Aaropi - 10 books and stories free download online pdf in Marathi

आरोपी - प्रकरण १०

प्रकरण १०
तारकर क्षिती ला घेऊन गेल्यावर काही वेळेतच पाणिनी चा फोन वाजला.अलीकडून कनक ओजस बोलत होता
“ पाणिनी, आपण दोघांनी ग्लोसी कंपनीच्या बाहेरच्या वाहनांचे नंबर लिहून घेतले होते , त्या सर्वांचे मालक कोण ते मला समजलंय.त्यातला एक मालक चंद्रवदन विखारे आहे.त्याचा पत्ता आणि फोन माझ्याकडे आहे.बोलायचं आहे तुला?”-कनक
“अत्ता नाही. नंतर. माझ्या अशीलावर, क्षिती वर खुनी हल्ला केल्याचा आरोप झालाय आणि तिला अटक झाल्ये.आपण आधी त्या फुगीर पायाच्या अंध बाईला भेटू.बघू तिला म्हणायचंय ते.तू तातडीने तयार रहा. पुढच्या तीन मिनिटात तुझ्या ऑफिस ला येतो मी.”
“ ठीक आहे.”-कनक
“ या तीन मिनिटात तू तुझ्या माणसांना निरोप दे की शेफाली महाजन, म्हणजे मयत ग्रीष्म महाजन ची पूर्व पत्नी, तिच्या बद्दल सर्व माहिती काढ.” पाणिनी म्हणाला.
ठरल्या प्रमाणे तीन मिनिटात पाणिनी कनक च्या ऑफिसात पोचला. दोघेही कनक ने शोधलेल्या त्या अंध विक्रेत्या बाईच्या पत्त्यावर पोचले.त्या ठिकाणी कनक ने आपला एक माणूस तिच्या घरावर नजर ठेवायला तैनात केलं होता. कनक दिसताच त्याने कनक ला खूण करून आपण कनक ला पाहिल्याचे निदर्शनाला आणून दिले.
“ त्या बाईशी बोलण्या पूर्वी तुला माझ्या माणसाशी बोलायचं आहे?”-कनक
“ तो धोका नको स्वीकारायला.आधी तिच्याशी बोलू ,मग तुझ्या माणसाशी,जाताना बोलू वाटलं तर.” पाणिनी म्हणाला.
कनक ने अचानक सिगारेट काढून ओठात ठेवली.
“ ही त्या माणसाला केलेली खूण आहे. याचा अर्थ त्याने लक्ष देण्याचं काम पुढे चालूच ठेवायचं आहे.” –कनक
पाणिनी ने तिच्या दारावरची बेल वाजवली. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. पुन्हा वाजवली पण उपयोग झाला नाही.
“ तुझ्या माणसाशी बोलू या.”- पाणिनी म्हणाला.
ते दोघेही कनक च्या हेराच्या गाडी पाशी आले.
“ ती बाहेर नाही ना गेलेली?” पाणिनी न विचारलं
“ नाही .मी तिच्यावर नजर ठेवायला सुरुवात केल्यापासून तरी नाही. ”
“ तिच्या कडे कोणी आलं? आणि आत गेलं?”
“ कोणी नाही.”
पाणिनी आणि कनक यांनी एकमेकांकडे पाहिलं.
“ ती बाहेरच्या विक्रेत्यांना वगैरे फारशी किंमत देत नसावी. त्यामुळे दार उघडतच नसावी.”
“ शेवटी ती मधुरा महाजन बरोबर काम करते आहे. आणि मधुरावर हल्ला झालाय. हिला सुध्दा धोका असू शकतो.”
“ पोलीसांना कळवू या ? ”-कनक
“ अगदी शेवटी गरज वाटली तर पाहू. मला जरा आत जावून पहायचंय, आणि तिच्याशी बोलायचंय, ती जीवंत असेल तर. पोलीस येण्यापूर्वी मला तिथल्या गोष्टी नजरे खालून घालायच्यात.” पाणिनी म्हणाला.
“ अरे धोका दायक आहे हे, पाणिनी.”
“ मी बऱ्याच वेळा धोकादायक गोष्टीचं करतो कनक.” पाणिनी म्हणाला आणि पुन्हा तिच्या अपार्टमेंट च्या दिशेने निघाला.
