आरोपी - प्रकरण ८ Abhay Bapat द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आरोपी - प्रकरण ८

प्रकरण ८
ग्लोसी कंपनीच्या परिसरात गाडी लावल्यावर दोधे जण लॉबी मधे आले.तिथे साधारण तिशीतली एक तरतरीत अशी मुलगी रिसेप्शन काउंटर ला होती.तिच्या मागील बाजूला टेलिफोन ऑपरेटर मुलगी आपल्या कामात व्यग्र असलेली दिसत होती.
कनक तिच्याकडे गेला आणि हसत म्हणाला, “माझ्या मित्राला घेऊन परत आलोय मी.”
“ अजून तुम्हाला त्या पेन्सिली विकणाऱ्या अंध बाई मधे रस आहे?” ती रिसेप्शनिस्ट म्हणाली. “ तुम्ही पोलीस आहात की काय? तिला अटक करायला आलाय, भीक मागते वगैरे कारणास्तव?”
“ आम्हाला फक्त उत्सुकता आहे.म्हणून आलोय.” पाणिनी म्हणाला.
“ ते ठीक आहे पण तुम्ही पोलीस वाटत नाही, तुमच्या सारखे साहेबी घराण्यातले ,फक्त उत्सुकते पोटी इथे येतील हे....अरे तुम्ही पाणिनी पटवर्धन तर नाही ? ... अॅडव्होकेट?” ती एकदम उद्गारली.
“ बरोबर.” पाणिनी म्हणाला.
“ ती एखाद्या खुनाच्या गुन्ह्यात अडकल्ये म्हणून सांगू नका म्हणजे झालं !”
“ ती साक्षीदार असू शकते. पण आहे कुठे ती?” पाणिनी न विचारलं
“ म्हणजे? ती नाहीये त्या नेहेमीच्या जागी?” रिसेप्शनिस्ट ने आश्चर्याने विचारलं. “ अर्ध्या तासापूर्वी तर मला दिसली होती ती.”
“ अत्ता नाहीये ती.” कनक आणि पाणिनी दोघेही एकाच वेळी उद्गारले.
“ ती जिथे उभी राहते ना तो शेजारच्या दुसऱ्या कंपनीच्या हद्दीच्या सीमा रेषेवर येतो अगदी. आमची कंपनी ची हद्द तिथूनच सुरु होते. आमच्या मणी साहेबांनी तिला तिथे उभं रहायला परवानगी दिली.”
“ मणी?” पाणिनी न विचारलं
“ आमचे मोठे साहेब. आम्ही सर्व त्यांना मणी साहेब म्हणतो. मणिरत्नम. ”
“ केवळ पेन्सिली विकून ती कशी काय गुजराण करते?” पाणिनी न विचारलं
“ फक्त पेन्सिली नाही, इतरही वस्तू असतात की ! पेन, हवेच्या उशा, गॉगल, आमच्या कंपनीचे बरेच लोक रोज तिच्या कडून काही ना काही घेत असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल , तुम्ही कल्पना करू शकणार नाही एवढा धंदा ती करते.हां, पण रोज टॅक्सी ने येण्या जोग नाही.”
“टॅक्सी नसेल तर ती कशी येणार? अंध असल्या मुळे बस ने येण तर शक्य नाही.” पाणिनी म्हणाला.
“ मी तिला हा प्रश्न एकदा विचारला होता तेव्हा ती म्हणाली की आम्हा अंध लोकांना टॅक्सी कमी रेट ने मिळते. ”
“ किती दिवस झाले तिला इथे यायला लागून?” पाणिनी म्हणाला.
“ दोन आठवडे झाले असतील.”
“ तिच्या पायांकडे तुझं लक्ष गेलय का? कनक म्हणा होता मला ” पाणिनी म्हणाला.
“ हो. खरं तर त्या दोन वेगळ्या बायका आहेत. एकीचे पाय नॉर्मल आहेत. दुसरीचे मात्र वेगळे आहेत, म्हणजे डावा पाय साधाच आहे पण उजवा फुगीर आहे, म्हणजे अंगठा जाड आहे. ”
“ तुझ्या कसं लक्षात आलं हे?” पाणिनी न विचारलं
“ माझं सर्वत्र बारिक लक्ष असतं. म्हणजे मला सवयच आहे. ...मी खूप माहिती दिली तुम्हाला मिस्टर पटवर्धन, आमच्या मणी साहेबाना हे आवडेल की नाही मला माहीत नाही.उगाचच आमच्या कंपनीचे नाव या गोष्टीमुळे अडकायला नको कशात.तुम्हीच त्यांना विचारलं का हे प्लीज?”
“ हो, नक्कीच.आम्ही जाऊ का वर, त्यांच्या ऑफिसात?” पाणिनी न विचारलं
“ एक मिनिट हं ” ती म्हणाली. तिने इंटर कॉम वर मणी साहेबांच्या सेक्रेटरी ला फोन लावला.जवळ जवळ अर्धा मिनिटं ती फोन वर बोलत होती. “ सॉरी, पटवर्धन,आज सर खूप बिझी आहेत. पुढचे दोन तास ते सतत मिटींग, मुलाखती आणि फोन वर व्यग्र असणार आहेत. ”
“ वर्षाखेरीचे कामात ते अडकले असावेत.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही सुध्दा वकील आहात? ” कनक कडे बघून तिने विचारलं
“ गुप्तहेर आहे तो.माझ्या साठी काम करतो.” पाणिनी म्हणाला.
“ त्यात हे काम पण आहे? आंधळ्या विक्रेत्या बाईचे?”
“ माहीत नाही.आम्हाला एक टिप मिळाली होती.त्या दृष्टीने आम्ही तपास करतोय.तिची आणखी माहिती काढण्यासाठी. पण तुम्ही सांगू नका तिला हे. ” पाणिनी म्हणाला.
“ हे सगळ गूढ आणि रहस्यमय आहे.”
अचानक तिने त्या दोघांच्या मागच्या बाजूला बघितलं..एक माणूस घाई घाईत हातात ब्रीफकेस घेऊन आला होता.
“ मिस्टर मणी...” तो बोलणार होता तेवढ्यात रिसेप्शनिस्ट ने त्याला थांबवलं. “ वर जा थेट, विखारे. , सर तुझी वाट बघताहेत.”
तो घाईघाईत लिफ्ट कडे वळला तेव्हा पाणिनी कडे बघून ती म्हणाली, “ खूप महत्वाची कामगिरी आहे का ही तुमची?”
“ रुटीन आहे आमच्या दृष्टीने.” पाणिनी म्हणाला. आणि जाण्यासाठी निघाला.
“ मला मात्र तुम्ही रहस्यात अर्धवट सोडून चाललाय. ”
“ काळजी नका करू. तुम्हाला साक्ष देण्यासाठी समन्स काढेन मी !”
“ तसलं काही करू नका हो, नाहीतर भारी पडेल तुम्हाला,” ती हसून बोलली.
पाणिनी आणि कनक बाहेर पडले.दोघानीही एकमेकांकडे सूचक नजरेने बघितले.
“ पुढे काय?” कनक ने विचारलं.
“ ती निघून गेल्ये, आणि तुझे दोन्ही हेर तिच्या मागावर आहेत असं वाटतंय.त्यांनी तुझ्या ऑफिसात काही निरोप ठेवलाय का पहा.”
“ पाणिनी, मला माहिती नसलेल्या काही गोष्टी तुला माहिती आहेत.विशेषतः रकमे विषयी.”
“ बहुतेक.” पाणिनी मोघम पणे म्हणाला.
“ सांगणार आहेस?”
“ नाही.”
“ का?”
“ मी तुला जेवढे सांगेन तेवढंच तुला माहिती असलेलं बरं.जास्त नाही. पण एक सांगतो तुला मी,कनक,आपण बोलत असतांना आपल्या मागे अचानक आलेल्या ज्या माणसाला पाहून रिसेप्शनिस्ट दचकली आणि पटकन तिने त्या माणसाला मिस्टर विखारे म्हणून हाक मारली,आणि वर पाठवलं, त्याच पाहिलं नाव चंद्रवदन असणार असा माझा कयास आहे. त्याचं वाहन बाहेर असेल. बाहेरच्या सगळ्या वाहनांचे नंबर आपण टिपून घेऊ , तुझ्या स्त्रोतातून त्याच्या मालकांपैकी कोणाचे नाव चंद्रवदन विखारे आहे का शोध घे. त्याच्याच बरोबरीने त्या जाड पायाच्या बाई चा काय तपशील मिळाला का ते पण विचारून घे.” पाणिनी म्हणाला.
दोघे बाहेर आल्यावर दोघांनी मिळून सगळ्या वाहनांचे नंबर लिहून घेतले.कनक ओजस ने ते ऑफिसला कळवले. तो फोन वर बोलत असे पर्यंत पाणिनी ने गाडीत बसून मस्त पैकी एक सिगारेट शिलगावली. कनक फोन करून आला आणि गाडीत बसला.
“ वाहनांच्या मालकांची नावे मिळतील काही वेळाने. माझ्या माणसाने तुझ्या लाडक्या जाड पायाच्या बाई ची सविस्तर माहिती काढल्ये पाणिनी ! इथून साधारण दहा किलोमीटर वर राहते.गेली दोन वर्षे ती त्या घरी राहत्ये.ती अंध-एकांत वासाचं आयुष्य जगत्ये. ”
“ काय नाव आहे तिचं?” पाणिनी न विचारलं
“ काय असेल?” कनक ने विचारलं.
“ महाजन?” पाणिनी न विचारलं
“ मणिरत्नम ! ”
“ माय गॉड ! हे प्रकरण म्हणजे धक्क्यांची मालिकाच आहे. ग्लोसी कंपनीच्या मणी साहेबांची नसावी म्हणजे मिळवलं. ” पाणिनी म्हणाला.
