Aaropi - 1 books and stories free download online pdf in Marathi

आरोपी - प्रकरण १







आरोपी
प्रकरण १
पाणिनी पटवर्धन आणि सौम्या सोहोनी त्यादिवशी ‘मदालसा’ नावाच्या एका पॉश रेस्टॉरंट मध्ये दुपारचं जेवण घेत होते पाणिनी सौम्याकडे बघून काहीतरी बोलणार होता तेवढ्यात त्याला आपल्या टेबलाजवळ एक सावली हलताना दिसली म्हणून त्यानं दचकून वर बघितलं तर त्या हॉटेलचा मालक मधू राजे त्याच्या जवळ उभा होता पाणिनी हा त्याचा नेहमीचा ग्राहक असल्यामुळे दोघांची तशी ओळख होती
“कसं काय चाललय मिस्टर पाणिनी पटवर्धन?”
मधु राजेंनी पाणिनी ला विचारलं
“एकदम छान मस्त चाललंय आणि तुमच्याकडे जेवण तर काय सुंदरच असत” पाणिनी म्हणाला
“आणि आमची सर्विस कशी आहे?”
“एकदम अप्रतिम. लेडीज वेट्रेस हे तुमच्या हॉटेलचं विशेष आकर्षण आहे मिस्टर राजे” पाणिनी म्हणाला.
“मिस्टर पटवर्धन, मी तुम्हाला आमच्या सर्विस बद्दल विशेषत्वाने विचारायचं कारण असं की तुम्हाला आत्ता जी मुलगी वेट्रेस म्हणून सर्विस देते आहे तिने तुमचं टेबल मुद्दामून दुसऱ्या वेट्रेस कडून मागून घेतलंय”
“म्हणजे? मी नाही समजलो” पाणिनी म्हणाला.
“म्हणजे असं की आत्ता जी मुलगी तुमच्यासाठी तुम्ही दिलेले खाद्यपदार्थ घेऊन आली ती मुलगी तुमच्या टेबलावरची वेट्रेस नव्हती. तुमच्या टेबलावरची वेट्रेस वेगळीच आहे. शेजारच्या वेट्रेस ने तुमच्या टेबलावरच्या वेट्रेस कडून तुमचं टेबल मुद्दामून मागून घेतलय”.
“अरे बापरे मला नव्हती माहिती ही भानगड. आम्ही दोघे बोलण्यात एवढे गुंग होतो की या गोष्टीकडे आमचे लक्ष पण गेले नाही.” पाणिनी म्हणाला
“नाही, पण माझ्या ते लक्षात आलं ना ! माझं सगळीकडे बारकाईने लक्ष असतं” मधू राजे म्हणाला; “तुम्हाला सांगतो पटवर्धन, हे अशा प्रकारचं एकमेकात ॲडजस्ट करणे आम्हाला अजिबात आवडत नाही”
“म्हणजे काय म्हणायचे नक्की तुम्हाला?” पाणिनी नं विचारलं
“काय आहे, कॅप्टन वेट्रेस असते ती प्रत्येक वेट्रेस ला आपापली टेबल वाटून देते आणि त्यांनी त्याच ठिकाणी काम करायचं असतं पण कधी कधी होतं असं की या वेट्रेस ना सगळीकडून सारखी टिप मिळत नाही, त्यामुळे जिथे चांगली टिप मिळायची शक्यता असते ते टेबल घेण्यासाठी दुसरी वेट्रेस इच्छुक असते ती त्याच्या बदल्यात मूळ वेट्रेसला थोडे पैसे देऊन करते आणि तिला हवं असलेलं टेबल मिळवते”
“अरे बापरे ! असे प्रकार हॉटेलमध्ये चालतात ?मला कल्पना नव्हती” पाणिनी म्हणाला
“पण मिस्टर पटवर्धन मला असं वाटतंय की आत्ता ज्या वेट्रेस ने तुमचं टेबल मागून घेतलं, त्या मुलीने, म्हणजे जिचं नाव क्षिती आहे, तिने तुमचं टेबल चांगली टीप मिळावी म्हणून मागून घेतलं नसणार. तिला काहीतरी कायदेशीर सल्ला तुमच्याकडून हवा असणार असा माझा अंदाज आहे”
“क्षिती नाव आहे तिचं?” पाणिनी नं विचारलं
“हो क्षिती नाव आहे तिचं. ती आमच्याकडे नवीनच लागली आहे नोकरीला. फार दिवस झाले नाहीत. जेमतेम पंधरा दिवस झाले असतील. मिस्टर पटवर्धन माझी अशी अपेक्षा आहे की तिने तुमच्याकडून काही सल्ला जर मागितला तर मला या गोष्टीची कल्पना द्या” राजे म्हणाला
पाणिनी यावर काहीच बोलला नाही म्हणून मधू राजे ने पुन्हा विचारलं “द्याल ना मला कल्पना?”
“नाही” पाणिनी पटवर्धन ठामपणे म्हणाला.
“नाही?”
“नक्कीच नाही. एक लक्षात घ्या तिने माझा वकील म्हणून उपयोग करून घ्यायचं ठरवलं असेल तर आमच्या दोघात जे काही संवाद होतील ते वकील आणि त्याचा अशील असे गोपनीय संवाद ठरतील आणि त्याची माहिती मी कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीला म्हणजे तुम्हाला देऊ शकणार नाही.”
“अहो माझा तुम्ही एकदम हिरमोड करुन टाकलात मिस्टर पटवर्धन. ठीक आहे, काही हरकत नाही. ही बघा, क्षिती आलीच तुमच्याकडे,” राजे म्हणाला आणि दूरवर जाऊन उभा राहिला. परंतु तो जरी दाखवत असला की त्याचं क्षिती कडे लक्ष नाही तरी लांब उभा राहून तो तिच्याकडे बारकाईने बघत असल्याचं पाणिनीच्या लक्षात आलं.
पाणिनीने मागवलेली कॉफी आणि टोस्ट तिने दोघांच्या समोर ठेवले
“तुम्हाला कॉफीत दूध किती घालू?” त्या दोघांच्या कडे बघत क्षिती ने विचारले
“मी कोरी कॉफी घेणारे” सौम्या म्हणाली
“ठीक आहे आम्ही करू एकमेकात अॅडजस्ट” क्षिती ला उद्देशून पाणिनी म्हणाला
क्षिती मुद्दामून तिथे थोडी रेंगाळली. “तुम्हाला अजून काही लागेल?”
“नाही हे ठीक आहे एवढ बास आहे” पाणिनी म्हणाला. तरी ती तिथून जायचं नाव घेईना सौम्याने पाणिनी कडे एक अर्थपूर्ण दृष्टीक्षेप टाकला.
“तू गेलीस तरी चालेल. आम्हाला काही नकोय” पाणिनी पुन्हा तिला म्हणाला
“बोल सौम्या काय म्हणण आहे तुझं क्षिती बद्दल?”
“तिच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे, पण ते कसं बोलावं हे तिला समजत नाहीये” “आपले मालक राजे आपल्याकडे बारकाईने लक्ष ठेवत आहेत याची तिला कल्पना असावी” पाणिनी म्हणाला
“सोम्या माझं एखादं विजिटिंग कार्ड तुझ्याकडे आहे?”
“हो. आहे ना !” सौम्या म्हणाली आणि तिने आपल्या पर्समध्ये हात घालून पाणिनी पटवर्धन एक विजिटिंग कार्ड बाहेर काढलं.
“मला टेबलाच्या खालून दे. मधू राजे ला दिसणार नाही अशा पद्धतीने.”
तेवढ्यात त्या दोघांचं बिल घेऊन ती तिथे आली. आपल्या बिलाचे पैसे देताना पाणिनी पटवर्धन ने आपलं कार्ड नोटांच्या वर ठेवलं. आणि त्यावर एक ओळी लिहिली. ‘हॉटेलचे बिल , अधिक त्यावर तुझी 10% टीप आणि त्याहून वर हजार रुपये, माझे कन्सल्टेशन चार्जेस’ आणि बिलाचा फोल्डर बंद करून त्याने तो क्षिती कडे दिला.
“सर तुम्ही काय केलंत? कदाचित आपल्याला वाटते तसा तुमचा सल्ला तिला नको असेल. तुम्ही सेलिब्रिटी असल्यामुळे कदाचित तुमचा फक्त ऑटोग्राफ तिला हवा असेल तर?” सौम्याने शंका व्यक्त केली.
“तिला माझा ऑटोग्राफ हवा असेल तर तिला कार्डावर खरडलेल्या चिठ्ठीवर तो मी केलाच आहे” पाणिनी म्हणाला आणि दोघेही हसले.
सौम्या, उद्या जर ती आपल्या ऑफिसमध्ये आली तर मला भेटल्याशिवाय दिला जाऊ देऊ नको”
“म्हणजे तुम्ही चक्क तिला भेटणार आहात?”
“नक्कीच भेटणार आहे आणि तिच्याकडं हजार रुपये वकिलीची फी पण घेणार आहे.” पाणिनी म्हणाला.
प्रकरण १ समाप्त

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED