आरोपी प्रकरण ६
साहिर सामंत ने दाराची बेल वाजल्याचा आवाज ऐकला. दार उघडलं तर दारात पाणिनी आणि सौम्या उभे असलेले पाहून तो चकितच झाला.
“ तुम्ही पुन्हा इथे?”
“ मला वैयक्तिक, मधुर महाजन यांना भेटायचं आहे.” पाणिनी म्हणाला.
“ त्या आता कोणालाही भेटू शकत नाहीत.”-साहिर
“ तुम्ही तिच्या वतीने बोलताय का? म्हणजे तिचे वकील किंवा प्रतिनिधी म्हणून काम करताय का?” पाणिनी नं विचारलं
“ ती कोणालाही भेटणार नाही.”-साहिर
“ म्हणजे तिने तुम्हाला सांगितलं नाहीये तर, की ती कोणालाही भेटणार नाहीये म्हणून !” पाणिनी म्हणाला.
“ अर्थात मला तिनेच सांगितलंय.”
“ याचा अर्थ तुम्ही तिच्या संपर्कात आहात ?” पाणिनी नं विचारलं
“ ठीक आहे तसं समजा.मी आहे तिच्या संपर्कात.”
“ ही माझी सेक्रेटरी, सौम्या सोहोनी , तिला क्षिती अलूरकर ने लेखी अधिकार दिलेत, तिच्या खोलीत जायचे आणि तिचे कपडे आणि अन्य वस्तू तिच्या वतीने ताब्यात घेण्याचे.” पाणिनी म्हणाला.
“ त्या आत जाऊ शकत नाहीत.” –साहिर
“ तुमच्या म्हणण्याला मी काही किंमत देत नाही.” पाणिनी म्हणाला. “ या घराच्या मालकीण या नात्याने मधुरा महाजन यांनी नाही म्हणू दे.”
“ आत शिरायचा प्रयत्न तर करून बघा, मग माझा अधिकार काय आहे ते दिसेल तुम्हाला.”-साहिर
“ मला वाटतंय की सौम्या ला क्षिती चे कपडे आणि वस्तू घेण्यापासून तुम्ही बळजबरीने रोखणार आहात?”पाणिनी नं विचारलं
“ मी वापर करीन , बाळाचा.नक्कीच करीन.”-साहिर ओरडला.
“ मी जरा बोलू का तुझ्याशी? ” साहिर चा आरडा ओरडा ऐकून बाहेत येत जनार्दन दयाळ म्हणाला.
“ नंतर बोल.” साहिर त्याच्यावर डाफरला.
“ माझं अशील अपमानित झालं आहे. त्याचं मानसिक संतुलन बिघडवण्यात आलं आहे.तिच्यावर गुन्हेगार म्हणून आरोप करून तिला घरातून हुसकून लावलं गेलं आहे.तिला तिचे कपडे घ्यायचे आहेत.ते घेण्यापासून अटकाव केलं जाणे म्हणजे नुकसानीची तीव्रता वाढवल्या सारखं आहे.मला वाटत की मधुरा महाजन यांना हे समजणं आवश्यक आहे.” पाणिनी म्हणाला.
“ एक मिनिट ,एक मिनिट, मिस्टर पटवर्धन,” घाई घाईत दयाळ म्हणाला. त्याने साहिर ला हाताला धरून बाजूला नेलं.दोघांत कुजबुज त्या आवाजात चर्चा झाली. साहिर ने माघार घेतल्या प्रमाणे तो मागे थांबला, दयाळ पुढे येऊन पाणिनी ला म्हणाला, “ आत या तुम्ही दोघेही.मी सौम्या सोहोनी ना क्षिती च्या खोलीत जायची परवानगी देतो. त्यांना जे काही न्यायचं आहे ते घेउ दे . मी अस गृहित धरतोय की क्षिती ने तसे अधिकार दिलेत. ”
“ हे आता ठीक आहे ” पाणिनी म्हणाला. आणि त्याने क्षिती ने लिहिलेले पत्र दयाळ ला दाखवलं.त्याने ते वाचून आपल्या खिशात ठेवलं.
“ हे पत्र मधुरा महाजन ला उद्देशून लिहिलंय. ” पाणिनी ने दयाळ च्या लक्षात आणून दिलं
“असू दे, आम्ही तिचेच प्रतिनिधी आहोत.”- दयाळ
“ क्षिती च्या खोलीत जाऊन सौम्या ला तिचे कपडे आणि वस्तू घ्यायची परवानगी तुम्ही दिलीत याचा अर्थ मी असा घेतो की तुम्ही आधीच क्षिती ची खोली तपासल्ये ” पाणिनी म्हणाला.
“ काय अर्थ काढायचा याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे.” –दयाळ.
त्यांनी घराच्या आत प्रवेश केला.दयाळ सौम्या ला घेऊन जिन्यावर गेला.पाणिनी आणि साहिर वेगवेगळया ठिकाणी बसले.वरच्या मजल्यावर पावलांचे आवाज ऐकू आले.एक अत्यंत आकर्षक अशी स्त्री बाहेर आली.
“ तुम्ही पाणिनी पटवर्धन ?” तिने विचारलं.
पाणिनी ने मान डोलावली.
“ मी मधुरा महाजन.”
“ बरं वाटलं भेटून.पण मधुरा, मी वकील आहे आणि तुमच्या विरोधातल्या व्यक्ती चं मी प्रतिनिधित्व करतोय , त्यामुळे मला वाटत की तुम्ही तुमचा वकील इथे बोलवावा.” पाणिनी म्हणाला.
“ अहो, कसला वकील आणि कसलं काय. बसा मिस्टर पटवर्धन. मला बोलायचं आहे.”-मधुरा
“ मी परत सांगतो.......”
“ मला माहित्ये तुम्ही अब्रू नुकसानी आणि आर्थिक नुकसान भरपाई साठी दावा लावण्याच्या तयारीत आहात, पण साहिर आणि दयाळ जे काही बोलले असतील तुम्हाला, त्या साठी मला जबाबदार धरू नका.”-मधुरा
“ म्हणजे या प्रकरणात तो तुमचा प्रतिनिधी नाही?”
“ तो तसं भासवायचा प्रयत्न करतोय.म्हणजे उगाचच मला सल्ले देत बसतो.मी काय करावं काय नाही तोच ठरवतो. ”
“ तुम्हाला खरंच वाटतंय की क्षिती ने तुमचे पैसे घेतले असतील म्हणून?” पाणिनी नं विचारलं
“ तुमच्या वकीली भाषेत यालाच सूचक प्रश्न म्हणतात ना?” –मधुरा हसून म्हणाली. “ पण मी मात्र तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये अत्ता.आणि मला काय वाटत यामुळे कशात काही फरक पडणार नाही.”
“ हा पुराव्याच्या संदर्भातला मुद्दा आहे.” पाणिनी म्हणाला. “ दुसऱ्यावर आरोप करायचा अधिकार नागरिकांना कायद्यानेच दिला आहे.”
“ तुम्हाला सांगायला हरकत नाही माझी, की मी बराच कालावधी एकटीनेच आयुष्य जगल्ये आणि त्यामुळेच कदाचित, लोकांवर संशय घेण्याचा माझा स्वभाव बनलाय. मिस्टर पटवर्धन, मी माझ्या कपाटात एका खोक्यात हजार ची नोट ठेवली होती ती गायब झाल्ये. मी सुरुवातीला साहिर सामंत वर संशय घेतला,आरोप केला.तो नाराज झाला त्यामुळे, त्यानेच माझ्या लक्षात आणून दिलं की जर ही चोरी असेल तर क्षिती ला सर्वात जास्त संधी होती.”
“ थोडक्यात त्याने स्वतः वरची संशयाची सुई क्षिती कडे वळवली?” पाणिनी नं विचारलं
“ पुन्हा तुम्ही सूचक प्रश्न विचारलात पटवर्धन . मी नाही उत्तर देणार याचं.मला माझे हजार रुपये मिळण्याशी मतलब आहे. मी सध्या ज्या पद्धतीचे आयुष्य जगते आहे, त्यात हजार रुपये ही सुध्दा मोठी रक्कम आहे. ”
पाणिनी काहीतरी बोलेल अशी मधुराची अपेक्षा होती.तो काहीच बोललं नाही हे बघून ती पुन्हा म्हणाली,
“ मोठी रक्कम आहे.”
“ बरोब्बर हजार रुपयेच गेले?” पाणिनी नं विचारलं
“ बरोबर.”
“ बरेच दिवस तुम्ही साठवत असलेले?” पाणिनी नं विचारलं
“ हा खाजगी प्रश्न आहे.फारच. तरीही मी सांगते, माझ्या बँकेत मी जमेल तेवढे पैसे साठवते.आता पर्यंत पंधरा-वीस हजाराची बचत मी केल्ये. मला सगळे पैसे पर्स मधे ठेवायला आवडत नाही.मला लागतील तसे बँकेतून काढतेआणि कपाटातल्या खोक्यात ठेवते.”-मधुरा
“ आणि आज संध्याकाळी तुम्ही तिथे बघायला गेलात तेव्हा पैसे गायब झाले होते?” पाणिनी नं विचारलं
“ हो. आणि तो खोका जमीनीवर टाकून देण्यात आला होता.मला आता असं कळलंय की साहिर ने आणलेला तो खाजगी गुप्तहेर,जनार्दन दयाळ,त्या खोक्यावरचे ठसे मिळवणार होता , म्हणजे, प्रयत्नात आहे त्या.”
“किती लोकांनी हाताळला तो खोका?” पाणिनी नं विचारलं
“ मी , अर्थातच. तुम्हाला तेच काढून घ्यायचं असेल ना माझ्याकडून?” मधुरा म्हणाली.
“आणि जेव्हा चोरी बद्दल तुम्ही साहिर ला सांगितलं, तेव्हा त्याने ही त्याला हात लावला?”-पाणिनी नं विचारलं
“ म्हणजे त्याने तो उचलला, आणि निरखून बघितलं,काही क्लू मिळताहेत का पाहण्यासाठी.”
“ या शिवाय ,दयाळ ने सुध्दा?”पाणिनी नं विचारलं
“ नाही, त्याने हात नाही लावला त्याला.त्याने एका टोकदार चिमट्याने उचलला तो.”
“ म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की त्यावर साहिर चे ठसे आहेत म्हणून?”
“ हो.”-मधुरा
“ त्यावर क्षिती चे ठसे आहेत असे सिध्द झालं तर साहिर चे सुध्दा ठसे आहेत ही बाब तुम्ही सोडून दयाल?”
“ अर्थात,कारण साहिर चे ठसे असायला सबळ कारण आहे,त्याने तो उचलला होता.क्षिती ला मात्र खोक्याला हात लावयचं कारण नसताना सुध्दा तिचे ठसे आहेत असा अर्थ होईल.”-मधुरा
“ समजा, तुमच्या घरात त्या क्षणी तुमच्या बरोबर क्षिती असती आणि चोरी झाल्याचे तुम्ही ओरडल्यावर तिने तो खोका काही क्लू मिळतोय का ते पाहायला हातात उचलून घेतला असता,आणि नंतर त्यावर तुम्हाला साहिर चे सुध्दा ठसे आहेत असे लक्षात आले असते तर तुम्ही क्षिती ऐवजी साहिर ला चोर ठरवलं असतं?” पाणिनी नं विचारलं
मधुराचा चेहेरा पडला. नंतर एकदम तिला हसायला आलं. “ तुम्ही वकील लोक तुम्हाला हवा तसा फिरवता पुरावाआणि अर्थ बदलता.मला एवढंच सांगायचयं पटवर्धन ,की मला निरपेक्ष पणे न्याय हवाय.मी क्षिती वर आरोप केलेले नाहीत.तुम्हाला फक्त वस्तुस्थिती सांगितली आहे. ”
“ मला हे जाणून घ्यायचंय.तो साहिर सामंत तुमच्या वतीने का हाताळतो आहे सर्व? तुमचा प्रतिनिधी किंवा वकील आहे? ” पाणिनी नं विचारलं
“ तो प्रतिनिधी वगैरे नाहीये माझा.”
“ तो म्हणाला मला,की तो तुमचा प्रतिनिधी आहे.”पाणिनी म्हणाला.
“ त्याला व्हायचंय ते.पण मीचं माझी प्रतिनिधी आहे.” –मधुरा
“ तुमची आणि त्यांची काही काळा पासून ओळख आहे?” पाणिनी नं विचारलं
“ काही काळा पासून. हो.” –मधुरा
“ म्हणजे कधी पासून?”
“काही काळा पासून. ”-मधुरा
“ वर्षं भर ओळखता?”-पाणिनी नं विचारलं
“ एवढी जुनी नाही.”
“ महिनाभर?”
“ असू शकेल.”
“ आणि तुमचे फक्त हजार रुपये गेलेत?”
“ हो.”
“ तुमची खात्री आहे ही बरोब्बर हजार रुपये गेलेत?” पाणिनी ने पुन्हा विचारलं.
“ हो.”
“ आणि गरज वाटली तर बॅंकेच पासबुक तेवढी रक्कम काढल्याचं दाखवेल?”-पाणिनी नं विचारलं
“ नक्कीच. पटवर्धन, मी जेव्हा काही सांगते तेव्हा ते शंभर टक्के खरं असतं.खोट सांगण्यावर माझा विश्वास नाही.”
जिन्यावर पावलं वाजली. सौम्या हातात एक हँडबॅग घेऊन उभी होती.तिच्या मागे जनार्दन दयाळ.त्याच्या हातात मोठी सुटकेस होती.
“ मी, पुढे काही दिवस बाहेर राहण्याच्या दृष्टीने लागणारे, तिचे कपडे, कॉस्मेटि्स, रात्री लागणाऱ्या काही गोष्टी, असं सर्व घेतलंय” सौम्या म्हणाली.
“ तिला कधीही काहीही लागलं तरी येऊदे इथे, काही राहिलं असेल तरी.” –मधुरा
“ तुमची ओळख करून देतो, ही माझी सेक्रेटरी,सौम्या सोहोनी.” पाणिनी मधुराला म्हणाला.
मधुर उठून उभी राहिली, आपले हात पुढे करून तिने सौम्या ला शेक हँड केला. तिच्याकडे निरखून बघत म्हणाली,
“ बर वाटलं भेट झाली आपली.”
ती शेक हँड साठी पुढे आली तेव्हा सौम्या ने आपल्या हातातली हँडबॅग खाली ठेवली.आणि तिच्या हातात हात मिळवले. “ मला वाटलं होतं की तुमची भेट होईल तेव्हा तुम्ही खूप मेंटली अपसेट झालेल्या असाल”
“ तशी मी झाल्ये ,पण त्यामुळे आपल्या चालीरीती विसरून नाही ना चालणार ! तू खूप चांगली मुलगी वाटलीस मला. वागणं,बोलणं सर्वच दृष्टीने.”
“ थँक्स.”सौम्या म्हणाली .
मधुर पाणिनी कडे वळली. “ पटवर्धन,तुम्ही क्षिती चे वकील आहात?”
“ हो.”
“ इथे या शहरात क्षिती च्या ओळखीचा कोणी वकील असेल असं मला वाटलं नव्हतं”-मधुरा
“ ती मला ओळखते.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही इथे येण्या पूर्वीपासून?”
“ हो.”
“ किती दिवसापासून तुम्ही परिचित आहात?”-मधुरा
“ काही काळापासून.”-पाणिनी म्हणाला.
मधुरा हसली. मगाचचेच संवाद पुन्हा बोलले जात होते. “ किती कळ पासून?”
“ काही काळापासून.” पाणिनी म्हणाला.
“ आणि संधी मिळताच तिने लगेच तुम्हाला फोन केला?” –मधुरा
“ दिवस भरात मला बरेच लोक फोन करतात.” पाणिनी म्हणाला.
“ तुमच्या बोलायच्या धाटणी वरून तुम्ही माझ्याशी फार बोलायला उत्सुक नाहीसे दिसतंय. स्वाभाविकही आहे,तुम्ही आणि मी विरुध्द बाजूचे आहोत.पण मला हेच सांगायचं आहे की मी तिच्यावर वैयक्तिक रित्या, चोरीचा आळ घेतलेला नाही.साहिर किंवा जनार्दन दयाळ यांनी जे काही आरोप केले असतील ते त्यांच्या विचारानुसार आणि अभ्यासानुसार असावेत.त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही.” –मधुरा
“ म्हणजे साहिर हा तुमचा एजंट किंवा वकील , प्रतिनिधी नाही? ” पाणिनी नं विचारलं
“ बिलकुल नाही.”-मधुरा
“ हे बरं झालं.थँक्स” पाणिनी म्हणाला.
“ पटवर्धन, मला सांगायचं होत,ते सर्व सांगीतलंय मी.शेवटी एवढंच म्हणायचंय की क्षिती च्या घर सोडण्याशी माझा संबंध नाही.मी तिच्यावर ती वेळ आणलेली नाही.ती इथे कधीही येऊ शकते, तिच्या वस्तू नेऊ शकते. सौम्या, मला वाटत की तू तिला पुरतील एवढया वस्तू घेतल्येस?”
“ मला वाटतंय तसं ” सौम्या म्हणाली.
“ पटवर्धन,एका अर्थी क्षिती ला नोकरी लागली आहे ते चांगलंच झालं. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर. मीच तिला हट्टाने नोकरी करायला लावली, इथे असतांना. माझी इच्छा आहे की तिने ती चालूच ठेवावी. पटवर्धन, आता तुम्ही तुमच्या अशिलाला म्हणजे क्षिती ला भेटायला उत्सुक असाल ना? तुम्हाला जास्त थांबवणार नाही मी.क्षिती ला नक्की सांगा आठवणीने की तुझ्या मधुरा आत्याने तुला खूप शुभेच्छा दिल्येत.”-मधुरा म्हणाली.
“ आणि हे पण सांगू ना की खोक्यातले पैसे चोरण्यात क्षिती चा काहीही हात नाही हे मधुराला पटलय?” पाणिनी नं विचारलं
“ अजिबात नाही. ” मधुरा उफाळून म्हणाली. “ एखादा माणूस दोषी आहे की निर्दोष आहे हे मी कधीचआधी ठरवत नाही. सत्य हे सत्यच असतं. पण मी पुन्हा सांगते की मी वैयक्तिक तिच्यावर चोर म्हणून आरोप केलेले नाहीत.आणि पुरावा मिळे पर्यंत करणार पण नाही.”
“ म्हणजे साहीर सामंत हाच जबाबदार आहे, दयाळ तर्फे खाजगी तपासणी करून घ्यायला?” पाणिनी नं विचारलं
“ माझं उत्तर तुम्हाला मी कोर्टात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहीन तेव्हा देईन.” आपले चमकदार डोळे वटारून मधुर म्हणाली. “ माझा निरोप मात्र क्षिती ला नक्की द्या.आणि मला आता रजा द्या. मी काय फार तरुण नाहीये.दमल्ये आता मी. ” असं म्हणून इने पाणिनी आणि सौम्या ला चक्क बाहेरचा रस्ता दाखवला.
“ लबाड कोल्हा ! ” बाहेर आल्यावर पाणिनी म्हणाला.
“ पुढे काय?” सौम्या ने विचारलं ”
“ तू लक्षात घे सौम्या, तिच्या कडे नोटांनी भरलेले खोके असणार.एक तर कोणीतरी ते चोरले असणार.किंवा मधुराच्या लक्षात आले असणार की क्षिती ला त्या पैशांचा शोध लागलाय आणि क्षिती ही गोष्ट इन्कम टॅक्स विभागाला कळवू शकते . मग त्यामुळे मधुर ने काय केलं असावं? ती सगळी रोकड तिथून हलवली, बँकेत जाऊन हजर रुपये काढले, त्यामुळे त्याचे रेकोर्ड तयार झालं.नंतर एक रिकामा खोका जमीनीवर टाकला आणि ओरडायला सुरवात केली की माझे पैसे गेले.”
“ म्हणजे ती मोठी रक्कम साहिर किंवा दुसऱ्या कोणीतरी चोरली असं तुम्हाला नाही वाटत?”-सौम्या
“ तसं असतं तर मधुरा अत्ता वागते आहे त्यापेक्षा खूप वेगळी वागली असती.खरंच मोठी रक्कम गेली असती तर साहिर वर विसंबून ण राहता तिने पोलिसांना बोलावलं असतं , त्या आधी खूप आरडा ओरडा केलं असता.” पाणिनी म्हणाला.
“ त्यामुळे इन्कम टॅक्स विभागा कडून इला त्रास झाला असता तरी ? ”-सौम्या
“ तरीही. इन्कम टॅक्स विभागा बरोबर तिने नंतर हुज्जत घातली असती, पहिल्यांदा तिने पोलिसांच्या मदतीने जास्तीत जास्त रक्कम वसूल करायचा प्रयत्न केला असता. ” पाणिनी म्हणाला.
“याचा अर्थ मधुरा अभिनय करत्ये,आपल्या समोर.” सौम्या म्हणाली.
“ पुरावा तसचं दर्शवातोय.अर्थात, क्षिती खरं सांगते आहे असं मानल तर !”पाणिनी म्हणाला.
त्यांची गाडी क्षिती ने घेतलेल्या हॉटेल वर पोचली. खोलीत आल्यावर पाणिनी ने क्षिती ला तिकडची सर्व हकीगत सांगितली. सौम्या ने आणलेल्या तिच्या वस्तू तपासत असतांना, क्षिती ते सर्व ऐकत होती. अचानक तिने सौम्या ला विचारलं, “ हँगर ला लावलेला माझा लोकरीचा गुलाबी ब्लाऊज पाहिलास का तिथे?”
“ तो हवा होतं का तुला? मी तो आणायला पाहिजे होता का?” –सौम्या
“ मनजे.. मला.. वाटलं की तू तो आणशीलच ! म्हणजे तो ड्रेस आणि आणि माझे चामड्याचे बूट असं मी उद्या ऑफिस ला जाताना घालायचं ठरवलं होतं मनातून. पण ठीक आहे फार काही बिघडलेलं नाही.माझ्याकडे इतरही ड्रेस आहेत आणि दुसरे काळे बूट ही आहेत. ”-क्षिती
“ मधुरा आत्याने खूप सहकार्य केलंय. तुला तिथे जाऊन कधीही काहीही आणायला तिने परवानगी दिल्ये.फक्त जाशील तेव्हा एकटी जाऊ नको.कोणालातरी बरोबर ठेव.माझं ऑफिस बंद असेल तेव्हा कनक ओजस च्या ऑफिस मार्फत तू मला कधीही संपर्क कर.त्याचं ऑफिस चौवीस तास चालू असतं. आता सर्व विसरून जरा झोप काढ , विश्रांती घे.” पाणिनी म्हणाला.
“ झोपायचा प्रयत्न करते पण तो प्रसंग विसरणे अवघड आहे. ” –क्षिती म्हणाली.
पाणिनी ने तिच्या खांद्यावर थोपटले. “ आम्ही निघतो आता. काळजी करू नको.”
आणि सौम्या ला घेऊन बाहेर पडला.
प्रकरण ६ समाप्त