Nirnay - 6 books and stories free download online pdf in Marathi

निर्णय - भाग ६

निर्णय भाग ६

मागील भागावरून पुढे


" आई मी शुभांगीला काय सांगू?" मिहीरचा आवाज रडवेला झाला होता.


" बाबांबद्दल खरं सांगायचं. ती आपल्या घरात येणार आहे तिला सगळ्यांबद्दल नीट माहिती हवी."


" आई हे सगळं ऐकून तिनी नाही म्हटलं तर!"


" नाही कशी म्हणेल एकदम. ती विचार करेल. तू तिला पसंत असशील तर इतर गोष्टीसाठी ती तडजोड करेल."


" आई तुला माहिती होतं का ग लग्नाआधी बाबा असे आहेत हे?"


" नाही.आमचा प्रेम विवाह नव्हता. ठरवून लग्न करताना मुलीला विचारण्याऐवजी मुलांच्या आजूबाजूची चौकशी करून मुलीचं लग्न लावून हीच पद्धत पूर्वापार चालत आली आहे. मुलाला चांगली नोकरी आहे,स्वतःचं घर आहे, मोठ्ठं कुटुंब आहे, हसतं खातं आहे एवढंच बघतात.आता मोठ्ठं कुटुंब बघत नाही एवढंच."


" मला भीती वाटते.आई तू सांगशील शुभांगीला?"


" मिहीर लग्न तुला करायचं आहे त्यामुळे तुलाच हे काम करावं लागेल. तिला न दुखावता सांगावं लागेल. हे सांगताना तिच्या मनात तुझ्या बाबांची किंम्मत कमी व्हायला नको हे लक्षात ठेव. ती दुस-या घरून येणार तिच्या मनात आधीच बाबांबद्दल वाईट विचार नको. लग्नं होऊन घरी आल्यावर तिला तिचे अनुभव घेतले.त्यातून तिला जे कळायचं ते कळेल.आपण आहोतच तिच्याबरोबर."


" आई तुझ्याशी बोललो की सगळा ताण निघून जातो.अगदी नेहमीच.तुझ्या शब्दात जादू आहे."


" झालं का सुरू?"


" आई ठेवतो फोन."


इंदीरानी टेबलवर फोन ठेवून मागे वळली तेवढ्यात तिचा फोन मंगेशनी ऊचलला.कोणाचा फोन होता ते बघीतलं.


" एवढ्या सकाळी काय काम होतं मिहीरला?"

" तुमची कमाल आहे तुमची! आई आहे मी त्याची त्याला आठवण आली केला फोन."


पूर्वी इंदीरा फोन लपवून ठेवल्यासारखं ठेवायची आता तेही करत नाही.करून करून काय करेल? ते सगळं भोगायची तयारी ठेवल्याने आणि मुलं सक्षम झाल्यापासून इंदीरेनी मंगेशला घाबरणं सोडून दिलं.

***


मेघना बंगलोरला जाऊन आता सहा महिने होत आले होते. तिचं पहिलं सेमीस्टर नुकतंच संपलं होतं.


" मेघना परीक्षा संपली आहे तर ते इकडे."

" यायची इच्छा आहे पण बाबांनी मला इकडे येऊ दिलं नाही तर?"

" अगं असं कसं होईल? तेव्हा आपल्याला लपून छपून करावं लागलं सगळं पण या वेळी तू बिनधास्त जाऊ शकतेस.ये ग मलाही करमेल."


" हो येते."

"शनीवार रवीवार मिहीरला सुट्टी असते तोही येईल दोन दिवस. काढा तिकीट दोघंही."


***

"आजकाल सारखे फोन चालू असतात?"

" काय म्हणायचय तुम्हाला? माझी मुलं मला चोवीस तासांत कितीही वेळेला फोन करू शकतात. "


"आजकाल तुझी जीभ फार चुरचूर चालायला लागली आहे!"


" कळलं नं तुम्हाला.आता पुन्हा विचारू नका."


"कोणी शिकवली तुला एवढी धिटाई?"


" मी काय कुक्कूलं बाळ आहे.मला कोणी शिकवायला?"


" एवढी वर्ष इतकी बोलत नव्हतीस?"


" कधी ना कधी संयम संपतो माणसाचा.तसा माझा संपला म्हणून एवढं बोलतेय.कळलं पुन्हा हाच प्रश्न विचारू नका"


मंगेशच्या प्रत्युत्तराची अपेक्षाही न करता इंदीरा स्वयंपाकघरात शिरली.


