.
त्यांनी या किल्ल्याची थोडक्यात माहिती सांगितली की हा किल्ला भोज राजाने बांधला होता. तो खूप वर्षे आदिलशाहीकडे होता. १६६७ मध्ये शिवाजी महाराजांनी यास स्वराज्यात आणले. किल्ल्याची डागडुजी महाराजांनी केली होती. तिथल्या या तटबंदी, हे बुरुज, या नुसत्या भिंती नसून मावळ्यांच्या पराक्रमाची अभेद्य छाती आहे. पण रक्ताने सह्याद्री पावन करून स्वराज्यात अभिषेक वाहणाऱ्या नर वीरांच्या शौर्याचा त्याग आपण दारूच्या बाटल्या टाकून आणि भिंतीवर दिलं चे चित्र रेखाटून फेडतो हे पाहून मनाला किळस येतो.
असो एवढंच वाटतं की, गड-किल्ल्यांच्या दुरुस्ती आणि स्वच्छतेमुळे आपला इतिहास जतन होईल. भूतकाळात गाडल्या गेलेल्या गोष्टी तर समोर येतीलच त्याशिवाय यामुळे किल्ले पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीही होऊ शकेल. त्यासाठी गड-किल्ल्यांवर मौजेसाठी येणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. स्थानिकांना रोजगार देऊन त्यांच्यावर हे संरक्षणाचे काम सोपवले पाहिजे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. जय भवानी जय शिवाजी.