हिरवे नाते - 4 - बदल Madhavi Marathe द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हिरवे नाते - 4 - बदल

                                                                                                   बदल

 

     कडूगोड आठवणी साठवून जीवनचक्र फिरत असते. घरामध्ये काही बदल घडत असल्याचे जाणवू लागलं होतं. आता वीणाला चांगली जाण आली होती. आई बाबा आपसात काही चर्चा करत आहेत, असं वारंवार दिसू लागलं होतं. आजी आजोबां बरोबरही चर्चा होत होती. वातावरण ताणत ताणत एक दिवशी ते तुटलं. मग मुलांशीही चर्चा केली गेली. निरामय तर छोटाच होता, पण त्यालाही समजेल अशा स्वरूपात ती बातमी सांगितली गेली.

      बाबांच्या कंपनीमध्ये गेले काही दिवस खुप ताण निर्माण झाला होता. तिढा सुटत नाही असे दिसल्यावर त्यांनी दुसरीकडे अर्ज टाकायला सुरवात केली होती. त्यामध्ये त्यांना फॉरेन चान्स मिळाला. हे ऐकताच वीणाला खूप आंनद झाला, पण लगेच त्याची दुसरी बाजू लक्षात आली. बाबा आपल्यापासून लांब जाणार हे जाणवताच तो आनंद कुठल्या कुठे गेला. रडावं तर आई, बाबा, आजी, आजोबा सगळे खुश होते. आपणही त्यात सहभागी व्हावे तर एका मोठ्या सुंदर विश्वाला आपण मुकणार हे जाणवून आंनदही होत नव्हता. निरामयला वास्तवाची तेव्हढी जाणिव झाली नाही, पण बाबा रोज आपल्याला भेटणार नाही म्हंटल्यावर त्याचा चेहेरा रडवेला झाला. दोघांची स्थिति जाणवून आई बाबांनी त्यांना जवळ घेतलं.

    बाबा म्हणाले “ मी कधीपासून या संधीची वाट बघत होतो. तुमच्या पासून दूर रहाण्याचे दुःख मला पण आहे. पण थोडेच वर्ष. एकदा का मी तिथे सेटल झालो की आपण सगळेच तिकडे शिफ्ट होऊ. पण तोपर्यंत तुम्हाला मला साथ द्यावी लागेल. तुम्हाला तरी इथे आपले सगळे लोकं आहेत. आपले मित्र, गाव, देश आहे. तिथे तर कोण आपलं, कोण परकं हे फक्त अनुभवच सांगू शकतील. अशा मानसिकतेत रहायला मला तुमचा आधार हवा. बळ हवं. आपल्या कुटुंबाची ऊर्जा हीच तर मला तिथे एकटं रहायला शक्ती देईल.” सगळ्यांचे डोळे भरून आले. वीणा बाबांचे डोळे पुसत म्हणाली “ आम्हाला खूप आनंद झाला आहे बाबा. तुम्ही निश्चिंत जा. दूरदेशी राहूनही तुम्ही आमचे बाबा असाल. एकत्र राहूनही कितीजण मनाने आपल्या आईवडिलांजवळ असतात ?” वीणाचे ते बोल ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. पण ती आपल्या मित्र मैत्रिणींच्या घरच्या कथा पहात होती. ऐकत होती. त्यात आपल्या कुटुंबाशी तुलना करत होती. पण आपलं घर किती एकमेकांशी बांधलं गेलं आहे हे ती जाणून होती. सगळे एकमेकांशी मनाने बांधले गेलेले होते.

     आई म्हणाली “ वीणा, अजून एक सांगायचे आहे. माझी बदली डयू होती. बाबांच्या मधल्या स्थितीमूळे थोडी थोपवून धरली. पण आता ते ही क्लिअर केले आहे. बाबांचे फायनल झाल्यावर मी पण ऑफिस मध्ये अर्ज टाकला आणि गुहागर ब्रांच मागून घेतली. खेडेगावात जायला तसेही लोकं तयार होत नाही. मी ते मागितलं तर झटक्यात मंजूर झाले. अमेरिकेतला मोठा काका, आजी आजोबांना कधीचा तिकडे बोलवत आहे. तेव्हा ते पण तिकडे रहायला जाणार आहे.”

     वीणा, निरामयला तर आता आभाळच कोसळल्या सारखं वाटू लागलं. आजी आजोबां शिवाय रहायचं ? ज्या घरात आजोबांच्या अभंगांनी जाग येते आणि आजीच्या गोष्टी ऐकत झोप लागते. बाबांच्या शिस्तप्रियतेने यश दिसते, त्यालाच एकदम सुरुंग लागल्या सारखा झाला. शिवाय घर बदलणार म्हणजे मित्र मैत्रिणी, शाळा सगळच बदलणार. आता हे दोघांच्याही शक्तीबाहेर चालले होते. पण परिस्थितीच अशी होती की कुणालाच काही करता येण्यासारखं नव्हतं. वाईट परिस्थिति तर वाईट असतेच पण चांगली परिस्थिती, घटनाही लहान मुलांच्या दृष्टीने वाईट ठरू शकतात, असं उदाहरण घडत होतं.

      आई, बाबा, आजी, आजोबा सगळ्यांनाच महित होतं की या गोष्टीवर कौन्सिलिंग होणे गरजेचे आहे. आजोबा म्हणाले “ अरे बाळांनो, आमची ताकत आता कमी होत चालली आहे. थोडे बरे आहोत तोपर्यंतच आम्हाला प्रवास करता येणार म्हणून तिकडे जाऊन येतो. आणि तुम्हीच सांगा, आता तुमच्या आईवर किती जबाबदारी पडणार. ऑफिस, घर सांभाळा, तुम्हाला सांभाळा, अभ्यास बघा, त्यात बाबा नसल्यामुळे तिला स्वतःलाही सांभाळावे लागणार आहे. त्यात अजून आमची जिम्मेदारी नको.”

  “ खरं तर बाबा मला तुमचा फार मोठा आधार राहिल. पण आमच्या जिम्मेदारीत अडकण्यापेक्षा तुम्ही आताच जरा फिरून आले तर ते चांगलेच आहे. इतके वर्ष तुम्ही सगळ्यांची जिम्मेदारी निभावली. आता तुम्हाला तुमचे आयुष्य एन्जॉय करायचा पूर्ण हक्क आहे.” आई म्हणाली. वीणालाही ते पटलं.

    आजोबा म्हणाले “ हा निर्णय घेताना मी खूप विचार केला. पण तू माहेरगावीच असल्यामुळे मी निर्धास्त झालो. सगळं गावच तुझ्या ओळखीचं आणि आई वडील भाऊ सगळेच तिथे असल्यामुळे कुणालाच काही चिंता नाही. नीलला पण परदेशात इथल्या चिंता रहाणार नाही. खूप चांगला निर्णय घेतलास तू.”

   वीणा, निरामयला एकदम नवीन विश्व सापडल्याचं लक्षात आलं. ते गाव तर आपल्याही ओळखीचं आहे. तिथे आपले मित्र मैत्रिणी आहे, आणि मुख्य म्हणजे तिथे पण आजी, आजोबा, मामा, मावशी सगळेच आहेत. शाळा फक्त नवीन आहे आपल्यासाठी. पण सगळ्या प्लस पॉइंट मध्ये एखाद दोन मायनस पॉइंट धुक्यासारखे विरघळून गेले. मुलांची खुलत जाणारी कळी पाहून सगळच वातावरण निवळत गेलं. “आजी कडे रहायचं.” निरामयच्या त्या आनंदी उद्गारांनी हसू येऊन आजीने त्याला जवळ घेतले. दोन्ही आजी त्याला तेव्हढ्याच प्रिय होत्या. पण आई म्हणाली “ निरू आपण आजीच्या गावात रहाणार आहोत. आजीकडे नाही.”  “का ?” निरू लगेच ओरडला. “ अरे ! आपल्यामुळे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे. पण आपण नवीन घर आजीच्या घराजवळ घेऊ, म्हणजे तुला कधीही तिकडे जाता येईल.

चालेल ?” निरामयचे आनंदाने लकाकलेले डोळे पाहून सगळ्यांनाच हायसे वाटले.

     हळूहळू सगळ्या परिस्थितीचा स्विकार केला गेला. खूप काही बदल सगळ्यांच्याच जीवनात होणार होते. त्यासाठी लागणारी ऊर्जा त्यांना एकमेकांच्या मायेच्या घट्ट धाग्यातूनच मिळणार होती. विखुरलेल्या कुटुंबाला काही काळ याच अवस्थेतून जावं लागणार होतं. त्या काळात घडणाऱ्या घटनांचे पडसाद भविष्याच्या कुपीत होते. ती कुपी थोडीही किलकिली करू नये कारण त्यातून आधी चिंता बाहेर पडतात. आयुष्य जसं आहे तसं स्विकारावं. त्याचं स्वागत करावं. मग भविष्याच्या कुपीतून आपल्याला बक्षिसं मिळू शकतात.

                                                        .................................................................................................