निर्णय भाग५
मागील भागावरून पुढे…
मिहीर ने एकदा वेळ बघून शुभांगीला विचारलं. तिनी विचार करायला वेळ मागीतला. नंतर मिहीरचा इंदीरेला फोन आला.
" आई मी शुभांगीला विचारलं. तिनी वेळ मागीतला आहे विचार करायला."
" तिचं बरोबर आहे.आता तिनी काही सांगेपर्यंत तिला विचारु नकोस. एका दिवसात किंवा काही क्षणात लग्नाचा निर्णय घेता येत नाही.तू तिला सुरवातीपासून त्याच नजरेनी बघतो आहेस.तुला तिच्या बद्दल बरीच माहिती आहे पण तुझ्या मनात काय आहे हे तिला आत्ता कळलं आहे.तुझ्या मनात असं काही आहे याचा अंदाज बहुदा तिला आधी आला असेल.मुलींच्या लक्षात येतं.त्यामुळे तिला स्वतःहून विचारू नकोस."
" ठीक आहे." मिहीरने फोन ठेवला.
इंदीरा फोन ठेवून मागच्या अंगणातील बगीच्यात जायला वळली तसं तिच्याकडे मंगेश संन्याशी बघत होता.इंदीरेन त्याच्याकडे बघून न बघीतल्यासारखं केलं आणि ती बागेत गेली.
***
फोनवर मिहीर काय बोलला असावा याचा अंदाज मंगेशला आला. आजकाल त्याची सततच चिडचीड व्हायची कारण डोळ्या आड असणारी दोन्ही मुलं आजकाल त्याला विचारत नसतं आणि डोळ्यासमोर असणारी इंदीरा त्याला किंमत देत नव्हती.त्याचं त्यांच्या घरातील सिंहासन डळमळायला लागलं होतं. आपलं महत्व कमी होतंय हे त्याला कसं सज्ञन होईल? मंगेशी आजूबाजूच्या लोकांवर सत्ता गाजवण्याची वृत्ती होती.ती एकदम कशी जाईल.
तो चिडलेल्या अवस्थेतच पायात चप्पल अडकवून बाहेर पडला.
***
बागेत झाडांची आळी नीट करता करता इंदीरेच्या डोक्यात भरपूर विचार चालू होते.शुभांगीनी जरी हो म्हटलं,तिच्या घरच्यांनी जरी हो म्हटलं तरी मंगेश काय घोळ घालेल यांचा अंदाज तिला येत नव्हता.नेहमीप्रमाणे ती आपल्या मनातील खळबळ या तिच्या मित्राने वळ झाडांजवळ बोलून दाखवत तिचं काम चालू होतं.
मिहीर आता नोकरीमध्ये स्थिरावला आहे.मेघनाचं येणारं वर्ष शेवटचं.तेव्हा नोकरीसाठी कॅम्पस मधून सिलेक्ट झाली तर लगेच नोकरीला लागेल. नंतर एखाद्या वर्षानी तिच्याही लग्नाचं बघावं लागेल.
तिच्या आधी मिहीरचं लग्नं झालं पाहिजे. या सगळ्या विचारांमध्ये बराच वेळ गेला.झाडांची मशागतपण झाली.पाण्याची ट्यूब झाडांमध्ये सोडून डोकं शांत ठेवत ती घरात शिरली.
****
देवाच्या पुजेची तयारी करता करता तिला आठवलं शुभांगी नी मिहीरला हो म्हटलं. मिहीरनी ही आनंदाची बातमी तिला लगेच दिली.नंतरच्या शनीवारी मिहीरनी व्हिडीयो काॅल करून तिची शुभांगीशी ओळख करून दिली. बराच वेळ बोलत होते तिघंही. बोलण्यावरून शुभांगीची विचार करण्याची पद्धत, तिचं धेय्य, तिचे छंद अश्या वेगवेगळ्या विषयांवर इंदीरा तिच्याशी बोलत होती. इंदीरेलापण शुभांगी आवडली.तिनी शुभांगीला सांगितलं
" मिहीर मला तुझी पसंती आवडली.शुभांगी तुझं आयुष्य छान सुंदर करेल."
"थॅंक्यू आई
" काकू थॅंक्यू. तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे.
"मिहीर चे बाबा कुठे दिसत नाहीत?"
" ते बाहेर गेले आहेत बहुतेक." तेव्हाच मागून आवाज आला
"मी इथेच आहे.मी कुठेही बाहेर गेलेलो नाही."
"अरे तुम्ही घरीच आहात मला वाटलं तुम्ही बाहेर गेलाय. इंदीरेनी सारवासारव केली.
"तुझ्या सोयींनी तुला बरंच काही वाटत असतं. मंगेशचा आवाज चिडका होता.
"हे बघ शुभांगी मिहीर चे बाबा"
"नमस्कार काका.मी शुभांगी मिहीर ची मैत्रीण."
"ठीक आहे.मी ओळखत नाही तू कोण शुभांगी आहेस."
शुभांगीचा चेहरा हे ऐकून पडला तसं मिहीरला टेन्शन आलं.
"हे बघ मिहीर मी नंतर फोन करते."
" हो." हे मिहीरनी म्हणेपर्यंत इंदीरेनं फोन कट केला.
" छान सगळं ठरल्यावर बापाची ओळख करून देतेय. मी आत्ता नसतो आलो तर सरळ लग्नाच्या वेळेसच कळवलं असतं !"
" असं कसं करू आम्ही? लग्नाला बोलावणार आहे तुम्हाला. मिहीरचे बाबा आहात तुम्ही तुमचा मान महत्वाचा."
" होका मला आजच कळलं की मला या घरात मान आहे. धन्यवाद मॅडम." ऊपहासानी मंगेश म्हणाला
"तुम्ही जर प्रेमाने बोलत असतात तर माझ्याबरोबर मिहीरने तुम्हालापण ही गोष्ट सांगितली असती. पण तुम्ही कधी मुलांचं मन जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही मग मुलांना कसं त्यांच्या मनातलं सगळं तुम्हाला सांगावं वाटेल? टाळी एका हाताने वाजत नसते तसंच नातंपण एकाच बाजूने जोडल्या जात नाही."
" वा! आज इंदीरा मॅडम तुमचं प्रवचन ऐकून मी धन्य झालो."
"प्रवचनात जे ऐकलं त्याप्रमाणे तुम्ही आचरण केलं तरच त्याचा फायदा होईल अन्यथा पालथ्या गडावरून पाणी असंच होणार."
"मला टोमणे मारलेले कळतात. काही गरज नाही मला ते आचरणात आणण्याची."
"नका आणू. जबरदस्ती नाही. कोणतीही गोष्ट जबरदस्ती नी होत नसते."
मंगेश दोन्ही हात जोडून नमस्कार करत म्हणाला
"मला फार वेळ सत्संग नको आहे."
इंदीरा गालातल्या गालात हसत स्वयंपाकघरात गेली.
शुभांगी बद्दल कळलय मंगेशला ते बरंच झालं. सगळं पुढे जाण्याअगोदर कळलं तेच बरं झालं. आणखी उशीरा कळलं असतं तर गहजब केला असता त्याने कुणास ठाऊक! अजूनही मंगेश काय करेल याचा अंदाज इंदीरेला येत नव्हता.
***
शुभांगीला मिहीरच्या वडिलांचं वागणं काही कळलं नाही. ती जरा बुचकळ्यात पडली. मिहीरकडून त्याच्या बाबांबद्दल फारसं काही कळलं नव्हतं. आज जे काय कळलं ते नेमकं काय होतं? हा प्रश्न तिला पडला. हे प्रश्न तिला पडले आहेत याचा अंदाज मिहीरला आला.
त्याने तिला समजावलं आणि मनाशी ठरवलं की शुभांगीच्या मनात उठलेल्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यायची हे आईला विचारून मगच तिच्याशी नीट बोलायचं. आता कसंबसं शुभांगीला समजावून सांगून मिहीरने तिला तिच्या घरी सोडलं.
—---------------------------------