हिरवे नाते - 9 - कॉकटेल पार्टी Madhavi Marathe द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हिरवे नाते - 9 - कॉकटेल पार्टी

                                                                                      कॉकटेल पार्टी - 9

   विदुला विचारमग्न होऊन बसली होती. लंचटाईम झाला याचही तिला भान नव्हतं. कामं समोर तशीच पडली होती.

  “ विदुला, अग चल ना जेवायला.” आभा म्हणाली.

  “ नको आभा, तू ये जेऊन. मला भूक नाहीये. फक्त माझ्यासाठी कडक कॉफी पाठवून दे.”

  “ का ग ? बरं नाही ?” आभा

  “ नाही असच.” विदुला

 तिची बोलायची इछा नाही हे पाहून आभा पुढे सरकली. विदुलाची कडक कॉफी सांगून जेवायला निघून गेली. कडक कॉफीतून बाहेर पडणाऱ्या पांढऱ्या वाफाणकडे बघत विदुला आपल्या विचारात हरवून गेली. अतिशय आवडीने तिने b.a केलं होतं. उत्तमरितीने पास झाल्यावर एका मोठ्या फर्ममध्ये तिला नोकरी मिळाली होती. तिच्या सारख्या करियरिस्ट मुलीला याहून चांगली संधी कोणती मिळणार होती.

   विदुलाला भूतकालातल्या घटना समोर दिसू लागल्या. ही नोकरी मिळाल्यावर बाबा जरा विचारमग्न झाले होते. ते तिला समजावणीच्या सुरात म्हणाले “विदुला तू याचा नीट विचार केला आहेस ना ? अश्या फर्म मध्ये काम करण्याआधी तू छोट्या फर्मचा अनुभव घे. एकदम इथे जॉइन झालीस तर कदाचित तुला नीट सामना करणं जमणार नाही. हळूहळू येणाऱ्या अनुभवातून माणूस प्रसंगी योग्य प्रकारे सामना करू शकतो. एकदम प्रसंग आला तर पूर्वतयारी, पूर्वसूचना नसल्यामुळे माणूस कमजोर पडतो. त्याला लढता येत नाही. मग ती हार शारीरिक असो किवा मानसिक, दोन्ही स्वरूपात ती येऊ शकते.”

   “ काही तरी काय बाबा, इतकी चांगली फर्म सोडून कुठे जाऊ ? अनुभवानीच माणूस तयार होतो ना ?” विदुला

 “ नाही बेटा. काही वेळेस अनपेक्षित अनुभव आला तर माणूस खचतो. भारी....

 “ओ .. बाबा फरगेट इट. आता आपण छान बाहेर जेवायला जात आहोत. आणि तुम्ही आहात की ...... चला उठा बरं !”

   लेकीच्या फुललेल्या चेहेऱ्याकडे बघून क्षणभर त्यांना वाईट वाटलं. पण इलाज नव्हता. केव्हा ना केव्हा या जगात उतरायचेच आहे आणि अनुभव गाठीशी बांधायचे आहे तर आत्ताच का नाही ? जाऊ दे तिची तिला टक्कर घेऊ दे.

“ ठीक आहे विदुला. मी बापाचे कर्तव्य केले. पुढे तू जाणे आणि तूझी फर्म जाणे. चल सगळे अनुभव एन्जॉय कर”

  नंतर बाबानी दखल दिली नव्हती. विदुला ऑफिसमध्ये आली. तिथलं खेळीमेळीचं वातावरण पाहून सुखावली. आभा सारखी जिवलग मेटरीनही मिळाली. तिचा बॉस तिच्या कामावर खुश होता. तरी आभाने सावधगिरीचा इशारा देऊन ठेवला. एका शनिवारी संध्याकाळी बिझनेस पार्टी होती. बॉस बरोबर तिलाही इनवहिटेशन होतं. ओळखी वाढणार, नवीन विषयांचं नॉलेज मिळणार या विचारानी ती अगदी भारावून गेली. पार्लरमधे तासभर बसून मेकप केला. दहा ड्रेस आरशासमोर बदलून शेवटी पहिलाच घातला. सगळ्यांकडून पसंतीची पावती घेऊन बॉसच्या कारमधे जाऊन बसली.

  “ तुमचं ऑफिस मधलं काम छान असतं. पण तुम्ही अजून तुमच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला प्रोमोशन कसं मिळणार ?” बॉस

  “ हो सर, मी अजून लक्ष देऊन काम करेन.”

  “ जरा खिडकी उघडतो .” असं म्हणत त्यांनी तिच्या शरीरावर ओणवून तिच्या बाजूची खिडकी उघडली, आणि हात ओझरता मांडीवरून फिरवला. तशी ती शहारली. घृणेची लाट सगळ्या अंगातून पसरत गेली. अजून अंग चोरून ती कोपऱ्यात सरकली.

   “ अरे! तिकडे कोपऱ्यात कुठे घुसता? जरा इकडे सरका, बोल्ड बना. तुम्ही फारच नवशिकया दिसता.” बॉसची नजर तिच्या अंगभर भिरभिरली. काय कराव न सुचून ती खिडकीबाहेर पहात राहिली. हॉटेल आल्यावर बॉसनी उतरून तिच्या कमरेत हात घातला. तशी ती धुसपुसली. तिच्या दंडाला धरून ते जरबेने म्हणाले “ इथे असच वागावं लागतं. एवह्ढही कळत नाही ? मॅनर्स शिकता येत नाही तर येता कशाला नोकऱ्या करायला ?” एव्हाना विदुलच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं होतं. तेव्हढ्यात एक जण त्यांच्याकडे हाय करत आला आणि ती तशीच खेचली गेली. हेलो, हाऊ आर यू चे मॅनर्स पाळत सगळ्यांची ओळख करून घेत होती. बघता बघता तिच्या लक्षात आलं. इथे कुठल्याही प्रकारची वेचारिक देवाण घेवाण होत नाही तर बिझनेस टॉक या नावाखाली काळाबाजार चालू आहे. इतके लाख, तितके लाख अश्या लाचलुचपतिणी कोनतऱ्क्ट साईन होत आहेत. आपल्या कमरे मधे हात घालून आणलेल्या मुलींची पण देवाणघेवाण होत आहे. हॉटेलमध्ये आल्यावर आपल्या कमरेत हात घातलेली एक मुलगी पाहिजे असा जणू रिवाज होता. ती हादरली. सुशिक्षित स्त्रियांची ही परवड ? शेवटी तिची पायरी एक व्यापार म्हणून ? “ अगं इथे काय उभी राहिलीस ? चल जेवायला.” म्हणून बॉसनी जेवायच्या टेबलकडे नेलं. आता विदुलानी विचार करणं सोडून दिलं. जसा पार्टीचा ओघ वहात जाईल तसं तिने स्वताला सोडून दिलं. पार्टी संपल्यावर ते गाडीत जाऊन बसले. काय करावं समजत नव्हतं. त्यांच्या बरोबर जाणंही भागच होतं. शेवटी विदुलाने झोपायचे नाटक केले. तसं बॉसनी अंगावरून बोटं फिरवायला सुरवात केली, तेव्हा विदुला त्याच्या अंगावर धाऊन गेली. अचानक झालेल्या हल्ल्याने बोसही घाबरला. गाडी सरळ घरासमोर आणून उभी केली. मागेही न पहाता विदुला धावत घरात शिरली. बाबा सर्व काही उमगले. ह्या जगाच्या अनुभवातूनच ते गेले होते. पण आताचा काळ जरा जसतीच पुढे गेल्यामुळे त्यांना लेकीची काळजी वाटत होती. त्यांनी तिला समजावलं. धीर दिला.

    कोलमडून पडलेली विदुला दुसऱ्या दिवशी नव्या निश्चयाने ऑफिसमधे गेली. कारण आता रूप पालटणार होतं. गेल्या गेल्याच तिच्या हातात मेमो पडला. कामात असंख्य चुका आढळून आल्याचं त्यात म्हंटल होतं. तिच्या प्रत्येक हालचलीवर बॉस आता नजर ठेवून होता. छोट्या चुकीला मोठी शिक्षा मिळत होती. सगळे फक्त पहाण्याचे काम करू शकत होते. दूसरा इलाज नव्हता. ती पण आता सरावली होती. आपण जसं एखादं पेंटिग आवडीने लावतो आणि काही दिवसानी त्याला नजर इतकी सरावून जाते की कालांतराने त्याची दखलही घेतली जात नाही. तसच विदुलाचं झालं. मानसिक त्रास देण्यापलिकडे बॉस काही करू शकत नाही हे तिच्या लक्षात आलं

   आणि एक दिवस त्याच्या बदलीची ऑर्डर आली. सगळयानीच एक निश्वास टाकला. पण विदुलाला आता नव्या बॉसच्या स्वभावाची काळजी लागली. आता हा पण असाच असेल तर किती दिवस सहन करायचं ? तो कसा असेल ? कसा वागेल ? या परशनानी ती बावरून गेली. “ अगं विदुला लक्ष कुठे आहे तुझं ? कॉफी पण थंड झाली बघ.”

 भूतकालातून बाहेर येत विदुला म्हणाली “ अरे! जाऊ दे चल आपण दुसरी कॉफी पिऊन येऊ. पाय जरा मोकळे होतील.” “ काय ग तुझा हा लहरी स्वभाव .” गप्पामध्ये खिदळत परत दोघी कॉफी पिऊन आल्या. दिवस जाऊ लागले. नवीन बॉस आणि स्टाफ एकमेकात रुळू लागला. सध्यातरी तो चांगला वाटत होता. निदान काट्यावर चालायची तरी कसरत संपली होती. तिला थोडं हाइस वाटलं. जीवन परत खेळीमेळीचं वाटू लागलं. पण शेवटी तिला जी भीती होती, ती पार्टी आलीच. आपल्या मनाला धीर देत, कसंबसं तयार होऊन बॉसच्या गाडीत जाऊन बसली.

  “ गुड, अगदी वाटत होतीस तशीच आहेस.”

 “ म्हणजे कशी ?” जरा रागातच विदुलाने विचारले.

 “ सोबर .” शांत स्वरात त्यांनी उत्तर दिले.

 विदुलाला थंड पाण्याचा शिडकावा झाल्यासारखे वाटले. भणाणत्या वाऱ्यात उडणाऱ्या बटा सावरत गुपचुप बसून राहिली. तिला मग काही वेळाने जाणवलं ते ही शांतपणे गाडी चालवत आहे . शेवटी विदुलाच म्हणाली “ शांत का बसलात, बोला ना काहीतरी.”

  “ समोरच्याची बोलायची तयारी नसेल तर आपण एकट्याने कंठशोष करू नये. एव्हढं कळतं मला.” विदुलाच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. तसे ते ही हसले . मग एकमेकांशी गप्पा मारत हॉटेलपाशी आले. उतरल्यावर सराईतपणे त्यांनी तिच्या कमरेत हात घातला. तशी ती धुसपुसत म्हणाली “ तुम्ही सुद्धा तसेच आहात तर ..”

   “ चल आधी, नंतर काय म्हणायचे ते म्हण .”

 जगावरच विश्वास संपल्यासारखी ती हताश झाली. यांत्रिकपणे पार्टीचे सोपस्कार पार पाडू लागली. विखुरलेल्या कलीडओसऑपचे रंग तयार करू लागली. पार्टी संपली. गाडी सुरू झाली आणि टर्न घेऊन विरुद्ध दिशेला धाऊ लागली. “ कुठे नेताय तुम्ही मला ?” कापऱ्या पण जरबेच्या स्वरात ती ओरडली. “ गप्प बईस. फार वेळ झाला नाहीये . तुला वेळेत घरी पोहोचवतो .” बॉस ओरडला .

 पण मधला वेळ काय करणार ? या कुशंकेने ती घाबरली . अचानक उसळत्या समुद्रावर गाडी थांबल्याचं तिला जाणवलं . पोर्णिमेचं चांदणं त्या सागरावरून उसळून येत होतं. चंदरची चमचम लाटांशी खेळत होती. खारा वारा मनाला उभारी देत होता. तिने निश्वास सोडला. निदान इथे तरी ते काही करू शकणार नव्हते. तो उसासा त्यांनी एकला, तसे ते खवळले आणि ओरडून म्हणाले “ तुम्ही काय सगळ्या पुरुषणा सारखच समजता का ग ? नीतीमत्ता काय फक्त तुमची वारसदार आहे ? एका पुरुषावरून सगळ्या पुरुषणा बदनाम करत रहाता. रोजच्या व्यवहारात पुरुष तुम्हाला साथ देत नाहीत ? तुमचं अडलेलं काम करतात, लिफ्ट देतात, कुणी वेडवाकडं बोललं तर प्रसंगी पुरुषच हाणामारी करायला उठतात ना ? तू म्हणशील आम्ही स्वताला वाचवू शकत नाही का ? पण त्यातून तुम्हाला बाहेर काढायला पुरुषच जास्ती मदत करतात.” विदुलाच्या डोळ्यासमोरून बाबा तरळून गेले.

 “ तुझ्या कमरेभोवती हात टाकला तेव्हा मी तुझ्याकडून मदत घेत आहे याची जाणिव मला होती. तुला त्यातली स्निग्धता जाणवली नाही ? या मोठमोठ्या हॉटेलमधून व्यापार आणि वासनाच चालते असे तुला वाटते का ? बिझनेस चालवायचा म्हणजे केव्हढीतरी टेंशन असतात. ती हलकी करण्यासाठी स्त्रियाना, पुरुषणा एंजॉयमेंट, बिजनेसच्या नावाखाली नुसत्या या पार्ट्या नसून त्यातील खाचाखोचा जाणून घेणं, नवीन मार्ग उपलब्ध करून देणं अशाही बाबी असतात. त्या व्यवसायात काम करणारे ते समवयीन इतके मिसळून गेलेले असतात की एकमेकांच्या हातात हात घालून खऱ्या अर्थाने बरोबरीने पावले टाकतात. बाहेरच्या पहाणाऱ्याला ते चवचाल किवा व्यापार दृष्टीचा उपभोग असं वाटतं. पण प्रत्यक्षात तसं नसतं. तिथे ज्याला जे पाहिजे त्याचं मिश्रण असते. तुम्ही ते शोधून तुमचा ग्रुप तयार करावा लागतो. लंपट पुरुषा प्रमाणे लोचट बायकांचीही तिथे गर्दी असते. आपलं ज्ञान समृद्ध करून घेणाऱ्या स्त्री पुरुषांचीही तिथे गर्दी असते. सगळं जगच एक कॉकटेल पार्टी आहे. आपलं ज्याच्याशी जमतं तिथे जायचं. आपण आपल्या बुद्धीनुसार, विचारानुसार माणसं निवडतो आणि ग्रुप जमवतो. त्यात आपलच चांगलं, दुसऱ्याचं वाईट असं म्हणू शकत नाही, कारण त्यांचा जगायचं दृष्टिकोण आपल्या दृष्टीपेक्षा वेगळा असतो.”

 “ सर,” विदूलानी त्यांची तंद्री मोडली. समजलं सर तुम्हाला काय म्हणायचं आहे ते . मी उगीचच गेरसमज करून घेतला. माझ्या बाबाना जे सांगायला जमले नाही ते तुम्ही अगदी सहज सांगितलं. आता आपलं कॉकटेल जमलं ना ?” खट्याळपणे हसत ती म्हणाली.

   दोघं घरच्या रस्त्याला लागले. आयुष्याचं गणित एका रात्रीत उलगडलं होतं आणि ते फारसं अवघडही नव्हतं. कॉकटेल पार्टीसारखं हळुवार उलगडत, रंगत जाणारं होतं. एक नशा , एक झिंग त्यात होती. मानवी भावभावनांचे कल्लोळ त्यात होते. संगीताच्या जल्लोषतून नंतर हळुवार शांतवणारं गीत त्यात होतं. तुम्ही कुठल्या अवस्तेत आहात त्याप्रमाणे ती स्थिति अनुभवाल. आयुष्याचा मागोवा, आढावा घेत विदुला शांत बसून राहिली.

                                                                              .................................................