निर्णय - भाग ८ Meenakshi Vaidya द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निर्णय - भाग ८

निर्णय भाग ८

मागील भागावरून पुढे…


शुभांगी आणि तिच्या घरची मंडळी ठरलेल्या दिवशी इंदीरेच्या घरी आले.त्यावेळेस मिहीरपण होता. मेघना मात्र आली नाही कारण तिची असाईन्टमेंट पूर्ण करायची होती.


इंदिरेचं मंगेशकर बारीक नजर होती.मिहीरला धाकधुक होतं होती.ती मंडळी स्टेशनवरून जशी निघाली शुभांगी ने मिहीरला फोन करून सांगितलं. तशी इंदीरा मंगेशला म्हणाली


" मी जे काय सांगीतलं तुमच्या लक्षात आहे नं ?"

मंगेश नी नुसतं इंदिरेकडे बघीतलं


" मी काय विचारतेय?"


" दहावेळेला तेच सांगायला नको मला


"तुमच्यावर विश्वास नाही माझा"


"माझा पण तुझ्यावर विश्वास नाही."


"तुम्ही कधी कोणावर विश्वास ठेवला आहे? माझ्यावर तरी कसा ठेवावा."


"फार बोलू नकोस.मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे."


"तुम्ही रागामध्ये कोणतंही वाकडं पाऊल उचललं तर मग मी तुमची प्रतीष्ठा वगैरे बघणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा."


"काय करणार करून करून!"


"तुम्ही वाकडं वागून बघा मग कळेल."


या दोघांच्या वादावादी मुळे मिहीर अस्वस्थ होत होता.


"आई प्लीज नका वाद घालू आता."


"सांग तुझ्या आईलाच.जिथे तिथे आपला रोब झाडत असते."


"काळजी करू नको मिहीर सगळं व्यवस्थित होईल."


***

शुभांगी आणि तिच्या घरचे आले.इंदिरेनी स्वागत केलं.


शुभांगीच्या वडिलांनी मंगेशला आणि इंदीरेला हात जोडून नमस्कार केला पाठोपाठ तिच्या आईनी केला. मंगेशनेही दोघांना उलट नमस्कार केला. शुभांगीने खाली वाकून इंदिरा आणि मंगेशला नमस्कार केला.


" बसा.प्रवासात काही त्रास नाही झाला नं ?"


" नाही.आजकाल पूर्वीसारखे खडतर प्रवास कुठे राह्यलेत."


"हो खरय.आलेच." असं म्हणत इंदिरा आत स्वयंपाकघरात सरबत आणायला गेली. मंगेश गप्प होता बाकीचेच आपापसात गप्पा मारत होते.


इंदिरा नसताना या लोकांची चांगली उडवायची असं मंगेश ने मनाशी ठरवलं होतं पण घरात येताच शुभांगी ने त्याला खाली वाकून नमस्कार केला त्यामुळे मंगेशच्या मनात शुभांगीला जरा जागा मिळाली. तिला मानसिक त्रास व्हायला नको म्हणून तो गप्प राहिला.


इंदिरा सरबत घेऊन आली तशी शुभांगी पटकन उठली आणि इंदिरेजवळ जात म्हणाली


"द्या काकू मी देते."असं म्हणून तिने इंदिरेच्या हातातील ट्रे घेतला.पहिला सरबताचा ग्लास मंगेशला दिला त्याबरोबर मंगेश शुभांगीवर आणखी खूश झाला.


थोड्यावेळाने इंदिरा आतमध्ये जेवणाची तयिरी करायला गेली. तिच्या पाठोपाठ शुभांगी उठून आत गेली. इथे एक मार्क मंगेशनी शुभांगीला दिला.


हळुहळू त्याचं शुभांगी बद्दलच मत पहिल्याच बैठकीत बदलू लागलं. मंगेश इतका वेळ इतका शांत बसलेला बघून इंदिरेला आश्चर्य वाटत होतं तसंच आनंदही होत होता.


शुभांगी चे वडील जेवढं विचारत तेवढंच मंगेश बोलत होता.


"लग्नाचाच मुहूर्त काढा.साखरपुडा आदल्या दिवशी करता येईल "असं इंदिरेने सुचवलं. ते शुभांगीच्या आईवडिलांना पटलं.


एकूण शांततेत पहीली भेट आणि जेवण पार पडलं. मिहीर ने एक सुस्कारा सोडला.जोपर्यत शुभांगी कडचे लोक जात नाहीत तोपर्यंत मिहीरला धाकधुक वाटत होती.


शुभांगी कडचे दुपारचा चहा घेऊन निघाले.ते जसे रिक्षात बसले तसा इंदीराने एक सुस्कारा सोडून जरावेळ डोळे मिटून शांत बसली.


*****




"शुभांगी मुलगी चांगली वाटली मला

इंदिरा आश्चर्याने मंगेशकडे बघू लागली.


"खरच बोलतोय.तिच्या घरचे संस्कार चांगले आहेत.मला आल्या आल्या खाली वाकून नमस्कार केला."


आत्ता इंदिरेच्या लक्षात आलं मंगेशला शुभांगी का आवडली. सगळ्यात आधी मंगेशला तिने खाली वाकून ‌नमस्कार केला. त्याला महत्व दिलं. इंदिरेला शुभांगीचं कौतुक वाटलं. तिने मंगेशी नस बरोबर पकडली. त्याला सगळ्यात आधी मान देऊन दुर्गम किल्ला जिंकला.


" तुझा विश्वास बसत नाही का?"


" बसला विश्वास. खरच शुभांगी गुणी मूलगी आहे."


" कोणाला आधी नमस्कार करायचा हे तिला कळलं.घरचा कर्ता कोण हे तिला कळलं." मंगेश प्रत्येक वाक्य ठासून बोलला.


इंदिरा यावर फक्त हसली.


"हसायला काय झालं? खरं तेच बोलतोय."


" मी कुठे काही म्हटलं!"


" तुझ्या हसण्यावर मला संशय आहे."


" तुम्हाला संशय कधी आणि कशावर येत नाही ते सांगा."


" तुझ्या आताच्या वागण्यावर मला संशय आहे."


" मी काय वागले तुम्हाला संशय येईल असं?"


" आत्तापर्यंत मान वर करून न बोलणारी इंदीरा आजकाल माझ्या डोळ्याला डोळा भिडवून बोलते."


" बायको आहे तुमची. डोळ्याला डोळा भिडवून तुमच्याशी बोलले तर गुन्हा आहे का?"


" कोण तुला पाठींबा देतय एवढी नीट झालीस?"


" इतकी वर्षं सहन केलं. आता ठरवलं जे आपल्याला पटत नाही ते करायचं नाही. स्पष्ट सांगायचं."


"वा! केवढी प्रगती झाली तुझ्यात. म्हणून मुलं पण मनासारखी वागायला लागली.बापाला विचारीनाशी झाली."


इंदिरा काहीच बोलली नाही.

" बोल नं आता.गप्प का?"

" तुम्ही काहीही प्रश्न विचाराल आणि मी उत्तर देऊ?"


" सरळ प्रश्न विचारला आहे.तुझ्या मनात खोटं आहे म्हणून तुला असं वाटतंय."


" तुम्ही मला मनापासून सांगा की तुम्हाला या प्रश्नाचं नक्की काय उत्तर हवं आहे?"

मंगेश कुचकट हसून निघून जातो.

इंदिरा त्याच्या मागोमाग जाते आणि विचारते.


"असं कुचकटासारखं हसून का आलात? "


" मला कळलं."


" तुम्हाला काय विचारायचं आहे हे तुम्हालाच माहिती नाही.हे माझ्या लक्षात आलं आहे. मला त्रास द्यायचा म्हणून सतत एकच निर्रथक प्रश्न विचारू नका."


" बापरे ही मांजर वाघोबा व्हायला बघतेय." घाबरल्याचा अभिनय करतो.


"मी मांजर नाही वाघीण आहे. इतके दिवस शांत होते.आता मला ऊचकवू नका.स्पष्ट सांगते आहे."


मंगेशची आता खात्री पटली की इंदीरा बदलली आहे.


इंदीरेला बदलवणारा कोण आहे याचा आता प्रकर्षाने शोध घ्यायला हवा. याची मंगेशला पुन्हा जाणीव झाली.


विचारात घडलेल्या मंगेशला इंदीरा कधी त्याच्यासमोरून निघून गेली ते त्याला कळलं नाही.

_______________________________________

क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात.

निर्णय

लेखिका... मीनाक्षी वैद्य