निर्णय - भाग १ Meenakshi Vaidya द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निर्णय - भाग १

निर्णय.भाग१ला
"कशाचा एवढा माज आलाय तुला?" मंगेशनी चिडून विचारलं .इंदीरानी मात्र चेह-यावर काही भाव न दाखवता शांतपणे आपली बॅग भरायला सुरुवात केली. मंगेशनी रागानी तिचा हात पकडून पुन्हा तोच प्रश्न केला तेव्हा ती शांतपणे म्हणाली


"मी निर्णय घेतला आहे. तो आता बदलणार नाही.""एक दिवस बाहेर राहीलीस की कळेल जगायला पैसा लागतो. तेव्हा माझ्याकडे येऊ नको हात पसरून. एक छदाम मिळणार नाही तुला. समजलं?"मंगेश जितक्या रागानी बोलत होता तेवढीच इंदीरा शांत होती. ती शांत आहे याचाच त्याला जास्त राग येऊ लागला. आत्तापर्यंत आपल्यासमोर थरथर कापणारी ही बाई आज कोणाच्या जीवावर एवढी धीट झाली आहे हे त्याला कळत नव्हतं.ते कळत नव्हतं म्हणून त्यांची आणखी चिडचीड वाढत होती. शांतपणे इंदीरानी आपली बॅग भरली. आणि ती खोलीबाहेर गेली.मंगेश दणदण पावलं आपटत तिच्या मागे गेला.ती स्वयंपाक घरात कामाला लागली. तिला उद्देशून तो म्हणाला,


"आज जेवायला मिळणार आहे नं? की तुझी बॅग भरण्याच्या नादात मला उपाशी ठेवणार आहेस?"इंदीरानी आताही भाजी चिरता चिरता शांतपणेच उत्तर दिलं,


"असं आजपर्यंत कधी झालंय? माझ्या कामामुळे तुम्हाला उपवास घडला. मला तरी आठवत नाही.या घरात इतरांचे नाही पण तुमच्या इच्छेला पहिल्या नंबरवर ठेवल्या जातं. हे तुम्ही विसरलात? तश्या बऱ्याच गोष्टी तुम्ही विसरलात." इंदिरा शांतपणे म्हणाली. मगेशच्या बोलण्याचा तिने आपल्या कामावर परिणाम होऊ दिला नाही.
हेच तर मंगेशला टोचत होतं. इंदीरेचा शांत चेहरा आणि शांतस्वर ऐकून मंगेशच्या कपाळाची शीर रागानी ताडताड उडायला लागली. त्याने तिचा दंड पकडून खर्रकन ओढला आणि बोलला,


" आजपर्यंत तोंडाला चिकटपट्टी लावून बसली होतीस कोणाच्या मदतीने माझा इतका अपमान करण्याची हिंमत करतेय सांग."


" हं… मी कुकुल बाळ आहे का? कुणी म्हणेल तसं मी वागायला? "


इंदीरा हलकं हसली आणि पुन्हा ओट्याच्या दिशेनी वळली. तसं मंगेशनी इंदीराला पून्हा मागे ओढलं.आणि विचारलं,


"तुला काय विचारलं मी? ऐकू आलं नं? मग उत्तर का देत नाहीस?"


" मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे."


एवढं बोलून इंदीरेनं भाजी फोडणीला घातली आणि कणिक मिळायला घेतली.


इंदीरेच्या इतक्या शांत हालचाली बघून मंगेशचा राग टिपेला पोचला.


" एवढी अकड! थांब तुझी सगळी अकड बाहेर काढतो."


असं म्हणून तिला मारायला स्वयंपाक घरातलाच झारा त्यानी उचलला.


त्याने तिला मारायला हात उगारला तशी इंदीरानी त्याचा हात वरचेवर पकडला. हे बघून तर मंगेशचा चेहरा रागानी वेडा वाकडा झाला.इंदीरेनी शांतपणे त्याचा हात खाली केला आणि म्हणाली,


"आता माझ्यावर हात ऊगारायचा नाही. माझ्याशी बोलताना विचार करून बोलायचं. हे माझं सांगणं नाही स्पष्ट सूचना आहे तुम्हाला. आत्तपर्यंत ज्या इंदीरेला तुम्ही बघीतलत तिला विसरा.."एवढं बोलुन ती तिच्या कामाला लागली. इंदीराच्या डोळ्यात आज वेगळीच चमक मंगेशला दिसली. आज इंदीरा त्याच्या काबूत येत नव्हती. आज तिला आपली भीती वाटत नाही आहे हे मंगेशच्या लक्षात आलं.
तो चिडून दाणदाण पावलं टाकत आपल्या खोलीत गेला. इंदीरा शांतपणे स्वयंपाक करत होती. तिस-या व्यक्तीने जर इंदिरेचा चेहरा बघीतला असता तर त्याला तिचा चेहरा स्थितप्रज्ञा सारखा दिसला असता. एवढी वर्ष इंदीरा अशी नव्हती. काही वर्षांनी प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात काही बदल करावेसे वाटतात. त्यांनी तसे ते केले तर कोण हरकत घेऊ शकतं?
मंगेशचा मात्र जिवाचा त्रागा होऊ लागला. कारण आजपर्यंत इंदीरा एक भाबडा,भित्रा ससा होती.आज अचानक तिच्यात हत्तीचे बळ कसं आलं? कुठून आलं? मंगेशला हा गुंता काही केल्या सुटत नव्हता. आजपर्यंत या घरात मंगेश म्हणेल ती पूर्व दिशा मानली जात असे.आज वेगळच घडलं होतं.


या वेगळ्या घटनेमुळे मंगेशच्या चेह-यावरचे बदलेले भाव बघून इंदीरेला आनंद झाला. पण तिने तसं दर्शवलं नाही.


इंदीरा आपल्या खोलीतील आरश्यासमोर उभी राहिली. त्या आरशानी तिच्या चेह-यावरचा कणखरपणा दाखवला. किती तरी वेळ अनिमीष नेत्रानी ती स्वतःचाच कणखर चेहरा बघू लागली. हा चेहरा बघण्यासाठी इतकी वर्ष ती आसुसलेली होती.आज अचानक तो चेहरा इंदिरेला सापडला.


आता तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मीत हास्य उमटलं. ते बघून ती हळूच आरशापासून लांब झाली. ती मागे वळली तर तिला रागानी लालबुंद झालेला मंगेश दिसला. त्याला जराही किंमत न देता ती खोलीबाहेर पडली.


****स्वयंपाकघरात काम करता करता इंदीरेला जुने दिवस आठवले. लग्नं झालं तरी मंगेश आणि इंदिरेची निवांत भेट नव्हती झाली. मंगेशचं कुटुंब खूप मोठं होतं.मंगेशला चार आत्त्या आणि सहा काका ‌होते. सगळे काका याच वाड्यात रहात.चूल एकच असली तरी प्रत्येक जण स्वतंत्र रहात असे.देवदर्शनासाठी सगळेच कुलदेवतेला गेले होते. देवदर्शनाहून आल्यावर तिच्या सासूबाई तिला म्हणाल्या,


" इंदीरा आज तुमची पहिली रात्र आहे. घाबरू नकोस.पुढल्या आयुष्याच्या इमारतीचा पाया या नव्या नवलाईच्या दिवसांतच पक्का करायचा असतो.तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.या नवीन घरात वावरताना काही अडचणी आल्या तर मला विचार.सासूला कसं विचारू हा संकोच मनात ठेऊन नकोस.कळलं?"


" हो.काही अडचण आली तर तुम्हालाच विचारीन." इंदीरा म्हणाली.


"बाईला माहेरच्या घरातून बाहेर पडून सासरच्या घरात रूजायचं असतं. सासरी असणा-या रितीरिवाजांना, घरातील माणसांना आपलसं करायचं असतं.तू शहाणी आहेस हे कळलय मला थोड्याच दिवसात. तू लवकर रुळशील आमच्या घरी. हा विश्वास आहे मला. तरी कधी काही शंका मनात आली तर विचारत जा."


" हो." इंदीरा म्हणाली.


सासूबाईंनी तिच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि त्यांची खोली दाखवली.


खोलीत जाताना इंदीरा मनोमन मोहरून आली.आजपर्यंत जे पहिली रात्र या बद्दल पुस्तकात वाचलेलं, सिनेमात बघीतलेलं होतं ते आज तिच्या आयुष्यात सगळं घडणार होतं.


इंदिरा खोलीत गेली.खोलीतल्या टेबलवर दुधाचा ग्लास ठेवला आणि पलंगावर नव-याची वाट बघत बसली.वाट बघता बघता ती खुदकन हसली. हिंदी सीनेमात दाखवतात तशी 'टिपीकल बहू' होऊन आपण नव-याची वाट बघत बसलो आहे हे तिच्या मनात आलं.


***


बराच वेळ झाला तरी मंगेश खोलीत आला नाही. दुधाच्या ग्लास कडे नजर जाताच मघाशी तिला जे पहिल्या रात्री बद्दल वाटलं ते सगळं घडलच नाही, मंगेश अजून आला नाही हे तिच्या मनाला उदास करून गेलं.वाट बघता बघता इंदीरेच्या डोळ्यात झोप रेंगाळू लागली.ती कधी झोपेच्या अधीन झाली हे तिचं तिलाच कळलं नाही. लग्नातील धावपळीमुळे आलेल्या थकव्यानी तिला भरजरी साडी, अंगावरचे दागीने काढून ठेवायचं सुचलं नाही.ती बसल्या जागीच पलंगावर आडवी झाली आणि झोपली.


***


रात्री केव्हातरी मंगेश घरी आला.पलंगावर तिच्या बाजूला अस्ताव्यस्त झोपला. मित्रांबरोबर दारुची पार्टी झाल्यामुळे मंगेश आपल्याच तंद्रीत होता.या क्षणी त्याला आपली पहीली रात्र आहे हे सुद्धा लक्षात नव्हतं. तोही क्षणात झोपी गेला.


***


त्यानंतर पहाटे कधीतरी इंदीरेला जाग आली तर मंगेश तिच्याशी धसमुसळेपणाने वागत होता. हे बघताच तिच्या डोळ्यात स्वप्नातील रोमॅंटिक पहिली रात्र मंगेशच्या धसमुसळे पणाच्या राकट वागण्यापुढे फिकी झाली.


पहिल्या रात्रीच्या गोड गुलाबी आठवणींनी जो आनंदाचा मोहोर तिच्या मनाला आला होता तो क्षणात गळून पडला.झालेल्या या पहिल्या भेटीत इंदीरेला मंगेशचा धसमुसळेपणा आणि हट्टीपणा याची झलक बघायला मिळाली .इंदीराच्या घरी कुणाचाच स्वभाव असा नव्हता. म्हणूनच घायकुतीला न येता होईल… होईल बदल काही दिवसांनी मंगेशमध्ये असा तिने विचार केला.


तिने बघीतलेल्या पहिल्या रात्रीच्या स्वप्नाला मात्र वास्तवतेचे दाहक चटके बसले. इंदीरेच्या मनाचा चोळामोळा झाला. पुढची प्रत्येक रात्र अशीच येणार का? हा तिला प्रश्न पडला. क्षणात तिला आपला नवरा परका वाटायला लागला. ती खूप तिरस्कृत नजरेनी अस्ताव्यस्त पसरलेल्या नव-याच्या देहाकडे बघू लागली.


पहिल्या रात्रीसाठी तिचं असलेलं गोड स्वप्नं पूर्ण रंगण्याची या आतच विखुरलं. भकास नजरेनी ती पलंगावर बसून राहिली. खोलीबाहेर पडल्यावर घरच्यांसमोर आनंदाचा अभीनय करावा लागणार हे तिच्या लक्षात आलं.


सकाळ होताच नववधूच्या न रंगलेल्या गोष्टींचा खोट्या आनंदाचा मुखवटा चेहेऱ्यावर चढवून तिला खोलीबाहेर जायचं आहे हे इंदिरेच्या लक्षात आलं.


आपली साडी आणि केस नीट करून चेहरा जाणीवपूर्वक हसरा ठेऊन ती खोली बाहेर पडली.

—---------------------------------------------------------

क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात

निर्णय...

लेखिका…मीनाक्षी वैद्य.