दाणादाण पावलं टाकत मंगेशनी लोअरवर अंगात शर्ट घालून पायात चपला अडकवून घराबाहेर पडला.


****



मेघना सुट्टीत आली पण जरा घाबरतच.तिला भीती वाटली की मंगेश तिला पुन्हा बंगलोरला जाऊ देईल की नाही.


"तुझी भीती अनाठायी आहे.तू ये घरी." ईंदीरेनी तिला सांगितलं म्हणून मेघना नी घरी यायची हिंमत केली.

***

मेघना आली आणि इंदीरेला खूप आनंद झाला.


मेघनाला दारात बघताच मंगेश संतापून ओरडला,

" मेघना घरात पाऊल टाकले तर बघ.तुला बंगलोरला जातानाच मी सांगीतलं होतं."


" मेघना आत ये.घाबरू नकोस."

" इंदीरा…" मंगेश जोरात ओरडतो.


" हे घर माझंपण आहे. तुम्हाला मेघना आलेली आवडलं नसेल तरी मेघना घरात येईल. ती मला भेटायला आलेली आहे. तुम्हाला पसंत नसेल तरी ती घरात येईल.ये मेघना."


मेघना इंदीराकडे बघत राहिली. ही आपलीच आई आहे नं! की कोणी दुसरी आहे हा तिला प्रश्न पडला.


मेघना आल्यामुळे इंदीरेचा वेळ छान जाऊ लागला.


"आई बंगलोरचं माझं काॅलेज खूप मस्त आहे.तिथले सर मॅडम इतके मस्त शिकवतात. त्या रूपात म्हणून साऊथ इंडियन मॅडम आहेत त्यांचं इंग्लिश इतकं सुंदर आहे.त्या बोलायला लागल्या की ऐकत रहावस वाटतं."


" तुला काॅलेज आणि तिथला स्टाफ आवडला हे वाचून छान वाटलं. तिथे तुझ्या मैत्रीची अशा आहेत?"


" छान, हुशार,अभ्यासू. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे तारा आणि वैष्णवी मध्ये. कितीतरी वेळ आम्ही पुढील गोष्टींबाबत चर्चा करत असतो. एकदा नं…"


बोलता बोलता मेघना गप्प बसली.ती गप्प का बसली म्हणून इंदीरेनी तिच्याकडे बघीतलं मग दाराकडे बघीतलं. मंगेश दारात उभा राहून या दोघींच्या गप्पा ऐकत होता आणि रागानी दोघींकडे बघत होता.


"तिकडे उभं राहून आमच्या गप्पा ऐकण्या पेक्षा इथे येऊन बसा. ऐका."


" मला इच्छा नाही तुमची थेरं ऐकायची."


" मग कशाला उभे राहता आमच्या गोष्टी ऐकायला? थेरं हा शब्द कशासाठी वापरतात हे तुम्हाला माहीत नाही याचं मला नवल वाटतं."


एवढं बोलून इंदीरा मेघना कडे वळली.

मंगेश रागाने निघून गेला.


"आई तू केवढी बदललीय ! बाबांना तू चक्क ठणकावून सांगितलं.आई मला तुझा खूप अभिमान वाटतो." असं म्हणून मेघना नी इंदीरेला मिठी मारली.


"मेघना मी इतकी वर्ष गप्प राहीले.आतापण गप्प राहिले असते तर तुम्हा दोघांचं भविष्य

फार बरं घडलं नसतं.हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी ही कडक पावलं उचलली. हे आपल्या घरी व्हावं हे मला फारसं पसंत नाही. पण आई म्हणून मी तुमच्या पाठीशी उभी नाही राह्यले तर काय उपयोग. यांच्या अश्या स्वभावामुळे मी आयुष्यात घरात राहण्याव्यतीरिक्त काहीच करू शकले नाही. तुमच्या इच्छांना मला कुंपण घालायचं नव्हतं.म्हणून मी धीट झाले.


इतकीवर्ष घेतलेलं मवाळपणाचं सोंग काढून फेकलं."


इंदीरा बोलायची थांबली थांबली तशी मेघना नी तिला घट्ट मिठी मारून म्हटलं.

" माझी आई जगात सगळ्यात बेस्ट ममा आहे."

बोलताना मेघनाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED