निर्णय भाग १०
मागील भागावरून पुढे..
मंगेशच्या या नवीन पावित्र्यामुळे इंदिराला फार संताप आला.माणसानी किती आपल्या अहंकाराला जपावं.पोटच्या मुलाचं लग्नात अश्या पद्धतीने खोडा टाकायचा.
इंदीरानी मनाशी काहीतरी ठरवलं आणि ती बागेत आली. झाडाला आळं करता करता तिने शरदला फोन लावला. इंदीरेनं आपल्या कानात मुद्दाम हेडफोन घातला होता आणि तिचं सगळं लक्ष दाराकडे होतं. मंगेशचा काही भरवसा नाही कधीही तो आपलं बोलणं ऐकायला मागे येईल अशी शक्यता इंदीरेला वाटत होती म्हणून हा सावधपवित्रा इंदिरेने घेतला.
" हॅलो, वहिनी बोला."
"शरद भाऊजी आज संध्याकाळी घरी आहात का?"
" हो.काही काम आहे का?"
"आज यांनी वेगळाच गोंधळ घातलाय. म्हणून तुमच्याशी बोलायला यायचं होतं."
"मंगेशनी गोंधळ घातला आहे.कमाल आहे मंगेशची. या वहिनी "
"ठीक आहे."
इंदीरेनी फोन ठेवला.
***
संध्याकाळी इंदिरा तिच्या नवीन साड्या घेऊन निघाली बरोबर मेघना पण होती.
"कुठे निघाल्या?"
" टेलरकडे."
" कशाला?" मंगेश नी नेहमीच्याच संशयी सुरात विचारलं.
"लग्नासाठी घेतलेल्या साड्या फाॅलपिको करायला द्यायला चालले आहे."
" इतक्या आधीपासून?"
" लग्नसराई आहे.टेलरकडे खूप काम असतं. चल मेघना."
मंगेशला फार स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत न पडता इंदिरा मेघनाला घेउन बाहेर पडली.
***
शरद आणि प्रेमा इंदिरा आणि मेघना ची वाटच बघत होते.
" प्रेमा मला कळत नाही या मंगेश नी काय घोळ घातला आहे?" सचिंत चेह-यानी शरद म्हणाला
"तुम्हाला मंगेश भावजींचा स्वभाव माहिती आहे नं.काहीतरी कारण काढलं असेल."
" कसला एवढा इगो या माणसाला कळत नाही.प्रत्येक वेळी आपलच म्हणणं खरं करायचं एवढंच फक्त त्याला कळतं. बाकीच्या लोकांच्या इच्छा याच्या दृष्टीने काही महत्वाच्या नसतात.याचाच मला राग येतो."
" होनं. इंदीरा वहिनी शांत आणि समजुन घेणा-या आहेत म्हणून सगळं ठीक आहे."
प्रेमा म्हणाली.तेवढ्यात इंदिरा आणि मेघना शरद कडे येऊन पोहोचले.
" वहिनी मंगेशनी काय घोळ घातला आहे?"
शरदने त्या दोघींना खुर्चीवर बसण्याची ही उसंत दिली नाही.
" अहो जरा त्यांना श्वास घेऊ द्या,काही क्षण बसू द्या." प्रेमा म्हणाली.
" प्रेमा आता बसून चालणार नाही.लवकर कृती करायला हवी.मिहीरच्या लग्नाला आता फार दिवस राहिले नाही." इंदीरा म्हणाली.
" झालं काय?"
शरदने विचारताच इंदिरेने घडलेला प्रकार सांगितला.हे ऐकताच शरद फारच चिडला.
" मंगेश कधीच कोणाचा विचार करत नाही फक्त त्याचं सगळ्यांनी ऐका. इतरांच्या भाव भावनांचा तो कधीच विचार करत नाही. जे अगदी चुकीचं आहे.पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अशी परिस्थिती आहे."
" मी ठामपणे सांगितलं आहे की मी व्यवस्था करीन. मिहीर काही पैसे देईल. त्याला कर्जच काढावं लागेल. भाऊजी थोडंफार तुम्हाला मदत करावी लागेल."
" वहिनी तुम्ही काळजी करू नका.मी करतो पैशांची सोय."
यावर नंतर बरीच चर्चा झाली.
इंदिरा आणि मेघना दोघी घरी जायला निघाल्या.शरदच्या बोलण्याने दोघींनी नि:श्वास सोडला.
***
दोघी घरात शिरताच मंगेश नी उलटतपासणी घ्यायला सुरुवात केली.
" एवढा उशीर का झाला?"
" तुम्ही काय माझ्यावर लक्ष ठेवता? तुम्हाला मी कुठे जाते काय करते हे सांगण्याची गरज नाही."
" नवरा आहे मी तुझा."
" ओरडू नका.माझ्याशी बोलताना आवाज खाली ठेवायचा.मला खूप कामं आहेत."
इंदीरा निघून गेली. ती एवढ्या वेळ कुठे गेली होती हे शेवटी मंगेशला कळलंच नाही. याचाच त्याला फार राग आला.
*****
इंदिरा ने मिहीरला सगळी कल्पना दिली.ती पुढे असंही म्हणाली
" मिहीर बाबांनी मध्येच खोडा टाकण्याचा काम केलय.तू काळजी करू नकोस."
" बाबा असं का वागतात ग प्रत्येक वेळी. इतर लोकांना त्यांच्या मनासारखं करायचं असतं हे लक्षात येत नाही का त्यांच्या?"
" सगळं लक्षात येतं.पण त्यांचा स्वभाव असाच आहे.त्यांना जे करायचं आहे किंवा जे करावसं वाटणार तेच ते करणारं. कुटूंबातील इतर व्यक्ती या त्यांच्या दृष्टीने माणसं नाहीत तर त्यांचा हूकूम पाळणारे दास आहेत. मिहीर एक गोष्ट तू लक्षात ठेव की लग्नं झाल्यावर शुभांगीशी तू असं वागायचं नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्याला इच्छा असतात, अपेक्षा असतात हे लक्षात ठेव."
" हो आई तू जे म्हणतेस तसंच वागीन. बाबांच्या या स्वभावामुळे माझं लहानपण कसं गेलं हे मला चांगलंच माहीत आहे. त्याचबरोबर तुझ्याशी ते कसे वागले हेही मला माहीत आहे त्यामुळे शुभांगीच्या बाबतीत आणि माझ्या मुलांच्या बाबतीत ही चूक अजीबात करणार नाही."
" गुड."
" कोणाचा फोन आहे?" मंगेशनी विचारलं.
इंदीरेने फोन स्पीकर वर टाकला आणि म्हणाली,
" मिहीर मी फोन स्पीकर वर ठेवला आहे.बाबा आहेत माझ्या बाजूला.तू बोल."
" अरे आई बाबा असताना का फोन स्पीकर वर ठेवला?"
" मिहीर तुझं लहानपण कसं गेलं हे तू सांग त्यांना आत्ता. कारण ही छान संधी आहे. त्यांना वाटतं मी दोन्ही मुलांना भडकवलं आहे. तू तुझा अनुभव बिनधास्त सांग.त्यांना कळू दे त्यांच्या हेकटपणामुळे त्यांच्या मनासारखं झालं पण मुलांचं काय आणि किती नुकसान झालं. बोल तू न घाबरता मी आहे."
" वा! छान.मुलांना छान शिकवण दिली आहे."
" आधी ऐका मिहीर काय म्हणतोय.तुम्हाला कळलं पाहिजे तुमची मनमानी थांबवली पाहिजे. बोल मिहीर.
" बाबा तुम्ही खूप हुशार आहात.तुमच्या करीयर मध्ये तुम्ही खूप नाव कमावलं पण आपल्या मुलांना तुम्ही कधी वेळ दिला नाही. तुम्हाला आठवतं तरी का आम्हाला परीक्षेत किती मार्क मिळवायचे? वर्गात कितवा नंबर यायचा? प्रगतीपत्रकावर सही करायला सुद्धा तुम्हाला वेळ नसायचा. आम्ही मोठे होत असताना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला तुम्ही हवे असायचे पण तुम्हाला वेळच नसायचा. आम्ही लहान असताना तुम्ही आमची कधी पापी घेतलेली कधी आठवतंय." हे बोलताना मिहीरचा आवाज गहिवरला.
" मिहीर बस कर तुझी बडबड. हे सगळं बोलायला आईनीच सांगीतलं असेल म्हणून करतोय पोपटपंची.तुला कुठे आहे एवढं डोकं? तू तर.."
इंदीरा मंगेशचं बोलणं मध्येच कापत म्हणाली
"मिहीर आता यापुढे तुझ्या मनातील कुठल्याही भावना बाबांना सांगायच्या नाहीत. कारण त्यांना तुझं मन, तुझ्या भावना समजूनच घ्यायच्या नाही.ठेव फोन."
इंदिरेनं रागानी फोन बंद केला आणि चिडून ती मंगेशला म्हणाली,
"तुमचं काळीज दगडाचं आहे हे आज पक्कं कळलं. मुलाशी कसं बोलता. तुमचं प्रेम मिळवण्यासाठी दोघंही धडपडत राहिली पण तुम्हाला किंमत नाही त्याची. तुमचं विचीत्र वागणं तुमच्या जवळच ठेवा.यापुढे तुमच्या विचीत्र वागण्याला मी आणि माझी मुलं बळी पडणार नाही. कळलं."
इंदिरा रागानी निघून गेली. मंगेशला काहीच फरक पडला नाही कारण मंगेश अतिशय अप्पलपोटा, आतल्या गाठीचा आणि फक्त स्वतःला महत्व देणारा माणूस होता.
***
मिहीरच्या लग्नानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलायचा निश्चय इंदिरेने केला.आपण आयुष्यभर ज्या विचीत्र स्वभावाच्या नव-याशी जमवून घेतलं तसं शुभांगीला विचित्र स्वभावाच्या सास-याशी जमवून घेण्याची जबरदस्ती व्हायला नको.त्यामुळे आत्तापासूनच मंगेशशी वागताना 'अरे ला कारे' हाच मंत्र वापरायचा. असा निश्चय करून इंदिरा पुढील कामाला लागली.
__________________________
क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात
निर्णय भाग १०
लेखिका…मीनाक्षी वैद्य.