“ ती विचित्रच आहे म्हणतात.कधीकधी ती दोन-दोन दिवस दिसतं नाही कोणालाच.तर कधी कधी आपली काठी सर्वांना दाखवत जवळच्या बाजारात जाताना दिसते. बाजारात तिला ओळखणारे बरेच दुकानदार आहेत.तिला ते अंध म्हणून मदत ही करतात. सामान उचलायला वगैरे मदत करतात. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती सगळ्यांचे पैसे रोख देते.लगेचच. उधारी ठेवत नाही. ” –कनक
“ आपण जरा चर्चा करू. कनक. तू आंधळा असतास आणि गरीब असतास तर काय केलं असतंस? तू बाहेर जेवायला जाऊ नाही शकत, घरी स्वयंपाकी ठेवणं नाही परवडत.” पाणिनी म्हणाला.
“ बरोबर मुद्दा आहे तुझा पाणिनी. मग काय करुया?”
“ तिच्या मागे माणसे लाव. कुठे जाते,कधी जाते बाहेर ,कोणाला भेटते सगळ शोधून काढ.”
“ माझ्या माणसाचं म्हणणं आहे की मागच्या वेळी पाठलाग केला ते तिला समजलं.”
“ ती अंध असून समजलं?” पाणिनी न विचारलं
“ तिला नाही कळल, तिच्या टॅक्सी ड्रायव्हर ला कळलं.”
“ चतुर असणार तो.” पाणिनी म्हणाला.
“ मी दोन माणसंपाठलागावर ठेवली होती. एक गाडी मागे होती, ती थोडया वेळाने त्याने तिच्या पुढे काढली आणि माझा माणूस आरशातून तिच्या मागच्या टॅक्सी वर नजर ठेऊ लागला, त्याचं वेळी माझा दुसरा माणूस त्यांची दुसरी गाडी घेऊन तिच्या टॅक्सी च्या मागे होता. थोडया वेळाने त्या दोघांनी आपापल्या जागा बदलल्या. म्हणजे पुढच्या हेराने आपली गाडी मागे ठेवली, मागच्याने पुढे आणली. असं केलं तर ज्याचा पाठलाग केलं जातोय त्याला संशय येत नाही कारण पाठलाग करणाऱ्या गाड्या कायम त्याचं रहात नाहीत.”
“ तरी ही तिच्या टॅक्सी ड्रायव्हर ला कळलं?” पाणिनी म्हणाला.
“ हो. त्याने मागे वळून न बघता, आतल्या बाईला पाठलाग होत असल्याचं सांगितलं. त्या नंतर ती एकदम सावध होऊन ताठ बसली.”
“ठीक आहे, तुझी माणसे तिच्या मागावर आहेत ती राहू दे तशीच.आपण आपल्या ऑफिस मधे जाऊ. तू ग्लोसी च्या आवारात लावलेल्या वाहनांच्या मालकाचा तपास कर.”
कनक ओजस ने पाणिनी च्या सूचना आपल्या ऑफिस मधे आपल्या सहकाऱ्याला कळवल्या. गाडीत दोघेही फारसे बोलले नाहीत. पाणिनी तर आपल्याच विचारात हरवला होता. ऑफिस मधे आल्यावर तो सौम्या ला म्हणाला,
“ मदालसा हॉटेलात, राजे ला फोन लाव जरा, मला त्याच्या शी वेट्रेस बद्दल बोलायचंय. ”
सौम्या ने फोन लावला.
“ काय म्हणताय राजे ? धंदा पाणी काय म्हणतंय?” पाणिनी न विचारलं
“ नेहेमी सारखं चाललंय. जेवणाची वेळ आहे ना, गर्दी आहे भरपूर. आता रात्रीच्या जेवणाची तयारी चालल्ये.”
“ क्षिती वेट्रेस शी बोलायचं आहे.तिने तास भरासाठी सुट्टी घेतली तर चालेल का? गर्दी नसेल तेव्हा?” पाणिनी न विचारलं
“ पटवर्धन सर, तुमच्यासाठी काहीही ! कुठे पाठवू तिला ? बोला.”
“ माझ्या ऑफिस मधे.”
“ ती हजर असेल.”
“ तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम नाही ना?” पाणिनी न विचारलं
“ बिलकुल नाही. दोन दिवसापूर्वी तुम्हाला सर्व्हिस देणारी हीच ना ती?”
“ तीच.”
“ तिने तुम्हाला काही प्रस्ताव नाही ना दिला,?”
“ मीच तिला एक प्रस्ताव दिलाय राजे.”
राजे हसला. “ मग हरकत नाही ! ती येईल .”
फोन ठेवल्यावर पाणिनी सौम्या ला म्हणाला, “ बुटा बद्दल खात्री आहे तुझी?”
“ शंभर टक्के.”
ते ऐकून पाणिनी पटवर्धन अस्वस्थ झाला.आणि त्याच्या सवयी प्रमाणे ऑफिस मधे येरझऱ्या मारायला लागला.
सौम्या ला त्यांची मानसिकता माहीत असल्याने तिने त्यात अजिबात व्यत्यय आणला नाही.
(प्रकरण ८ समाप्त)