त्याने पुन्हा दारावरची बेल वाजवली. “ दाराजवळ बोलायचाआणि ऐकायचा स्पीकर आहे. तिला वाटलं तर त्यातून बोलू शकते ती,किंवा दाराजवळ येऊन दारावरची छोटी खिडकी उघडून बोलू शकते.”- पाणिनी म्हणाला.
“ तू सांगतोस त्यापैकी काहीही न करता ती आतच गप्प बसून राहू शकते पाणिनी. तू आंधळा असतास आणि एकटाच रहात असतास तर काय केलं असतंस पाणिनी? ” कनक ने विचारलं.
“ तेच केलं असतं.” पाणिनी म्हणाला.
अचानक पाणिनी दाराबाहेरून जोरात ओरडला. “ मिसेस मणीरत्नम, आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय.”
दारच्या आतून काहीही हालचाल जाणवली नाही पण खालच्या मजल्यावरची बाई दार उघडून बाहेर आली. “ काय गडबड चालल्ये इथे? केवढ्या मोठा आवाजात हाक मारतंय तुम्ही ? मी मिसेस गोखले, इथली मॅनेजर आहे. काय हवंय तुम्हाला?”
“ आम्हाला मिसेस मणिरत्नम शी बोलायचं आहे.खूप महत्वाचं.” पाणिनी म्हणाला.
“ कोणाच्या दृष्टीने महत्वाचं?”
“ दोघांच्याही.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही कोण आहात?”
“ मी वकील आहे.पटवर्धन आडनाव माझं.”
“पाणिनी पटवर्धन?” तिने एकदम आश्चर्याने विचारलं.
“ बरोबर.”
“ हे बरोबरचे गृहस्थ कोण आहेत?”
“ माझा सहकारी आहे.कनक ओजस.”
“ पोलीस?”
“ खाजगी हेर आहे.” कनक ने उत्तर दिले.
“ मगच पासून मी बघत्ये तुम्ही सगलं गूढ पणे वागताय.तुम्ही खाली असतांना सारखे इकडून तिकडे फिरत होतात . त्या गाडीतल्या माणसाकडे जाताय. कोण आहे तो माणूस?”- मिसेस गोखले
“ माझा सहकारी आहे तो.” कनक म्हणाला.
“ आम्हाला वाटतंय के मिसेस मणिरत्नम ला धोका आहे.आम्ही तिला सावध करायला आलोय.” पाणिनी म्हणाला.
“ अहो आंधळी बाई आहे ती, तिच आयुष्य आधीच खडतर आहे, त्यात अजून कसला धोका असणारे तिला? त्यातून तुम्हाला धोका वाटत असेल तर पोलिसांकडे जा.” – मॅनेजर बाई, मिसेस गोखले म्हणाली.
“ आम्ही तिला मदत करू शकतो.” पाणिनी म्हणाला.
“ आम्ही तिच्या रक्षणाला इथे माणूस ठेऊ शकतो.” –कनक.
“ हो? आणि त्याचा खर्च कोणी करायचा?”
“ आम्ही करू.”
“ अच्छा ! ” ती विचारात पडत म्हणाली.
इतरांना मोहात पाडणारे आपले हास्य चेहेऱ्यावर आणत पाणिनी ने विचारलं, “ तिला कसं शोधायचं ? तुम्हीच मदत करा, किंवा सुचवा आम्हाला.”
“ मी करते तिच्याशी संपर्क.”
“ तुमच्याकडे किल्ली आहे तिची?” पाणिनी न विचारलं
“ मला किल्लीची गरज नाही. मी थेट फोन वर बोलेन तिच्याशी. तिच्या घरी लँड लाईन फोन आहे. पण तो डिरेक्टरी मधे नाही. अन-लिस्टेड आहे. फक्त मलाच माहित्ये तो. तुम्ही इथेच उभे रहा. मी आत जाऊन फोन करून येते. ”
ती जवळ जवळ तीन चार मिनिटं आत गेली.
“ सॉरी, पण मिसेस मणिरत्नम उचलत नाहीयेत फोन.” बाहेर येईन ती म्हणाली.
“ दारावरच्या बेल ला सुध्दा तिने प्रतिसाद नाही दिला” पाणिनी म्हणाला.
“ ते नेहेमीचं आहे तिचे. त्यात वेगळे काही नाही.पण फोन उचलत नाही असे कधी होत नाही. मी सोडून आणखी एकाच व्यक्ती कडे तिचा फोन नंबर आहे. त्यामुळे तिचा फोन वाजला की आमच्या दोघांपैकी एक असणार हे तिला समजतं.”
“ ही दुसरी व्यक्ती म्हणजे मिसेस महाजन आहेत?” पाणिनी न विचारलं
“ महाजन.... महाजन.. नाव ऐकल्यासारखं वाटतंय. बहुतेक तिच्याच तोंडून .... तिच नाव मधुरा तर नसेल ना?”
पाणिनी ने मान डोलावली.
“म्हणजे तिच्या तोंडून मधुरा हे नाव ऐकलंय. पण मधुराचे आडनाव महाजन चं आहे का दुसरी कोणी मधुरा आहे हे माहिती नाही. बर ते काहीही असो, ती फोन घेत नाहीये हे मात्र खरं ”
“ मग काहीतरी गडबड आहे.ती घरातच आहे.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्हाला काय माहीत?” मिसेस गोखले, ने विचारलं.
“ बाहेर गाडीत जो आमचा हस्तक बसलाय ना, तो गेले कित्येक तास या घरावर नजर ठेऊन आहे..... म्हणजे, तिला काही धोका नाही ना हे बघण्यासाठी.”
“ कसला धोका?”
“ मोकळे पणाने सांगायचं तर मला माहीत नाहीये पण कोणाला तरी तिच्या घरी असणारी काहीतरी वस्तू हवी आहे,आणि त्यासाठी तो तिच घर सुध्दा फोडू शकतो.”
मिसेस गोखले ने गंभीर पणे विचार केला.
“ तसं असेल तर माझ्या कडच्या किल्ली ने मी दार उघडते.तुम्ही थांबा इथे.”
“ आम्ही पण तुमच्या बरोबर आत येतो. काही विचित्र घडलं असेल तर तुम्हाला साक्षीदार म्हणून आमचा उपयोग होईल.” पाणिनी म्हणाला.
“ कशाला साक्षीदार?”
“ तुम्हाला आत काही आढळलं तर.” पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे या आत, पण कशालाही हात लावू नका आणि कशावरही टीका करू नका, कारण आपला खर्च भागवताना हात तोंडाशी गाठ असणाऱ्या आंधळ्या स्त्री कडून नीट नेटके घर ठेवले जाणं अपेक्षितच नाही.”- मिसेस गोखले.
“ समजू शकतो. आम्हाला घरी पसारा आहे किंवा काय यात रस नाहीये.” पाणिनी म्हणाला.
“ आणखी एक सांगायचं आहे, तुम्हाला, तिला असलेल्या धोक्य बद्दल तिला काही सांगू नका.मला नंतर सांगा. तिने सावध रहावं असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक असेल पण आंधळ्या बाईला तो धक्का कितपत सहन होईल याचा अंदाज नाही. अंध व्यक्ती आपले दैनंदिन जीवन कसबसं तारून नेऊ शकते पण आपला जीव धोक्यात आहे हा धक्का ती पचवू शकणार नाही. या, आत या माझ्या बरोबरच रहा. इकडे तिकडे फिरू नका. प्लीज. मिस्टर पटवर्धन ,मी इथे येऊन अधून मधून तिला स्वच्छता करायला मदत करते.”
तिने आपल्या जवळच्या किल्लीने दार उघडलं. आत मधून एक कुबट असा वास आला.दार उघडताच वर जाणारा एक जिना होता,त्याच्या टोकाला एक छान हॉल होता.
“ लाईट चालू आहेत की नाहीत देव जाणे ! ” मिसेस गोखले उद्गारली. “ अंध असल्यामुळे ती दिवे चालूच ठेवते.अर्थात विजेचा वापर ती स्वयंपाकासाठी करते. उजेडासाठी नाही. तिला उजेड असणे आणि नसणे तिला सारखेच असणार ! ”
पुढे जाऊन तिने जोरात हाक मारली, “ सारिका..ssss”
काहीच प्रतिसाद आला नाही. तिने पुन्हा एकदा जोरात हाक मारली. प्रतिसाद शून्य.
“ मी, मीनल गोखले.” तिने पुन्हा आवाज दिला. “ तुम्ही लोक इथेच थांबा मी आत बघून येते.”
“ मी काही मदत करू का?” पाणिनी न विचारलं
“ नको. ” तातडीने मीनल गोखले म्हणाली. “ हे घर खरं म्हणजे पाहुण्यांनी येण्याजोगे नाहीये.तुम्हाला आत पर्यंत येऊन दिल्याचं सारिकाला समजलं तर राग येईल तिला.तुम्ही या बेडरूम बाहेर जा आणि बाहेरच्या खोलीत बसा.”
पाणिनी आणि कनक बाहेर आले.साधारण चार पाच मिनिटांनी मीनल गोखले, बाहेर आली. “ आश्चर्य आहे, ती आत सुध्दा नाही दिसत.ती नक्कीच बाहेर गेली असणार.”
“ ती शक्यता नाही. नक्कीच नाही.आमचा माणूस सतत तिच्या पहाऱ्यावर बसवलाय आम्ही समोर.” पाणिनी म्हणाला.
“ तिला बघितल्यावर तो तिला ओळखेल का?” मीनल गोखले ने विचारलं.
“ हो.”
“ कसं काय? ”-मीनल गोखले.
“ त्यांने तिला अनेकदा बघितलंय यापूर्वी.” पाणिनी म्हणाला. “ मला सांगा, या घराला मागच्या बाजूला दार आहे?”
“ हो आहे ना.”
“ तुम्ही मागच्या दारात पाहिलं का?” पाणिनी न विचारलं
“ नाही बघितलं. थांबा तुम्ही. मी बघून येते.”
ती पुन्हा आत जाऊन पाहून आली.
“ मागचं दार उघड आहे. मला वाटत की ती पायऱ्या उतरून गल्लीत गेली असावी.”
“ आणि मग? ”
मीनल गोखले संकोचली.
“ बोला,बोला.” पाणिनी म्हणाला.
“ ती कधी कधी तिच्या मैत्रिणीला फोन करते तिथून. महाजन ला. मग मधुरा महाजन येते तिला भेटायला त्या गल्लीत.”
“ का? गल्लीत का?” पाणिनी न विचारलं
“ मला नाही सांगता येणार.मी तिला तसं कधी विचारलं नाही.माझा तसा स्वभाव पण नाही. एकदा मी माझ्या घराच्या मागे काहीतरी कामाला गेले होते तेव्हा मला दिसलं की सारिका तिच्या घराच्या मागील गल्ली पर्यंत आली होती आणि त्या गल्लीच्या टोकाशी मधुरा महाजन कार घेऊन आली होती.ती भाड्याची कार होती. मधुरा त्यातून उतरली आणि तिने सारिका ला पायऱ्या उतरून तुच्या कडे यायला मदत केली. दोघींनी एकमेकींची चौकशी केली.गळा भेट दिली. मी ऐकलं आणि पाहिलं ते एवढंच.मी मनात विचार केला की त्यांना खाजगी बोलायचं असेल आणि त्यांनी मला तिथे बघितलं असेल तर माझा व्यत्यय नको म्हणून मी आत आले. ”-मीनल गोखले.
“ तुमची खात्री झाल्ये ना ती घरात नसल्याची?” पाणिनी म्हणाला.
“ मी तिला सगळीकडे शोधलंय, फक्त कॉट खाली पाहिलं नाही.”
“ चला तर तिथे बघू.” पाणिनी म्हणाला.
“ ती कॉट खाली कशी असेल?”-मीनल
“ ते मला नाही माहीत,पण तिथे ही नसेल तर मग पुढच्या दाराने आत जाऊन, घराच्या मागच्या पायऱ्या उतरून त्या गल्लीत जाऊन भाड्याच्या गाडीने ती पसार का झाली असेल?”- पाणिनी न विचारलं
“ झाली असेल पसार,तर तो तिचा प्रश्न आहे आपलं नाही.”-मीनल
“ ते काहीही असलं तरी बघून घेऊ एकदा.” पाणिनी म्हणाला.
“ ती कॉट खाली सरपटत जाऊ शकत नाही.”
“ कोणीतरी तिला डोक्याला वगैरे मारलं असेल आणि तिला कॉट खाली ढकललं असू शकत. बघूया. ”
“ मूर्खपणाची कल्पना आहे.”
“ तुमच्या माहिती साठी सांगतो, तिची मैत्रीण मधुरा महाजन ही सुद्धा एकटी च राहते काल रात्री तिच्यावर हल्ला झालाय.तिला पण कोणीतरी फटका मारून जमीनीवर फेकून गेलंय!”- पाणिनी म्हणाला.
मीनल गोखले विस्फारलेल्या डोळ्यांनी पाणिनी कडे बघत राहिली.
“ तुम्हाला मागचं दार उघडं दिसलं? ”
“ हो. त्या दाराला स्प्रिंग लॅच नाहीये.म्हणजे दार बंद करायला किल्ली फिरवून बंद करावं लागतं,आपोआप ओढून घेतलं तर लॉक होत नाही. ती घाई घाईत बाहेर पडली असावी कारण किल्ली बरोबर घेऊन लॉक करायला तिला वेळ मिळाला नसावा.कारण मी पाहिलं तेव्हा किल्ली दारालाच होती आतल्या बाजूला. ”
“ असं नेहेमी घडत नाही?” पाणिनी न विचारलं
“ तुम्ही अंध असाल तर दार लॉक ण करता रहाल का घरात?”-मीनल गोखले ने विचारलं.
“ नाही.”
“ असंही झालं असेल, तिच्या परिचित अशा कोणीतरी महत्वाचं काम आहे असं भासवून तिला घाई घाईत बाहेर काढलं असेल.”-कनक ओजस
“ तिला अनोळखी सुध्दा असू शकतो.” पाणिनी म्हणाला. “ तिसऱ्या मजल्या वरचा फ्लॅट कुणाचा आहे?”
“ सध्या तो रिकामाच आहे.”
“ आपल्याला बघायला हरकत नाही ना तो?”- पाणिनी न विचारलं
“ हरकत नाही पण आपल्याला पुन्हा पुढच्या बाजूला जाऊन दोन मजले चढून वर जावं लागेल.”
“ नजरे खालून घालायचाय मला. मोकळाच आहे ना? म्हणजे फर्निचर नसलेला? ” पाणिनी न विचारलं
“ मला त्याची रचना पहायची आहे. या फ्लॅट सारखाच प्लान असेल ना?”
“ हो. चला.” मीनल म्हणाली.
तिने दार उघडलं पाणिनी आणि कनक बाहेर आल्यावर ते लाऊन घेतलं. वर जाणाऱ्या जिण्याला असलेलं दार आपल्या जबालाच्या किल्ली ने उघडलं, आणि त्यांना घेऊन वर गेली.जिन्याच्या वरच्या टोकाशी असलेल्या दारात किल्ली अडकवून ते उघडलं. दोघांना घेऊन आत गेली.दोघांनी आत नजर मारली आणि तिच्याकडे पाहिलं.
“ थँक्स, आम्ही आता निघतो.जर सारिका मणिरत्नम आली तर कनक ओजस च्या ऑफिसात कळवाल का? ” पाणिनी ने विचारलं.
“ मी असलं काहीही नाही करणार.” मीनल गोखले ने फटकारलं. “ माझ्या भाडेकरूंच्या खाजगी आयुष्यात मी डोकावत नाही.”
“ तसं नाही म्हणायचं मला. ते बाई अंध आहे.तिला कनक चे व्हिजिटिंग कार्ड देणं आणि फोन करायला सांगण बरोबर नाही.” पाणिनी म्हणाला.
“ बरोबर आहे तुमचं म्हणणं.ती आली की तिला मी तुमचा नंबर सांगेन आणि फोन कर म्हणून निरोप देईन.” मीनल गोखले म्हणाली
“ तिला लक्षात राहील नंबर? ” पाणिनी नं विचारलं
“ लक्षात राहील? अहो तुम्हाला तिच्या स्मरण शक्तीची कल्पनाच नाही. एक एक आठवडा तिला सांगितलेले नंबर लक्षात असतात.”
“ आता आम्ही निर्धास्त पणे निरोप घेतो तुमचा.” पाणिनी खुष होऊन म्हणाला.
“ पण मी तिला हे सांगून घाबरवणार नाही की तिच्या जीवाला धोका आहे.”-मीनल गोखले.
“ तसं करूच नका. तुम्ही खरंच खूप सहकार्य केलंत.”
“ आभार तर मी मानले पाहिजेत तुमचे सारिका च्या वतीने. पण मी जरा वाट बघते ,मला तिच्या कडून आणखी माहिती मिळे पर्यंत.”
तिला नमस्कार करून दोघे गाडी जवळ आले.
“ पुढे?” कनक ने विचारले.
“ तिच्या बाबतीत काहीतरी झालंय नक्कीच, किंवा ती मोठा गेम खेळत्ये ” पाणिनी म्हणाला.
“ पुढची हालचाल काय असणार आहे आपली पाणिनी?”
“ तुझी दोन माणसं हव्येत मला.पुढच्या दारावर नजर ठेवायला आणि एक मागच्या. ती आल्या आल्या मला कळवायचे त्यांनी.”
“ ठीक आहे.”-कनक
“ आपण वरच्या मजल्यावर तपास घेत होतो तेव्हा खिडकी वर लिहिलेला अन लिस्टेड नंबर मला दिसला .मी लिहून घेतलाय तो.” पाणिनी म्हणाला.
“ क्या बात है ! मला ही तो दिसला.मी पण टिपून घेतलाय.”
“ बर झालं आपल्या दोघांकडेही तो आहे. ती आली की आपण त्या नंबर वर फोन करू. मुलाखत घेऊ तिची.तिला असलेल्या धोक्याची तिला जाणीव करून देऊ.त्या दोन अंध बायकांबाबत मात्र आपण पोलिसांच्या पुढेच आहोत. ती जाड पायांची अंध स्त्री, सारिका मणिरत्नम ला धोका असेल तर कोणीतरी तिला भेटायला तिच्या घरी येणार. ” पाणिनी म्हणाला.
“ जर तो माणूस आधीच तिच्या घरी लपून बसला नसेल , आणि त्यानेच तिला मागील दारातून पळवून नेलं नसेल तर ! ” कनक ओजस उद्गारला.
“ ती एक शक्यता आहेच.पण प्रश्न असा आहे की त्यांनी असं का केलं असेल?” पाणिनी ने विचारलं.
“ ते ही बरोबर म्हणतो आहेस तू पाणिनी.”
“ त्यांना जर तिला मारायचं असतं, तर तिला तिच्या घरातच ते करून टाकलं असतं.तीच गोष्ट मधुर महाजन ची.मारेकरी तिला मारून टाकू शकत होता.त्या ऐवजी तिला टॉर्च चा फटका का मारला असेल? आणि तो ही एकच?” पाणिनी ने विचारलं.
“ तुझ्या मनात आता ठोस काहीतरी आहे असं दिसतंय.” कनक म्हणाला.
“तिला टॉर्च चा फटका मारला याचं कारण टॉर्च हे मारेकऱ्याला सहज हाताला लागलेलं हत्यार असणार. त्याने काहीतरी शोधायला टॉर्च हातात घेतली असावी,त्याचं वेळी मधुरा कडून तो रंगे हाथ पकडला गेला असणार, मग स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने टॉर्च चा फटका तिला मारून स्वत:ची सुटका करून घेतली असणार.”
“ याचा अर्थ मधुर महाजन हे त्याचे लक्ष्य नव्हते.त्याला दुसरंच काहीतरी हवं होतं.”
“ आता, सारिका मणिरत्नम च अपहरण झालंय याचा अर्थ कोणाला तरी तिच्या घरातलं काहीतरी शोधायचंय, आणि ते करत असतांना त्याला कोणाचा अडथळा नकोय.” पाणिनी म्हणाला.
“ कनक,मला आज रात्री तुझी दोन माणसं सारिका च्या घरापाशी हव्येत. जर कोणी आलाच तिथे काहीतरी शोधायला, तर त्याला मी रंगे हाथ पकडू इच्छितो.नंतर आपण त्यांची मुलाखत घेऊ.” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण १० समाप्त)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED